Wednesday 30 December 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ६३

                                               पार्किन्सन्सविषयक गप्पा  - ६३

                                        पार्किन्सन्सवर नियंत्रण आणणारा एक रामबाण उपाय मला माहित आहे.हा प्रयोगाने कोठेही सिद्ध झालेला नाही.तरीही यावर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही.आमच्या अनेक शुभार्थींच्यावर याचा झालेला उपयोग मी पाहिलेला आहे.उत्सुकता वाढली ना? सांगते सांगते.मंडळी नातवंडाचे आगमन हा तो उपाय.ज्यांच्याकडे नातवंड आली त्यांना नक्की पटले असेल.तसे प्रत्येकालाच ही दुधावरची साय निर्भेळ आनंद देते.पण पार्किन्सन्स शुभार्थींच्याबाबत ही साय त्यांचा आजार विसरायला लावते  हे महत्वाचे.

                                     आमचे मंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे यांच्या उत्साहाला अमेरिकेहून मुले नातवंडे आली की उधाण येत असे.दुसरे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन यांच्या घरी त्यांच्या मुलाला मुलगा झाला म्हणून आम्ही सर्व पहायला गेलो होतो.नेहमी थकलेल्या पटवर्धन वहिनी उत्साहित दिसत आहेत हे सर्वाना जाणवले.त्यांनीही हसत हसत याला दुजोरा दिला.आमच्याकडेही नातवंडे आली की ह्यांचा एखादा डोस विसरला जातो पण त्याने काही फरक पडत नाही.

                                 हे सर्व आत्ताच आठवायचे कारण म्हणजे मृदुला कर्णीला ५/६ महिन्यापूर्वी नातू झाला.सध्या लॉकडाऊनमुळे घरून काम करायचे आहे त्यामुळे मुलगा, सून पुण्यात आहेत.मृदुलाकडे फोन केला की  नातवाबद्दल किती सांगू आणि किती नको असे तिला होते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे शुभार्थी कर्णी यांच्या वागण्यात नातवंड आल्यापासून खूपच बदल झाला.ते आनंदी असतात. त्यांची एक गोळी कमी झाली.पार्किन्सन्स  मित्रमंडळाचा सोमवारी 'भेटू आनंदे' हा ऑनलाईन  कार्यक्रम असतो.२८ तारखेच्या सोमवारी शुभंकरांच्या अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम होता.त्यावेळी मृदुला  आणि त्यांच्याकडे अनेक वर्षे असलेला केअरटेकर रवी यांनी कर्णी यांच्यात झालेल्या बदलाची माहिती सांगितली.कर्णी यांचे मूड स्विंग असायचे ते कमी झाले.नातू रडला की ते सर्वांना रागवतात.नातवाची छोटी छोटी कामे आवडीने करतात.स्वत:च्याच कोशात असणारे कर्णी आता कुटुंब प्रमुखाच्या अविर्भावात वावरत असतात.मृदुलाचा गोड नातू आयुष त्याच्याही नकळत आजोबांचा शुभंकर झाला आहे.या छोट्या शुभंकराचे  स्क्रीनवर दर्शनही झाले.सभेत उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच ते सुखावह वाटले.

                                           

                                   

                                 

Saturday 19 December 2020

आठवणीतील शुभार्थी - नारायण कलबाग

                                                  आठवणीतील शुभार्थी - नारायण कलबाग

                          ' परंतु यासम हा' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे आमचे कलबाग काका होते. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान.उर्जा स्त्रोत,तन,मन धनानी  पार्किन्सन्स मित्रमंडळाशी  एकरूप झालेले कलबागकाका म्हणजे जेष्ठ शुभार्थी नारायण कलबाग.यांचे ३० सप्टेंबर २०२० ला ९६ व्या वर्षी निधन झाले.तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.तरीही ते सेन्चुरी नक्की करतील असे वाटत होते.त्यांच्याशी अजून किती तरी विषयावर बोलायचे होते सर्व राहून गेले.माझा शेवटचा फोन lock down च्या काळात झाला.

                         .कलबागकाका  हे आदर्श शुभार्थी  (पेशंट ) होते..त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका  एकटेच राहात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत  नाही तर इतरांनाही मदत करत.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला होता.. त्यानुसार दिनचर्या आखली.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली.

                          Lock down काळात त्यांच्याकडे येणारा मसाजवाला सकाळी थोड्या वेळासाठी आणि रात्री येणारा केअर टेकर येत असेल का अशी काळजी मला वाटत होती..म्हणून चौकशीसाठी सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.

             मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची काही दिवस राहिली आणि ती आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो.हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.

                              त्यांच्या फोनच्या डीपीवर आमच्या मंडळाच्या सहलीच्या वेळचा वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असतानाचा फोटो होता. ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येत.सह्लीना येत.
                          मंडळात ते सामील झाले तेंव्हा बहुदा त्यांची  ८५ वर्षे उलटून गेली होती.मध्यंतरी आता हयात नसलेल्या जुन्या शुभार्थीच्या घरी जाऊन भेटी द्यायचे ठरले कलबागांची पत्नी पेशंट होती.शेखर बर्वे त्यांच्या घरी गेले तर कलबागांची भेट झाली.ते म्हणले मला आता पार्किन्सन्स झाला आहे मला मंडळात सामील करून घ्या.ते सामील झाले आणि आमच्यातलेच झाले.सभेच्यावेळी फार बोलता येत नसे पण सहलीत गप्पा होत. त्यांचे नवनवीन पैलू तुकड्यातुकड्याने समजत गेले.त्यांच्या तरुणपणातील मुंबईच्या साहित्यिक,सांस्कृतिक, वैद्यकीय,शैक्षणिक वर्तुळात त्यांचा संचार होता.त्या काळाचा ते चालताबोलता इतिहास होते.आचार्य अत्रे,विजय तेंडुलकर,वसंत देसाई अशी बुजुर्ग मंडळी त्यांच्या उठण्या बसण्यातील होती.वसंत देसाई यांच्या कार्यक्रमात ते सहभाग ही घेत असत.
                          .त्यांनी न्यूरॉलॉजिकल आजारावरची वृत्तपत्रातील, मासिकातील कात्रणे काढून ठेवली होती.ती वेगवेगळ्या आजारानुसार लावून ठेवली होती.ती त्याना आमच्याकडे सुपूर्द करायची होती.त्यांच्याकडे येणाऱ्या केअरटेकरच्या मुलीची शिक्षणासह सर्व जबाबदारी त्यांनी घेतली होती.ते दीडदोन तास सलग बोलायचे.दमतील म्हणून त्याना थांबावावे लागायचे.
                         माझे नाव त्याना आठवायचे नाही मग ते डॉक्टर म्हणायचे.मागच्या वर्षीच्या सहलीत दुपारी कोणाला आराम करायचा असेल तर वेळ ठेवला होता.कलबाग म्हणाले डॉक्टर जरा बसा बोलायचे आहे.मला त्यांनी विश्रांती घ्यावी असे वाटत होते.पण गप्पा हीच त्यांची विश्रांती असावी.बसमधून येताना त्याना छोटी छोटी गावे दिसली.आय.एम,ए.चे अध्यक्ष अविनाश भोंडवे त्यांचे Family Doctor. त्यांच्याशी बोलतो हे फॉर्म हाऊस छान आहे येथे डॉक्टर्सची मिटिंग घेऊन आजूबाजूच्या गावातील वैद्यकीय प्रश्नांचा  आढावा घ्यावा.ते प्रश्न सोडवावे असा त्यांचा विचार होता.त्यासाठी फार्महाउसचा फोन नंबरही त्यांनी घेतला.आम्ही बसमधून येताना गमती जमती करत होतो पण हा अनेक आजार असलेला ९५ वर्षाचा तरुण भोवतालच्या खेड्यांचा विचार करत होता.त्यांची यासाठी पैसे खर्च करायची तयारी होती. त्यांच्याविषयीच्या आदरानी मी नतमस्तक झाले.असे क्षण त्यांनी वेळोवेळी दिले.नंतर त्यांच्या  डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली.ते बरेच दिवस भाच्याकडे मुंबईला होते.हा विषय मागे पडला असावा.
                          सोमवार ११ डिसेंबर ला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती  कलबागकाकांचा  फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले..ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान  कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
                              त्यावर्षी आम्ही एप्रिलमधील जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात कलबाग काकांचे इशस्तवन ठेवायचे ठरवले. आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर (केअरटेकर) असा इशस्त्वनात सहभाग असायचा.आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असल्याने.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते. सकाळी त्यांचा फोन आला.'मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?'त्याप्रमाणे ते आलेही.
                                  ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले'.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला  तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील' असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते   त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.प्रमुख पाहुणे डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
                       त्यांच्याकडे सांगण्याजोगे  खूप होते..कोणीतरी त्यांच्याशी  बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.त्यांच्या दिनचर्येचा व्हिडिओ केंला पाहिजे असे आम्हाला  वाटत होते.पण सर्व राहूनच गेले याची फारफार हळहळ वाटते.
.आपल्या परिवारातील वडिलधारे माणूस गेल्याची भावना आम्हा सर्वांच्याच मनात आहे.कलबागकाका आमच्यासाठी तुम्ही कायम प्रेरणा स्थान राहाल.
                      
            

                
                      
 


 


Sunday 8 November 2020

मी शुभंकर

                                                   मी शुभंकर

                                                प्रदीपना पीडी झाला तेंव्हा त्याच काहीच वाटलं नाही, कारण त्याने रोजच्या जीवनात काहीही फरक पडला नाही. ते आपली सगळी कामं स्वत:ची स्वत:च करायचे .गाडी पण चालवायचे. फक्त स्कूटर चालवू शकत नव्हते. पण त्याने काही बिघडत नव्हतं. त्यांच्या वडिलांना पार्किन्सन होता.ते  ४ वर्षे बिछान्याला खिळून होते.  तशी वेळ प्रदीपवर येईल असं कधीच वाटलं नाही ,आताही वाटत नाही.
                                           पण मधल्या काळात, म्हणजे  २०१७ मध्ये घरात काही समस्या  सुरू झाल्या. आणि या कौटुंबिक समस्येचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला.पीडीचं उग्र रूप दिसायला लागलं.  चालताना तोल जायला लागला , रात्री बिछाना ओला व्हायला लागला, जेवताना अंगावर सांडायला लागलं. न्यूरॉलॉजिस्टने डोस वाढवून दिला ,यूरोलॉजिस्टने गोळ्या दिल्या. २४  तास ब्यूरोचा माणूस ठेवला, थोडा रिलीफ मिळाला.
                                        मग मुलाने बावधनला घर घेतलं म्हणून बघायला गेलो.तिथे ब्यूरोचा माणूस नव्हता. ४  दिवसांसाठी गेलो होतो.  कामाला बाई नव्हती. त्यातच पुन्हा रात्री कपडे, बिछाना ओला झाला. उठून सगळं बदलून होईपर्यंत सकाळ झाली.मी रात्रभर जागीच होते. चहा, नाष्टा, अंघोळ उरकून कपडे धुवायला गेले तर वॉशिंग मशीन बंद पडलं होतं. कपडे धुवून, स्वैपाक करून कसंबसं आटपलं आणि जरा पडले तर प्रदीप उठवायला आले.मी खूप थकून गेले होते. रात्रभर झोप झाली नव्हती.खूप चिडचिड झाली, काय करावं समजेना.  रात्री मुलाशी बोलले, त्याला माझी अगतिकता आणि बाबांची असुरक्षितता दोन्ही जाणवले असावे.तो म्हणाला, "बाबांना इनसेक्युअर वाटत असणार, म्हणून तुझी पाठ सोडत नाहीत. तू जरा सहन कर". मग पार्किन्सनन्स मित्रमंडळाच्या Whats app ग्रुपवर  मी माझे मन मोकळे केले. शोभनाताई, रेखाताई, रमेशजी असे बऱ्याच जणांचे फोन आले, त्यामुळे धीर आला.
 रेखाताईनी मलाच डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला हवी असं सांगितलं.पण मला स्वतःसाठी वेळच नव्हता.
परत बेळगावला आलो.इथे कामाला माणसे मिळाली, थोडी स्थिरावले.
दरम्यान मित्रमंडळाच्या मीटिंगला गेलो होतो. तिथे उषा कुलकर्णी भेटली.तिच्याही यजमानांना पीडी होता.बेळगावला  आमची घरे जवळ होती. मग ओळख वाढली. खूप दिवसांची मैत्री असावी असे बंध जुळले.
  थोड्या दिवसांनी धाकट्या मुलाने गुडगावला येण्यासाठी विमानाचं तिकीट पाठवलं. बरोबर आमचे व्याही पण येणार होते. पुण्याला आलो, जागा वेगळी, रात्री बाथरूमला जाताना पडायला नको म्हणून डायपर लावला. त्याचा त्यांना राग आला. तोपर्यंत डायपर वापरावा लागत नव्हता ,रात्री उठून बाथरूमला जायचे.रात्री डायपर काढून टाकला आणि बाथरूमला गेले. तिथे पाय घसरून पडले. हाताला लागलं, पण लगेच  दिल्लीला जायचं म्हणून डॉ. कडे गेले नाही.  तिथे गेल्यावर डॉ. ना दाखवलं. त्यांनी फ्रॅक्चर नाही पण हात हलवायचा नाही, असे सांगून बांधून ठेवला. ड्रेसिंग करून गोळ्या दिल्या. ४ दिवसांनी सूज गेली पण १५ दिवस अंघोळ,संडास , भरवणं, कपडे बदलणं सगळं मलाच करावं लागलं .
बेळगावला आलो, परत हात सुजला. इथल्या डॉ. नी फ्रॅक्चर आहे असे सांगितले. पण जखम भरली नाही म्हणून दर २ दिवसांनी प्लास्टर काढून ड्रेसिंग करायचं, परत प्लास्टर घालायचं शिकवलं.
 रात्री प्रदीप प्लास्टर काढून टाकायचे. त्यात न्यूरॉलॉजिस्टने डोस आणखी वाढवला. मग चक्कर यायला लागली ,शिवाय प्रदीपना डिप्रेशनही आलं.  आता आपण जगत नाही असं प्रदीपच्या मनाने घेतलं. खाणे, पिणे, फिरणे सगळे कमी झाले. १चपाती, १ चमचा भाजी किंवा आमटी, ३ चमचे दही एवढंच जेवण.  बनियन फाटला तरी नवा नको,  हाच राहूदे, चप्पल नवी नको ,मी कुठे जाणार असं करायला लागले.मलाही त्यांचा भरवसा वाटेना.
                                    त्यांचा ७५ वा वाढदिवस आला. निदान सगळे भेटू देत म्हणून माझ्या आणि त्यांच्या भावंडांना कुणी कसलंही गिफ्ट आणायचं नाही या अटीवर रहायला बोलावलं. २ दिवस घरात ३५ माणसे होती  खूप बडबडलो, एकत्र जेवलो, रात्री अंताक्षरी खेळलो.दुसऱ्या दिवशी वाढदिवस. सगळे देवळात जाऊन आलो.  संध्याकाळी मुलांनी हॉल घेऊन छोटासा समारंभ केला. मेजवानी दिली. आम्ही लवकर घरी आलो पण दुसऱ्या दिवशी सगळे जाताना प्रदीप त्यांना पोचवायला गेटपर्यंत जायला लागले ,हसून आभार मानायला लागले आणि पहिल्यांदाच प्रसन्न दिसले.
                                  दरम्यान होमिओपॅथीची Gelhemium,Brain Tonic  R 57, Calcarea Fiu , Silicea,   Kali Phos सुरू केलं. त्याबरोबरच फ्लॉवर रेमेडीची  Gorse , Oak, Agree many Larch  द्यायला लागले.त्याचा  परिणाम दिसायला लागला.
                                 मी पण  फ्लॉवर रेमेडीमधील Elm , Hornbeam, Olive आणि Impatient घ्यायला लागले माझी चिडचिड कमी झाली.माणसं नसली तरी कामाचा त्रास वाटेना. म्हणूच तर त्यांच्या पंचाहत्तरीचा बेत आखू शकले आणि निभावू शकले.
                              आता त्यांचा तोल जाणं कमी झालं, चालणं सुधारलं,  मुख्य म्हणजे निराशा कमी झाली ',आपला काही उपयोग नाही' हे विचार गेले आणि जेवण पण सुधारले.आता ते ३ चपात्या, १ डाव भाजी, १ डाव आमटी, अर्धी वाटी दही आणि अर्धा कप सूप घेतात. नॉनव्हेज असलं तर मागुन घेतात.आता त्यांना फारशी मदत लागत नाही.
                            आता मी पंचामृत , च्यवनप्राश ,सकाळी १ केळे द्यायला लागले,  दुधातून शंखपुष्पी, अश्वगंधा, हळद द्यायला लागले आणि खूपच सुधारणा दिसायला लागली.
                       मदतीला माणसे मिळाली म्हणून मी अहमदाबादला Statue  of  Unity बघायला जायचं ठरवलं.कोणाची कंपनी मिळेना ,तेंव्हा प्रदीप येतो म्हणाले.  केसरीच्या ऑफिसमध्ये विचारलं तर सगळी मदत करू म्हणाले, मग आम्ही गेलो.५ दिवसांची टूर होती , सह्प्रवाश्यांनी पण खूप मदत केली आणि प्रदीपनी टूर एन्जॉय केली. फक्त फार चालणे होते, तेथे व्हील चेअर घेतली. मग स्वतःच मित्रमंडळाच्या सहलीला जाऊया म्हणाले, म्हणून बेळगावहून खास सहलीसाठी पुण्याला आलो.  तिथंही त्यांनी ओरिगामीत भाग घेतला.बक्षीसही मिळवले. खेळात प्रत्यक्ष भाग घेतला नाही पण एन्जॉय केलं.  त्याच सगळं क्रेडिट सहल अरेंज करणाऱ्यांना.
 आता त्यांची दिनचर्या अशी :
सकाळी १ टेबल स्पून खोबरेल तेल, मग चहा बरोबर १ बिस्कीट आणि न्यूरॉलॉजिस्टची औषधे,  ८ ला होमिओपॅथीचा १ डोस
८.३० ला नाष्टा, १ ग्लास दूध अश्वगंधा, हळद, शंखपुष्पी घालून.
११ ला १ चमचा च्यवनप्राश, १ केळं, १ डाव पंचामृत.
 १२.३० ला होमिओपॅथीचा २ रा डोस,
 १  ला जेवण,
 3 ला चहा,
 ५ ला होमिओपॅथीचा 3 रा डोस
  ६ ला बदाम, अक्रोड, डिंक घालून लाडू,
८  ला जेवण.
सकाळच्या चहा नंतर ८.३०  पर्यंत फिजिओथेरपीचे व्यायाम, प्राणायाम, उन्हात फिरणे,
 १०.३० ला सायकलिंग
 ५ ते ६ - २ किलोमीटर फिरणे
लघवीवरच्या प्रॉब्लेमवर आधी यूरॉलॉजिस्टच्या गोळ्या देत होते, त्या बंद करून A पिल्स सुरू केल्या. आता Natrum Mur आणि Causticum  देते.
अंगाला खाज यायला लागली होती, स्किनस्पेशालिस्टने गोळ्या, मलम दिले होते ते पण आता बंद झाले.. खाज आली तर आता  Rhustox देते.
वर सांगितलेली औषधे मी त्यांचा स्वभाव, आवडी बघून दिली आहेत,ती सर्वांना लागू पडणार नाहीत.हे वाचून कोणी प्रयोग करू नये. मी पुण्याला १  वर्षाचा होमिओपॅथीचा कोर्स केला आहे.लहान असताना मुलांनाही औषधे द्यायची.त्यामुळे याचा मला अनुभव आहे.होमिओपॅथी आणि आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला  घ्यायला  हरकत नाही. 
आणि एक गोष्ट म्हणजे प्रदीपना ऑन ऑफ पिरियड नाही, गोळ्या घायला विसरले तरी काही फरक पडत नाही.
आणि आता तर मला असं वाटतं की ते यातून पूर्ण बरे झाले नाही तरी आपलं जीवन स्वावलंबी जगू शकतील.मी केअरटेकरच्या भरवशावर आता एखादा दिवस गावालाही जाऊ शकते.माझ्यासाठी वेळ देऊ शकते.
.'जगणे नको पासून जगण्यातला आनंद घेण्याच्या' प्रदीप यांच्या  अवस्थेसाठी औषधोपचाराबरोबर,आहार,व्यायाम,समजून केलेले पूरक उपचार,दिनचर्येतील नियमितता,प्रवासासारखे छंद जोपासणे,स्वमदत गटात सामील होणे  या सर्वांचा सहभाग आहे.या लेखाचे नाव 'मी शुभंकर' हेही प्रदीपने सुचविले.
 माझ्या अनुभवातून' 'धीर सोडू नका'  असे मी आवर्जून सांगते. शुभंकरानी स्वत: खचून न जाता,शुभार्थीची मानसिकता लक्षात घेऊन हळुवारपणे शुभार्थीला हाताळायला हवे.
शुभंकर अशा नाडकर्णी


Wednesday 28 October 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६२

                                      





    पार्किन्सन्सविषयक गप्पा  ६२

                      आमचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांना आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडावे असे सांगण्यासाठी मी फोन केला.विषय कोणता या बाबत विचारले तर म्हणाले, सध्या माझा करोनावर अभ्यास चालू आहे.त्यांचा करोना या आजाराचे स्वरूप,करोनाच्या चाचण्या,करोनामुळे होत असलेले सामाजिक मानसिक परिणाम असा  करोना वर विविधांगी अभ्यास आकडेवारीसह झाला होता.एकीकडे या विषयाकडे तटस्थपणे पाहात असताना करोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या दोन घटना वाचून ते व्यथित  झाले होते आणि यासाठी जेष्ठांसाठी स्वमदत गट तयार करावा का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.२००० मध्ये त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हाचाच उत्साह आज ८५ व्या वर्षी तब्येतीच्या थोड्या तक्रारी असूनही पाहून मी अवाकच झाले.

याच्या उलट मी करोनाविषयी अजिबात वाचायची नाही.बातम्या पहायच्या नाही. प्राथमिक माहिती आहे तेवढी बस झाली असा विचार करणारी.अनेक मानसोपचार तज्ञही सारख्या अशा  बातम्या पाहू नका, ऐकू नका असे सांगत असलेले दिसले.मध्यंतरी एक शुभार्थी करोनामुळे गेल्याने whats app group वरच्या अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली मी पाहिली.त्यामुळे यावर काही लिहायचे नाही असे मी ठरवले होते.पटवर्धन यांच्या करोनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे  मला या विषयावर गप्पा माराव्या असे वाटले.या वातावरणात निराश झाला असाल घाबरला असाल तर ग्रुपमधल्या कोणाशी तरी बोलून मन मोकळे करा आमच्या whats app group वर सामील व्हा,व्हिडिओ कॉन्फरन्स जॉईन करा,ऑनलाईन डान्सक्लास जॉईन करा हेही आवर्जून सांगावेसे वाटले.या गप्पातून थोडी माझ्यापर्यंत पोचलेली सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न.

 करोना हा रक्तदाब,मधुमेह,कर्करोग हे आजार असणाऱ्यांना धोकादायक आहे असे सांगितले जाते.अर्थात हे आजार असणारेही करोना झाल्यावर सही सलामत बाहेर पडल्याची उदाहरणे आहेतच.इंडिअन मेडिकल असोशिएशनचे डॉ.अविनाश भोंडवे आणि न्यूरॉलॉजिस्ट डॉ.श्रीपाद पुजारी यांनी आपल्या व्याख्यानात पार्किन्सन्स हा आजार या यादीत नसल्याचे सांगितले.त्यामुळे हायसे वाटले.तरीही पार्किन्सन्स झालेले बरेच जण जेष्ठनागरिक असतात त्यामुळे त्यादृष्टीने मात्र काळजी घेतली पाहिजे असेही सांगितले होते.येथे करोनाविषयी मी जास्त लिहिणार नाही. परंतु करोनाची भीती थोडी कमी करणारे काही अनुभव लिहिणार आहे.

लॉकडाऊन मध्ये घरात राहावे लागते याबद्दल आमच्या शुभंकर, शुभार्थीना समस्या वाटत नव्हती पण बऱ्याच जणांना इतर काही आजारामुळे किंवा पार्किन्सन्स वाढल्यामुळे हॉस्पिटल मध्ये जावे लागले तर आपल्याला करोनाची लागण होईल अशी भीती वाटते.पण अनेकांना पर्याय नसल्याने हॉस्पिटल गाठावे लागले.सुरुवातीला पार्किन्सन्स वाढल्याने एका शुभार्थीना हॉस्पिटलाईज करायची गरज वाटली त्यावेळी कोविद्ची तपासणी झाल्याशिवाय कोणतेही हॉस्पिटल admit करायला तयार नव्हते कोविद्च्या टेस्ट आता घरीही येऊन घेतल्या जातात तशा तेंव्हा नव्हत्या. ससून मध्ये न्यायची वेळ आली.तेथे टेस्ट निगेटिव्ह निघाली.नंतर शस्त्रक्रिया झाली.त्यानंतर दोन महिने नर्सिंग होम मध्ये राहावे लागले परंतु करोना मात्र निगेटिव्ह राहिला. आमच्या मंडळाच्या कार्यवाह आशा रेवणकर यांचे पती रमेश रेवणकर याना त्यांचे दोन्ही हात खूप भाजल्याने आठवड्यातून तीनदा अनेक दिवस सर्जनना दाखवायला  जावे लागत होते.शिवाय घरीही ड्रेसिंगसाठी तास सव्वा तास लागायचा ही सर्व काळजी आशाने उत्तमप्रकारे घेतली..( हे भाजले कसे याची मोठ्ठी कथा आहे ती पुन्हा सांगेनच).अर्थोपेडीककडेची वारीही झाली. त्यातच त्यांची शेजारीणच कोविद पॉझिटिव्ह निघाली.परंतु या सगळ्यातून करोना यांच्यापर्यंत पोचू शकला नाही.आता ते पुर्ववत होऊन दिवाळीचा आकाशकंदील करायच्या तयारीला लागले आहेत.

शुभार्थी वनिता कुलकर्णी घरातच पडल्या.खांद्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागणार होती.सर्व तपासण्या नॉर्मल होत्या पण कोविद टेस्ट पॉझिटिव्ह निघाली.ती निगेटिव्ह आल्याशिवाय शस्त्रक्रिया शक्य नव्हती.त्याना लक्षणे कोणतीच नव्हती.मुलगा आणि सून यांनी त्याना घरातच क्वारेनटाइन करून उत्तम काळजी घेतली.शस्त्रक्रिया होईपर्यंत प्रचंड वेदना सहन करणे हे मात्र वनिताताईनाच करावे लागले हेवी पेन किलर त्याना दिल्या होत्या.पण त्यांनी धीर सोडला नाही.शस्त्रक्रिया क्रिटीकल होती हाडांचे तुकडे झाले होते.ती यशस्वी होऊन त्या घरीही आल्या.मी त्यांच्याशी बोलल्यावर त्या या सर्व काळात मनाने कोलमडल्या नव्हत्या हे लक्षात आले.त्यांची सूनही म्हणाली त्या अगदी पॉझिटिव्ह होत्या.

मनाने न खचता  कोविद्शी लढा देऊन पूर्ववत झालेल्या माझ्या नवऱ्याची गोपाळ तीर्थळी यांची कथा थोडी विस्ताराने सांगायची आहे कारण घरचाच अनुभव आहे.ती पुढच्या गप्पात.या सर्वात योग्य डॉक्टर केअरटेकर,कुटुंबीय हितचिंतक यांचाही मोठ्ठा रोल असतो हे नक्की.येणाऱ्या परिस्थितीला धीराने तोंड देणे ही महत्वाचे.बऱ्याचशा समस्या घाबरून गेल्यानेच वाढतात.

 


Tuesday 6 October 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६१

                                              पार्किन्सन्सविषयक गप्पा ६१   

                                   मागच्या गप्पात  डॉ. सतीश वळसंगकर यांच्यावर लिहिले होते.या गप्पात त्यांच्या पत्नी भूल तज्ज्ञ( Anesthesiologist ) डॉ.क्षमाताई वळसंगकर यांच्यावर लिहित आहे.शुभंकर, शुभार्थीची ही युनिक जोडी आहे.त्या आमच्या संपर्कात एकदोन वर्षापूर्वी whats app द्वारे आल्या.आणि आमच्यातल्याच होऊन गेल्या.

.आमच्या Whats App  group चे नाव  Parkinsons info & sharing असे आहे.पार्किन्सन्सशिवाय काही बोलायचे नाही असे ठरले होते.पण  करोनाचे संकट आल्यापासून थोडी मोकळीक दिली गेली आणि  शुभंकर आणि शुभार्थींच्या क्रिएटिवीटीला उधाण आले आहे.गीता पुरंदरे यांची ताजी टवटवीत फुलांची आरास आणि भूल तज्न डॉ.क्षमाताई वळसंगकर यांच्या तितक्याच टवटवीत नित्य नूतन कविता सर्वांची मने प्रफुल्लीत करत असतात.पर्किन्सन्सला थोडे विसरायला लावतात.अनेकाना त्यांच्या कविता वाचून बा.भ.बोरकर,इंदिरा संत,अरुणा ढेरे यांच्या कवितांची  आठवण येते..क्षमा ताईंची कविता सखी त्यांच्या कामाच्या व्यापातून त्या आपल्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही हे लक्षात येऊनही  स्वस्थ होती आता त्या थोड्या मोकळ्या आहेत म्हटल्यावर ती उफाळून वर आली आणि आता ती पिच्छा सोडत नाही आहे.खरे तर त्यांच्या कविता हा स्वतंत्र लेखाचा विषयआहे.

त्यांची पहिली ओळख झाली ती त्यांनी शेअर केलेल्या 'दूर चांदण्याच्या गावा' या अलबम मधून.क्षमाताईंनी लिहिलेल्या गाण्यांना नीरज करंदीकर यांनी स्वरसाज दिला होता.सुरेशजी वाडकर,आर्या आंबेकर आणि प्रियांका बर्वे यांच्यासारख्या वलयांकितांनी गाणी गायली होती.२२ डिसेंबर २०१९ ला याचे सोलापूर येथे प्रकाशन झाले होते.पहिली एन्ट्रीच अशी दमदार झाली होती.नंतर त्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचे अविष्कार आम्ही आ वासून पाहतच राहिलो.यापूर्वी उधाण हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.आता दुसरा कविता संग्रह बनेल इतक्या कविता तयार आहेत.

अतुल ठाकूरनी तुमच्या कविता वेबसाईटवर टाकल्या तर चालतील का विचारले.त्यावर त्यांनी 'चालेल ना' म्हणत लगेच परवानगी दिली. ' माझा हेतू फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात आंनदाचे काही क्षण देता यावे एवढाच आहे.व्यवसायाने मी anesthesiologist  असल्याने दुसऱ्याच्या वेदना कमी करणे हे काम मी गेली ४० वर्षे करत आहे.कविता वेबसाईटवर दिल्याने मला आनंदच होईल असे त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले.आणि त्यांच्याशी फोनवर बोलण्याईतका मोकळेपणा माझ्यातही आला.फोनवर बोलताबोलता  त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समाजत गेले.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे बाळकडू लहानपणीच मिळाले.छानछोकीपेक्षा वडिलांनी वाचनाची चैन पुरविली.हवी ती पुस्तके विकत आणून दिली.पुण्यात वाचनालयांचीही कमी नव्हती.मराठी हिंदी,इंग्रजी सर्व भाषातील विविध विषयावरची पुस्तके वाचली.व्यक्तिमत्वाची परिपक्वता,सारासार विवेक,मनाचा उमदेपणा,सर्जनशीलता असे आयुष्यभरासाठी पुरणारे पाथेय यातून मिळाले.

एम.बी.बी.एस.झाल्यावर इंटर्नशिप चालू होती आणि डॉ.सतीश वळसंगकर यांच्याशी विवाह झाला.पुरोगामी उदारमतवादी सासरी व्यक्तिमत्व आधीकच उजळले.सासऱ्यांचे हॉस्पिटल होते.गरिबांचे डॉक्टर म्हणून ते ओळखले जात.तेथेच इंटर्नशिप पूर्ण केली.सासऱ्यांनी जर्मन शिकायला लावले.ड्रायव्हिंगही शिकल्या.पुण्यात येवून बीजेमधेच एम.डी.( Anesthesiology ) प्रथम क्रमांकाने पारितोषिकासह केले.आणि स्वत:च्याच हॉस्पिटलमध्ये आणि स्वतंत्रपणेही Practice सुरु केली.

पुण्याहून सोलापूरसारख्या छोट्या गावात गेल्यावर जमवून घेणे त्याना फारसे कठीण गेले नाही.सकाळी पाच वाजल्यापासून दिवस सुरु व्हायचा.रात्री आठपर्यंत शस्त्रक्रिया असायच्या.भूल तज्ञाचे काम किती महत्वाचे असते ताण  प्रचंड असणार.पण हे काम त्यांच्या आवडीचे. मेंदूच्या शस्त्रक्रीयानाही भूल दिली.सोलापूरला असल्याने विविध तर्हेच्या शस्त्रक्रिया हाताळता आल्या.पुण्यात कदाचीत इतका अनुभव मिळाला नसता असे क्षमाताईना वाटते.एकुणात आहे त्या परिस्थितीतून चांगले शोधायचा त्यांचा गुण त्यांच्याशी बोलताना मला जाणवला.

या नियमित कामाबरोबर १९९८ मध्ये 'इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्टस,सोलापूर' शाखेचे अध्यक्षपद भूषविले.राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील भूलात्ज्ज्ञांच्या परिषदेत अभीभाषणे केली.शास्त्रीय निबंध आणि शोध निबंधासाठी प्रथम पारितोषिके मिळवली.स्वत:चे हॉस्पिटल असल्याने व्यवस्थापकीय जबाबदार्या होत्याच. वळसंगकरांच्या घरात या सर्वाला प्रोत्साहनच मिळाले.दीर.पुतण्या,जाऊ,नणंद,मुलगा ,सून सर्वच डॉक्टर.कुटुंब रंगलय वैद्यकीय व्यवसायात असे यांच्याबाबत म्हणता येईल.या सर्वात करियर आणि पैसा यामागे न धावता मिशन म्हणून व्यवसायाकडे पाहिले.हे करताना नाते संबंध, सगेसोयऱ्यांची ये जा,त्यांचे अदारातीथ्य,सणसमारंभ हेही आवडीने सांभाळले.आमची कार्यकारिणी सदस्य सविता ढमढेरे त्यांच्या न्यूरॉलॉजिस्ट दिराना दाखवण्यासाठी सोलापूरला गेली होती.येताना परतीच्या रेल्वे प्रवासात क्षमाताईनी डबा करून दिला. एवढ्या व्यापातून त्यांनी दाखवलेल्या  अगत्याचे तिला अप्रूप वाटले होते.त्या, नणंद आणि जाऊ एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेतच पण सुनेच्या वैद्यकीय कर्तुत्वाबद्दल बोलतानाही त्याना किती सांगू किती नको असे होते.

 हे सर्व पाहिल्यावर सुखी माणसाचा सदरा यांच्याकडेच मागावा असे वाटेल नाही का? पण तसे नाही.त्यांच्या आयुष्यातही कठीण निर्णय घ्यावे लागलें असतील,अडचणी आल्या असतील पण त्यांचा बाऊ न करता, त्यांनाच कुरवाळत न बसता आनंदाने  जगण्याचे मार्ग दोघांनीही शोधले.

 डॉक्टरना पर्किन्सन्स झाला तेंव्हा  एका प्रतिथयश सर्जनला हाताला कंप सुरु झाल्यावर मानसिक त्रास झालाच असेल. शस्त्रक्रिया करणे  करणे बंद केल्यावर .त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून शस्त्रक्रिया  करणाऱ्या क्षमाताईना निश्चितच त्यांची उणीव जाणवली असेल.हॉस्पिटची बरीच जबाबदारी क्षमा ताईना सांभाळावी लागली असेल.खाजगी हॉस्पिटल सांभाळणे आजचे वैद्यकीय क्षेत्रातले,नियम,कायदेकानू ,पेशंटची बदलती मनोवृत्ती,डॉक्टरना मारहाण करण्याच्या घटना पाहता तारेवरची कसरत असते..क्षमा ताई या त्रासदायक बाजूबद्दल न बोलता या व्यवसायाने दिलेल्या आनंदा बद्द्लच बोलतात.

वास्तवाकडे तटस्थतपणाने पाहता आल्याने .आलेल्या परिस्थितीनुसार योग्यवेळी योग्य निर्णय त्यांनी सहजपणे घेतले.अद्ययावत अशी नवी हॉस्पिटलची इमारत बांधली होती.१५ वर्षे  हॉस्पिटल चालवले.पण वेळ आल्यावर  .हॉस्पिटल विकण्याचा निर्णयही  घेतला. भूलतज्ज्ञ म्हणून त्यांचे काम मात्र चालूच होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे एप्रिल २०२० मध्ये काम बंद केले आणि त्यानंतर राहून गेलेल्या छंदाकडे वाट वळवली.यापूर्वीही ६२ व्या वर्षी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते.आता कविता करणे आणि त्या सादर करणे या छंदासाठी त्यांना वेळ मिळू लागलाय..चित्रकलेच छंदही नव्याने डोके वर काढत आहे.

एक शुभंकर म्हणून जबाबदाऱ्या आहेतच.. डॉक्टरांचा स्वभाव कामात झोकून देण्याचा.एक डॉक्टर म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांच्या औषधाच्या वेळा सांभाळण,.पार्किन्सन्सला मोनिटर करण्याचे काम करावे लागतेच.डॉक्टरांचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यात त्यांच्या सकारात्मकतेचा वाटा आहे तसा क्षमाताईंच्या बरोबर असण्याचाही आहे.

पार्किन्सन्स मित्रमंडळात त्यांच्या असण्याने आम्हालाही विशेषता मला आधार वाटतो.माझ्या पार्किन्सन्स विषयक विविध लेखातून चुकीची माहिती जात नाही ना अशी मला भीती असते.क्षमाताईंचा त्या डॉक्टर असल्याने यासाठी आधार वाटतो.क्षमा ताई तुम्ही आमच्या ग्रुपसाठी asset आहात.

Image may contain: 1 person, standing, tree, plant and outdoor



 



                                 

Tuesday 22 September 2020

आठवणीतील शुभार्थी - लीलाताई माडीवाले

                                                 आठवणीतील शुभार्थी - लीलाताई माडीवाले 

 

                                    पार्किन्सन्स  मित्रमंडळाच्या परगावच्या शुभंकर, शुभार्थींच्यापर्यंत पोचण्यासाठी आज वेबसाईट,फेसबुक, whats app, व्हिडीओ कॉन्फरन्स अशी विविध साधने आहेत..सुरुवातीच्या काळात मात्र लिखित साहित्य, फोन,पत्रे, पत्रके याशिवाय साधन नव्हते. फोनवरील संपर्क वन टू वन असायचा.आणि इतर साधने खर्चिक,पोस्टावर अवलंबून राहावे लागत असल्याने.खात्रीलायकही नव्हती.त्यावेळीही पुण्यात आलेल्यावेली भेटणे,सभेला हजर राहणे असे अनेक सदस्य करीत.पण ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याजोगी होती. त्या काळातील आज  हयात नसलेल्या अनेकांची आज आठवण येते. प्रत्यक्ष पाहिले नसले तरी जो काही थोडाफार संपर्क झाला त्यातून जवळीक निर्माण होई..त्यातील एक नाव म्हणजे लीलाताई माडीवाले..त्यांच्या तज्ज्ञत्वाच फायदा आम्हाला घेता आला नाही.

                                 ११ जुलै २००९ मध्ये सर्व सदस्यांची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले.तेंव्हा परगावच्या सदस्यांनाही प्रश्नावली पाठवली होती अनेकांनी प्रश्नावली भरून पाठवल्या.त्यात लीलाताईंचीही प्रश्नावली होती.नर्सिंग क्षेत्रात त्यांनी ३३ वर्षे काम केले होते.निवृत्तीच्यावेळी त्यांचा हुद्दा प्रिन्सिपल नर्सिंग ऑफिसर होता.याशिवाय त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन विषयात एम.ए.केले होते.नर्सिंगवर त्यांनी मराठीतून पुस्तके लिहिली होती.निवृत्तीनंतरही त्यांचे लेखन वाचन सुरूच होते.मंडळाने पाठवलेली स्मरणिका त्याना पोचली होती.त्यातले लेख त्याना माहितीपूर्ण, प्रेरणादायी वाटले होते.मंडळाने पत्रे पाठवून,फोनवर संपर्कात राहावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. 

              त्यांच्या या ओळखीत पत्रकार, प्राध्यापक असलेलेले रत्नागिरीचे माझे विद्यार्थी राजेन्द्रप्रसाद मसुरकर यांच्या भेटीमुळे भर पडली.ते कोणी पार्किन्सन्स पेशंट असल्यास मला कळवत असतात.तसेच त्यांनी लीलाताईंच्याबाबत सांगितले.ते नुकतेच लीलाताईना जुन्नर तालुक्यातील बेल्हे या त्यांच्या गावी भेटून आले होते.खूप प्रभावित झाले होते.त्या पंचाहत्तरीत होत्या.त्यांचे सारे शरीर पार्किन्सन्सने थरथरत होते आणि त्या स्वत:वर विनोद करत सांगत होत्या मी या वयात डान्स करते आहे पहा.स्वत:च्या अवस्थेबद्दल कोठेही रडगाणे न गाता त्या छान गप्पा मारत होत्या.कंपामुळे लिहिणे शक्य नसले तरी भावाला लेखनिक बनवून पुस्तके लिहित होत्या.मसुरकर यांनी २९ जुलै २०१० च्या तरुण भारतमध्ये त्यांच्यावर लेख लिहिला होता त्यातून बरीच माहिती समजली.

            लीलाताईनी नर्सिंगचा कोर्स केला होता तसा नर्सिंग टीचर डीप्लोमाही केला होता.अलिबाग,रत्नागिरी,कोल्हापूर येथे त्यांनी काम केले.फक्त कामापुरते काम अशी त्यांची वृत्ती नव्हती.एक शिक्षिका म्हणून त्याना प्रशिक्षणार्थीना भाषेची अडचण येते हे लक्षात आले.त्यांनी मराठीतून नर्सची कामे,जबाबदाऱ्या,दिनचर्या यावर लिहिले.खेडेगावातील स्त्रियांनाही पुस्तके उपयुक्त ठरतील हे लक्षात घेऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शरीरस्त्रावर पुस्तक लिहिले.सहज सोपी भाषा आणि भरपूर आकृत्या यामुळे पुस्तके लोकप्रिय झाली.

             आजूबाजूला समस्या दिसल्या की त्यावर त्या लगेच उपाय शोधत.त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचार्यांना साधा रजेचा अर्जही लिहिता येत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी कर्मचार्यांच्या दैनंदिन गरजांवर पुस्तक लिहिली.त्यांच्या नर्सिंगवरील पुस्तकांची गुजराथीत भाषांतरे झाली.

            आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देण्याचे काम त्या करत.रत्नागिरीत असताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या तरुणाला अर्धवट सोडलेले कॉलेज शिक्षण पूर्ण करायला लावले.त्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत:ही एम.ए.चा अभ्यास केला. व्याकरणावरही एक पुस्तक लिहिले.हे एक उदाहरण असे अनेकांचे जीवन त्यांनी मार्गी लावले. 

        त्यांच्या कर्तुत्वाची दखल सरकारनेही घेतली.महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या त्या सदास्य झाल्या.सुश्रुषा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले.पेशंट आणि उपचारक यांच्या नात्यात संवादाचे महत्व त्या जाणत होत्या. ते कमी होत आहे याची त्याना खंत होती.पण निराश न होता ही गरज पटवण्याचा त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला.निवृत्तीनंतरही पार्किन्सन्स आजाराला तोंड देत लेकानकाम चालूच ठेवले. 

         आम्ही परगावच्या सदस्यांशी संपर्क ठेवण्यात कमीच पडलो.लीलाताईंच्या तज्ज्ञत्वाच फायदा आम्हाला घेता आला नाही याची हळहळ वाटते.

            

             

          


Wednesday 16 September 2020

ऑनलाईन मासिक सभा - एप्रिल २०२० ते आक्टोबर २०२०

                                  ऑनलाईन मासिक सभा 

                           एप्रिल  २०२० ते  आक्टोबर  २०२० 

                           ४ एप्रिल २०२० रोजी  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता. करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मेळावा घेता आला नाही.                 

            लॉकडाऊनमुळे मासिक सभाही होणे शक्य नसल्याने अतुल ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सचा पर्याय सुचविला. त्याद्वारे नेहमीच्या मासिक सभेप्रमाणे दुसऱ्या सोमवारी व्याख्याने,शेअरिंग इत्यादी करायचे ठरले.पहिली ट्रायल मिटिंग   एप्रिल २०२० झाली.

           यानंतर आणखी काही ट्रायल मिटिंग झाल्या आणि पुढे प्रत्येक महिन्यात खालीलप्रमाणे मासिक सभा झाल्या.सर्व सभांचे रेकॉर्डिंग युट्युब चॅनेलवर आहे. त्याची लिंक वेबसाईटवर दिलेली आहे.सर्व सभांचे होस्ट डॉक्टर अतुल ठाकूर होते.
सभांचे फोटो काढण्याचे आणि रेकॉर्डिंगचे काम गिरीश कुलकर्णी यांनी केले. 

           ११ मे - डॉक्टर रेखा देशमुख - 'आनंदी कसे राहावे' या विषयावर व्याक्यान झाले.डॉक्टर शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.

           ८ जून - डॉक्टर अमित करकरे यांचे 'शुभांकाराविषयी सर्व काही' या विषयावर व्याख्यान झाले. शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.श्यामलाताई शेंडे यांनी आभार मानले.

           १३ जुलै - डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे 'आला पावसाला तब्येत सांभाळा' या विषयावर व्याख्यान झाले.त्यांच्या हस्ते स्मरणिका २०२० चे वेबसाईटवर ऑनलाईन प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.

           १० ऑगस्ट - नीलिमा बोरवणकर यांचे 'आठवणीतील मुलाखती या विषयावर व्याख्यान झाले..मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.

           १४ सप्टेंबर - डॉक्टर विद्या रवींद्र जोशी यांचे 'मनाचे श्लोक आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान झाले.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले. 

          १२ आक्टोबर - डायबिटीस आणि पार्किन्सन्स या सहचरांबरोबर गेली कित्येक वर्षे राहणारे डॉ.सतीश वळसंगकर पोटविकार सर्जन यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा असा कार्यक्रम होता..मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.  

           सभांचे फोटो काढण्याचे आणि रेकॉर्डिंगचे काम गिरीश कुलकर्णी यांनी केले.   

                 नोव्हेंबर २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत

                 ९ नोव्हेंबर २०२० - औरंगाबादचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.मकरंद माणिकराव कांजाळकर यांचे 'पार्किन्सन्स आणि अध्यात्म' या विषयावर व्याख्यान झाले.रमेश तिळवे यांनी ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी आभार मानले.

                 रविवार १३ डिसेंबर २०२० - मानसोपचार तज्ज्ञ मानसी देशमुख यांचे  'Psychoneuroimmunology' या विषयावर व्याख्यान झाले.विजयालक्ष्मी रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी समारोप केला आणि आभार  मानले.

                 ११ जानेवारी २०२१ - सुप्रसिद्ध एकपात्री कलाकर आणि हास्ययोगतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांचे 'हास्ययोगातून तणावमुक्ती' या विषयावर व्य्ख्यान झाले.शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.

                 ८ फेब्रुवारी २०२१  - डॉक्टर पराग ठुसे यांचे पार्किन्सन्ससाठी प्राणायाम या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.आशा रेवणकर यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.शोभना तीर्थळी यांनी समारोप केला आणि आभार मानले.

                 ७ मार्च २०२१ - न्यूरॉलॉजिस्ट डॉ.हेमंत संत यांचे पार्किन्सन्ससह पडण्याची समस्या या विषयावर व्याख्यान झाले.शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी समारोप                                          केला आणि आभार मानले.

                  एप्रिल २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत

                  रविवार  ११ एप्रिल  २०२१ -  ११ एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन असतो यानिमित्त प्रथमच लॉकडाऊनमुळे ऑनलाईन मेळावा घेण्यात आला.संस्थेच्या अध्यक्षा श्यामला शेंडे यांनी स्वागत केले.मृदुला कर्णीनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.नागपूरच्या मीनल दशपुत्र यांनी म्हटलेल्या प्रार्थनेचा ऑडीओ आणि मुंबईच्या मोहन पोटे यांनी प्रत्यक्ष प्रार्थना म्हटली.संस्थेचे संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर हृषीकेश पवार नृत्य सहभागींनी मनोगत व्यक्त केले.शुभार्थीच्या काल्कृती दाखविण्यात आल्या.त्याची माहिती शोभना तीर्थळी यांनी दिली..क्रिटिकलकेअर स्पेशालिस्ट डॉ.शिरीष प्रयागआणि कन्सल्टंट पॅथालॉजिस्ट डॉ.आरती प्रयाग यांनी 'दोन ध्रुव' (स्व.पु.ल.देशपांडेआणि स्व.विजय तेंडूलकर यांच्या प्रयाग हॉस्पिटलमधील उपचारा दरम्यानचे अनुभव) या विषयावर व्याख्यान झाले.वक्त्यांची ओळख अशा रेवणकर यांनी करून दिली.या प्रसंगी स्मरणिका २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षातील जोड स्मरणिकेचे प्रकाशन झाले.मृदुला कर्णी यांनी सूत्र संचालन केले.अतुल ठाकूर हे होस्ट तर गिरीश कुलकर्णी हे को होस्ट होते.

           १० मे २०२१ - न्युरोस्पीच पॅथालॉजीस्ट सोनाल चिटणीस यांचे 'Cognitive Neurorehabilitation in movement disorder.निलेश कुरावळे  ; Things to understand and address' या विषयावर व्याख्यान झाले.शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.अंजली महाजन
यांनी समारोप केला.आणि आभार मानले.

            १४ जून २०२१ - न्यूरोसर्जन डॉ.निलेश कुरवाळे यांचे डीबीएस शस्त्रक्रिया समज गैरसमज या विषयावर व्याख्यान झाले.शैलजा कुलकर्णी यांनी ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी
समारोप केला.आणि आभार मानले.

                  .१२ जुलै  २०२१ - मोटीवेशनल स्पिकर आणि कार्पोरेट ट्रेनर

संदीप दांडेकर यांचे 'मळभातला सुर्यप्रकाश' या विषयावर व्याख्यान झाले.अमिता धर्माधिकारी यांनी ओळख करून दिली..मृदुला कर्णी यांनी समारोप केला.आणि आभार मानले.
          
          ९ ऑगस्ट २०२१ -  मराठी चित्रपट क्षेत्र,संगीत नाटके,वेब सेरीज,भाडिपाचे उपक्रम यामधे आपला वेगळा ठसा उमटवणारा गुणी कलाकार निपुण धर्माधिकारी. याच्याशी मृदुला कर्णी यांनी दिलखुलास बातचित केली.
निपुण हा शुभार्थी डॉ. अविनाश धर्माधिकारी आणि शुभंकर डॉ.अमिता धर्माधिकारी यांचा सुपुत्र आहे.त्या दोघानाही गप्पात सामील करून घेतले होते.
         ५ सप्टेंबर २०२१ - शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत' या पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे ऑनलाईन प्रकाशन दिनानाथ मंगेशकर हास्पीटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.आशा रेवणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.आभार मानले.
        ९ ऑक्टोबर २०२१ - सुप्रसिद्ध वैद्य आणि योगतज्ज्ञ डॉक्टर पराग ठुसे यांचे 'Power in your hand' या विषयावर व्याख्यान झाले.व्याख्यानात पार्किन्सन साठी उपयुक्त मुद्रांची त्यांनी माहिती दिली.विलास गिजरे यांनी ओळख करून दिली.शोभना तीर्थळी यांनी आभार मानले.
         ८ नोव्हेंबर २०२१ - स्पीच थेरपिस्ट डॉ.नमिता जोशी यांचे 'Role of Speech therapist in intervention of speech,voice,and swallowing in individuals with Parkinson's Disease' या विषयावर व्य्ख्यान झाले.व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे यातून गिळणे,बोलणे,आवाज यासंबंधी अनेक शंकांचे निरसन झाले.डॉ.शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांचा परीचय करून दिला आणि आभार मानले. 
         १३ डिसेंबर २०२१ - आयुर्वेद सत्वावजय व सायकोथेरपिस्ट डॉक्टर यश वेलणकर यांचे 'भावनिक सजकता' या विषयावर व्याख्यान झाले.भावनांचे चार प्रकारात वर्गीकरण करून त्याना क्रमांक देत भावनिक सजकता कशी अंगीकारता येते हे सांगितले पार्किन्सनबाबत भावनिक सजकतेचे महत्व आणि त्यावर कृती हे उदाहरण देऊन सांगितले. अंजली महाजन यांनी ओळख करून दिली आणि आभार मानले
         १० जानेवारी २०२२ - संत साहित्याच्या अभ्यासिका, लेखिका डॉक्टर आरती दातार यांचे' हे जगणे आनंदाचे' या विषयावर व्याख्यान झाले.तरुण वयात दैवाच्या निर्घुण हल्ल्याशी  संघर्ष करत जगणे आनंदाचे कसे केले हा अनुभव सर्वाना भारावून टाकणारा होता.आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली व आभार मानले.
 
        १४ फेब्रुवारी २०२२ - नेत्रविशारद वैशाली नाबर यांचे 'Parkinson disease and Ophthalmic disorders' या विषयावर व्याख्यान झाले.त्यांनी समर्पक आणि माहितीपूर्ण स्लाईडच्या माध्यमातून डोळे, दृष्टी आणि पार्किन्सनमुळे त्यावर होणारे परिणाम याचा विस्तृत आढावा घेतला.शंका निरसनही केले.त्यांचा परिचय आणि आभार मानण्याचे काम शोभना तीर्थळी यांनी केले.
       १४ मार्च २०२२ - सूक्ष्म जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि विपश्यनेचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्र देवपूरकर यांनी 'मनस्थिती, परिस्थिती आणि विपश्यना' या विषयावर व्याख्यान झाले.आकृत्या,illustrations आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणे यांच्या सहाय्याने मनस्थितीचे कामकाज आणि मनाने सजकपणे परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी विपश्यनेची भूमिका स्पष्ट केली.त्यातील अनापन तंत्राची ओळख करून दिली.मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली व आभार मानले.          
               एप्रिल २०२२ पासून मार्च २०२३
        १० एप्रिल २०२२ - ११ एप्रिल हा जागतिक पार्किन्सन्स दिन असतो. यानिमित्त ऑनलाईन मेळावा घेण्यात आला.मृदुला कर्णीनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.सोलापूरच्या डॉ.सतीश वळसंगकर यांनी म्हटलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर.शुभार्थीच्या कलाकृती दाखविण्यात आल्या.त्याची माहिती शोभना तीर्थळी यांनी दिली.नृत्य गुरु हृषीकेश पवार यांनी २००९ पासूनचा नृत्य उपक्रमाचा आढावा विविध नृत्यफितीद्वारे घेतला.तांत्रिक अडचणीमुळे व्हिडीओचा काही भाग दिसला नाही. नंतर स्मरणिका  २०२२ चे  प्रकाशन मनोविकास तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. मृदुला कर्णी यांनी त्यांची ओळख करून दिली आणि 'मजेत कसे जगायचे' या विषयावर मुलाखत घेतली.अतुल ठाकूर हे होस्ट तर गिरीश कुलकर्णी हे को होस्ट होते.
      
       ९ मे २०२२ - डॉ.अरुणा नार्वेकर यांचे 'पार्किन्सन्सची कारणे आणि संभाव्य उपचार' या विषयावर विविध स्लाइडस् दाखवत व्याख्यान झाले.डॉ.गौरी भोंडे यांनी डोपामाईनची पातळी मोजण्या संबंधात थोडक्यात माहिती सांगितली.डॉ,अमिता धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक,स्वागत,वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.
         
       १३ जून २०२२ - सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या,डिमेन्शियांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या डॉ. मंगला जोगळेकर यांनी 'काळजीवाहक आणि ताण' या विषयावर व्याख्यान दिले.त्या २०१० पासून अल्झायमर स्वमदत गट आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे मेमरी क्लिनिक चालवत असल्याने त्यांच्या व्याख्यानाला अनुभवाची भक्कम बैठक होती.शुभंकरांसाठी हे व्याख्यान खूपच उपयुक्त होते.गौरी इनामदार यांनी सूत्रसंचालन केले.

      ११ जुलै २०२२ - न्युरोफिजिओथेरपिस्ट डॉ.पूनम गांधी यांचे पार्किन्सनच्या रूग्णामधील पडण्याची समस्या या विषयावर व्याख्यान दिले.पडणे कसे टाळता येईल आणि पडणे झाल्यास कमीतकमी कसे नुकसान होईल याचे तंत्र यावर त्यांनी भर दिला.तंत्र आत्मसात करताना मनोधारणाही महत्वाची हे सांगितले.विजायालक्ष्मी रेवणकर यांनी सूत्र संचालन केले.
      ९ ऑगस्ट २०२२ - पुण्यातील नामवंत डॉक्टर लिली जोशी यांनी "पार्किन्सन्स चे सह-आजार (को माॅर्बिडिटीज्)" या विषयावर मार्गदर्शन केले.अत्यंत माहीतीपूर्ण असे त्यांचे व्याख्यान होते.पेशंटचे विविध अनुभव सांगत त्यांनी व्याख्यान रंजक केले.शोभना तीर्थळी यांनी सूत्रसंचालन केले.गौरी इनामदार यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. 
       सप्टेंबर २०२२ -
मंगळवार दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी आपल्या 'मासिक सभेमध्ये,' पुण्यातील व्यावसायिक समाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ समुपदेशक डाॅ.अनुराधा करकरे ,यांनी
" Spiritual Well-being (अध्यात्मिक स्वास्थ्य)" या विषयावर मार्गदर्शन केले.हा वेगळा,थोडा abstract विषय त्यांनी विविध घटना अनुभव,कथा यांचा आधार घेत सोपा करून सांगितला.मृदुला कारणी यांनी सूत्र संचालन केले.
        ११ ऑक्टोबर २०२२ - पुण्यातील वृद्धकल्याण शास्त्राच्या अभासक,सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी पटवर्धन यांचे 'वृद्ध निवास' या विषयावर व्याख्यान झाले.वृद्ध निवासाचे विविध पर्याय त्यांनी सुचविले.त्यांच्या व्याख्यानाला प्रत्यक्ष अनुभवाचे अधिष्ठान असल्याने सर्वाना व्यावहारिक उपयोगाचे वाटले.गौरी इनामदार यांनी सूत्र संचालन केले.
       ८ नोव्हेंबर २०२२ - मंगळवार दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी ऑनलाईन 'मासिक सभेमध्ये,' डाॅ.प्रियदर्शनी कुलकर्णी,यांनी " Positivity in Palliative care" या विषयावर संवाद साधला.हा विषय तसा नवीनच आहे.प्रदीर्घ आजार, किंवा असा आजार जो पूर्णपणे बरा करण्याचा उपाय विज्ञानाकडे अजून नाही अशा आजाराच्या रुग्णांचे दुःख शक्य तितके दूर कसे होईल यासाठी धडपडणारे शास्त्र म्हणजे Palliative Care.असा हा विषय गंभीर न करता पेशंट आणि केअरटेकर हे कसे हाताळू शकतील याबाबत तोडगे सुचविले.विजयालक्ष्मी रेवण कर यांनी सूत्रसंचालन केले.
        १३ डिसेंबर २०२२ - डॉक्टर मनजितसिंग अरोरा यांचे 
'Handling of emergencies at home' या विषयावर व्याख्यान झाले. रंजकपणे आणि विनोदाची पेरणी करत त्यांनी विषय मांडला. रोजच्या व्यवहारात, इमर्जन्सी मध्ये काय चुका करतो आणि काय करायला हवे याचे मार्गदर्शन झाले.
        १० जानेवारी २३ - श्री. कार्लटन हिल (Carlton Hill) यांचे 'पार्किन्सन शुभार्थीसाठी Tai - Chi ( ताई ची)' या विषयावर व्याख्यान झाले.कार्लटन हिल हे ताई ची या चीनी व्यायाम,मेडीटेशन विद्येचे तज्ज्ञ आणि अभ्यासक आहेत.शुभार्थीना उपयुक्त आणि सोपे प्रकार त्यांनी सांगितले.काहींनी यानुसार कृतीलाही सुरुवात केली.
        दि.१४ फेब्रुवारी २०२३ - 'सुप्रसिद्ध समुपदेशक आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक डाॅ.प्रतिभा देशपांडे यांनी "मानसिक प्रथमोपचार"या एका नवीन संकल्पनेवर संवाद साधला.श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना प्रतिभाताईंनी उत्तरे दिली.मृदुला कर्णी यांनी सूत्र संचालन केले.
         दि.१४ मार्च २०२३ - पुत्तूर कर्नाटक मधील वैद्य्रास आयुर्वेद हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जाना आणि डॉ. राम यांनी ' Effective Ayurveda Treatment for Parkinson's Disease' या विषयावर स्लाईड शोसह व्याख्यान दिले.आयुर्वेदाचे मुळापासुन व्याधी बरी करण्याचे महत्व त्यांनी अधोरखित केले.गौरी इनामदार यांनी दोन्ही वक्त्यांचा परिचय करून दिला व आभार मानले. 
                मे २०२३ ते मार्च २०२४
        दि.९ मे २०२३ - पुण्यातील नामवंत न्यूरॉलॉजिस्ट डॉ.पूर्णिमा गौरी यांचे 'पार्किन्सन आणि भास' या विषयावर व्याख्यान झाले.त्यांनी सर्वांच्या जिव्हाळ्याच्या या विषयाची अत्यंत सोप्या भाषेत माहिती सांगितली.ही समस्या कशी हाताळायची याचे मार्गदर्शन केले.वसुंधरा केळकर यांनी प्रास्ताविक केले आशा रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.  
       १३ जून २०२३ - नाशिकचे श्री,सुनील देशपांडे यांचे 'जाणून घेऊया अवयवदान' या विषयावर व्याख्यान झाले.या विषयाबद्दल जागरुकता वाढवण्याचे ते गेली २५ वर्षे काम करत आहेत.यासाठीचे फॉर्म कोठे मिळतील याचीही माहिती सांगितली.गौरी इनामदार यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले.
        ११ जुलै २०२३ - न्युरो सर्जन डॉ.सारंग रोटे यांचे 'Non Invasive Ultrasound Procedure विषयावर व्याख्यान झाले.सध्या पर्किन्सन्स उपचारामध्ये शस्त्रक्रियेविना Ultrasound ध्वनीलहरींचा  वापर करून बाहेरून उपचार करण्याचे तंत्र विकसित झाले आहे.या बाबतीतील माहिती त्यांनी Power Point Presentation च्या आधारे सांगितली.श्रोत्यांच्या विविध प्रश्नाना उत्तरे दिली.सोनाली मालवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली,मृदुला कर्णी यांनी आभार मानले. 
         १२ सप्टेंबर २०२३ - पुण्यातील सुप्रसिद्ध फिजिशियन आणि अतिदक्षता ( Intensive and critical care ) तज्ज्ञ डॉ.शिरीष प्रयाग यांचे व्याख्यान झाले. "ICU समज गैरसमज" असा विषय होता.विषय जिव्हाळ्याचा आणि गंभीर होता.डॉक्टरांनी अत्यंत सहजपणे गैरसमज दूर करत भारतीय पातळीवरील वास्तव मांडले.श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना न कंटाळता उत्तरे दिली.
        १० ऑक्टोबर २०२३ - सुप्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ज्ञ (  ENT ) वीरेंद्र घैसास यांचे व्याख्यान झाले.पार्किन्सन्समधील गीळण्याच्या, बोलण्याच्या तसेच जेष्ठांच्या ENT संबंधातील सर्व साधारण समस्यांचा परामर्श त्यांनी आपल्या व्याख्यानात घेतला.त्यांच्या वडिलांना पार्किन्सन्स होता त्यामुळे त्यांच्या व्याख्यानात एक भावनिक धागा होता.आशा रेवणकर यांनी सूत्रसंचालन केले.
                   १२ डिसेंबर २०२३ - न्युरोयोग तज्ञ डॉ.सरिता झळकिकर यांनी पार्किन्सन्स शुभार्थीसाठी न्युरो योग या विषयावर व्याख्यान दिले. पार्किन्सन्सच्या विविध लक्षणावर न्युरो योगा कसे काम करते हे सांगितले.त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या फिटनेस आणि न्युरो योग तज्ज्ञ जान्हवी प्रभुदेसाई यांनी न्युरोयोगात समाविष्ट असलेल्या अनेक बाबींचे प्रात्यक्षिक करून घेतले.आशा रेवणकर यांनी सूत्रसंचालन केले.

        जानेवारी २०२४ - जानेवारीत वर्षाची सुरुवात म्हणून नेहमीच वेगळा कार्यक्रम ठेवत असतो.यावेळी डॉ. अविनाश बिनीवाले यांच्या "भाषा आपली सर्वांचीच" या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन करण्यात आले प्रथम अमिता धर्माधिकारी यांनी सर्व पुस्तकाचा थोडक्यात आढावा घेतला.त्यानंतर अविनाश धर्माधिकारी,आशा रेवणकर आणि मृदुला कर्णी यांनी एकेक प्रकरण वाचले.शेवटी अविनाश बिनीवाले यांनी आपले मनोगत मांडले.

       १३ फेब्रुवारी २०२४ - न्युरो फिजिओथेरपिस्ट पूनम गांधी यांचे "Improving caregiver's quality of life after Parkinson's
disease" या विषयावर व्याख्यान झाले.स्लाईड्सच्या आधारे त्यांनी विषय सोपा करून सांगितला.आंतरविद्याशाखीय (Multidisciplinary) अभ्यासाचे महत्व सांगितले.साधना डोईफोडे यांनी सूत्रसंचालन केले. 
         १२ मार्च २०२४ - Neuro Occupational Therapist चैत्राली कुलकर्णी यानी "पर्किन्सन्ससाठी Occupational Therapy" या विषयावर व्याख्यान दिले.व्यावसायोपचार (Occupational Therapy) म्हणजे काय? पार्किन्सन्स शुभार्थीसाठी  उठल्यापासून झोपेपर्यंतच्या सर्व दैनंदिन व्यवहारात या थेरपीचा उपयोग करून अवलंबित्व कसे कमी केले जाते याचे स्लाईडसच्या सहाय्याने विवेचन केले.शोभना तीर्थळी यांनी सूत्रसंचालन केले.