Monday 22 August 2016

खुदिको बुलंद करणारे बंदे

                                                    खुदिको बुलंद करणारे बंदे -  १   
                              
                        " खुदिको कर इतना बुलंद कि हर तहरीरके पहले 
                          खुदा बंदेको पुछे,'बोल तेरी रजा क्या है'| "
ऐकायला,लिहायला हे छान वाटत,  प्रत्यक्षात अशा व्यक्ती सापडणे कठीण. पण आमच्या मित्राने,पार्किन्सन्सने आमच्यापर्यंत असे बंदे आणले.उल्हास गोगटे आणि उषा गोगटे हे जोडपे  यातील एक.८१ वर्षांच्या  उषाताईंच ३ ऑगस्ट २०१६ ला निधन झाल.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उषाताईंच्या निधनाने  साठी  ओलांडलेल,परस्पराविषयी प्रेम आदर,कौतुक यांच्या अतूट नात्यात बांधलेलं  सहजीवन रूढार्थाने संपल.त्यांचं सांत्वन करायला गेलेलो आम्ही त्यांच्या आगळ्यावेगळ्या सहजीवनाच्या दर्शनाने थक्क होऊन आणि प्रेरणा आणि ५००० रुपयाची देणगी घेऊन परतलो.हे काही प्रथम दर्शन नव्हत.पण जेंव्हा जेंव्हा गोगटे भेटले तेंव्हातेंव्हा आवाक होण हीच प्रतिक्रिया असते.ती शब्दात मांडण आणि एका लेखात सामावण कठीण. त्यामुळे जमेल तसे  आणि टप्प्या टप्प्याने लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
 दिवाणे यांच्या घरी झालेल्या डेक्कन गटाच्या सभेत उल्हास गोगटे प्रथम भेटले.ते पूर्णवेळ न थांबता घाईघाईने गेले.पार्किन्सन्स झालेली शय्याग्रस्त  पत्नी,आणि आणि आता ५८ वर्षाचा असलेला विकलांग मुलगा, यांना ते घरी सोडून आले होते.यशस्वी व्यावसायिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गोगटे यांनी इतर सर्व गोष्टी बंद करून पत्नी आणि मुलाच्या सेवेस वाहून घेतलं होत.१००० रुपयाची देणगी त्यांनी दिली.मंडळाला मिळालेली ती पहिली देणगी होती.नंतर अनेकवेळा ते अशीच देणगी द्यायला घाईघाईने येऊन गेले.त्यांचं सर्व लक्ष पत्नी आणि मुलाकडे असे.आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा उषाताईना प्रथम पाहिलं.घरी शय्याग्रस्त कोणी असल की घरात एक उदासवाण वातावरण असत.शय्याग्रस्त व्यक्ती थोडी ओशाळलेली, कंटाळलेली, त्या व्यक्तीकडे पाहायला कोणीतरी पगारी व्यक्ती नेमलेली असते.इथ तर एक शय्याग्रस्त आणि एक विकलांग व्यक्ती.पण उदासवाणेपणाचा मागमूसही नव्हता उलट प्रसन्न वातावरण होत.या दोघांच सर्व काही स्वत: गोगटे करत होते.पगारी माणसे नेमली की झाल असे समजणारे अनेक शुभंकर पाहिले होते,आम्हाला आमच लाईफ नाही का? किती दिवस आम्ही अडकून राहायच? अस विचारणारेही पाहिले होते.कोणताही आव न आणता समर्पित भावाने सर्व काही करणारे गोगटे यांच्यासारखे मात्र विरळाच.
 ना .सी.फडकेंच्या कादंबरीतील नायक, नायिका शोभतील असे हे जोडपे.एकमेकाच्या आकंठ प्रेमात बुडालेले. सर्वगुण संपन्न.नायक हँडसम,नायिका ब्युटिफुल.नियतीने  यांच्या कथेतील सहजीवनाच्या सुंदर चित्रावर दु:ख,वेदना,हतबलता यांचे वार करत बाधा आणण्याचा प्रयत्न केला.परंतु यांच्या प्रेमाच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या सहजीवनाच्या गडद रंगात नियतीचे फटकारे निष्प्रभ ठरले.
पहिला फटकारा १९६४ मध्ये अमरच्या जन्मानंतर मिळाला.त्याच्या जन्माच्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता.फोर्सेप्स डिलिव्हरी करावी लागली.मेंदूला इजा झाली आणि विकलांगता चिकटली.
जन्मताच सर्व अवयाववरच नियंत्रण गमावलं.पती पत्नींनी हार न मानता त्याला नॉर्मल स्थिती आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.नॉर्मल नाही झाला तरी दोन गुडघ्यावर, हातावर चालू लागला.अस्पष्ट का असेना बोलू लागला.त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला.त्याला नाटकाची संगीताची आवड आहे.गोगटेना कवितेत शब्द अडला तर तो सांगतो. आम्ही भेटायला गेलेल्यावेळी तोही आमच्यात बसतो.आम्ही सभेचे फोन करतो तेंव्हा एकदा अमरनी फोन घेतला.मला कोण आणि काय बोलत समजलच नाही. आमच्या पहिल्या भेटीत गोगटे म्हणाले त्याला इतर काय बोलतात ते समजत.त्यांनी एकदा पाहिलेली व्यक्ती तो १० वर्षांनी भेटली तरी ओळखेल.यानंतर मात्र अमर फोनवर असला की मी कोण ते सांगून निरोप देऊ लागले आणि तो गोगटेना व्यवस्थित पोचलेला असायचा.त्यांनी आपल्याच जीवनावर एक कथाही लिहिली.त्याला नेत्रदान आणि देहदान करायचं आहे. विकलांग  अमरला घडवण्यात,निरोगी आणि सुंदर मन देण्यात या पती पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले असतील,पेशन्स ठेवावे लागले असतील याची आपण कल्पना करू शकतो.इतर कुटुंबीयांचीही यात मदत होतीच.एकदा कोणीतरी अमरसाठी उपाय  सांगितला.त्यासाठी डोंगरावर जावे लागणार होते. वाहनाची सोय नव्हती. तर धाकटा भाऊ केदारने अमरला पाठीवर उचलून नेल होत.
१९९६ मध्ये उषाताईंना पार्किन्सन्स झाल्याच निदान झाल.त्यातच अ‍ॅस्टीओपोरोसिसही झाला. जरा कुठ पडल की हाड मोडल अस होऊन अनेक ठिकाणी ऑप्रशन करून  रॉड घालावे लागले.बॅटमींटन चँपियन असलेल्या उषाताई अंथरुणाला खिळल्या.त्यातच ताठरता कमी करणारे पार्किन्सनन्सवरचे महत्वाचे औषध सिंडोपा घेतल्यावर त्याना जोरदार चक्कर येत असे त्यामुळे सिंडोपाच्या गोळ्या  देता येणार नव्हत्या.न्युरॉलॉजीस्ट दिवटे यांनी Pacetane,Amentral या गोळ्या चालू ठेवल्या.अमरबरोबर आता  उषाताईनाही पाहावे लागणार होते. गोगटे ते समर्थपणे करत होते.त्यांच्या खाण्यापिण्याबरोबर, औषधोपचाराबरोबर त्यांचा व्यायाम करून घेणेही ते करत होते.मन आनंदी ठेवण्यासाठी धडपडत होते.घरात बसून कंटाळा येईल म्हणून दोघानाही गाडीतून बाहेर फिरऊन आणत होते. अमरला पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरात आवडतो म्हणून बऱ्याच वेळा तेथे ते जात. हे किती कठीण आहे, हे ते या दोघांना एकदा सभेला घेऊन आले तेंव्हा लक्षात आल.त्यांनी गाडी अश्विनी हॉटेलच्या अगदी दारापाशी आणली.प्रथम अमरला गाडीतून काढून व्हीलचेअरवर घेतलं.हॉलमध्ये आणून बसवलं.नंतर उषाताईना गाडीतून बाहेर काढून हॉल मध्ये आणल.घरापासून हॉलपर्यंत असा दोघानाही आणण्याचा  मला वाटत विचारही कोणी केला नसता.उषाताईही मन रमवण्यासाठी स्वत:चे मार्ग शोधत होत्या.नामजपाने त्यांच्या अनेक वह्या भरल्या.उषाताईंच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती तरीही गोगटे काहीना काही उपाय पाहत होते. मध्यंतरी श्री गोखले यांनी पीडी पेशंटच्या घरी जाऊन संमोहन उपचार करण्याची तयारी दाखवली. गोगटे यांनी तो प्रयोग करून पाहिला.उषाताईना त्यामुळे थोडा फायदा झाला.गोखले यांचे व्याख्यान आम्ही मंडळात ठेवले तेंव्हा  आपला अनुभव सांगायला घाईघाईने गोगटे येऊन गेले.सगळ थोड स्थीरस्थावर होत होत तर नियतीला पुन्हा परीक्षा घेण्याची लहर आली.गोगटेना सुधारता येऊ शकत नाही अशी दृष्टीची समस्या निर्माण झाली.कमी दिसू लागल.वाचन लिखाणावर मर्यादा आली.चारचाकी बंद झालीच होती दुचाकीवर जाणही बंद झाल.सेवेत मात्र खंड नव्हता.
आता त्यांच सभांना येण जवळजवळ बंदच झाल.फोनवर संपर्क होता.एकदा त्यांनी 'पार्किन्सन्स मित्र' नावाची कविता पाठवली.एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत 'परका  होता घरचा झाला अखंड नाते जडले' अस म्हणण, 'रडण्यापेक्षा मुळूमुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा' म्हणत पीडीशी हातमिळवणी करण,खरच ग्रेट.आम्ही ही कविता २०१६च्या अंकात छापली.इतर अनेक छंद असलेल्या गोगटेना घरी राहण्याच्या काळात त्यांच्या कविता सखीने साथ दिली.या कवितेच्या साथीबद्दल स्वतंत्रपणे लिहिणारच आहे.उषाताईंच्या मृत्युनंतर तीन चार  दिवस, ही सखी सुद्धा त्यांच्याजवळ जाऊ शकली नाही.६ ऑगस्टला मात्र धीर करून ती जवळ आली. त्यांची 'भयकंपित अवस्था' कागदावर उतरली. आम्ही भेटायला गेलो तेंव्हा टेबलवर कवितेची वही होती.' वर्षा सहल,श्रावण,उषाताईंचा १६ ऑगस्टचा वाढदिवस अशा आठवणीच्या सरीवर सरी अनेक कवितेतून कोसळत होत्या. 'जाणे तुझे मनाला गेले लुळे करून'.असा विलाप मन करत होत.
त्यांनी यापूर्वी आपल्या एका दीर्घ कवितेत 'जगावेगळी माझी प्रार्थना देवा प्रथम ने या दोघांना ' अस म्हटल होत.हे बुद्धीला समजल तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर मन मात्र हा वियोग सहन करू शकत नव्हत.
उल्हासराव आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.

Wednesday 17 August 2016

बुद्धिवंत वास्तुरचनाकार हरपला.

                                                  बुद्धिवंत वास्तुरचनाकार हरपला.
                
११ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा होती.या महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांना सभेस येण्याची आठवण करायला फोन करायचे होते.यात चंद्रकांत दिवाणे यांचे नाव होते.पण त्यांना फोन करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली.अत्यंत बुद्धिमान,मितभाषी, शांत स्वभावाच्या दिवाणे यांचा मंडळाच्या कामात विविधांगी सहभाग असायचा.
२००८ मध्ये दीनानाथ हॉस्पिटल मध्ये झालेल्या मेळाव्यानंतर मंडळाची नौका वेगाने पुढे नेणारी नव्या उमेदीची कुमक सामील झाली.त्यात चंद्रकांत दिवाणे हे शुभार्थीही होते.सुरुवातीला पुण्यातील वेगवेगळ्या भागात सभा घेण्यासाठी सात विभाग करण्यात आले. त्यातल्या डेक्कन विभागाची धुरा दिवाणेनी उचलली.स्वत:च्या घरी डेक्कनच्या सभासदांची सभा आयोजित केली.सभासदांना सुंदर हस्ताक्षरात सभेची पत्रे पाठवली.वास्तुरचनाकार असल्याने कार्डाच्या मागे त्यांच्या घराकडे कस यायचं हे दाखवणारा नकाशाही होता.सहवास वाढत गेला तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजत गेले.
                                  त्यांच्या यशाची भव्य वास्तू परिश्रम,माणुसकी आणि  नैतिकतेच्या भक्कम पायावर उभी होती.सकाळी ड्राफ्ट्समनचे काम करायचे आणि संध्याकाळी अभिनवकलाच्या आर्किटेक्चर डिप्लोमाच्या व्याख्यानांना हजर राहायचे,असे करत त्यांनी शिक्षण पुरे केले.इतरांना असे कष्ट घ्यावे लागू नयेत म्हणून आजही गरजूंना शिक्षणासाठी ते मदत करीत, शैक्षणिक संस्थानाही ते मदत करीत होते.१९६५ मध्ये स्वतंत्र प्रॅक्टीस सुरु केली मग मागे वळून पहिलेच नाही.बंगले,चर्चेस,सोसायट्या विविध प्रकार हाताळले.मुलेही हाताशी आली व्याप वाढत गेला.२०१० पासूनच्या सर्व स्मरणिकेत त्यांनी दिलेल्या  जाहिरातीतून तो आमच्यापर्यंत पोचला.त्यांनी न सांगताच स्मरणिकेत एक पान  आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेले असायचे.मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात दिवाणे पती पत्नीचा सक्रीय  सहभाग असायचा.सहली हा त्यांचा आवडीचा विषय.मंडळाची पहिली पानशेतची दिवसभराची सहल फक्त कार्यकारिणीच्या लोकांची पायलट सहल होती. त्यानंतरची आठ दिवसाची आनंदवन सहल,प्रत्येक वर्षाच्या छोट्या सहली यात ते सपत्नीक हजर  होते.सहलीतील खेळ,ओरिगामी स्पर्धा,क्विझ या सर्वात ते पुढे असत बक्षीसही मिळवत.कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे असे.मागच्या वर्षीच्या फुलगाव सहलीत तर त्यांनी स्वत:च एक क्विझ तयार करून त्याच्या सर्वाना द्यायला झेरॉक्स कॉपी करून आणल्या होत्या.आनंदवनच्या सहलीत चार जणांना एक खोली शेअर करावी लागली.अंजली आणि केशव महाजन हे दिवाणे यांच्या बरोबर होते.शिक्षिका असलेल्या अंजलीनी आपल्या पतीसाठी व्हीआरएस घेतली होती.आनंदवन,हेमलकसा  येथील शाळा आणि मुले पाहिल्यावर तिला शिकवण्याची उर्मी आली.दिवाणे यांनी केशव महाजन यांच्याकडे पाहण्याची जबाबदारी घेतली.आणि अंजलीला आपली इच्छा पूर्ण करता आली.सहलीत खूप फोटोही काढले.सहलीतील त्यांचा वावर पाहता यांना खरच पीडी आहे  का? अशी कोणालाही शंका आली असती.
                  दर महिन्याच्या सभासाठी सभासदांना फोन केले जातात.हे काम बहूतेक शुभंकर करतात.कारण बऱ्याच शुभार्थीना स्पष्ट  बोलता न येण्याची समस्या असते.पण मागच्या महिन्याच्या सभेपर्यंत दिवाणे यानी हे काम केले.या महिन्याच्या सभेसाठीही त्यांनी नावांची यादी काढून ठेवली होती.
                 शेवटपर्यंत मंडळासाठी काम करण्याची त्यांची धडपड होती.व्यावसायाबद्दलही तेच.आता मुलांच्यावर व्यवसाय सोपऊन त्यांनी निवृत्ती घेतली होती खरी,पण त्यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार ते ऑफिसमध्ये जात नव्हते, प्रत्यक्ष काही करत नव्हते तरी सर्व काही करत होते.त्यांनी केलेल्या कामाच्या फायली अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळल्या आहेत.आजही ज्यांचे काम केले त्यांना कागदपत्रे सापडली नाही तरी दिवाणे यांच्या फायलीत  ती सापडतात.स्वत:पुरते न पाह्ता कोणतही काम परफेक्ट करायचं हा त्यांचा गुण.त्यांच्या इतक परफेक्शन आमच्याकडे नाही अस त्यांच्या मुलांनी सांगितलं.
                          दिवाणे,यावर्षीच्या स्मरणिकेतही तुमची जाहिरातीची परंपरा तुमच्या कुटुंबीयांनी जपली.विजयाताईनी  तर यावेळी जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात गणेश स्तवनात भाग घेतला.सभा सहलीत आठवणीच्या रूपाने नेहमीच तुम्ही आमच्याबरोबर असाल.
                                   
Saturday 6 August 2016

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा

मित्रा पर्किन्सना,तुला आणि तुझ्यामुळे जमा झालेल्या परिवारातील सर्व मित्रमैत्रीणीना मैत्री दिनाच्या शुभेच्छा! तू मित्र आहेस, पण कधी कधी राग येतो तुझा. हतबलही व्हायला होत.कठीण आहेस तू.थांगच लागत नाहीरे तुझा.पण लगेच लक्षात येत.तुझा राग करण,तुझ्याशी शत्रुत्व करण योग्य नाही.तुला आहे तसाच स्विकारण,समजून घेण आणि मैत्री निभावण हेच शहाणपणाच.मग मी सारखा तुझाच विचार करते,तुझ्याबद्दलच बोलते,तुझ्याबद्दलच लिहिते.तुझ्याबद्दल गैरसमज करून घेणार्याना तावातावाने तुझ खर स्वरूप सांगते.तुला माणसाळवण्याच मला उमगलेलं तंत्र सांगते.इतर अनेकांना हे तंत्र जमलय. त्यांच्या कडूनही तुला समजून घेते.या सगळ्या व्यापात जगभरच्या मित्र मैत्रिणी मिळाल्या मला.
शनीच फेरा,शनीची साडेसाती याबद्दल अनेकांच्या मनात अकारण भीती असते. पण जाणते सांगतात,शनी वाईट नाही तो तुमचा अहंकार उतरवतो.ज्याला अहंकार नाही त्याला तो त्रास देत नाही.तुझही असच आहे तुला समजून घेणार्यांचा तू मित्र बनतोस. मित्रा मैत्रीदिनाच्या पुन्हा शुभेच्छा!

Tuesday 2 August 2016

देणाऱ्याचे हात हजार

जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या  २०१६ च्या स्मरणिकेचे काम चालू होते.मोकळ्या जागांवर घालायला फिलर निवडून ठेवले होते.एका ठिकाणी अर्धे पान शिल्लक होते.तिथ काय टाकायचं असा विचार चालला होता.तर आमचे प्रिंटर विनय दिक्षितनी तिथ स्वत:ची जाहिरात घालून टाकली.स्मरणिकेचे काम करता करता तो आमच्या कामात गुंतत गेला. पुढच्या सभेपासून स्वयंसेवक म्हणून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.असेच मदतीचे हात ज्यांची  नोंद होतच नाही.त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी हे लेखन.कृतज्ञता,आभार असे शब्द या कोणाला आवडणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्यांनी फार काही केलेलं नसते.आमचे काम मात्र यामुळे खूप पुढे गेलेले असते.काही सातत्याने आमच्याबरोबर नसतात पण त्यात्यावेळी त्यानी निभावलेली भूमिका आमच्यासाठी मोलाची असते.
               शरच्चंद्र पटवर्धन यांनी २००० मध्ये पहिली सभा घेतली तेंव्हा 'हा जगन्नाथाचा रथ आहे,सार्‍यांनी मिळून ओढायचा आहे.गोवर्धन पर्वत आहे,सार्‍यांनी मिळून उचलायचा आहे.'असे म्हटले होते.आजही ते तितकेच खरे आहे.आपणहून सहकार्याचे हात पुढे होत आहेत.
                          मंडळाची स्वत:ची जागा नाही.पार्किन्सन्स मित्रमंडळाचे बॅकबोन असलेल्या रामचंद्र करमरकर यांच्या घरात कुणालाही पार्किन्सन्स नाही श्री.मधुसूदन शेंडे यांचे ते मित्र.त्यांच्या विनंतीवरून आले. आणि मंडळाचे सर्वे सर्वा झाले.त्यांची पत्नी, मुलगी, जावई सर्वच वेगवेगळ्या पातळ्यावर मदत करतात. त्याचं घर मध्यवर्ती असल्याने संपर्कासाठी त्यांचाच पत्ता आहे.पुण्यातले, परगावचे लोक सतत पुस्तके घेण्यासाठी, माहिती विचारण्यासाठी त्यांच्याकडे जातात .ते आणि त्यांची पत्नी सर्वांच हसतमुखाने स्वागत करतात.त्यामुळे मित्रमंडळ परिवाराशी शुभार्थी जोडले जातात.आमच्या शुभार्थींच्यात आत्मविश्वास जागवून  त्यांच्याकडून कार्यक्रमासाठी प्रार्थना बसवून घेणे त्यासाठी पेटी वाजवणे हेही त्या आनंदाने करतात.
अश्विनी हॉटेलचे अरुण देवस्थळी, २००८ पासून आम्हाला  विना मोबदला सभेसाठी जागा उपलब्ध करून देतात. तेथेच आम्ही कार्यकारिणीच्या मिटिंग घेतो.मित्रमंडळ हॉल,गांधीभवन,पुणे,दिनानाथ हॉस्पिटल यांनीही गरजेनुसार विना मोबदला जागा दिली.
मंडळ कोणतेही शुल्क घेत नाही.कामाचा पसारा वाढवायचा तर जागोजागी पैसे हवेतच.सभेच्या ठिकाणी दान पेटी ठेवली जाते.याशिवाय आपणहून आर्थिक मदत देणारे अनेक आहेत.अमेरिकास्थित सुधा कुलकर्णी या आर्थिक बाबीत फार मोठ्या आधारस्तंभ आहेत. आमची सर्व प्रकाशने त्यांचा आर्थिक मदतीमुळेच शक्य झाली.
 मुक्तांगणचा' अनिता अवचट संघर्ष सन्मान 'पुरस्कार सैलानी परिवाराचा पुरस्कार यातून आर्थिक मदत तर झालीच शिवाय काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारीही वाढली.
 स्मरणीकेसाठी जाहिरात देणारेही आहेत.यांची नावे स्मरणिकेत दिली जातात.स्वत:च्याच खर्चाने सभेच्या ठिकाणी येणारे,उलट आमच्या दानपेटीतच पैसे टाकणारे तज्ज्ञ व्याख्याते, स्मरणिकेसाठी लेखन देणारे,नावे तरी किती घ्यायची?
वेबसाईट विना मोबदला करून देणारे अतुल ठाकूर,गेली आठ वर्षे नृत्योपचार चालवणारे हृषीकेश पवार याना  तर सलाम.
मंडळाचा लोगो विनामुल्य करून देणाऱ्या अश्विनी करमरकर आणि युट्युबवर आमचे व्हिडीओ टाकून देणारे दिलीप नारखेडे यांची तर आमची प्रत्यक्ष भेटही झालेली नाही सारा मामला फोनवर ,मेलवर संपर्क साधूनच.
ज्यांची नावे सर्वांसमोर कधीच येत नाहीत असे पडद्यामागचे अनेक आहेत त्यांच्यामुळे आम्ही कामाचा व्याप वाढवण्याचे धाडस करत आहोत.
हा सर्व आटापिटा पीडीग्रस्त शुभार्थींसाठी आणि त्यांचे  शुभंकर यांच्यासाठी.आपण ही मदत करू शकता.
    आम्हाला आपले हात हवेत विविध पातळ्यांवर हवेत
  •  आर्थिक - 
                आपण देणगी देऊ शकता.
               एखाद्या कार्यक्रमाचे,उपक्रमाचे प्रायोजक होऊ शकता.
               आमच्या स्मरणिकेत जाहिरात देऊ शकता.
  •   सेवा स्वरूपात.
                आमच्या विविध कार्यक्रमाना  स्वयंसेवक म्हणून मदत करू शकता.
                शुभार्थीना कार्यक्रमास येताना सोबत करु शकता.
                घर भेटीसाठी मदत करू शकता.
                शुभार्थीबरोबर कॅरम, पत्ते खेळणे,गप्पा मारणे करू शकता.
                सभेसाठी फोन करण्यात हातभार लाऊ शकता.
  •    तांत्रिक स्वरूपात.
             संगणक,इंटरनेट वापरासाठी विविध स्वरूपाची मदत
             दृक्श्राव्य फिती तयार करण्यात मदत.
             नियमित कार्यक्रमाचे फोटो,व्हिडीओ शुटींग,
             काही शुभार्थींच्या घरी जाऊन त्यांच्या कलाकृतींचे फोटो काढणे.
             मराठी,इंग्रजी मजकुराचे मुद्रितशोधन,डीटीपी.इत्यादी.
  •  जागा स्वरूपात
            नियमित कार्यक्रमासाठी पुण्यातील विविध भागात जागा उपलब्ध करून देणे.
  • तज्ज्ञत्व
           शारीरिक, मानसिक  आरोग्य, व्यायाम, विविध उपचार इत्यादीसाठी मार्गदर्शन