Thursday 29 April 2021

पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६८

                                                 पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६८

                            आज आकाशवाणीवर सकाळी सकाळी जागतिक नृत्यदिनाच्या शुभेच्छा ऐकल्या.विशेष म्हणजे सुरुवातीला भक्ती गीते लावतात त्यात 'गणराज रंगी नाचतो' हे गाणे लागले.त्यानंतर विशेष ऐकिवात नसलेले पंत महाराज  बाळेकुंद्री यांचे 'नाचू गुरुभजनी' आणि संत एकनाथ यांचे 'विठ्ठल नाम छंदे' ही नृत्यावर आधरित गाणी लावली होती. आमचे नृत्यगुरू हृशिक्केश याच्या 'सेंटर फॉर कॉनटेमप्रररी डान्स' तर्फे फिल्म फेस्टिव्हल २५ एप्रिल पासूनच सुरु झाला आहे.तज्ञांच्या व्याख्यानाबरोबर वेगवेगळे डान्स परफॉर्मन्सही चालू आहेत.२९ एप्रिलचा नृत्यदिन आम्हाला प्रथम माहित झाला २०१० साली.

त्या आधी डान्स या प्रकाराशी आमचा पर्किन्सन्स मित्र भेटेपर्यं दुरान्वयानेही संबध नव्हता पण या आमच्या मित्रांनी अनेक गोष्टी करायला भाग पाडले.आता  शुभंकर, शुभार्थी आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ यासाठी डान्स हा महत्वाचा भाग झाला आहे.

२९ एप्रिल २०१० रोजी पुण्याच्या अर्काईव्हज थिएटर मध्ये नृत्यदिनानिमित्त ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स आणि मॅक्समुल्लरभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्यावरील 'व्हाय डान्स फॉर पार्किन्सन्स' नावाची पंधरावीस मिनीटाची एक जर्मन फिल्म दाखवण्यात आली.कार्यक्रमाची जाहिरात वाचून आशा रेवणकर आणि रामचंद्र करमरकर हा कार्यक्रम पाहण्यास गेले होते.सर्व तरुण, वृद्ध,स्त्री, पुरुष पीडी रुग्ण संगीताच्या तालावर कोणतीही लाज न बाळगता नाचताहेत.हे पाहून करमरकर खूपच प्रभावित झाले.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभासदाना ही फिल्म दाखवायचीच यासाठी त्यानी आटापिटा केला.याची परिणती म्हणून ३० मे २०१० रोजी मंडळाच्या सभासदांसाठी ही फिल्म पुना हॉस्पिटलच्या आडिटोरियमध्ये दाखवण्यात आली.पाश्च्यात्य.संगीता ऐवजी भारतीय संगीतावर आधारित प्रयोग करता येईल का असा विचार झाला.
ऋषीकेशच्या मनात २००४ मधे लंडनला असल्यापासुन ही कल्पना घोळत होती.रोहिणी भाटे यांच्याकडे तो कथ्थक शिकला होता.नंतर तो कंटेंपररी डान्सकडे वळला. Palucca Schule Dresden, Germany यांच्या टिचर्स ट्रेनींग प्रोग्रॅममध्ये बोलवला गेलेला तो पहिला गेस्ट स्टुडंट होता.त्यानी जगभर प्रवास केला आणि आता भारतात येऊन पुण्यात 'ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स'या संस्थेची निर्मिती केली. एका नृत्यविषयक मासिकात त्यानी मार्क मोरीस डान्स कंपनी आणि त्यांच्या पीडी रुग्णावरील डान्सविषयक प्रयोगाबद्दल वाचले होते..प्रयोग करु इच्छिणारा आणि प्रयोगात सह्भागी होऊ इच्छिणारे यांची गाठ सहा वर्षानी पडत होती.एक नव्या प्रायोगिक प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली गेली.११ वर्षे हृषीकेश शुभार्थीना विना मोबदला डान्स शिकवत आहे.

 ११ वर्षे झाली.अनेक अडचणींवर मात करत शुभार्थीची पावले थिरकत आहेत.नृत्यामुळे शुभार्थीला होणारे फायदे सिद्ध झाले आहेत

.शुभार्थिंच्या स्नायुंच्या हालचालींची मर्यादा वाढली;
हालचालीच्या गतीवरील नियंत्रण सुधारले
जमिनीवरील हालचालीच्या वेळी तोल सांभाळण्यात सुधारणा झाली,
नृत्यातील हालचालीचा क्रम लक्षात ठेवण्यात सुधारणा.झाली.
बोलण्यातील स्पष्टपणा आणि आवाजाच्या पातळीत वाढ झाली.
काही पेशंटचा औषधाचा डोस २५%नी कमी झाला. आत्मविश्वास वाढणे,नैराश्य कमी होणे,सकारात्मकता वाढणे या गोष्टीही झाल्या.कोरोना काळातही डान्स क्लासमध्ये  व्यत्यय आला नाही.उलट ऑनलाईन क्लास सुरु झाल्याने परगावचे शुभार्थीही सहभागी होत आहेत.जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या प्रत्येक मेळाव्यात शुभार्थींचे नृत्य आकर्षण ठरत आहे.पाहुणे म्हणून आलेले न्यूरॉलॉजिस्ट,न्यूरोसर्जन,मनोविकारतज्ज्ञ यांच्याकडून हृशिकेशला शाब्बासकी मिळाली आहे.सहभागी शुभार्थी आणि शुभंकरांसाठी तर तो देवदूतच आहे.

 डान्स हा उपचार न राहता  आता आनंदासाठी डान्स या विचारापर्यंत हृषिकेशने शुभार्थीना आणले आहे.बाय प्रोडक्ट्स म्हणून फायदे होतच आहेत.ऑनलाईन डान्स सुरु झाल्यावर सहभागी झालेल्या शुभदा गिजरे क्लासमध्ये सांगत होत्या.माह्या डॉक्टरनी गोळ्या कमी केल्या डान्सक्लास सोडू नका सांगितले.नुकत्याच झालेल्या ११ एप्रिल २०२१ च्या पार्किन्सन्सदिन मेळाव्यात अनेक शुभार्थीनी डान्सपासून झालेले फायदे आणि हृषीकेशबद्दल कृतज्ञता भरभरून व्यक्त केली. हृषिकेशने  शुभार्थीना .आम्ही डान्सर आहोत असे वाटायला लावले आहे.

जागतिक नृत्यदिनाच्या हृषिकेश, त्याच्या सर्व सहकार्यांना आणि शिष्याना शुभेच्छा! 

(पार्किन्सन्स मित्रमंडळ एक प्रयोगशाळा या लेखात विस्ताराने याबाब लिहिले आहे.त्याची लिंक सोबत देत आहे)

https://parkinson-diary.blogspot.com/2014/01/2.html


                          

Friday 23 April 2021

क्षण भारावलेले - 12

 

 

 पार्किन्सन्स मित्रमंडळाची प्रत्येक महिन्याच्या दुसर्या सोमवारी सभा असते.lock down च्या काळात ती घेणे शक्य नव्हते म्हणून व्हिडिओ कान्फरन्सचा पर्याय निवडला.11 मे ला ही सभा ठरली. डॉ.रेखा देशमुख यांचे ‘आनंदी कसे राहावे’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.कितीजण उपस्थित राहतील याचा अंदाज नव्हता.हळुहळु लोक जमा होऊ लागले.त्यात शांताताईंना पाहून सुखद धक्का बसला.शांताताई म्हणजे माझी मोठी नणंद.तिलाही पार्किन्सन्स आहे.माझे लक्ष व्याख्यानापेक्षा त्या अर्ध्यातून जात नाहीत ना याकडेच होते.त्यांना ऐकु येत असेल का?असेही वाटत होते.कोणीतरी त्यांना हेडफोन आणून लावलेले दिसले.मी माझे लक्ष व्याख्यानाकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते.
व्याख्यान संपल्यावर शांताताईंचा फोन आला.त्या खुशीत होत्या.व्याख्यान त्यांना आवडले होते.त्यांच्याकडे सकारात्मक कसे राहावे सांगणारे पुस्तक आहे ते वाचूनही छान वाटते.असे त्या सांगत होत्या.नातीने मदर्स डेसाठी सुंदर ग्रीटींग केल्याचेही त्या सांगत होत्या.त्यांनी रूमाल भरायला घेतले होते.
त्यांना मीटींगमध्ये रमेश तीळवे यांचे नाव दिसले.बेळगावकर रमेशभाऊ ना त्यांनी ओळखले होते.त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी झाली.त्यातून बेळगावबद्दल गप्पा,इतर कितीतरी गप्पा झाल्या.एकुणात त्यांचा अलर्टनेस,स्मरणशक्ती,cognition सर्व चांगले होते.पार्किन्सन्सने त्यांच्या बोलण्यावर परीणाम झाला नाही.त्यामुळे खुप बोलता येते.या सर्वांमुळे मी भारावून गेले होते.मला राहून राहून चार-पाच वर्षांपुर्वीची त्यांची अवस्था आठवत होती.
त्या दिवशी माझ्या भाचीचा नयनाचा फोन आला. फोनवर ती रडत होती. ‘मामी मी आईला माझ्याकडे घेऊन आलीय.आईची अवस्था फार वाईट आहे अजिबात हालचाल करता येत नाही मख्ख सारखी बसून राहते. काय करू ग? व्हिलचेअर आणू का?’मी तिला शांत केले थोडा धीर दिला आणि सांगितले,’तुझ्याकडे आले ना आता हळूहळू सुधारेल’. मला खात्री होती तिची ही अवस्था पार्किन्सन्स वाढण्यापेक्षा असुरक्षितता, भीती, नैराश्य यातून झाली होती. आत्मविश्वासही गमावला होता.
ती मुलाकडे होती तेव्हां मुलगा आणि सून त्यांचा व्यवसाय असल्याने सकाळी बाहेर पडत ते एकदम उशीरा घरी येत. तिच्यासाठी केअरटेकर असली तरी त्याबद्दल मनात थोडी असुरक्षितता होतीच कारण संपूर्ण मजल्यावर एका घरात एक बेडरीडन शेजारीण आणि यांच्या घरात या एकट्या. एकेकाळी सर्व घरे भरलेली. मुंबईत असूनही अनौपचारिक संबंध होते. आता सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी गेले.घर खायला उठु लागले. रोज खाली उतरून चालायला जायच्या.हळुहळु तिसर्या मजल्यावर घर असल्याने जीना उतरून जाण्याची भीती वाटायला लागली.मुलगा कधीतरी धरून खाली न्यायचा.त्याच्या उद्योगात त्याला वेळ नसे.केअरटेकरही टाळाटाळ करायची.
मुळात त्या अत्यंतउद्योगी.स्वच्छतेचे वेड. घरात बाईने काम केले तरी या सर्व पुन्हा करणार. मुंबईत लोकलने,बसने एकट्या फिरायच्या.प्रभादेवीला घर. रोज सकाळी सिद्धिविनायक पर्यंत चालत जायचे, फुलबाजारात जाऊन फुले आणायची, त्यांचे सुंदर हार करून देव्हारा
सजवायचा, भरतकाम, पर्सेस तयार करणे असे अनेक उद्योग असायचे. सारखी पाहुणेमंडळी असायची.त्यांना तर्हा तर्हा करून खायला घालायचं आमच्या मुलींनाही आत्याच्या घरी जायला आवडायचे.
कुटुंब मोठे.कोणा ना कोणासाठी रूखवत,बाळंतविडा चालू असायचे.मंगळागौर, वाढदिवस, साखरपुडा,डोहाळजेवण, अशा वेळी सजावट,उत्सवमुर्तीला तयार करण्याचे काम यांच्याकडेच असायचे.गणपती उत्सवातही यांचाच पुढाकार.
पण आता टीव्ही पाहण्या शिवाय काहीच उद्योग नव्हता.किंबहुना काही करायची उमेदच नव्हती.
एकदा माझ्या भाच्याचा फोन आला आम्ही दोघेही कामासाठी गावाला चाललोय, नयना पण गावात नाही तुझ्याकडे आईला सोडू का? मी लगेच होकार दिला. त्या आल्या तेव्हा त्यांना हालचाल करता येत नव्हती. मला वाटले मुंबई-पुणे प्रवास केल्याने असेल कदाचित पण तसे नव्हते.
पार्किन्सन्स मध्ये नीरसता ( Apathy ) हे लक्षण दिसू लागते तसे त्यांचे झाले होते.काहीच करावेसे वाटत नव्हते.खुर्चीवरून धरून उठवावे लागत होते.त्यांच्या मनालाच हलवावे लागणार होते.मी त्यांना बागेत घेऊन गेले.त्यांचीवर्ग मैत्रिण आमच्याजवळ राहते ती भेटली.हास्यक्लबच्या वातावरणात त्या थोड्या खुलल्या नंतर मी वेबसाईटवर न्युरालाजिस्ट व इतर तज्ञांची व्याख्याने ऐकवली. ऋषिकेश ची डान्सची डॉक्युमेंटरी दाखवली एका दिवसातच त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागले. माझा नातू आर्य तेव्हा आमच्याकडे असायचा.तिसरीत असेल पण आमच्याबरोबर सभांना येऊन त्याला पार्किन्सन विषयी माहिती होऊ लागली होती तो काहीतरी सांगायचा. आत्या आजी म्हणून तिच्यामागे असायचा त्याला त्या ज्युनियर डॉक्टर म्हणायला लागल्या. त्याच्या बरोबर असण्याने ही त्यांच्या आनंदात भर पडत होती. दोन-तीन दिवसात बागेतील सर्वजणी किती फरक पडला यांच्यात आता असे म्हणायला लागल्या.
त्या जिना चढून आमच्याबरोबर प्राणायामासाठी येऊ लागल्या. आमच्या गाण्याच्या क्लासला आल्या. त्यांची आधीची अवस्था पार्किन्सन्स पेक्षा एकटेपणातून, असुरक्षिततेतून होती हा माझा कयास बरोबर होता त्यांना थोडे दिवस राहण्याचा खूप आग्रह केला पण त्यांना वाटत होते मला स्वतःची तब्येत सांभाळून दोघांचे करावे लागेल. त्या मुंबईला गेल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे झाले. मी त्यांना म्हणायची नयनाकडे राहा ती घरी असते तिची मुले असतात.तिच्या सासरच्या माणसांनाही काही प्राब्लेम नाही. पण त्यांना ते पटायचे नाही. जुन्या पीढीतील लोकांना मुलीकडे राहणे नको असते. आता अशी अवस्था आली होती की मुलीने जबरदस्तीने घरी आणले. आईची अवस्था पाहून आता काय करू असे तिला झाले होते. तिला धीर धर सर्व काही ठीक होईल असे सांगितले ती पार्किन्सन्स इन्फो या व्हाट्सअप ग्रुप वर सामील झाली. शुभार्थींच्या कलाकृती, पेंटिंग, अनुभव, 

लेख आईला दाखवू लागली नातवंडांच्या सहवासाने, लेकीच्या प्रेमळ स्पर्शाने, कधी धाक दाखवून स्वतःच्या गोष्टी स्वतःचं करायला लावल्याने, फिजिओथेरपिस्टच्या फिजिओथेरपीने, मसाज केल्याने त्यांच्यात हळूहळू बदल होऊ लागला. बाथरूम मध्ये स्वतः जाऊन आंघोळ करू लागल्या खाली चालायला जाऊ लागल्या पूर्वीप्रमाणे आम्हाला फोन येऊ लागले संक्रांतीसाठी पुतण्याच्या नातीला कर्नाटकी कशिदा काढलेला फ्रॉक स्वतः तयार केला. बेडशीटवर भरतकाम करायला घेतले. त्याचे फोटो नयनाने पाठवले ते पाहून मला गहिवरून आले. आता गाडी रुळावर आली होती.
मधल्या काळात त्या पडल्या हीप जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली 80 वर्षे वय, त्यात पार्किन्सन्स असे असून त्यातूनही त्या बऱ्या झाल्या.
नयनाने आईला घरी आणल्यापासून आईच्या पार्किन्सन्सचे स्वरूप समजून घेऊन अत्यंत संयमाने,पेशन्स ठेऊन कणखरपणे आणि हळुवारपणेही आईला हाताळले होते.आणि आजच्या स्थितीला आणले होते.तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
आपल्या शुभार्थीचा पार्किन्सन्स वाढला आहे की मानसिक अवस्थेमुळे वाईट अवस्था झाली आहे हे प्रथम समजून घ्यायला हवे.त्याप्रमाणे उपाय हवेत.
औषधोपचाराबरोबर पुरक वातावरण,शुभंकराची भक्कम साथ हे असल्यास पीडीसह आनंदात राहता येते हे आत्तापर्यंत अनेक शुभार्थींच्या बाबतीत दिसून आले आहे.शांताताईंच्या उदाहरणाने त्यात आणखी एकाची भर पडली     





क्षण भारावलेले - १३

 


 

आमचे नृत्य गुरू ऋषिकेश पवार यांना गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शुभंकर शुभार्थी आणि इतर विद्यार्थी यांच्यातर्फे वंदन करत आहे. ऋषिकेश वर मी यापूर्वी वेळोवेळी लिहिले आहे त्यावेळी आमच्या शुभंकर, शुभार्थी यांच्या जीवनात आनंदाचे रंग भरणाऱ्या या तरुणा बद्दल कृतज्ञता वाटायची. बारा वर्षे अखंड आठवड्यातून तीनदा पार्किन्सन्स पेशंटला शिकवणे आणि तेही मोफत, त्यांच्याकडून स्टेजवर थक्क करणारे करणारे नृत्य परफार्मन्स करून घेणे, खुर्चीवर बसून नृत्य करणाऱ्या शुभार्थींना हळूहळू ९० मिनिटे उभे राहून नृत्य करायला लावण्याची करामत करणे हे सर्व मी अनुभवले होते आमच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात आत्तापर्यंत आलेल्या न्युरो सर्जन सुनील पंड्या, मनोविकार तज्ञ डॉक्टर उल्हास लुकतुके, डॉक्टर विद्याधर वाटवे, डॉक्टर संजय वाटवे, न्युरालाजिस्ट राजस देशपांडे,न्युरालाजिस्ट चारुशीला सांखला, डॉ.अरविंद फडके या सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
Lock down नंतर ऋषिकेशने जुन्या लोकांचा ऑनलाइन क्लास सुरू केला.नविन लोकांसाठी आता एक नवीन batch करणार असे तो फोनवर म्हणाला.तीर्थळी काका एकटे आले तरी क्लास घेणार असेही त्यांनी सांगितले. निवेदन दिल्यावर पुण्यातील लोक आलेच शिवाय नाशिक, औरंगाबाद, मुंबई, बेळगाव, बेंगलोर असे परगावचे शुभंकर, शुभार्थी ही जॉईन झाले. बारा मेपासून हा क्लास चालू झाला आणि लक्षात आले आपल्याला माहित असलेला ऋषिकेश हे हिमनगाचे टोक होते आजच्या युगात दुर्मीळ असे ऋषिकेश पवार हे वेगळेच रसायन आहे आणि हे पंडिता रोहिणी भाटे यांच्या प्रयोगशाळेत तयार झाले आहे.
ऋषिकेशने नृत्याचे शिक्षण पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडून घेतले.
रोहिणी ताई बद्दल बोलताना ऋषिकेश भरभरून बोलतो. त्यांनी फक्त नृत्य शिकवले नाही तर त्याला एक नैतिक अधिष्ठान दिले कलेतून मिळणाऱ्या उर्जेबरोबर शिस्त हवी. अस्थेटिक तर हवेच हवे. नवनवीन प्रयोग करत राहिले पाहिजे. स्वतःचे विश्लेषण करत राहिले पाहिजे. नाहीतर साचलेपणा येतो तरुण वयात ऋषिकेश च्या नसानसात हे सर्व भिनले आहे. त्यातून मिळालेली सुरक्षितता त्याला आजवर पुरते आहे. कलेचा बाजार करू देत नाही. प्रसिद्धी हिरोगिरी यापासून सहजपणे दूर ठेवते. विशेष म्हणजे त्याच्या आत्ताच्या गुरु नीलिमा आध्येही अशाच आहेत. आणि ऋषिकेशनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे सर्व तेवढ्याच ताकदीने पोचवले आहे. आणि त्याही तितक्याच तळमळीने काम करतात.
याशिवाय त्यांने जर्मनीतून कंटेम्पररी डान्स मास्टर्स डिग्री मिळवली. पुण्यात त्याची स्वतःची नृत्य संस्था आहे आणि तेथे अनेक batches चालतात.देश परदेशात तो अनेक उत्तमोत्तम परफार्मन्स देत असतो. या सर्वांचे वलय घेऊन तो वावरत नाही प्रत्येकाला आप्रोचेबल असतो. कला शुद्ध स्वरूपात टिकवणे ती रुजवणे हे ‘येरागबाळ्याचे काम नोहे’. मंदिरात पूजेनंतर उपस्थितात फिरून तीर्थ शिंपडले जाते अगदी
रांगेत मागे असणार्‍या आमच्यावरही त्यातील काही थेंब पडले आम्ही धन्य झालो.
पार्किन्सन्स शुभार्थी, शुभंकर आणि या व्यतिरिक्त ज्यांना शिकायचे आहे अशा ज्येष्ठांसाठी त्याचा क्लास असतो. त्याच्या जुन्या पार्किन्सन्स पेशंटच्या सकाळ संध्याकाळ अशा दोन batches आठवड्यातून तीनदा असतात. आमची नव्या लोकांची बॅच दोन दिवस असते. याशिवाय त्याच्या नृत्य संस्थेचे रेग्युलर क्लासेस असतातच. त्यात स्वतःचा रियाज, वडिलांचा पाय ampute करावा लागला त्यांचे सर्व करण्यात ऋषिकेशचा बराच वेळ जातो.
क्लास सुरू होण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा रियाज केलेला असतो पुढच्या क्लास साठी अभ्यास केलेला असतो. तो सर्वांसमोर अगदी ताजातवाना होऊन येतो. क्लास झाल्यावरही सर्वांचे निरीक्षण करून नोंदी ठेवतो. त्यातून दुसऱ्या क्लासमध्ये सुधारणा करणे, मोटिवेशन देण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार करणे, आणि यासाठी विविध ऍक्टिव्हिटी देणे इत्यादी तो करत असतो. दिवसाचे चोवीस तास त्याच्या तनामनात सारखा नृत्याचा आणि त्याच्या विद्यार्थ्यांचा विचार असतो. तो मात्र म्हणतो मी हे सर्व एन्जॉय करतो मला जे आवडते ते मला करायला मिळते मी किती नशीबवान आहे असेच त्याला वाटते. त्यामुळे दमणूक येत नाही. रोहिणी ताईनी घालून दिलेली शीस्त टाईम मॅनेजमेंट मध्ये उपयोगी होते. हे करताना कोठेही कोरडेपणा नाही तर भावनेचा ओलावा असतो.या सर्वांची टाईम मॅनेजमेंट तो कसा करतो हे तोच जाणे. lock down मध्ये खरेतर स्वतःसाठी वेळ द्यायला चांगली संधी होती पण नाही. पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थी यांच्यात तो इतका एकरूप झाला आहे की डान्स क्लास नसेल तर त्यांची काय मानसिक अवस्था होते हे त्याला चांगले माहीत आहे. कृष्णाची बासरी ऐकल्यावर जशा गोप,
गोपी कामधाम सोडून धावत येतात तसेच त्याच्या विद्यार्थ्यांचे होते.lock down नंतर आपण गरजेनुसार आँनलाईन माध्यम वापरले पाहिजे नाहीतर विद्यार्थ्यांचा स्टामीना,आत्तापर्यंत मिळालेली उर्जा कमी होईल.असे त्याला वाटले.सर्वांच्या हे गळी उतरवून त्यांना नव्या टेक्नॉलॉजीसाठी तयार करण्यात दोन आठवडे गेले आणि आँनलाईन क्लास सुरू झाला.
ज्येष्ठ नागरिक आणि पार्किन्सन मधील कंपा मुळे मोबाईल, लॅपटॉप ही साधने वापरण्यास असमर्थ असलेले विद्यार्थी. पण इच्छा तिथे मार्ग. झूम लोड करायला शिकवणे पासून त्याला सगळे काहिंना शिकवावे लागले.काहींना घरातल्यांनी मदत केली. ऋषिकेशच्या क्लास साठी काही करायला सर्वांची तयारी होती. ऋषिकेश क्लास कसा घेतो याचे वर्णन शब्दात मांडणे अवघड आहे. त्यांनी केलेल्या व्हिडिओ ची एक लिंक सोबत जोडत आहे.
त्याच्या सर्व batches त्यांनी विचारांच्या देवाणघेवाणीसाठी आणि अनुभव शेअर करण्यासाठी ‘एक कप चायकेलिये’ एकत्र केल्या होत्या. तुम्ही येथे नृत्योपचारासाठी नाही तर एन्जॉय करायला या आनंद अनुभवा असे त्याचे म्हणणे होते. प्रत्येक जण आपला अनुभव सांगत होते. क्लास रोज असावा असे काहींनी सांगितले.शैलजा कुलकर्णी म्हणाल्या, ‘ऋषिकेश चा क्लास म्हणजे आनंद आनंद आणि आनंद’ सर्वांची भावना तीच होती. आनंदाचे प्रगटीकरण नकळत शुभार्थींची पार्किन्सन्सची लक्षणे कमी होण्यावर येतेच. नृत्य क्लास चे प्रथम पासून चे विद्यार्थी असणाऱ्या विलास जोशी यांची पत्नी स्नेहलता जोशी म्हणतात,’ जोशी क्लासला एकटे जातात तेही बसने. स्वतःच्या अनेक गोष्टी ते स्वतः करू शकतात.ऋषिकेश शुभार्थींचे खुप मोठे ओझे वाहतो आहे. त्यामुळे शुभंकरांना आराम मिळतो. ऋषिकेश आमच्यासाठी केवढे मोठे काम करतो हे त्याला माहीत नाही’. सध्या ऑनलाईन क्लास जॉईन करत असल्याने त्यांना प्रत्यक्ष अनुभव येतो. ‘मोठ्या संकटातील मोठी संधी’ असे त्या क्लास विषयी म्हणतात. बेळगावच्या आशा नाडकर्णी यांना बेळगावात राहून शिकता येत असल्याने ऋषिकेश बरोबर कोविदचे आभार मानावेसे वाटतात.आम्हाला एका शुभार्थीला सांभाळताना पेशन्स नसतो ऋषिकेश मात्र काका,काकू करत सर्वांना हाताळत असतो.त्याच्या पेशन्सला सलाम.
बंगलोरच्या रेड्डी म्हणतात तो कर्मयोगी आहे. रेड्डी यांची लिखित प्रतिक्रिया मोठ्ठी असली तरी मला येथे दिल्याशिवाय राहवत नाही.
“A True Karmayogi in Our Midst !
What can you say about this dancer all of 26-27 ,who has been teaching dance to people who are 50 years and older who have aa accompanying progressive disorder of the dreaded Parkinson’s Disease..What can you say about this young mans choices to start “Dance for PD” classes which have turned 10 years old with a gathering of 86 dancers !.
What can you say about this charming young man and his enthusiasm at every class. Taking keen interest in everyone’s well being,spending the first 10 minutes of every day greeting all with his sunshine smile.So patient ,so thoughtful,so talented,so compassionate.
Where can you find persons like him .? Who have been running such a dedicated dance program for 10 years continueously and for free.! “Why Hrishikesh ?!How Hrishikesh “, I ask of him.
His answer being, “I love what I am doing” and the classes remain free.Can we find another one like him in this day and age ?
Dear Hrishikesh ,a true Karmayogi in our midst !!!”
Vintha Reddy यांच्याप्रमाणेच सर्वांच्या भावना आहेत.
ऋषिकेश नृत्याद्वारे अध्यात्मिक उंचीवर पोचलेला आहे हे जाणवत राहते. आणि नकळत ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. त्यांचे पहिल्या पासून चे विद्यार्थी विलास जोशी त्यांना देव मानतात मलाही तो पार्किन्सन्स मित्र मंडळासाठी पाठवलेला देवदूत, मसीहाच वाटतो. त्याने अनेक भारावलेले क्षण दिले त्याबद्दल खूप कृतज्ञता आणि त्याच्या भविष्यातील कार्यासाठी,कलेची शुद्धता अशीच टिकवून ठेवावी यासाठी खूप खूप शुभेच्छा!

 

क्षण भारावलेले - १४

                                                        क्षण भारावलेले - १४

१३ जुलै २०२० ची व्हिडीओ कॉन्फरन्स पार्किन्सन्स मित्र मंडळाचे काम करणाऱ्यांसाठी भारावून टाकणारी होती.इंडियन मेडिकल असोशीएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांचे व्याख्यान आणि स्मरणिकेचे प्रकाशन असे दोन कार्यक्रम होते दोन्ही उत्तम झाले.
५० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.सहभागींची संख्या हळूहळू वाढत आहे.व्हिडिओ कॉन्फरन्स साठी शुभंकर, शुभार्थी आता सरावलेले आहेत‌. पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई असे भारतातील सभासद होते शिवाय इंग्लंड,अमेरिकेतील थोड्या गैरसोयीच्या वेळा सांभाळूनही हजर राहणारे होते.
होस्ट अतुल ठाकूर प्रत्येक वेळी कोणाला काही तांत्रिक अडचण असली तर सोडविता यावी आणि एकमेकांशी बोलता यावे म्हणून पंधरा मिनिटे आधीच कॉन्फरन्स चालू करतात. डॉक्टर अविनाश भोंडवे ही पंधरा मिनिटे आधीच हजर झाले.अतुलने पहिले पेज टाकून त्यावर रीबनच्या फितीने झाकले होते. रीबनवर क्लिक केल्यावर पहिले पेज येणार होते. आणि स्मरणिकेचे प्रकाशन होणार होते हे सर्व नेमके कसे होईल यावर डॉक्टरांनी अतुलशी चर्चा केली. एकीकडे डॉक्टरना सारखे फोन येत होते आणि दुसरीकडे सर्व शुभंकर, शुभार्थी एकमेकांना पाहून हाय-हॅलो करत होते. बरेच दिवसांनी भेटल्याने आनंदित झालेले दिसत होते. डॉक्टरांचे स्वतःच्या मागचे वलय विसरून अनौपचारिक वागणे ते आमच्या परिवारातले आहेत हे दाखवणारे होते.
बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी कान्फरन्स
चालू झाली.
‘आला पावसाळा तब्येत सांभाळा’ या विषयावरील व्याख्यान तर उत्तम झालेच पण प्रश्नोत्तरात हळूहळू गाडी करोना कडे वळली आणि डॉक्टरांनीही अनेक समजुती कशा भ्रामक आहेत हे सांगितले. शुभार्थी किरण दोषी हे त्यांचे पेशंट चे नाव दिसल्यावर त्यांना व्हिडिओ on करायला सांगुन तुमचा मला चेहरा पाहायचा आहे असे सांगितले.अनिल शेंडे यांना अमेरिकेत तुमच्याकडे काय परिस्थिती आहे असे विचारले. एकूण खेळीमेळीच्या वातावरणात कॉन्फरन्स झाली. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण सहभागी झालो आहोत हे विसरायला झाले. या कान्फरन्समधील स्मरणिकेचे वेब एडिशन म्हणून प्रकाशन हा आमच्यासा साठी अनोखा प्रकार होता. हे प्रकाशन डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यासारख्या वैद्यकीय साक्षरतेचे व्रत घेतलेल्या मान्यवर व्यक्तिकडून व्हावे हे आमचे भाग्यच कारण आमच्या स्मरणिका मुख्यता लोकांच्या मनातील भ्रामक समजुती दूर करून पार्किन्सन साक्षरतेचे काम करणे, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे याच उद्देशाने असतात.
या वर्षी प्रथमच स्मरणिकेचा मजकूर तयार असूनही Lock down मुळे जागतिक पार्किन्सन दिन मेळावा होऊ शकला नाही.मेळाव्यात प्रकाशित होणारी स्मरणिका ही प्रकाशित झाली नाही. आशा रेवणकर,वसुमती देसाई, म‌दुला कर्णी, अंजली महाजन उषा कुलकर्णी या संपादक मंडळींनी यासाठी अनेक महिने बरेच कष्ट घेतले होते.दीपा होनप लागेल ती मदत करायला उपलब्ध होती. श्यामला शेंडे यांनी अमेरिकेत बसून चारुशीला सांखला यांच्या २०१९ च्या जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यातील व्याख्यानाचा व्हिडिओ ऐकून शब्दांकन करण्याचे क्लिष्ट काम केले होते. आशा रेवणकर यांनी मनोविकार तज्ज्ञ उल्हास लुकतुके यांच्या घरी जाऊन त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून त्याचे शब्दांकन केले होते. डॉक्टर यश वेलणकर, डॉक्टर अविनाश भोंडवे डॉक्टर अतुल ठाकूर यांचे महत्त्वपूर्ण लेख या स्मरणिकेत होते. शुभार्थी मोरेश्वर काशीकर यांच्या ‘पार्किन्सन्स डिसीज एक प्रतिबंधन एक शक्यता’ हा लेख पतंजली योग सुत्राचा वापर कसा करता येईल याचा विचार करणारा होता. माझ्यासह आमचे सहकारी शुभंकर, शुभार्थी यांनी आपल्या अनुभवातून काढलेले नवनीत आणि वैशाली खोपडे, गिरीश कुलकर्णी या कार्यकर्त्यांनी लिहिलेले अनुभव हे सर्वच शुभंकर, शुभार्थींच्या दृष्टीने मोलाचे होते पण हे सर्व संगणकात बंदिस्त होते. करोनाचा प्रसार पाहता सर्व व्यवहार केंव्हा ठिकाणावर येतील हे माहीत नव्हते. आम्ही हातावर हात ठेवून बसलो होतो आणि अशावेळी श्यामलाताईंचे
चिरंजीव अनिल शेंडे यांनी स्मरणिका वेबसाईटवर का टाकत नाही असे सुचविले. मजकूर शेवटच्या टप्प्यात होता पण अजून थोडे प्रूफ रीडींग आवश्यक होते. मग विनय दीक्षित नी आम्हाला पीडीएफ स्वरूपात मजकूर पाठवायचा आणि आम्ही दुरुस्त्या करून व्हाट्सअप वर पाठवायचे असे करत चुका दुरुस्त झाल्या. हार्ड कॉपी नसताना असे तपासणे आणि तेही मोबाईलवर हे आमच्या साठी सोपे नव्हते. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चुका दिसत राहिल्या आणि अगदी आदल्या दिवशीपर्यंत विनयने कंटाळा न करता
त्या दुरुस्त करून दिल्या.
अतुल ठाकूर यांनी वेबसाईटवर स्मरणिका लोड केलेली आहे आणि त्याची लिंक फेसबुक वर, व्हाट्सअप वर पोचवली आहे. आता जगभरातील मराठी वाचू शकणाऱ्या पर्यंत संगणकात बंदिस्त असलेले ज्ञान पोहोचणार आहे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या कॉन्फरन्सचे कार्यकर्ता गिरीश कुलकर्णी यांनी स्क्रीन शॉट घेतले रेकॉर्डिंग केले त्यामुळे आजचा कार्यक्रम ही आम्ही सर्वांपर्यंत पोहचवू शकणार आहोत कदाचित इतरांसाठी हे फार मोठे नसेल पण टेक्नॉलॉजीचे शून्य ज्ञान असणाऱ्या आमच्यासाठी ते फार भारावून टाकणारे आहे आणि वेबसाईट उपलब्ध होती म्हणून आम्ही हे करु शकलो आणि वेबसाईट उपलब्ध करण्याचे सर्व क्रेडिट अतुल ठाकूर यांच्याकडे जाते. त्यांच्याबद्दल आणि त्यांचे पार्किन्सन्स मंडळासाठीचे योगदान याबद्दल स्वतंत्रपणेच लिहावे लागेल. 



क्षण भारावलेले १५ - भाग १

 

                                                                  क्षण भारावलेले १५ -  भाग  १
१३जुलै २०२०
या दिवशीच्या पार्किन्सन मित्रमंडळाच्या कॉन्फरन्समध्ये आमच्या स्मरणिकेचे वेब एडिशन चे प्रकाशन झाले आमच्यासाठी हा क्षण आनंदाचा होता.२०१४ पुर्वी वेबसाईट असणे हे आमच्यासाठी
स्वप्नरंजन होते. मंडळाकडे तळमळीचे कार्यकर्ते असले तरी पैशाची आवक अशी नव्हतीच. सभासदांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मी वेबसाईट करण्याची कल्पना मांडली होती पण ती प्रत्यक्षात शक्य नाही असे सर्वांनाच वाटले. कारण मंडळात जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे.त्यातले सोशल मिडिया वर असणारे,वेबसाईट पाहणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत असे आमच्या प्रश्नावलीद्वारे केलेल्या पाहणीतून आढळले होते.इतक्या कमी सभासदांकरता वेबसाईटवर खर्च का करायचा हे सर्वांचे
मत तसे रास्तच होते.
पण २०१४ मध्ये
ध्यानीमनी नसतांना वेबसाईट झाली.आणि त्याचे श्रेय केवळ आणि केवळ डॉक्टर अतुल ठाकूर यांना जाते.
मार्च २०१४ मध्ये पार्किन्सन्स मित्र मंडळाला डॉक्टर अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार पुरस्कार मिळाला. या पुरस्कारा बरोबर एक अनमोल देणगी अचानकपणे मिळाली आणि ती म्हणजे डॉ.अतुल ठाकूर. त्यावेळी ते अजून डॉक्टर झाले नव्हते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हा त्यांच्या पीएचडी च्या केस स्टडी चा विषय होता. संघर्ष सन्मान पुरस्काराच्यावेळी त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट झाली आणि वर्षानुवर्षे आपण एकमेकांना ओळखतो असे वाटले.
यापूर्वी आमचे मायबोलीकर मित्र आणि सुहृद अशोक पाटील यांच्याकडून अतुलची विद्वत्ता, त्यांचे सखोल वाचन,लेखन,लेखनातील विचारांची स्पष्टता आणि नेमकेपणा याविषयी बरेच ऐकले होते.मायबोली आणि अशोक पाटलांच्या मुळे आम्ही अतुल ठाकूर पर्यंत पोचलो आणि पुढचा इतिहास घडला.त्यामुळे मायबोली आणि अशोक पाटील यांच्याबद्दल पण कृतज्ञता वाटते.
अतुलनी समाजशास्त्रात एम.ए. करताना आणि नंतर पीएचडी करताना सेमिनारमध्ये बोलघेवडे विद्वान पहिले होते. प्रत्यक्ष समाजाशी त्यांचे देणेघेणे नव्हते. अशा स्वतःला विद्वान म्हणवणाऱ्या आर्मचेअर स्कॉलरसारखे आपल्याला व्हायचे नाही हे त्यांनी निश्चित केले होते. अनिल अवचट यांची पुस्तके वाचून आणि गांधी विचारांच्या आकर्षणातून त्यांच्या मनात ज्या प्रकारचे काम करावे असे होते तेच काम त्यांना पीएचडी करताना मिळाले. त्यांचा स्वमदतगट हा विषय फक्त अभ्यासापुरता न ठेवता कृतीतही आणावा हे त्यांनी पक्के ठरवले. ते वेब डिझाईनर आहेत. स्वमदत गटांच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि त्यांच्या कामाला उभारी देण्यासाठी वेब डिझायनिंगच्या कामाची सांगड घालायची, स्वमदत गटांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत वेबसाइट करून द्यायची त्यांनी ठरवले आणि त्याप्रमाणे आम्हाला विचारणा केली.आमच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानर एकदा पार्किन्सन मित्र मंडळातील सर्व कार्यकारीणी सदस्यांना ते भेटले.त्यांना काय आणि का करायचे त्यांनी सांगितले.त्यांच्या बोलण्यातील थेटपणा, नेमकेपणा आणि सच्चेपणा, विचारांची स्पष्टता, पारदर्शकता कामाबद्दलची तळमळ याचा सर्व सदस्यांवर प्रभाव पडला. त्यांची वेबसाईटची कल्पना सर्वांनीच उचलून धरली.
आणि आमची वेबसाईट तयार झाली.
२०१४ मध्ये वेबसाईट तयार झाल्यापासून आत्तापर्यंत आम्हाला वेबसाईट साठी १ पैसाही खर्च करावा लागलेला नाही. सुरुवातीला त्यांच्या अनुबंध डॉट कॉम या साइटवर वेबसाईट होती. हळूहळू व्याप वाढल्यावर त्यांनी मंडळाच्या नावाने स्वतंत्रपणे वेबसाईट करून दिली आणि आत्ताचेwww.parkinsonsmitra.org हे नाव पक्के झाले.
वेब डिझायनर, समाजशास्त्राचा अभ्यासक आणि संवेदनशील माणूस या सर्वांचे मिश्रण वेब डिझाईन मध्ये उतरले आणि वेबसाईटला अतुल टच आला. टेक्नॉलॉजीचे विशेष ज्ञान नसलेल्यानाही हाताळायला ती सोपी असावी हा त्यांचा आटापिटा होता. त्यांनी डिझाइन मध्ये वेळोवेळी बदल केले आणि सर्वांसमोर सुधारणा सुचविण्यासाठी ते ठेवले. त्यांच्या मनाचा उमदेपणा मनाला भावणारा होता. या काळात त्यांचे पीएचडीचे काम ऐरणीवर होते. पुणे मुंबई जा ए चालू होती. स्वतःचे सेंट झेवीयर कालेजमधील लेक्चरर म्हणून काम होतेच तरीही ते या कामाशी एकरूप होऊन गेले. मला त्यांना हे काम इतके महत्त्वाचे नाहीये तुमच्या पीएचडीच्या कामाला महत्त्व द्या असे वेळोवेळी सांगावे लागत होते.
अतुलला विविध विषयात रस असल्याने अनुबंध या त्यांच्या साईटवर त्यावरचे लेखन सुरूच असते. संस्कृत, योगशास्त्र, स्वमदतगट, व्यसनमुक्ती, हॉलीवुड, बॉलीवुड वरील लेखन,जी.एं.चे साहित्य इत्यादी त्यांचे आवडीचे विषय. यातील हॉलीवुड, बॉलीवुड वरील लेखन आणि जी.एं.चे साहित्य स्वान्त सुखाय असं म्हणता येईल पण इतर विषयावरील त्यांचे लिखाण सामाजिक भानातून असते. आजूबाजूला घडणार्या बर्या-वाईट घटनांवरही ते सडेतोड भाष्य करत असतात. विषय विविध असले तरी मन, विचार, कृती यात या सर्वांची एकरूपता दिसते. विचारांचा पाया गांधी विचार हा असतो. त्यांच्या लेखमालेची, लेखांची शीर्षके वाचल्यावरही हे लक्षात येते. 'गांधी तत्वे आणि व्यसनमुक्ती' ही लेखमाला 'व्यसना संदर्भात संस्कृत सुभाषितांचा विचार', 'व्यसनमुक्तीसाठी योग,' 'सहचरींसाठी योग' 'पार्किन्सन्स आणि योग एक सकारात्मक शक्यता' ही लेखमाला ही काही उदाहणासाठी नावे. याशिवाय ते लिंग्विस्टिक मध्ये एम.ए. करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या वाडवळी समाजाच्या बोलीवर अभ्यास करत आहेत. 'योगाभ्यास आणि नैराश्या' यावर त्यांना अभ्यास करायचा आहे. विचारांच्या मुळाशी जाऊन शोध घेणे हा त्यांचा स्थायीभाव आहे हे सर्व करताना आमची वेबसाईट ते सांभाळतात ते आमच्यासाठी महत्त्वाचे. ते आमच्या परिवारातील एक होऊन गेलेले आहेत.
वेबसाईट सुरु झाली आणि हळूहळू पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या चेहरामोहराच बदलून गेला. मंडळाच्या उद्दीष्ट पुर्ततेची गती वाढली. अनेकांपर्यंत मंडळ पोहोचले
क्रमशः

May be an image of 1 person

क्षण भारावलेले - १५ भाग २

 

                                                              भाग  २
                                                      क्षण भारावलेले - १५
 
 
वेबसाईटमुळे मंडळाचा चेहरा मोहरा बदलणे,मंडळाच्या उद्दीष्टपुर्ततेचा वेग वाढणे हे सर्व आज वेबसाईट सुरु झाली आणि लगेच झाले असे नाही. वेबसाईट ची भूमिका कॅटलिस्ट ची राहिली.
सुरुवातीला पार्किन्सन्स मित्रमंडळ, पार्किन्सन्स विषयी माहिती होती मग काही जुन्या स्मरणिकेतील लेख काही नवीन लेख घातले गेले. प्रत्येक महिन्याचे वृत्त येऊ लागले. यापूर्वी वर्षभराचे वृत्त एकदम स्मरणिकेत येई त्यामुळे ते थोडक्यात द्यावे लागे. वेबसाईट मार्फत सभेस उपस्थित राहू न शकणाऱ्या, परगावच्या लोकांपर्यंत वृत्त पोचते त्यामुळे सविस्तर वृत्त दिले जाऊ लागले. दर महिन्याच्या सभेचे भरपूर फोटो टाकले जाऊ लागले त्यामुळे मासिक सभा, सहल या सर्वांचे भरपूर फोटोही घेतले जाऊ लागले यापूर्वी फक्त जागतिक पार्किन्सन्स मेळाव्याचे फोटो काढले जात आणि फक्त सभेला येणाऱ्या लोकांना ते दाखवले जात. आता फोटो आणि सविस्तर वृत्तामुळे ते वाचणार्या, पाहणाऱ्या सर्वांना पाहता येऊ लागले.एक फोटो पानभर लेखातून व्यक्त होणार नाही इतके सांगून जातो.ते पाहणार्यांना
आपण सभेस हजर आहोत असे वाटू लागले. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या लोकांना एकातरी सभेला उपस्थित रहावे असे वाटू लागले बेळगावच्या आशा नाडकर्णी, नाशिकच्या संध्या पाटील, नागपूरची मीनल दशपुत्र आणि जोशी दांपत्य, औरंगाबादचे तिळवे दाम्पत्य,नांदेडचे नांदेडकर,चिपळुणचे करोडे अशा अनेकांनी मासिक सभांना उपस्थिती लावली,
वेबसाईटवर काय काय करता येईल याबाबत आम्ही अगदीच अनभिज्ञ होतो अतुलनेच विविध गोष्टी सुचविल्या.त्यांनी मोबाईलवर पाहता येईल असे सुटसुटीत डिझाईन केले.शुभंकर नावाने appही केले पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यातील स्मरणिकेची पीडीएफ फाईल वेबसाईटवर टाकली जाऊ लागली.पुण्यात स्मरणिकेचे सभेत प्रकाशन होत असतांना त्याचवेळी वेबसाईट वरही प्रकाशन होऊ लागले.
सभा संपवून आम्ही घरी जाण्यापूर्वी अगदी अमेरिकेतील व्यक्तीनेही ती वाचलेली असायची. स्मरणिका पोस्टाने पाठवली तरी सर्वांना पोहोचत नसे. आता वेबसाईटमुळे कोणीही केव्हाही पाहू शकते. इंटरनेट न वापरणाऱ्यांना त्यांची मुले नातवंडे स्मरणिकेचे प्रिंटआऊट काढून देऊ लागले. अतुलने आपण तज्ज्ञाच्या भाषणांच्या व्हिडिओची लिंक देऊ शकू असे सांगितल्याने प्रोफेशनल व्यक्तीकडून जागतिक पार्किन्सन्स मेळाव्याचे व्हिडिओ घेतले जाऊ लागले. त्यातून यूट्यूब चानल बनवले गेले.
नवीन स्मरणिका वेबसाईटवर आल्या पण जुन्या चे काय? त्यावरही आतुलनी उपाय सुचवला लेख स्कॅन करून वेबसाईटवर टाकावे असे ठरले. आता वेबसाईट पार्किन्सन्स मित्र मंडळाची अर्काइव बनली आहे. काम आधीही करत होतो पण ते आता जगभर पोचले. अनेकांच्या कडून आपण होऊन देणग्या येऊ लागल्या.
स्मरणिकेत वर्षभरातील कामाचे फोटो टाकले जाऊ लागले. वेबसाईटवर सर्व फोटो उपलब्ध असल्यांने फोटोंची निवड सोपी झाली.
वेबसाईटचे काम मीच पहात असल्याने माझ्या आजारपणाच्या काळात महिन्याच्या सभेच्या वृत्तांता शिवाय काही जात नव्हते यावेळी अतुल ने पुढाकार घेतला.
येथे एक गोष्ट सांगावी लागेल अतुल ठाकूर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आहेत त्यांच्यातील संशोधकाला शुभंकर, शुभार्थी, त्यांच्या समस्या अनुभव, आनंद, दुःख कला या सर्वांसह येथे भेटतात. स्वमदत गटाचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व समजते. अतुल ठाकूर यांचे संशोधनातून निघालेले निष्कर्ष तपासले जाऊन त्याचे सिद्धत्व लक्षात आल्याने त्यांना वेगळे समाधान मिळत असावे. या काळात अतुल नी सर्वांना अनुभवाचे बोल, कवितेचे पान, कलादालन, अन्न हे पूर्णब्रम्ह असे विविध विषय दिले आणि वेबसाईट वर ते टाकण्याचे आश्वासन दिले. अनेक शुभंकर, शुभार्थी लिहिते झाले त्यांचे अनुभव, कला लोकांपर्यंत आले. इतक्या दिवसात मलाही हे जमले नव्हते.
अतुल लेख लिहिताना आमचे पार्किन्सन्स मित्र मंडळ म्हणतात ते फार छान वाटते. ते आमच्या परिवारातले आहेत यावर शिक्कामोर्तब होते.
Lock down च्या काळात तर अतुलनेच पार्किन्सन्स मित्र मंडळ कार्यरत ठेवले. तंत्रज्ञानात अनभिज्ञ असणारे आम्ही काहीच करू शकलो नसतो. अतुलने व्हिडीओ कॉन्फरन्स ची कल्पना मांडली त्यासाठी तीन-चार ट्रायल मिटिंग झाल्या आणि आता दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्स होते अतुल होस्ट असतात.परगावचे लोकही उपस्थित राहू शकतात. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे रेकॉर्डिंग यूट्यूबवर टाकून त्याची लींक वेबसाईटवर दिली जाते.
उमेश सलगर यांनी Lock down च्या काळात गाण्याचे कार्यक्रम केले. त्यांना प्रवृत्त करण्याचे काम अतुलने केले.
स्मरणिकेच्या वेब एडिशनच्या प्रकाशनाचा उत्साह आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त होता.
एरवी प्रत्यक्ष
प्रकाशनात प्रकाशन करणारे बांधलेल्या पुस्तकांची रीबन कापतात
येथेही त्यांनी अशीच सुंदर रीबनची फिरत केली.तिच्यावर क्लीक केले की स्मरणिका दिसणार होती.
त्यांना आता अनेकजण नावासकट माहित आहेत ते त्यांची अगत्याने चौकशी करतात
पुर्वी सभेला येणाऱ्यांनी पार्किन्सन्सला स्वीकारलेले नसायचे.कारण अज्ञान आणि त्यातून निर्माण झालेली भीती आता मात्र सभेला येण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत वेबसाईट वरील पार्किन्सन्स बाबत माहिती पोचलेली असते काहीजण तर वेबसाईटवरील मंडळाची माहिती पाहूनच मंडळात सामील होतात. आता येणारे शुभार्थी पार्किन्सन्सला स्वीकारूनच आलेले असतात.
यापुर्वी सभेला प्रथम येणारे शुभार्थी पार्किन्सन्सला स्विकारता न आल्याने भाऊक होऊन रडायचे.त्यांना समजवावे लागायचे.आता ती परीस्थिती राहिली नाही.अज्ञान दूर झाले त्यामुळे भिती गेली आणि स्वीकार सोपा झाला.
अतुल ची मदत अशी विविध मार्गाने मंडळाला उपयुक्त ठरली. अतुल खूप भीडस्त आहेत. त्यांचे असलेले हे श्रेय त्यांना दिले तरी ते अवघडून जातात.मंडळांने त्यांना संधी दिली,विश्वास दाखवला,याचेच त्यांना अप्रूप वाटते.
मी त्यांना एकदा विचारले 'या व्यवहारी जगात असे मोफत काम तुम्हाला का करावेसे वाटते?' त्यांचे उत्तर त्यांच्याच शब्दात.
'लहानपणापासून एकाकीपणाची भावना फार प्रबळ आहे. त्यामुळे माणसांच्या प्रेमाची भूक आहे अाहे असं वाटतं. मदत केली की माणसं जोडली जातात. कुठेतरी तुमच्यासारखी खुप प्रेम करणारी माणसं मिळतात. हे एक महत्वाचं कारण. दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला पैसा लागण्याच्या या काळात आपण निदान एक गोष्ट विनामोबदला करावी असं वाटतं. मानसिक समाधानासाठी.'
अतुलच्या कामामुळे आम्हाला मिळालेले समाधान अतुलच्या समाधानपेक्षा
शतपटीने जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात तर मंडळासाठी ते देवदूतच ठरले.
एका क्लिक मध्ये माहितीचा खजिना शुभंकर शुभार्थींना पाठवताना होणारे आत्मिक समाधान खूप मोठे आहे आणि हे क्लिक करताना अतुल बद्दलच्या अपार कृतज्ञतेने मन भरून येते. अतुल तुम्ही कायम आमच्या बरोबर आमच्यासाठी राहा. खात्री आहे राहालच.
-
पहिला भाग वाचून आमच्या शुभंकर, शुभार्थींनी अतुलचे भरभरून कौतुक केले.आपल्यात साधेपणाने वावरणारी ही व्यक्ती नेमकी काय आहे हे त्यांना प्रथमच समजत होते.भुषणा भिसे या शुभार्थींनी कृतज्ञता म्हणून स्वता बनवलेले पेंटींग भेट दिले.त्याचा फोटोही येथे देत आहे
 
 

 

Sunday 18 April 2021

क्षण भारावलेले - १६

                                                क्षण भारावलेले - १६

                           ११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्सदिना निमित्तचा  ऑनलाईन मेळावा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत  यावर्षी साजरा झाला.या मेळाव्यानी भाराऊन टाकणारे अनेक क्षण दिले.भरभरून येणाऱ्या प्रतिक्रियातून ते अजूनही येतच आहेत.बरच काही लिहायचे आहे.प्रथम लिहित आहे ते मोहन पोटे यांच्यावर कारण यातून नोकरीत असताना पार्किन्सन्स  झालेल्या अनेकांना प्रेरणा मिळेल.

                       मेळाव्यात मोहन पोटे यांचे 'इतनी शक्ती हमे देन दाता'  सर्वानीच ऐकले.ते स्टेट बँकेत नोकरी करतात.आज त्यांना तेथे २ वर्षाचे एक्स्टेंन्शन मिळाले.हे त्यांचे दुसरे एक्स्टेंन्शन  आहे. त्यांनी याबाबतची पोस्ट टाकताना  पार्किन्सन्स मित्रमंडळ आणि त्यातील सभासदांनाही श्रेय दिले आहे.आम्ही एकमेकांना पाहिलेही नाही तरी खूप जवळीक आहे.मला त्यांची पहिली फोनवरची भेट आठवते.त्याना पार्किन्सन्सचे निदान झाले होते.ते खचून गेले होते.मुले मार्गी लागायची आहेत नोकरी करणे गरजेचे आहे बँकेतील उर्वरित सेवा आपण करू शकणार नाही असे त्यांच्या मनानी घेतले होते.१ वर्ष गोळ्या घेतल्या.झोप येते,हाताने लिहिणे, जेवणे जमत नाही,  गोळ्यांचा त्रास होतो म्हणून हळूहळू त्याही बंद केल्या.यातून रुग्ण पूर्णपणे बरा होतो का असे ते विचारात होते..फोन आला तेंव्हा ते लोकलमधून प्रवास करत होते.

                            ते गोराइला राहातात.बँक बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे.गोराईहून बस किंवा रिक्षाने बोरीवली स्टेशन,तेथून लोकलने बांद्रा.आणि पुन्हा बस किंवा रिक्षाने इच्छित स्थळी.याला दीड ते दोन तास लागतात..अधिकार  पदावर असल्याने जबाबदाऱ्याही भरपूर.त्यांच्याकडे eod चे काम असल्याने सर्वात शेवटी बँकेतून बाहेर पडावे लागते.हे सर्व आता आपल्याला झेपणार का असे त्यांना वाटत होते.  

                      मी त्याना गोळ्या बंद न करता जो त्रास होतो तो तुमच्या न्यूरॉलॉजिस्टना सांगा ते गोळ्या बदलून देतील असे सांगितले.आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण लक्षणावर नियंत्रण आणता येते हे वास्तव सांगितले.तरूण वयात पार्किन्सन्स झालेल्या अनेकांनी कार्यकाल कसा पूर्ण केला ही उदाहरणे दिली,त्याना वेबसाईट लिंक पाठवली.त्यातील  लेख वाचून, व्हिडीओ ऐकून त्यांच्या बऱ्याच शंकांचे निरसन झाले होते.माझ्याशी बोलूनही त्याना बरे वाटले होते.ते Whats app group वर सामील झाले त्यांच्या पोस्टवरून त्यांची निराशा,नकारात्मकता कमी झाल्याचे जाणवत होते.

                   एकदा फेसबुकवर व यु ट्युबवर करावकेवर म्हटलेल्या 'बेकरार करके हमे यु ना जाईये' या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी टाकला होता.गाणे सुंदरच म्हटले होते.

                  त्यांच्या गच्चीत त्यांनी छोटी बाग केली आहे..त्याला आलेल्या फुलांचे फोटो ते टाकत होते.ग्रुपवर अनेक जण कलाकृती,स्वरचित कविता असे काहीना काही टाकतात आणि इतरांचीही क्रिएटिविटी जागृत होते.पोटे आता ग्रुपवर मिसळून गेले आहेत.आमच्या परिवाराचे सदस्य झाले होते.

                    ११ एप्रिलच्या मेळाव्यासाठी सुरुवातीचे ईशस्तवन म्हणाल का असे विचारताच त्यांनी ताबडतोब होकार दिला. एरवी तबला ,पेटीवर गाणे बसवले जाते.ऑनलाईन कार्यक्रमात ते शक्य नसते म्हणून मीच त्यांना अर्थपूर्ण आणि सोपे असे गीत सुचवले होते. 'इतनी शक्ती हमे दे ना दाता' हे गाणे बँकेचा व्याप सांभाळत ते बसवत होते.

                 मला किंवा ग्रुपमधल्या सर्वच स्त्री सदस्यांना ते माउली म्हणतात. त्यांचा मेसेज आला. 'माऊली तुमचे खूप आभार. ही प्रार्थना एकदम शुद्धीकारक आहे.काल दोनदा ऑफिस संपल्यावर कॉमन रूममध्ये रेकॉर्ड केले.परंतु आवाज मुलायम व्हायला हवा तसा प्रयत्न चालू आहे.सुरूवातीला आठवडाभर तर एकेक शब्दानेच कंठ दाटून यायचा.ही प्रार्थना म्हणजे मनासाठी आरसाच आहे.माझा आवाज मनासारखा जमला की मग रेकॉर्ड करीन व पाठवीन.परत एकदा धन्यवाद'. त्यांनी यासाठी खूप कष्ट घेतले.आधी ऑडीओ आणि नंतर व्हिडीओ पाठवले.ऐनवेळी तांत्रिक अडचण आली,इंटरनेटची समस्या झाली तर म्हणून आम्ही जास्तीत जास्त कार्यक्रमाचे व्हिडिओही घेऊन ठेवले होते.रिहर्सलला त्यांनी प्रत्यक्ष गाणे म्हटले ते छान झाले.

त्यांचा लगेच मेसेज आला.'आता केलेल्या रंगीत तालमीत एक गोष्ट लक्षात आली माझा नेहमीचा अलार्म सुरू झाला आणि एक मिनीटभर बीप बीप असा आवाज आपल्या कार्यक्रमात व्यत्यय आणू लागला.तसेच रीमाईंडर नोट चा पण व्यत्यय येतो.अलार्म व रीमाईंडर स्टॉप केले म्हणजे व्यत्यय येणार नाही.'प्रार्थना चांगली होण्यासाठी ते जीव ओतून काम करत होते.

कार्यक्रमादिवशी काही अडचण आली नाही त्यांनी प्रत्यक्ष गाणे म्हटले.

               या त्यांच्या यशानंतर लगेचच त्याना एक्स्टेंन्शन मिळाल्याचे लेटर आले.ते खुश होते.त्याना अभिनंदनाचा फोन केला तेंव्हा ते सांगत होते. या ग्रुपमध्ये आल्यावर एकदम माझ्या दृष्टीकोनात,जीवनात ३६० अंशात फरक झाला.

                एक्स्टेन्शन नंतर त्यांची बोरीबंदरला बदली होण्याची शक्यता आहे..प्रवासाचा वेळ वाढणार आहे..त्याबद्दल त्यांची काहीच तक्रार नव्हती.त्यांच्या दृष्टीने आता प्रवासामध्ये त्याना काही वाचायला, शिकायला,आराम करायला भरपूर वेळ मिळणार आहे.नरीमन पॉइंटला कामाला असताना .लोकल प्रवासातच ते बँकेत उपयोगी पडणाऱ्या काही कॉम्प्युटर लँग्वेज शिकले. त्यांच्या दृष्टीकोनात ३६० अंशात फरक पडलाय हे मला पटले.

              सुरुवातीला  शुभार्थीची रोल मॉडेल मी त्यांच्यासमोर ठेवली होती आता तेच रोल मॉडेल बनले होते.स्वमदत गटाचे महत्व अशा अनेक शुभार्थींच्या यशातून अधोरेखित होत आहे.

                पोटे तुमचे खूप अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.

                                                                                                                                                           

 May be an image of 1 person, body of water and tree