Saturday 11 February 2017

अभिनंदन अंजली






आमची शुभंकर अंजली महाजन हिला दौंड येथील 'रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट'तर्फेहमीद दाभोलकर यांच्या हस्ते 'रक्तदाता' पुरस्कार प्राप्त झाला आहे.या ट्रस्टतर्फे दरवर्षी रक्तमित्र,रक्तदाता,निसर्गपर्यावरण मित्र असे विविध पुरस्कार दिले जातात.रोहिणी जाधव यांचा २७ व्या वर्षी वेळेवर रक्त न मिळाल्याने मृत्यू झाला.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.पुरस्काराचे हे एकविसावे वर्ष आहे.अंजलीने २१ वेळा रक्तदान केले आहे. तिचा रक्त गट ओ आरएच निगेटिव्ह आहे.हा रक्तगट रेअर असल्याने अत्यवस्थ परिस्थितीतल्या अनेकांचे जीव तिच्या रक्तदानामुळे वाचले आहेत.अचानक रक्त हवे असा फोन येतो आणि ती हातातले सर्व काम टाकून तेथे हजर होते.घरी शंभर वर्षाच्या सासूबाई आणि पार्किन्सन्स झालेले पती आहेत.या गडबडीत त्यांच्याकडे कोणीतरी थांबण्यासाठीही तिला व्यवस्था करायची असते.साठी जवळ आली,पुढे रक्तदान करत येणार नाही. आता जास्तीत जास्तवेळा रक्तदान करायला हवे असे तिला वाटते.

Saturday 4 February 2017

ब्राम्ही माझी गुरु

                  
                 सकाळी उठून दार उघडल्यावर तुळशी वृंदावना भोवती असलेल्या ब्राम्हीच्या लॉनचे. प्रथम दर्शन होते.खर तर जंपिंग ग्रासच्या लॉनमध्ये उगवलेले ते तण आहे.आम्ही नव्या बंगल्यात राहायला आलो तेंव्हा पुण्यातल्या विविध नर्सरी धुंडाळून छानछान फुलांची रोपे,गुलाबाची कलमे,क्रोटन इत्यादी आणायचो.त्यावेळी एका ठिकाणी ब्राम्हीचे लॉन पाहिले आणि आम्हीही तसे लॉन तयार केले.काही दिवसांनी सर्व ब्राम्ही समूळ काढून जंपिंग ग्रास लावले.अनेक वर्षे हे जंपिंग ग्रासच होते.आमचे वाढते व्याप,आजार आणि वाढते वय यातून आमच्याही नकळत आम्ही बागकामातून निवृत्त झालो.आता आमचा माळीच बागेची देखभाल करतो.बाग स्वच्छ ठेवतो.या सर्वात जंपिंग ग्रासच्या जागी ब्राम्ही कधी वाढत गेली समजलच नाही.येणारे जाणारे म्हणतात किती छान दिसते ब्राम्ही.मला तिच्या धीर ठेवून तग धरून राहाण्याच आणि भरभरून पसरण्याच आश्चर्य वाटत? खचून जाण्याच्या अनेक प्रसंगी  'धीर धरी धीर धरी' असा संदेश ती देत आहे अस वाटत.उदाहरण द्यायचं झाल तर,पिसा सिंड्रोमच देता येईल.पुरंदर आणि जेजुरी गड विना सायास चढून जाणाऱ्या माझ्या नवऱ्याला अचानक पाठीत बाक आला.एका बाजून झुकून राहू लागले.न्यूरॉलॉजीस्टनी 'पिसा सिंड्रोम'  अस निदान केले. फिजिओथेरपी हाच उपाय होता.पाच किलोच दळण दूरच्या  गिरणीत नेऊन टाकणाऱ्या ह्यांना जवळच्या दुकानातून दुधाची एक लिटरची पिशवी आणताना दम लागायला लागला.थोडा धीर खचलाच.तेंव्हा ही ब्राम्ही ' डोन्ट गीव्ह अप' अस सांगतेय अस वाटायचं आणि धीर यायचा.आता एका बाजूला झुकण पूर्ण कमी झाल.पुढच बाक आहे पण तोही कमी होईल.
             या ब्राम्हीमुळे आणखी एक संदेश मी घेतला तो म्हणजे 'अखंड ते सावधपण'. कारण ब्राम्ही  वाढली कारण आमच दुर्लक्ष.पर्किन्सन्स बरोबर येणारे नैराश्य,अपथी असेच दबक्या पावलाने प्रवेश करतात आणि बघताबघता फोफावतात.कंप,मंदगती अशा हालचालीवर परिणाम करणाऱ्या लक्षणापेक्षाही यांना आवरण कठीण होत.