Sunday 27 February 2022

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७६

                                                 पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७६             

                  गप्पा ७४ मध्ये चार मुली असून त्या लक्ष देत नसल्याने शुभार्थी आईची दुरावस्था कशी होत आहे. याबद्दल लिहिले होते.त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या.लगेच गप्पा ७५ मध्ये मयूर श्रोत्रीयची यावरची संयत प्रतीक्रिया दिली होती.इतरही सकारत्मक उदाहरणे लिहायचे कबुल केले होते.पण मध्ये बराच काळ गेला मला लिहिणे जमले नाही म्हणून ही पार्श्वभूमी लिहिली.गप्पा ७४ आणि ७५ ची लिंकही देत आहे.

               स्पीचथेरपीस्ट नमिता जोशींनी पार्किन्सनसंबंधी बोलण्यासाठी अमरावतीच्या मोहिनी आळशी याना मला संपर्क करायला सांगितले त्या आता बेंगलोरला मुलाकडे होत्या.थोड्या नैराश्याकडे झुकत होत्या.त्यांचा मुलगा हृषीकेश यांनी लगेच व्हिडीओ कॉल केला.बेंगलोरला मराठी बोलणारे कोणी नसल्याने त्या कंटाळल्या होत्या.माझ्याशी बोलून त्या खूपच रीलॅक्स झाल्या ग्रुपमध्ये हृषीकेश आणि त्याही सामील झाल्या.घरातल्या आश्वासक वातावरणात स्वमदतगटाची मदत मिळाल्याने आता त्या खुश होत्या.पहिल्या भेटीपासूनच कुटुंबीय त्यांची व्यवस्थित काळजी घेतात हे लक्षात आले होते.त्याच्या पुढील पोस्टमुळे त्याच्याविषयीच्या कौतुकात भर पडली.              

              'कुणाला नर्सिंग डिग्री बद्दल माहिती आहे का? मला माहिती हवी आहे की नर्सिंगसाठी कोणत्या डिग्री available आहेत आणि त्या कारण्यासाठी वयोमर्यादा आहेत कोणती?   नर्स hire करण्यापेक्षा स्वतःच नर्सिंग च education घेऊन पार्किन्सन च्या रुग्णाची सेवा करता येईल का? - हा पर्याय practical आहे का? या बद्दल तुमचं मत अनुभव शेअर कराल का? धन्यवाद 🙏'

              याची त्याला आवश्यकता का वाटते सांगणारी आणखीन एक पोस्ट आली.

              " माझ्या आईचे वय ६३ आहे आणि तिला सुमारे दोन वर्षांपासून स्लो मूव्हमेंट्स चा त्रास व्हायला सुरवात झाली आहे. आज ती स्वतःचे सगळे काम करू शकते परंतु पुढल्या काही वर्षात तिला मदतीची गरज भासू शकते. पुढे मदतनीस आणि अजून पुढे नर्स हायर करावी लागू शकते. परंतु मदतनीस/नर्स आत्मीयतेने लक्ष देतील असा विश्वास वाटत नाही, अनेकांचे तसे अनुभव आहेत. त्यामुळे स्वतःच नर्स ची डिग्री घ्यावी का - असा विचार येतोय. या ग्रुप वर असा प्रश्न अनेकांना पडला असेल तेंव्हा त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा होता. आत्ता तात्काळ नर्स ची गरज नाही म्हणूनच आताच या पर्यायाचा विचार केला तर पुढे जेंव्हा गरज पडेल तेंव्हा हि डिग्री कामात येऊ शकेल. मी वर्कीग आहे पण पार्टटाइम किंवा वीकएंड्सला नर्सिंग चे शिक्षण घेता येईल का असा विचार येतोय."
             त्यांनी केअरटेकरचा एक ऑनलाईन कोर्स शोधून चालूही केला.
            शमा जोशीचे उदाहरण तर स्तिमित करणारे.तिच्या आईच्या निधनानंतर वडील एकटे पडले.ते मुलीकडे राहायला तयार नव्हते त्यामुळे आपला संसार सोडून हीच वडिलांच्या घरी राहायला गेली.नवरा मधून मधून येऊन जाई.त्यात पार्किन्सन झाला.दोन वर्षांनी त्यांनाच मुलीची ओढ होते हे जाणवले आणि ते मुलीकडे यायला तयार झाले. शमा तिची मुलगी आठवीतला मुलगा आणि नवरा सर्वचजण त्यांची काळजी घेत. त्यात त्यांचे दुखणे डिमेन्शियावर गेले त्यांना सांभाळणे खूपच कठीण झाले.तिने तपस या अल्झायमरग्रस्तांसाठी असलेल्या संस्थेत ठेवायचे ठरवले.कोणालाच न ओळखणाऱ्या तिच्या वडिलांना काय समजले माहित नाही पण ते रडू लागले.त्याना घर सोडून जायचे नाही असे दिसते.असा शमाने विचार केला.तपसमध्ये ठेवणे बारगळले.ब्युरोची चौकशी करण्यासाठी तिचा फोन आला.दिवस रात्र माणूस ठेवण्यापेक्षा जवळ राहणारा माणूस थोड्या वेळासाठी ठेवला.त्यात घरात कोविदने प्रवेश केला.शेजारीच एक खोली  मिळाली तेथे माणूस ठेऊन तात्पुरती सोय केली.
              वृद्धत्वाने त्यांचे निधन होईपर्यंत तिने आणि तिच्या सर्व कुटुंबाने त्यांची सेवा केली.या सर्वांनी दुसरी भावंडे आहेत त्यांनी ठीदा भर उचलावा असा विचार न करता स्वत:चे कर्तव्य पार पाडले.१३ वर्षाने आता तिचा स्वत:चा संसार सुरु झाला. 
             शुभार्थी  लतिका अवचट याना झेपत होते तोपर्यंत पती, पत्नी राहत होते.पतिना पक्षाघात झाल्यावर मुलांनी आपल्याकडे आणले त्यांची दोन्ही मुले सुना त्यांना पाहत असतात. त्यांची प्राध्यापक सून आपल्या whatsapp ग्रुपवर आहे.लतीकाताई सभांना येत असत. ते शक्य होईना पण फोनवर संपर्कात असतात.त्यांच्याशी बोलताना त्यांची काळजी घेतली जाते हे जाणवते.
            शुभार्थी शुभदा गिजरे यांच्या अनुभवाचा व्हिडिओ युट्युबवर आहे तो अवश्य पाहावा.
            अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
              हल्लीची पिढी स्वकेंद्रित आहे.आई, वडिलांना पाहत नाहीत, मुलीना प्रेम असते, मुलांना नसते.स्त्रियाच सेवा चांगली करु शकतात असे अनेक पूर्व ग्रह अनेकांच्या मनात असतात.आमच्या विविध शुभंकरांची उदाहरणे हे गैरसमज दूर करतात.
               https://parkinson-diary.blogspot.com/2021/12/blog-post_28.html

            https://parkinson-diary.blogspot.com/2021/12/blog-post_19.html
            


Wednesday 16 February 2022

आठवणीतील शुभार्थी - आरती तिळवे

                                                   आठवणीतील शुभार्थी - आरती तिळवे

                       आज नीलाचा ( आरती ) वाढदिवस. तिची प्रकर्षाने आठवण येत आहे.खरे तर तिने दिलेले क्रोशाचे फुल मी माझ्या कपड्यांच्या कपाटावर लावलेले आहे.ते पाहून रोजच तिच्या अनेक आठवणी दाटून येत असतात.   

                      ती पूर्वाश्रमीची नीला कॉलेजमध्ये माझ्या वर्गात होती आणि शुभंकर रमेश तिळवे तीर्थळींचे बालमित्र.बेळगावला एका गल्लीत राहत होते.हल्ली खूपच क्वचित गाठीभेटी होत.परंतु पार्किन्सनने आमच्या नात्याची विण घट्ट केली.१८ साली ते पार्किन्सन मित्रमंडळात आणि Whatsapp ग्रुप मध्ये सामील झाले.आणि परीवाराचे महत्वाचे घटक झाले.ग्रुपचे admin झाले. ग्रुपमध्ये त्यांनी आपल्या विविध कलाकृतींनी जान आणली.त्यांच्या बरोबरीने निलाच्याही नवनवीन कलाकृती येऊ लागल्या.ग्रुपसाठी ती एक शुभंकर, शुभार्थीची आदर्श जोडी झाली. तिच्याकडून करून घेतलेल्या व्यायामाचे व्हिडीओ ते टाकू लागले.फोन Whats app वरून संपर्क होत होता परंतु प्रत्यक्ष भेटीची ओढ वाटू लागली.

            औरंगाबादला असल्याने मासिक सभेस हजर राहता येत नव्हते.मासिक सभांचे फोटो पाहून निलालाही एकदा सभेला यावे असे वाटत होते.आणि तसा योग लवकरच जुळून आला.तीर्थळी आणि रमेशभाऊंचे कॉमन मित्र मदन जहागीरदार हे अमेरिकेहून बऱ्याच वर्षांनी पुण्याला येणार होते. पुण्यात सर्व मित्रांचे गेट टुगेदर ठरले. त्याचवेळी आमची १३ जानेवारीला मासिक सभा आणि तिळगुळ समारंभ असणार होता.नीलाला प्रवास झेपत नव्हता म्हणून बाहेर पडणे होत नव्हते पण आता या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने तीही उत्साहाने तयार झाली.हे दोघे आणि त्यांचा मुलगा गिरीश १२ तारखेलाच पुण्यात आले.

              १३ तारखेला सकाळी ते आमच्याकडे आले.आणि आमच्या घरूनच आम्ही सभेला गेलो हा अगदी छोटा वाटणारा काळ आम्हा सर्वांसाठी खूप क्वालिटी टाईम देवून गेला.वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत असे वाटले.नीलाने स्वत: केलेले तिळाचे लाडू आणले होते.ती आनंदात होती.तिचा पार्किन्सन शाहण्यासारखा वागत होता. तीही एका जागी बसून न राहता मधून मधून उठत होती फेऱ्या मारत होती.पीडीला सहकार्य करत होती.नीला,रमेशभाऊ आणि गिरीश आणि बरोबरीने पार्किन्सन मित्र यांच्यातील समन्वय,नाते याचे मला मनापासून कौतुक वाटत होते. त्यादिवशी भोगी होती.बेळगावकर असल्याने भरले वांगे,बाजरीची भाकरी,खोबऱ्याची कढी,पत्रवडे असा भोगी स्पेशल टिपिकल बेळगावी स्वयंपाक होता.बेळगावच्या आठवणी काढत रमतगमत जेवण झाले.

                नीलाने स्वत: तयार केलेली लेस लावलेले रुमाल संक्रांतीचे वाण म्हणून आणले होते. सभेला साधारण किती बायका असतात हे औरंगाबादहून निघण्यापूर्वीच त्यांनी विचारून घेतले होते.मी म्हटले, 'हे देण्यापूर्वी सगळे एकत्रित ठेवून फोटो काढू'. फोटो काढला खूपच छान दिसत होता. थरथरत्या हाताने केलेले हे सुंदर काम सर्वाना प्रेरणादायी ठरणार होते.संक्रांतीसाठी काळे कपडे घालायचे ठरले होते.नीलाने स्वत: भरलेली काळी साडी आणली होती.शुभार्थीना साडी नेसणे आणि ती सांभाळणे किती कठीण असते हे घरात शुभार्थी असणाऱ्यांनाच समजू शकते.येथेही रमेशभाऊंची मदत होती.

               चारच्या मिटींगसाठी तीन सव्वातीन पर्यंत निघणे गरजेचे होते.आम्ही चहा घेऊन निघालो.या सर्वात नीलाला आराम करण्यास थोडाही वेळ मिळाला नव्हता तरी ती फ्रेश होती.सभेला गेल्यावर सगळ्यांच्या ओळखी झाल्या.सभा संपल्यावर नीलाने सर्व स्त्रियांना रुमाल वाटले.सर्वाना ते खूपच आवडले.

               आमच्या घरची भेट खुपच धावती झाली होती.पुन्हा आम्ही गेटटुगेदरसाठी 'ला मेरेडीयन' मध्ये भेटलो.ही फारच थोड्या वेळाची भेट त्यात अनेकजण होते.तरीही भेटीत तृष्टता मोठ्ठी असे वाटत होते.

                औरंगाबादला परत गेल्यावर, दोनतीन दिवसातच तिला पुणे भेटीत मी दिलेली पुस्तके तिने रंगउन त्याचे फोटो पाठवले होते. तिचा उरक आणि तत्परता यामुळे मी थक्क झाले. ती हाडाची कलाकार. पेंटीग,विणकाम,भरतकाम,क्रोशावर्क असे ती पीडी होण्यापूर्वीही करत होती.पीडीमुळे थोडा वेग कमी झाला असेल पण मनाचा उत्साह कमी झाला नव्हता.ती कॉलेजमध्ये असताना खेळाडू होती हे स्पोर्ट्समन स्पिरीट आणि रमेशभाऊ, गीरीशसारखे शुभंकर यामुळे ती पार्किन्सनसह आनंदी राहू शकत असावी.

               ११ एप्रिलच्या कार्यक्रमातील कलाकृती प्रदर्शनासाठी कलाकृती तयार करण्यासाठी आता  मी तिच्या मागे लागले.तिने नातीसाठी दोन क्रोचे फ्रॉक,१ स्कर्ट,परकर - ब्लाउज,एक भरलेली साडी तयार केली होती पण उन्हाळ्यामुळे येऊ शकत नाही असे तिने कळवले.हे सर्व प्रदर्शनात मांडायचे राहून गेले.

                पुणे भेटीनंतर जवळीक,मैत्री अधिकच वाढली.तिच्यातील स्टोरी टेलर माझ्या लक्षात आली होती.जेवताजेवता तिने दिल्ली भेटीचे गमतीदार किस्से सांगितले होते.पीडीबद्दलचे अनुभव स्मरणिकेसाठी द्यायची  मी तिला विनंती केली.तिने भासावरचा तिचा अनुभव पाठवून दिला. सर्वाना तो खूप आवडला.कोणी भासाच्या समस्येबाबत बोलू लागले की मी तिचा हा लेख पाठवून देते त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.अनेकांच्या ओळखी झाल्याने  आता Whatsapp group वरही ती चांगलीच रमली होती.

             याच काळात मला कॅन्सरने गाठले.माझा सर्वकडचा वावर कमी झाला.शुभार्थीना त्रास नको म्हणून सांगितले नव्हते.मी बरी झाल्यावर सर्वाना सांगितले.पण कर्णोपकर्णी ते नीला पर्यंत गेले.तिचा फोन आला.मी खूप रडले असे ती सांगत होती.तिला मी समजावले अग मी आता बरी झाली आहे.

                लॉकडाऊन नंतर ऑनलाईन डान्स क्लास सुरु झाला त्यात ती सहभागी झाली.हृषिकेशने दिलेला होमवर्क सर्वात प्रथम तिचा येई.आता आठवड्यातून तीन वेळा ऑनलाईन का असेना भेटू लागली.ही छोटीशी भेटही छान वाटे.डान्स क्लासमुळे तिच्यात सुधारणा होऊ लागली होती.ती ताठ चालू लागली.

             आता पार्किन्सनदिन मेळावा ऑनलाईन होणार होता. तिच्या कलाकृतीचे फोटो पाठवूनही चालणार होते.अशातच मार्च मध्येच रमेशभाऊ आणि तिला करोनाने गाठले.त्यातच तिला चेस्ट इन्फेक्शन झाले. दोघांच्याही टेस्ट निगेटिव्ह आल्या पण इन्फेक्शन बरे होईपर्यंत नीलाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार होते.ती शांतपणे या सर्वाला तोंड देत होती पण शरीराने साथ दिली नाही.पार्किन्सनने गळीत गात्र करण्यापूर्वी जीवनालाच राम राम करू न तिने पर्किन्सन्सला चकवले होते.देहदान करून एक नवा आदर्श घालून दिला.

             आज ती नाही पण तिचे रुमाल तिच्या कलाकृती,आनंददायी आठवणी आमच्यासमोर सतत राहतील.तरीही तिनेच पाठवलेल्या एका कवितेतील ओळी मात्र माझ्या मनात आत कुठेतरी आहेत.

                      कालपासून गळ्यात बांध

                       डोळ्यामध्ये झरा आहे

                        पारा निघून गेलाय आणि,

                       आरशावरती चर्हा आहे.

May be an image of 1 person, sitting, standing and indoor


         No photo description available.        

Tuesday 15 February 2022

पालकत्वाची वेगळी तऱ्हा

                                              पालकत्वाची वेगळी तऱ्हा

                  हृषीकेशचा डान्स ग्रुपवर उद्या संध्याकाळी साडे चार वाजता क्लास आहे असा मेसेज आला आणि मी उडालेच.हृषीकेश गेली १२ वर्षे पार्किन्सन पेशंटसाठी डान्स क्लास घेतो लॉकडाऊन नंतर ऑनलाईन क्लास सुरु झाले.सोमवर, बुधवार, शुक्रवार अशी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन बॅचेस असतात. गेले काही दिवस वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवल्याने दोन्ही  बॅच एकत्र केल्या होत्या त्याची खूप धावपळ होत होती.चिंतेत असायचा.तरी तो क्लास बंद करायचा नाही.उलट दोन्ही क्लास एकत्र घेतल्याने सहभागींना इनकन्व्हिनीअन्स होतो याची त्याला खंत वाटत होती.वडिलांच्या तब्येतीतील गुंतागुंत वाढतच होती.

             सोमवार दि. ७ फेब्रुवारीला त्याचे वडिल विठ्ठल बाबुराव पवार यांनी ८० व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.आणि लगेच ९ तारखेला तो क्लास घेत होता.आम्ही त्याला थोडे दिवस क्लास बंद ठेवू म्हटले पण त्याला तो तयार नव्हता. शो मस्ट गो ऑन या त्याच्या स्पिरिटला आम्ही सलाम केला  आणि श्रद्धांजली साठी एक मिनिट उभे राहिलो.यावेळी त्याच्याबरोबर आमचेही डोळे भरून आले.इतके दिवस तो बाबांची मनापासून सेवा करत होता क्लास आणि वडील यांचे सर्व करताना त्याची तारेवरची कसरत होते हे आम्ही पाहत होतो.

              हृषीकेशचे वडील एक्स सर्व्हीसमन होते.निवृत्तीनंतरही टाटामध्ये मेंटेनन्सचे काम करत होते.त्याना डायबेटीस होता आणि २०१८ मध्ये त्यात गुंतागुंतीला सुरुवात झाली.एका छोट्या जखमेचे निमित्त झाले.गुडघ्याखालील उजवा पाय अम्प्यूट करावा लागला.त्यांना चार वेळा इन्शुलीन द्यावे लागत होते. त्याची  आई २४ तास त्यांच्या भोवती असेच.विवाहित बहिणही मुलगा,नवरा, सासू या सर्वांचे पाहून वडिलांच्या सेवेला हजर असायची.तिच्या सासरची मंडळीही कोऑपरेटीव आहेत.या दोघी असल्या तरी त्यांना अंघोळ घालणे,हॉस्पिटलमध्ये नेणे ही कामे हृषीकेशलाच करावी लागत ती तो अतिशय मायेने करत असे.आम्ही त्याला श्रावणबाळ म्हणत असू.याशिवाय त्याना जयपूर फुट बसवल्यावर त्याना चालण्याची सवय होणे, त्यांची चालण्याची  ताकद वाढवणे आणि त्याना स्वावलंबी बनवणे यासाठी तो विशेष कष्ट घेत असे.याबद्दलच्या त्याच्या स्कीलचा आम्हाला अनुभव होताच.

            आपल्या पायावर उभे राहू न शकणाऱ्या शुभार्थीना ( पार्किन्सन पेशंटना ) स्वत: च्या पायावर उभे करणे.खुर्चीशिवाय ७०/७५ मिनिटे स्टेजवर नाचायला लावणे,त्यांचा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे,त्यांच्या नैराश्यावर हळुवार फुंकर घालणे हे सर्व तो गेली १२ वर्षे करत आलाच होता.आमच्या पार्किन्सनदिन मेळाव्यात शुभार्थीच्या नृत्याचे प्रात्याक्षिक होत असते.आलेले अतिथी न्यूरॉलॉजिस्ट, मनोविकारतज्ज्ञ असे सर्वच याबद्दल कौतुक करतात. परक्या माणसांसाठी तो एवढे करु शकतो तर स्वत:च्या बाबांना त्यांची  आर्मीची  शिस्त सांभाळत त्यांनी केले यात काहीच नवल नाही. 

             आम्हा शुभंकरांचे ( केअर टेकर ) आपल्या शुभार्थीचे मानसिक स्वस्थ्य सांभाळण्याचे खूप मोट्ठे काम तो करीत असतो.काही दिवस डान्स चुकला तर त्यांचा स्टामीना जाईल ही त्याला काळजी असते. आपल्या वडिलांच्या इतकाच आमचाही तो पालक असतो.गुरु माउली म्हणतात. हा आमचा गुरु असाच आम्हा सर्वांसाठी माउली असतो. 

            अशीही पालकत्वाची वेगळी तऱ्हा.

अधिक माहितीसाठी सोबत हृषीकेशवरील लेखाची लिंक देत आहे.

https://www.parkinsonsmitra.org/?p=2958

Monday 7 February 2022

आठवणीतील शुभार्थी - मनोहर लिमये.

                                       आठवणीतील शुभार्थी -  मनोहर लिमये

            मनोहर लिमये यांना मी प्रत्यक्षात कधीच पहिले नाही पण तरीही खूप ओळखीचे झाले होते.११ एप्रिलला कलाकृती पाठवा असे ग्रुपवर लिहिताना मला लिमयेच आठवत राहिले मागच्या वर्षी त्यांनी सुंदर कोलाज करून पाठवले होते.आता त्यांच्या कलाकृती असणार नाहीत अशी खंत मनात दाटून आली पण क्षणार्धात त्यांच्या सुन्दर आनंददायी आठवणीनी त्यावर मात केली.आपल्या सर्वांबरोबर त्या शेअर कराव्या असे वाटले. 
                त्यांची पहिली आठवण म्हणजे दसऱ्याला व्हाटसअपवर अनेकांनी वेगवेगळे फोटो टाकले होते.त्यात मनोहर रावांनी टाकलेला फोटो मला अधिक भावला.त्यांनी आपल्या वॉकरला झेंडूची माळ घातली होती आणि त्यासह आपला फोटो टाकला होता.काठी, वॉकर,व्हीलचेअर वापरणे हे बऱ्याच शुभार्थीना आवडत नाही पण मनोहरराव तर तिला इतर वाहनांप्रमाणे आपला साथीदार समजत होते.त्यांचा पार्किन्सनसह कोणत्याही गोष्टीचा आनंदाने स्वीकार त्यातून जाणवत होता.
               मनीषा ताई आणि ते प्रत्येक ऑनलाईन सभेला हजर असत त्यावेळी त्यांच्या मागे पिनअप बोर्ड आणि त्यावर लावलेल्या वारली आर्ट,  कोलाज असे काहीना काही चिकटवलेले दिसायचे.PDMDS च्या सभानांही त्यांची हजेरी असायची.तेथे दिलेले होमवर्क त्यांनी आवर्जून केलेले असायचे.यात मनीषाताईंचा सपोर्ट आणि त्यांचा उत्साह हे दोन्ही असायचे.
               त्यांनी बहिणींसाठी राखी पौर्णिमेला दिलेल्या कलाकृतीच्या भेटी संबंधी 'क्षण भारावलेले' मध्ये मी यापूर्वी लिहिलेलेच आहे.त्याची लिंक सोबत देत आहे.ती अवश्य वाचावी.त्यावेळचा उत्साह नंतर त्यांचा आजार वाढल्यावरही तसाच होता.मनीषाताई व्हाटसअप ग्रुपवर त्यांचे दीर सुहास लिमये यांच्या नर्मदापरीक्रमेवरील पुस्तकाचे अभिवाचन टाकत होत्या.त्या दिराना ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून कार्यक्रम होता. जिना उतरून त्याना नेणे अशक्य वाटत होते.आपण घरी राहू असे मनीषाताईंनी सांगताच ते म्हणाले, तुम्ही घरी थांबा मी जाणार.त्यांनी जिना उतरून मला जमते कसे पहा हे ही दाखवून दिले.शेवटी त्यांचे म्हणणे मान्य करावे लागले.त्यांच्या येण्याने उत्सवमूर्तीसह सर्वच नातेवायीकाना किती आनंद झाला असेल ते आपण समजू शकतो.हे त्यांनी केले ते मानसिक बळावर.सामाजिक भयगंड बाळगणाऱ्या शुभार्थीसाठी हा उत्तम धडा आहे.
               असे आनंदी राहणे अचानक आचरणात येत नाही मनोविकार तज्ज्ञ मनोज भाटवडेकर यांच्या एका लेखातील 'आनंदाचाही रियाज करावा लागतो' हे वाक्य मला फार आवडले होते.मनोहररावांचा असा रियाज आयुष्यभर चालू असणार असे मला ते समजले त्यातून वाटते.२ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशीच त्यांचा जन्म. गांधीचा फोटो ते खिशात ठेवत.गांधीजींची शिकवण ही आचरणात आणत.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे ते होते. इतरांच्या आनंदात इतरांच्या प्रगतीत ते आनंद मनात.पत्नीची प्रयोगशीलता,त्यासाठी शाळे व्यतिरिक्त घरातही बराच वेळ घालवणे,कबीर बागेत शिकवायला जाणे याबद्दल त्यांची कुरकुर नसायची.उलट ते त्याना सोडायला आणायला जात.तेच नाही तर त्यांच्या आईचेही मनीषा ताईना प्रोत्साहन असे.कामाविषयी मनीषा ताईंचा फोन आला तर त्या मी त्यांची सेक्रेटरी बोलते असे सांगत.असे हे घरच आनंदी.एकमेकांचा आदर करणारे.
                ते संख्याशास्त्राचे पदवीधर.तरी विविध विषयावरचे वाचन अफाट.नगरवाचन मंदिरातून ते पुस्तके आणत.त्यांनी स्वेच्छया निवृत्ती घेतल्यानंतर ते घरी होते.मनीषाताई नोकरीत.त्यांची मुलगी नातीला त्यांच्याकडे सोडायची.नातीला सोडणे, आणणे, स्तोत्रे शिकवणे ते आवडीने करीत.तिचा अभ्यास घेत. परीक्षेपुरता अभ्यास न घेता पुस्तकाबाहेरचा इतिहास, भूगोल.राज्यशास्त्र शिकवीत.नात म्हणायची आजोबांचे ज्ञान इतके अफाट आहे कि कौन बनेगा करोडोपती मध्ये ते नक्की जिंकले असते.त्यांच्या शिकवण्यामुळे नातीचे हे विषय आवडीचे झाले आणि कॉलेजमध्ये तिने कला शाखा निवडली.पार्किन्सन झाल्यावर वाचन थोडे कमी झाले असेल पण नवीन विषय समजून घेण्याचे कुतूहल, जिज्ञासा होतीच.
                   मनीषाताई एक प्रयोगशील शिक्षिका. मनोहररावांच्या पार्किन्सनच्या अवस्थेनुसार त्याना कृतीशील ठेवण्यासाठी, त्यांच्या गरजा पुरविण्यासाठी प्रयोग करत.त्यांच्या बोलण्यावर परिणाम झाला तेंव्हा त्यांनी सर्व अक्षरे असलेला एक तक्ता तयार केला.त्याना काय म्हणायचे आहे त्यासाठी तक्त्यातील अक्षरावर ते बोट ठेवत.ती अक्षरे मनीषाताई लिहून काढत.यातून त्याना काय म्हणायचे आहे ते मनीषा ताईना समजे.एकदा मनीषाताईंनी मला श ओ भ न आ त ई र थ ळ  अशी अक्षरे लिहून हे तुमच्यासाठी म्हणून पाठवले
                मला प्रथम अर्थबोध झाला नाही.मनीषा ताईनी सांगितले त्यावेळी समजले.त्यादिवशी झूमवर तुळशी ट्रस्ट तर्फे माझी मुलाखत होती ती सकाळी ११ वाजता होती.मनीषाताईना माझी मुलाखत लावण्याची आठवण करण्यासाठी त्यांनी माझे नाव असे लिहून दाखवले होते.ते अवघड शारीरिक परिस्थितीतही माझी मुलाखत पाहणार होते. मला अगदी भरून आले.ऑनलाईन कार्यक्रम असल्याने शुभार्थीना किती सोयीचे होते हेही समजले.
                ते मितभाषी असल्याने मित्रांचा फार गोतावळा नव्हता.पण जे मित्र होते त्यांची मैत्री अगदी घट्ट होती.आपल्याच ग्रुपवर असणारे डॉ.अविनाश बिनीवाले हे त्याचे उदाहरण.खरे तर कॉलेजमध्ये त्यांची मैत्री झाली नंतर दोघांची क्षेत्रे बदलली.नोकरीसाठी गावे बदलली पण मैत्री कायम राहीली.मनोहररावांच्यामुळेच डॉ. बिनीवाले यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख झाली.ते मनोहरावाना नेहमी फोन करत.मनोहररावांचे बोलणे कमी झाले तरी ते व्हिडिओकॉल करत तो बोलला नाही तरी मी त्याला पाहतो तरी असे म्हणत.
                आता सभांच्या वेळी मनीषाताई शेजारील खुर्ची रिकामी असेल पण मनोहररावांच्या आनंददायी आठवणी नेहमीच आपल्याबरोबर असतील.

   https://www.parkinsonsmitra.org/?p=3131
            
          May be an illustration of 1 person    

Tuesday 1 February 2022

अनिल अवचट श्रद्धांजली

                           
डॉक्टर अनिल अवचट यांना आदरांजली
दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता बाबा डॉक्टर अनिल अवचट यांचे दु:खद निधन झाले.
त्यांची पुस्तके असोत,लेख असोत की प्रत्यक्ष सहवास या सर्वातून सकारात्मकता,उर्जा भरभरून मिळत असे.पुस्तके, लेख, वृत्तपत्रीय लेखन,दिवाळी अंकातील लेखन यातून हे मिळत असे.पण पार्किन्सनन्स मित्रमंडळात त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला.मंडळाच्या मासिक सभेत त्यांनी ओरिगामीची प्रात्यक्षिके दाखवली.थरथरणाऱ्या हातात जादू निर्माण केली. मरगळलेल्या मनात आनंद निर्माण केला.
२०१० च्या पार्किन्सन्स दिन मेळाव्यात पहिल्या स्मरणिकेचे उदघाटन केले.चित्रकला,बासरी,ओरिगामी अशा विविध प्रात्यक्षिकासह आणि मोजक्याच बोलण्याने,प्रत्यक्ष अस्तित्वाने शुभार्थीना दीड तास एका जागी बसवून ठेवण्याची किमया केली.
डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मानाने तर नुकतेच उभे राहू पाहणाऱ्या आम्हाला उंच उडण्याचे बळ दिले.भेटी होत राहिल्या.आनंदी राहणे शिकवत गेल्या.मुक्ता, यशो,फुला आत्या,डॉ. नाडकर्णी अशा अनेकांप्रमाणे ते आमचेही बाबा झाले.
हे सर्वचजण त्यांचा वसा पुढे चालवतीलच पण आमच्यासारखे थोडाच काळ सहवासात आलेलेही त्यांनी दिलेल्या आनंदाची जपणूक करतील.
त्याना पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे विनम्र अभिवादन              
 May be an image of 1 person and indoorMay be an image of 1 person
May be an image of 4 people and people standing