Sunday 27 February 2022

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७६

                                                 पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७६             

                  गप्पा ७४ मध्ये चार मुली असून त्या लक्ष देत नसल्याने शुभार्थी आईची दुरावस्था कशी होत आहे. याबद्दल लिहिले होते.त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या.लगेच गप्पा ७५ मध्ये मयूर श्रोत्रीयची यावरची संयत प्रतीक्रिया दिली होती.इतरही सकारत्मक उदाहरणे लिहायचे कबुल केले होते.पण मध्ये बराच काळ गेला मला लिहिणे जमले नाही म्हणून ही पार्श्वभूमी लिहिली.गप्पा ७४ आणि ७५ ची लिंकही देत आहे.

               स्पीचथेरपीस्ट नमिता जोशींनी पार्किन्सनसंबंधी बोलण्यासाठी अमरावतीच्या मोहिनी आळशी याना मला संपर्क करायला सांगितले त्या आता बेंगलोरला मुलाकडे होत्या.थोड्या नैराश्याकडे झुकत होत्या.त्यांचा मुलगा हृषीकेश यांनी लगेच व्हिडीओ कॉल केला.बेंगलोरला मराठी बोलणारे कोणी नसल्याने त्या कंटाळल्या होत्या.माझ्याशी बोलून त्या खूपच रीलॅक्स झाल्या ग्रुपमध्ये हृषीकेश आणि त्याही सामील झाल्या.घरातल्या आश्वासक वातावरणात स्वमदतगटाची मदत मिळाल्याने आता त्या खुश होत्या.पहिल्या भेटीपासूनच कुटुंबीय त्यांची व्यवस्थित काळजी घेतात हे लक्षात आले होते.त्याच्या पुढील पोस्टमुळे त्याच्याविषयीच्या कौतुकात भर पडली.              

              'कुणाला नर्सिंग डिग्री बद्दल माहिती आहे का? मला माहिती हवी आहे की नर्सिंगसाठी कोणत्या डिग्री available आहेत आणि त्या कारण्यासाठी वयोमर्यादा आहेत कोणती?   नर्स hire करण्यापेक्षा स्वतःच नर्सिंग च education घेऊन पार्किन्सन च्या रुग्णाची सेवा करता येईल का? - हा पर्याय practical आहे का? या बद्दल तुमचं मत अनुभव शेअर कराल का? धन्यवाद 🙏'

              याची त्याला आवश्यकता का वाटते सांगणारी आणखीन एक पोस्ट आली.

              " माझ्या आईचे वय ६३ आहे आणि तिला सुमारे दोन वर्षांपासून स्लो मूव्हमेंट्स चा त्रास व्हायला सुरवात झाली आहे. आज ती स्वतःचे सगळे काम करू शकते परंतु पुढल्या काही वर्षात तिला मदतीची गरज भासू शकते. पुढे मदतनीस आणि अजून पुढे नर्स हायर करावी लागू शकते. परंतु मदतनीस/नर्स आत्मीयतेने लक्ष देतील असा विश्वास वाटत नाही, अनेकांचे तसे अनुभव आहेत. त्यामुळे स्वतःच नर्स ची डिग्री घ्यावी का - असा विचार येतोय. या ग्रुप वर असा प्रश्न अनेकांना पडला असेल तेंव्हा त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा होता. आत्ता तात्काळ नर्स ची गरज नाही म्हणूनच आताच या पर्यायाचा विचार केला तर पुढे जेंव्हा गरज पडेल तेंव्हा हि डिग्री कामात येऊ शकेल. मी वर्कीग आहे पण पार्टटाइम किंवा वीकएंड्सला नर्सिंग चे शिक्षण घेता येईल का असा विचार येतोय."
             त्यांनी केअरटेकरचा एक ऑनलाईन कोर्स शोधून चालूही केला.
            शमा जोशीचे उदाहरण तर स्तिमित करणारे.तिच्या आईच्या निधनानंतर वडील एकटे पडले.ते मुलीकडे राहायला तयार नव्हते त्यामुळे आपला संसार सोडून हीच वडिलांच्या घरी राहायला गेली.नवरा मधून मधून येऊन जाई.त्यात पार्किन्सन झाला.दोन वर्षांनी त्यांनाच मुलीची ओढ होते हे जाणवले आणि ते मुलीकडे यायला तयार झाले. शमा तिची मुलगी आठवीतला मुलगा आणि नवरा सर्वचजण त्यांची काळजी घेत. त्यात त्यांचे दुखणे डिमेन्शियावर गेले त्यांना सांभाळणे खूपच कठीण झाले.तिने तपस या अल्झायमरग्रस्तांसाठी असलेल्या संस्थेत ठेवायचे ठरवले.कोणालाच न ओळखणाऱ्या तिच्या वडिलांना काय समजले माहित नाही पण ते रडू लागले.त्याना घर सोडून जायचे नाही असे दिसते.असा शमाने विचार केला.तपसमध्ये ठेवणे बारगळले.ब्युरोची चौकशी करण्यासाठी तिचा फोन आला.दिवस रात्र माणूस ठेवण्यापेक्षा जवळ राहणारा माणूस थोड्या वेळासाठी ठेवला.त्यात घरात कोविदने प्रवेश केला.शेजारीच एक खोली  मिळाली तेथे माणूस ठेऊन तात्पुरती सोय केली.
              वृद्धत्वाने त्यांचे निधन होईपर्यंत तिने आणि तिच्या सर्व कुटुंबाने त्यांची सेवा केली.या सर्वांनी दुसरी भावंडे आहेत त्यांनी ठीदा भर उचलावा असा विचार न करता स्वत:चे कर्तव्य पार पाडले.१३ वर्षाने आता तिचा स्वत:चा संसार सुरु झाला. 
             शुभार्थी  लतिका अवचट याना झेपत होते तोपर्यंत पती, पत्नी राहत होते.पतिना पक्षाघात झाल्यावर मुलांनी आपल्याकडे आणले त्यांची दोन्ही मुले सुना त्यांना पाहत असतात. त्यांची प्राध्यापक सून आपल्या whatsapp ग्रुपवर आहे.लतीकाताई सभांना येत असत. ते शक्य होईना पण फोनवर संपर्कात असतात.त्यांच्याशी बोलताना त्यांची काळजी घेतली जाते हे जाणवते.
            शुभार्थी शुभदा गिजरे यांच्या अनुभवाचा व्हिडिओ युट्युबवर आहे तो अवश्य पाहावा.
            अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
              हल्लीची पिढी स्वकेंद्रित आहे.आई, वडिलांना पाहत नाहीत, मुलीना प्रेम असते, मुलांना नसते.स्त्रियाच सेवा चांगली करु शकतात असे अनेक पूर्व ग्रह अनेकांच्या मनात असतात.आमच्या विविध शुभंकरांची उदाहरणे हे गैरसमज दूर करतात.
               https://parkinson-diary.blogspot.com/2021/12/blog-post_28.html

            https://parkinson-diary.blogspot.com/2021/12/blog-post_19.html
            


No comments:

Post a Comment