Tuesday 24 July 2018

पर्किन्सन्स विषयक गप्पा - १९

                                        पार्किन्सन्स विषयक गप्पा - १९
                               'केल्याने देशाटन' म्हणतात तसे मी 'केल्याने घरभेटी' असे म्हणेन घरभेटीनी आम्हाला समृद्ध केले.शुभंकर आणि शुभार्थी कसा असावा,कसा नसावा याची जाण दिली. भाराऊन टाकणारे अनुभव दिले,आमच्या कार्याला दिशा दिली.यादी अशी खूपच लांबत जाईल. माझी मैत्रीण निरुपमा जोशीला मी घरभेटी झाल्या की, भरभरून त्याबद्दल सांगायचे.एका घरभेटीच्यावेळी तिला बरोबर न्यायचा प्रसंग आला.आम्ही के. के.मार्केटजवळ जाणार होतो.तेथेच एक शुभार्थी राहतात मी तिला म्हटले जायचे का? तिलाही उत्सुकता होती.आम्ही आधी फोन करून येऊ का विचारले.त्यांनी होकार दिला.
                            गप्पा सुरु झाल्या.शुभंकर बाई शुभार्थीना बोलूच देत नव्हत्या.विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्याच देत होत्या. माझे सर्व प्रश्न त्यांना निरर्थक वाटत होते.मी नेलेले पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत पुस्तक त्यांना दाखवले.याची ६० रुपये किंमत आहे.त्यांना ते घ्यायचे नव्हते.मी त्यांना म्हणाले, 'घ्यायचे नसेल तर तसेच राहूदे.वाचून झाले की परत द्या' यालाही त्यांचा नकार होता.त्याना वेळच्यावेळी खायला प्यायला देतो,औषधोपचार करतो,वेळच्यावेळी डॉक्टरकडे जातो.या वयात आणखी काय हवे.असा त्यांच्या एकूण बोलण्याचा आशय होता.संभाषण पुढेच जात नव्हते.मी ते पुढे नेण्याचा परोपरीने प्रयत्न करत होते.
'तुम्ही सभांना का येत नाही?मी विचारले.
'आम्हाला शक्य नाही' त्या.
'.अंतर लांब पडते म्हणून का? जवळ सभा असली तर याल का?' मी.
त्यांनी नुसतीच नकारार्थी मान हलवली.'त्यांना नेणे आणणे शक्य नाही का?आम्ही कोणी सोबत दिली तर येतील का?' पुन्हा मानेनेच नकार.
शेवटी वैतागलेल्य चेहऱ्यानीच दिलेल्या उत्तराचा  त्याना वेळच्यावेळी खायला प्यायला देतो,औषधोपचार करतो,वेळच्यावेळी डॉक्टरकडे जातो.या वयात आणखी काय हवे.असा आशय होता.आता बोलणेच खुंटले होते.नेमकी माझी मैत्रीण बरोबर असताना असा अनुभव यावा याचे मला वाईट वाटत होते.
                   त्या चहा करायला आत गेल्या आणि आता शुभार्थी बोलायला लागले.त्यांच्या डोळ्यात चमक आली होती. आम्ही आल्याचे त्यांना छान वाटले होते.आपले अक्षर पार्किन्सन्सने बिघडले याचे त्यांना वाईट वाटत होते.ते भरभरून बोलत होते. पत्नी आली आणि कळ दाबावी तसे त्यांचे बोलणे बंद झाले.
चहा घेऊन आम्ही निघालो.थांबून काही निष्पन्न होईल असे वाटत नव्हते.
                 मला मात्र त्या बाईना ( शुभंकर म्हणावेसे वाटत नाही.) हलवून हलवून 'त्याना तुमचे प्रेम हवेय,मायेचा स्पर्श हवाय,बोलायला माणसे हवीत,त्यांना सभानाही यायचे आहे.व्यक्त व्हायचे आहे असे सांगावेसे वाटत होते.
                 घरात असे वातावरण असल्यावर उदासीनता,नैराश्य असे मानसिक आजार शुभार्थीला गाठायला तयार असतातच आणि यातून शेवटची शय्याग्रस्त अवस्था यायलाही वेळ लागत नाही.
                या शुभार्थीचे असेच झाले.
 हे सर्व सांगायचे कारण शुभार्थीच्या आनंदी असण्यात शुभंकराची भूमिका किता महत्वाची आहे हे सांगणे.त्याविषयीच आणखी पुढच्या गप्पामधून.


                            
                             

Sunday 22 July 2018

आठवणीतील शुभार्थी - शंकर हिंगे.

                                   आठवणीतील शुभार्थी - शंकर हिंगे.
                                  शंकर हिंगे हे नाव घेताच हसतमुख,धडपडी  आणि प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती डोळ्यासमोर येते. पार्किन्सन्समध्ये चेहरा भावविहीन होतो याला अपवाद असणारे हे व्यक्तिमत्व.अश्विनी मधील सभेला ते नियमित वेळेपूर्वी आणि एकटेच येत.घरभेटीच्यावेळी आम्ही हडपसरला त्यांच्या घरी गेलो तेंव्हा लक्षात आले.सभेला येण्यासाठी त्यांना केवढा आटापिटा करावा लागतो.इतका त्रास घेऊन जर शुभार्थी येत असतील तर त्याना उत्तमच द्यायला हवे हा धडाही आम्हाला मिळाला.ते जरी निवृत्त झाले असले तरी त्यांची पत्नी शाळेत नोकरी करत असल्याने त्यांच्या सोबत येऊ शकत नव्हती.त्यांना त्यांच्याबरोबर कोणी हवे अशी गरजही वाटत नव्हती.आम्हाला वाटायचे अश्विनी लॉज सभेला जाण्यासाठी आपल्याला किती लांब आहे.आमच्या दुप्पट अंतर असलेल्या हिंगेनी मात्र दूर यावे लागते अशी कुरकुर कधीच केली नाही.
                                हिंगेनी सहा वर्षे कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरी केली आणि ३० वर्षे किर्लोस्कर न्युमॅटिक मध्ये अकौंट सुपरवायझर म्हणून नोकरी केली.याबरोबर वैदिकी आणि योग शिक्षक म्हणूनही ते काम करत.त्यामुळे निवृत्तीनंतर काय हा प्रश्न त्यांच्यापुढे नव्हता.खर तर त्यांच्याकडे प्रश्न कोणतेच नव्हते उत्तरे मात्र होती.जगण्याचा उत्साह होता.स्वत: आनंदी राहून इतरांना आनंद  लुटण्याचा स्वभाव होता.                              
                              ते तिसऱ्या मजल्यावर राह्त होते.मुलींची लग्ने झाल्याने पती पत्नी दोघेच राहत. आम्ही गेल्यावर पत्नीची तक्रार होती.तिचे गुढगे दुखत असल्याने जिने चढउतार करणे त्रासाचे होते.घर विकून ओल्डएज होम मध्ये राहावे असे त्याना वाटत होते.हिंगे याला तयार नव्हते आजूबाजूला अनेक वर्षाची संबंधित मित्रमंडळी होती.आम्ही त्यांच्याकडे बराच वेळ गप्पा केल्या.त्यानंतर आम्हाला त्या बाजुलाच राहणाऱ्या शिवरकर या शुभार्थीकडे जायचे होते.आम्ही रीक्षानी जाणार होतो.हिंगे म्हणाले अहो जवळच आहे मी येतो बरोबर.तुम्हाला घर दाखवतो.हिंगेंचे जवळ अंतर माझ्यासाठी खूप लांबचे होते.शिवरकरांच्याकडे उलटी परिस्थिती.त्यांनी पीडिला अजून स्वीकारले नव्हते.ते सभांना ही येत नसत.त्यांच्याकडे गाडी ड्रायव्हर होता.पण येण्याची इच्छा नव्हती.पीडीला आवश्यक असणारा व्यायाम ते करत नव्हते.हिंगेनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा व्यायाम घ्यायचे ठरले.त्याप्रमाणे ते घेऊही लागले.शिवरकर यांना घेऊन ते सभेला येवू लागले.त्यांची गाडी असल्याने आता हिंगेंचा बसनी येजा करण्याचे श्रम आणि वेळही  वाचला.घरभेटीत, जवळच्या लोकाना एकमेकांशी गाठ घालून देणे हा एक हेतू होता.तो साध्य झाल्याने आम्हाला छान वाटले.
                            एकदा मी फोन केला तर त्यांना शुगर एकदम लो झाल्याने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे समजले.सभेच्या दिवशी त्यांना डीसचार्ज मिळणार होता.त्यांची पत्नी म्हणाली,त्याना सभेला यायची इच्छा आहे. आम्ही थेट सभेला येतो आणि नंतर घरी जाऊ.पण हॉस्पिटलच्या सर्व फॉरम्यालीटी होण्यास वेळ लागला.आणि ते सभेला येऊ शकले नाहीत.त्यानंतरही ते सभेला आलेच नाहीत.ते गेल्याचे वृत्तच आले.पुढे संपर्कही होऊ शकला नाही.त्यांनी पार्किन्सन्सला चांगले  हाताळले पण मधुमेहाला ते हाताळू शकले नाहीत असे वाटते.पीडी कडे लक्ष देताना इतर आजाराकडे दुर्लक्ष नको.हे सर्वानीच लक्षात घ्यायला हवे.
                         .मंडळाला पत्र लिहून ते काय करता येईल याबाबत सूचना करत.वृत्तपत्रात पीडीविषयी काही आल्यास त्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना करत.सहलीची कल्पनाही त्यांनी मांडली होती.सकाळ वृत्त समूहाने फॅमिली डॉक्टरचा पार्किन्सन्स विशेषांक काढला होता.मुंबईच्या शुश्रुषा हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट नाथन यांचा त्यात लेख होता.त्यांनी पीडीवर एक सीडी तयार केली होती.हिंगेना वाटत होते आपण सर्वांनी मुंबईला एकत्र जावून त्यांना भेटावे.तेंव्हा पीडीवर मराठीतून फारसे लिखाण नव्हते.एखादा लेख आला तरी अप्रूप वाटायचे.आज मंडळाच्या नावावर तीन पुस्तके, ९ स्मरणिका,१३ संचारचे  अंक असे लिखित साहित्य आहे.याशिवाय एक  इबुक,वेबसाईट वरील लेखन, ब्लॉग आहे.युट्युब चॅनलवर तज्ञांच्या व्हिडिओ सीडी,नृत्योपचारावरील डॉक्युमेंटरी असे विपुल साहित्य आहे.दरवर्षी सहल जाते.हे पहायला हिंगे नाहीत.या सुरुवातीच्या काळातील शुभार्थींच्या सूचना,अपेक्षा यामुळेच हे झाले हे तितकेच खरे आहे.हिंगे तुम्ही असताना हे सर्व झाले नाही याची खंतही वाटते.
 

Saturday 14 July 2018

भावपूर्ण श्रद्धांजली

                    डॉक्टर अरविड कार्लसन या स्वीडिश वैज्ञानिकाचे नुकतेच ९५ व्या वर्षी निधन झाले.त्याना कृतज्ञतापूर्वक  श्रद्धांजली.कार्लसन यांनी जगभरच्या पार्किन्सन्सग्रस्तांना उपकृत केले आहे.जेम्स पार्किन्सन्सने १८१७ मध्ये आपल्या Shaking Palsy या निबंधाद्वारे या आजाराची लक्षणे जगासमोर आणली.या आजारावर औषध निघण्यासाठी मात्र २० व्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला.याचे श्रेय डॉ.कार्लसन यांना जाते.त्यांनी प्रथम १९५० मध्ये डोपॅमीन हे मेंदूच्या बॅसल गॅंगलीया या भागात तयार होते. यामुळे शरीराच्या हालचाली नियंत्रित होतात हे सांगितले.आजही पार्किन्स
न्सवर वापरल्या जाणाऱ्या एल डोपा चा शोध यातूनच पुढे लागला.डॉ.कार्लसन याना या संशोधना बद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.
                   जगभरातील पार्किन्सन्सग्रस्त आणि त्यांचे कुटुंबीय यासाठी त्यांचे सदैव ऋणी राहतील.

Thursday 12 July 2018

क्षण भारावलेले.- ६

                                   क्षण भारावलेले.- ६
                                 शुभार्थी उमेश सलगर दोन तीन सभांना आले नाहीत म्हणून मी फोने केला तर ते म्हणाले,' ती तुमचीच आठवण काढत होतो.सकाळीच गडहिंग्लजहून आलो.' खर तर प्रवासातून आल्यावर माणूस दमलेला असतो. पण सलगर मात्र अधिक उत्साही असतात.तिथले खाणे,हिरण्यकेशी नदी,निसर्ग, जवळच असलेल्या आजऱ्याचा दौरा  इत्यादीबद्दल ते भरभरून सांगत होते.त्यांचा प्रत्येक फोन माझ्यासाठी भारावलेला क्षण असतो.त्यांनी तिथून करवंदे,अननस,हळदीची पाने आणली होती.करवंदाचा मधु,अननसपाक आणि हळदीच्या पानातील पातोळ्या केल्या होत्या.या सर्व रेसिपीचे रसभरीत वर्णनही केले.हे सर्व त्यांना मला खायला घालायचे होते.तुम्ही शेजारी असता तर किती बर झाल असत.अस ते नेहमी म्हणत असतात.दुसरे दिवशी ते नाशिकला आठ दिवसासाठी जाणार होते.मुलासाठी चिवडाही करून ठेवला होता.या महिन्याची सभाही बुडणार याचे त्यांना वाईट वाटत होते.सलगर यांचे कामासाठीचे दौरे हे त्यांच्यासाठी एखाद्या सह्लीसारखेच आनंददायी असतात.त्यांच्या अशा सहली आणि रेसिपी यावर त्यांनी खरे तर पुस्तकच लिहायला हवे.   
                                    उमेश सलगर यांचा उत्साह आणि दिनचर्या पाहता त्यांना  पार्किन्सन्स होऊन सात वर्षे झाली आहेत का? मुळात त्यांना पार्किन्सन्स आहे का याबाबत मला बऱ्याचवेळा शंका येते. पत्नीच्या आकस्मित निधनानंतर ते मुलाची आईही बनले ९.३० ला ऑफिसला जाण्यापूर्वी गृहिणीच्या तत्परतेने घरातील पूजा,नाश्ता,मुलाचा, स्वत:च डबा भरणे अशी विविध कामे करतात.स्कूटरवर ऑफिसला जातात. १० ते ६ ऑफिस,पुन्हा १५ किलोमिटर गाडी चालवून  कामे करत घरी.आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक तोही साग्रसंगीत करतात.यात स्वत:साठी योगसाधना,वाचन संगीत असतेच.अगदी परगावी गेले तरी त्यांच्या योग,व्यायाम यात खंड नसतो.
                                  सलगर इन्शुरन्सकंपनीत administrative ऑफिसर म्हणून  नोकरी करतात.त्यांनिमित्ताने इंटरनल ऑडिटसाठी त्यांना गावोगावी जावे लागते. बहुतांश पार्किन्सन्स शुभार्थी पीडी झाल्यावर नैराश्याने ग्रासतात. व्हीआरएस घेणे पसंत करतात किंवा आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कशीबशी नोकरी करतात.पण सलगर हे मात्र इमाने इतबारे नोकरी करतात.आजाराचे निमित्त सांगून कोणतीही सवलत घेत नाहीत.मध्यंतरी जमशेटपुरला जावे लागणार होते.इतर कर्मचाऱ्यांनी जाण्यास नकार दिला पण सलगर मात्र यशस्वीरीत्या काम करून आले.ऑफिसच्या निबंधस्पर्धेसारख्या इतर गोष्टीतही ते सह्भाग घेतात.बक्षिसे मिळवतात.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या उपक्रमातही ते तेवढ्याच उत्साहानी सहभागी होतात.
                       जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळाव्यात शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन असते.एकदा त्यांनी भरल्या मिरच्या ठेवल्या होत्या.वक्ते राजस देशपांडे यांच्यासाठी खास वेगळे पाकीट आणले होते.यावर्षी खारी चंपाकळी ठेवली होती.सकाळच्या पत्रकारानाही आपल्या वृत्तात त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवले नाही.त्यादिवशी प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतही  त्यांचा सहभाग होता'.मनाचा विमा '  शरीराच्या विम्याइतकाच कसा महत्वाचा आहे आणि त्यासाठी काय करायला हवे हे त्यांनी आपल्या लेखात सांगितले होते.त्यांचे आयुष्य पाहता त्यांनी नक्कीच स्वत: मनाचा भक्कम विमा उतरवला आहे
                    अभिरुची फॉर्महाऊसला सहल गेली होती तर त्यांनी सर्वांसाठी रव्याचे लाडू करून आणले होते.विविधगुण दर्शनात आईची महती सांगणारी कविता आणि त्यावरील भाष्य यांनी सर्वांनाच खिळवून ठेवले.तेही भावनावश झाले.त्यादिवशी पहिल्यांदाच थरथरणाऱ्या हातानी त्यांच्या पार्किन्सन्सचे दर्शन दिले.तिथल्या बागेत नीरफणसाचे झाड होते. अनेकांना ते नवीन होते.सलगरनी त्याचे काय पदार्थ करता येतात ते सांगितले.ते विकतही घेतले. बस मध्ये बसता बसता मला एक नीरफणस आणून दिला.सर्वांनाच दिवसभराच्या सहलीची दमणूक होती.सलगरना मात्र नसावी.कारण रात्री त्यांचे whatsapp वर फोटो आले त्यांनी जावून तुळशीचे लग्न यथासांग केले होते.निरफणसाची कापे मुलाला करून घातली. त्या सर्वाचे फोटो   त्यानी टाकले होते.मला त्यांनी दिलेल्या फणसाची कापे करण्यास तीन चार दिवस गेले.
                     २८ मेच्या आय.पी.एच.कार्यक्रमाच्यावेळी तर त्यांनी कमालाच केली.औंधहून ते.स्कूटरवर आले होते.आय.पी.एच. ऑफिस कर्वेनगरला आहे.आल्या आल्या त्यांनी माझ्याकडे पिशवी सुपूर्त केली गेल्या गेल्या फ्रीजमध्ये ठेवण्याची सूचना केली.माझा वाढदिवस लक्षात ठेवून खास पारंपारिक पदार्थ पिकलेल्या आंब्याचे सासम,हळीवाचे लाडू आणि ताज्या कैर्यांचे लोणचे त्यांनी आणले होते.हळीवाचे लाडू मित्राची मुलगी बाळंतीण आहे तिच्यासाठी केले होते म्हणाले.घरी पोचल्या पोचल्या सासम आवडले का? व्यवस्थित गेल का? सांडले नाही ना?उन्हाळ्याचे दिवस खराब तर झाले नाही ना? असे विचारणारा त्यांचा फोन आला.आईच्या मायेने दिलेल्या त्यांच्या भेटीने माझा वाढदिवस अविस्मरणीय झाला होता.
     टीप -  यापूर्वी वेळोवेळी त्यानी केलेल्या पदार्थांचे फोटो मी टाकले होते.त्यातील त्यांची दिवाळीच्या फराळाची लिंक सोबत देत आहे.
https://parkinson-diary.blogspot.com/2017/10/blog-post_28.html     
                                       

Tuesday 10 July 2018

पार्किन्सन्सविषयक गप्पा - १८

                                      पार्किन्सन्सविषयक गप्पा - १८
                          गप्पांना सुरुवात झाल्यावर मला अनेकजणांनी सांगितले की यापूर्वी या आजाराविषयी आम्हाला काहीच माहित नव्हते.किंबहुना आम्ही हे नाव ही ऐकले नव्हते.नंतर अल्झायमर आणि पक्षाघात संबंधी व्हिडीओ काहींनी पाठवले.त्यावेळी मला लक्षात आले ते पार्किन्सन्सची अल्झायमर आणि  पक्षाघाताशी  सांगड घालत होते.हे तीन्ही आजार मेंदूशी निगडीत असले तरी पूर्णपणे वेगळे आहेत.यापूर्वीच्या गप्पात मी अल्झायमर म्हणजेच स्मृतीभ्रन्शाविषयी लिहिले आहे.आता पक्षाघात आणि पार्किन्सन्सच्या फरकाविषयी लिहित आहे.सांगलीचे शुभार्थी  रेगे यांना आधी पक्षाघात झाला आणि नंतर पार्किन्सन्स.असे उदाहरण विरळाच.
                           पक्षाघात आणि पार्किन्सन्स यातील वेगळेपण म्हणजे पक्षाघातात एखादा अवयव कायमचा बधीर होतो वा लुळा पडतो.संवेदनाशून्यही बनतो.पार्कीन्सन्समध्ये एखादा अवयव ताठरल्यासारखा दिसला तरी त्यात संवेदना असते.पार्किन्सन्समध्ये काहीजणांना ऑन ऑफची समस्या असते.ऑन पिरिएड म्हणजे औषधाचा परिणाम चालू असून हालचाली व्यवस्थित होत असतात.औषधाचा परिणाम कमी झाला की,व्यक्ती एकदम ताठर होते हालचाल करता येत नाही.याला ऑफ पिरिएड म्हणतात.पुढचा डोस घेतल्यावर हळूहळू हालचाली सुरु होतात.म्हणजेच ही अवस्था तात्पुरती असते.
           पक्षाघातात तातडीने उपचार झाल्यास औषधोपचार आणि फिजिओथेरपी करून रुग्ण त्यातून बाहेर पडू शकतो.उपचारास वेळ लागला तर मात्र निकामी अवयव पूर्ववत होणे कठीण होते.पार्किन्सन्समध्ये कंप, ताठरता,हालचालीतले मंद्त्व ही व इतर काही लक्षणे असल्यास ती पूर्णपणे कमी होत नाहीत.त्यावर नियंत्रण आणता येते.कोणत्याही आजाराचे स्वरूप एकदा समजले की त्याला हाताळणे सोपे जाते.आणि त्याला स्वीकारले की आजार आटोक्यात राहतो.यासाठी ही सर्वसाधारण माहिती माझ्या ज्ञानानुसार देत आहे.काही उणिवा असल्यास कृपया तज्ज्ञांनी सांगाव्यात.
           अधिक माहितीसाठी

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube.com/playlist?list=PLfigPhBt8dAjA7e6-IeeVFfV2fgqSFyS7 ) हा युट्युब channel पहा

Sunday 1 July 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - १७

                             पार्किन्सन्सविषयी गप्पा - १७
                            आमच्या जवळच्या नातेवायीकांकडे आम्ही विवाहापुर्वीच्या गृह्मुखासाठी गेलो होतो.होमाचा धूर झाला आणि हे गच्चीत जावून बसले कारण नुकतीच ह्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती.माझी नजर ह्यांना शोधत आहे हे पाहुन उपस्थीतांपैकी एकानी येवून सांगितले. काका गच्चीत आहेत.नंतर दोन दिवस वेगवेगळे विधी आणि लग्नादिवशीही वेळोवेळी हे कुठे आहेत याची ते माहिती देत होते.लग्नाच्या गडबडीत मला त्यात काही गैर जाणवले नाही.ते मला काकानी ओळखले घरच्यांबद्दल  चौकशी केली असे ज्या पद्धतीने सांगायला लागले तेंव्हा माझ्या लक्षात आले,ह्यांना पीडी झालाय म्हणजे यांची स्मृती गेली आहे असे त्यांना वाटत होते.बऱ्याचजणांचा पीडीमध्ये स्मृती भ्रंश होतो असा समज असतो.
                            पार्किन्सन्सच्या एक लक्षणात स्मृतीभ्रंश हेही आहे पण तो सर्वाना होत नाही.माझ्या पाहण्यात २/३ जणांनाच स्मृतीभ्रंश झालेला आढळला.तेही ८५/९० अशा वयात म्हणजे तो उतार वयानेही असू शकतो.अल्झायमरवर ( स्मृती भ्रंश ) पीएचडी करत असलेल्या मंगला जोगळेकर यांना अल्झायमर झालेले पीडी पेशंट हवे होते.मी त्यांना एकही नाव सांगू शकले नाही. मला जे माहित होते ते त्यावेळी जीवित नव्हते. उलट अत्यंत चांगली स्मृती असणारे अनेक सांगता येतील.कै अनिल कुलकार्णीनी शेवटपर्यंत स्मरणिकेसाठी उत्तम लिखाण दिले. डॉक्टर प्रकाश जावडेकर यांचे पुस्तक प्रकाशित होत आहे.तर प्रभाकर जावडेकर यांनी 'जावडेकर कुलवृत्तांता'सारखे किचकट काम केले.वास्तुविशारद चंद्रकांत दिवाणे शेवटपर्यंत अगदी जुन्या फाईलमध्ये कोठे काय आहे ते मुलांना सांगत.अशी असंख्य उदाहरणे देता येतील.सुरुवातीला शुभार्थी,शुभंकर लक्षणांची भली मोठ्ठी यादी पाहून आपल्याला वाट्याला हे सर्व येइल का म्हणून भयभीत होतात.मीही यातून गेली आहे.मला हे एकटे बाहेर गेले की आपला नाव पत्ता विसरले तर विसरणार नाहीत ना? असे वाटायचे. आज माझ्या या बावळटपणाचे मला हसू येते.पक्षाघात आणि पीडी याबाबत पण लोकांच्या मनात संभ्रम असतो त्याविषयी पुढच्या गप्पात.

अधिक माहितीसाठी www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube.com/playlist?list=PLfigPhBt8dAjA7e6-IeeVFfV2fgqSFyS7 ) हा युट्युब channel पहा