Tuesday 29 November 2016

शांतीवन सहल

                                                  शांतीवन सहल वृत्तांत
     पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थीसाठी सहल ही आनंदाची पर्वणी असते.वर्षभराच्या आनंदाची बेगमी असते.आत्तापर्यंत दुपारी २.३० ते ६.० अशी अर्धवेळ सहल असायची. मागील वर्षीची पूर्ण दिवसाची सहल यशस्वी झाली त्यामुळे यावर्षीही दिवसभराची सहल करायची ठरली.पुण्याजवळील सिंहगड रोडवरील शांतीवन हे ठिकाण आणि १८ नोव्हेंबर तारीख ठरली. सहल असली की दोन महिने आधीपासूनच पूर्वतयारी सुरु होते. जायच्या  आदल्या दिवशी पर्यंत अचानक अडचणी उद्भवतात.सहलीच्या दिवशीही एखादी व्यक्ती उशिरा आल्याने पुढचे  सर्व वेळापत्रक कोलमडते..पूर्वानुभवावरून हे सर्व गृहीत धरलेले  असते  पण शांतीवन सहलीने पूर्वीचे सर्व अनुभव मोडीत काढले.
                                  पाडळकर पती पत्नी चिंचवडहून येणार होते. आम्हाला वेळ झाला तर गाडी थांबवा असे त्यांनी सांगितले होते.शीलाताई कुलकर्णी स्वत:ची गाडी घेऊन येणार होत्या. बस थांबवण्यापेक्षा त्यांची  गाडी मागे ठेवायची ठरवलं होत.पण तशी गरजच पडली नाही.सर्व जण वेळेत आले.सर्वाना त्यांच्या नावाचे  बॅचेस देण्यात आले.अंजलीने हजेरी घेतली.४८ शुभंकर, शुभार्थी सहभागी झाले होते.आजार, वय विसरून  सर्वांनी लहान व्हायचं होत.शरच्चंद्र पटवर्धन यांनी ओरिगामी साठी कागद कापून  आणले होते ते सर्वाना देण्यात आले.ब्रेकफास्ट बसमध्ये द्यायचा होता.तोही वेळेत आला.बस मार्गस्थ झाली'.साथी हात बढाना' पद्धतीने ब्रेकफास्ट वाटप सुरु झाले.उमा दामलेनी लाडू देणे सुरु केले.शुभार्थीना हातात धरायला सोपे असे सुंदर पॅकींग होते.व्हेजिटेबल उपम्यावर खोबरे,शेव,डाळिंब यांची पखरण होती.पंचाहत्तरीनिमित्त गोपाळ तीर्थळी यांनी नाश्ता  दिला.सविता ढमढेरेने स्वत: घरी केलेले रव्याचे लाडू आणले होते.थंडीही त्यादिवशी बोचरेपणा कमी करून सुखद बनली होती..खाण्याचा  आस्वाद घेऊन झाल्यावर गाण्याला सुरुवात झाली.
महेंद्र शेंडे खास आमच्या मदतीसाठी आणि त्यांच्या गाण्याने सहलीची रंगत वाढवण्यासाठी आले होते. टाळांच्या साथीने त्यांनी 'रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली,चला जाऊ पुसायला'.हे गमतीशीर गीत गायला सुरुवात केली. सर्वाचेच आवाज त्यात मिसळले.काहींनी ओरिगामी करून आपली कलाकृती सादरही केली.विजय ममदापूरकर यांच्यातील खोडकर मुल जागे झाले होते.त्यांनी शेजारी बसलेले दिलीप कुलकर्णी,गाणे सांगणारे महेंद्र शेंडे,लाडू वाटणारी उमा यांची व्यंगचित्रे काढली.चालती बस आणि थरथरणारे हात यांचा त्यांना विसर पडला होता.
                    खडकवासला धरणाच्या काठाकाठाने बस जात होती.महेंद्र शेंडे गाईडचे काम करत बाहेरील महत्वाच्या गोष्टी पाहण्यास सांगत होते.बघता बघता शांतीवन आलेही.गेटमधून आत शिरताच,भरपूर झाडी,सुंदर फुलझाडे,हौदात फुललेली विविध रंगी कमळे,आखीव रेखीव रस्ते,बसायला  पार,  अगत्याने स्वागत करणारे कर्मचारी आणि स्वच्छता हे सर्व पाहून  मन प्रसन्न झाले.विविध पक्षांचे  आवाज आणि सहलीसाठी आलेल्या बालवर्गातील २५० मुलांचा  किलबिलाट दोन्हीही सुखावणारे.मोठ्या हॉल मध्ये चहा,कॉफी,बिस्किटांची सोय केली होती.चहापानानंतर सभा मंडपात आम्ही आलो.परस्पर परिचयाचा कार्यक्रम होणार होता.भिंतीवरील मोठ्या आकारातील ओम पाहून सर्वांनी आधी शांत बसून ओंकार करूयात असे शेंडेनी सुचवले.सर्वांकडून ओंकार म्हणवूनही घेतला.वातावरण सकारात्मक लहरींनी भारावून गेले..नकळत एकरसता निर्माण झाली.एरवी कंटाळवाणा होऊ शकणारा परिचय कार्यक्रमही नेटका  झाला.सहलप्रेमी आणि आज आपल्यात नसणाऱ्या शेंडेसाहेब,अनिल कुलकर्णी, चंद्रकांत दिवाणे या शुभार्थींच्या आठवणीनी सर्वच भावूक झाले.प्रत्येकजण मित्रमंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते.रामचंद्र करमरकर यांनी प्रत्येकाच्या  ओळखीनंतर त्या त्या व्यक्तीचे  मंडळासाठी योगदान,शुभंकर, शुभार्थी,स्वयंसेवक  म्हणून वैशिष्टे सांगत टिप्पणी जोडली.परिचय रंगतदार केला.वसू देसाईनी चौकटीतील फुले ओळखा  आणि वाद्ये ओळखा अशी दोन कोडी करून आणली होती ती सर्वाना वाटण्यात आली.
                    यानंतर १ वाजेपर्यंत शांतीवन फिरण्यासाठी मुभा होती.निसर्ग पाहणे,फिरणे,खेळणे,आराम करणे,बऱ्याच पायऱ्या उतरून खडकवासला धरणाचे बॅक वॉटर पाहणे,विविध आकाराच्या रंगीबेरंगी दगडांचे संग्रहालय पाहणे ज्याला जे हवे ते करता येणार होते.प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार,क्षमतेनुसार मार्ग निवडले.ज्यांना आराम करायचा होता त्यांच्यासाठी हॉलजवळील व्हरांड्यात बाजा टाकून देण्यात आल्या.हवे असल्यास बागेतही विविध ठिकाणी बाजा होत्या.काही शुभार्थीना आरामाची गरज होती.कितीतरी दिवसांनी त्यांच्या शुभंकरानाही निश्चिंतपणे मोकळा श्वास घेता येणार होता.संधीचा फायदा घेत त्यांनी झोपाळे,झुलतापूल,विविध खेळ यांचा मनमुराद आनंद लुटला.काहीजण गटाने गुजगोष्टी करत बसले,ज्यांना शक्य नव्हते त्यांनी हॉलमध्ये बसून कोडी सोडवणे, ओरिगामी करणे पसंत केले.कुठेही असाल  तरी पार्श्वभूमीला मंद, मधुर,सुरेल संगीत असाव तशी  निसर्गाची अदृश्य साथ होतीच.कडक ऊन नाही,गार वारा नाही.विशेष म्हणजे नेहमी सहलीच्या ठिकाणी आढळणारे वातावरणातील एकतानता भंग करणारे कर्कश संगीत नव्हते.अनेकांचे मोबाईल हे आनंदाचे क्षण मात्र टिपत होते.मने भरली नव्हती पण जेवायची वेळ पाळायची होती.सर्वजण स्वयंशिस्तीने डायनिंग हॉलमध्ये जमा झाले.
                     बुफे पद्धतीने जेवण मांडलेलेच होते.सर्वांनीच रांग लावून जेवण घेतले.ज्यांना खूप चालणे शक्य नव्हते त्यांना सभा मंडपात जेवण दिले.आल्यापासून कर्मचारी शुभार्थींची अवस्था पाहत असल्याने न सांगताच मदत करत होते.चटणी ,कोशिंबीर,पापड,दोन भाज्या,पुलाव,डाळ,गुलाबजाम असे साधेच पण चवीष्ट,गरम गरम  जेवण होते.कर्मचारी जातीने कोणाला काय हवे नको पाहत होते.
                     जेवणानंतर सर्व पुन्हा  सभामंडपात  जमले.आता खेळ,करमणुकीचे कार्यक्रम ठरले होते.
प्रथम विजय ममदापूरकर यांनी आपल्या शालेय जीवनातील व्यंग चित्राची गमतीदार आठवण सांगितली.तास चालू असताना सरांचेच व्यंगचित्र काढल्याने शिक्षकांनी कान पिरगाळला.पालकांना बोलवायला सांगितले.ते अमेरिकेत गेलेल्यावेळी मात्र त्यांच्या व्यंगचित्राचे कौतुक झाले. गंमत म्हणून काढलेली व्यंगचित्रे  १०/१० डॉलरला विकली गेली.कुस्तीपटू ममदापुरकर यांनी व्यायामाचा अतिरेक नको असा सल्ला दिला.अशा अतिरेकानेच  आपल्याला पार्किन्सन्स झाला असे वाटत असल्याचे सांगितले.
                        वसू देसाईने दिलेले कोड्यांचे कागद आता गोळा करावयाचे होते. पाच मिनिटाची वार्निंग बेल देण्यात आली.सर्वाना शाळकरी झाल्यासारखे वाटत होते.सर्व वाद्ये आणि सर्व फुले ओळखणारेही निघाले.विजया दिवाणेनी दोन्हीमध्ये पहिले बक्षीस मिळवत चंद्रकांत दिवाणे यांची परंपरा चालू ठेवली.त्यांच्या बरोबरीने रेखा आचार्य,विजय ममदापूरकर,अंजली महाजन, हेही विजयी ठरले.ओरीगामिचे परीक्षण महेंद्र शेंडे यांनी केले.सौ.ठक्कर यांच्या पंख्याला पहिले,श्रद्धा  भावे यांच्या पंचपाळ्याला दुसरे,अंजली आणि वसू या दोघीच्या फोटोफ्रेमला  तिसरे,अरुंधती जोशी यांच्या जंबो विमानाला आणि शशिकांत  देसाई यांच्या फ्लॉवरपॉटला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.या सर्वाना तसेच पुढे करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेणार्‍यांना   डायऱ्या देण्यात आल्या.व्यंगचित्रे काढल्याबद्दल ममदापूरकर यांना खास बक्षीस देण्यात आले.
                         आता पुन्हा करमणुकीच्या कार्यक्रमाकडे वळायचे होते.
                        शीलाताई कुलकर्णी यांनी एक विनोद सांगितला.'एका माकडाने काढले दुकान' हे बालगीत ठसक्यात म्हणत स्वत:तील लहान मुल जपल्याचे दाखवून दिले.यानंतर अनुपमा करमरकर यांनी 'केतकीच्या बनी तिथे' हे अवघड गीत लीलया म्हटले.वन मोरच्या आग्रहाने 'अंगणी माझ्या मनीच्या' हे गीत म्हटले शेंडेनी टेबलावर ठेका धरला.अंजलीलाही नृत्य करण्याचा मोह झाला.कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.अनेकांना गाण्यासाठी फर्माईश होऊ लागली.मग  शोभना तीर्थळी यांनी 'रसिक बलमा' आणि 'खुलविते मेंदी माझा' ही गीते म्हटली. उमा दामलेनी 'घनघन माला' आणि' 'ओ सजना बरखा बहार आयी',सविता ढमढेरेनी' सांज ये गोकुळी',ही गीते म्हटली.केशव महाजन यांना काहीतरी सादर करायचे असते.ते खूप एक्साईट होतात आणि दमतात म्हणून आम्हाला काळजी वाटत असते.पण आमच्या काळजीला न जुमानता त्यांनी सौदागर मधील राजकुमारचा संवाद आणि' सबकुछ सिखा हमने' हे अनाडी मधले गाणे म्हटले.चहासाठी डायनिंग हॉलमध्ये जायचे होते.पण शुभार्थीना पुन्हापुन्हा नाचानाच करणे कठीण आहे हे कर्मचार्‍यांच्या  लक्षात आले.त्यांनी सभामंडपातच चहा आणला.चहा घेताघेता अंजलीनी नेहमीप्रमाणे स्वरचित कविता म्हटली.शुभार्थी पद्मजा ताम्हणकर यांनी 'रंगरेखा घेउनी मी' हे गीत म्हटले.
विष्णुपंत जोशी यांनी ५००/१००० च्या नोटा भरण्यासाठी आलेल्या लोकांना सूचना देणाऱ्या गमतीशीर पुणेरी पाट्या वाचून दाखवल्या.करमरकर यांनी पुणेरी लोकांच्यावरील विनोद सांगितला.महेंद्र शेंडे यांनी नामदेवांची 'देव जेवला हो'  ही भैरवी म्हटली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
पुण्याकडे प्रयाणाची वेळ झाली होती.नवी उमेद, नवे परिचय,आणि मधुर स्मृती बरोबर घेऊन बस निघाली.डॉक्टर गुजराथी यांनी दिलेले वेफर्स, वसू देसाई यांनी आणलेली नानकटाई, मोघे, दिवाणे यांनी आणलेली चॉकलेटस वाटली गेली.गप्पा, गाणी करत डेस्टिनेशन आले ही.
डॉक्टर आनंद जोशी आणि सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल' मेंदूतील माणूस' हे पुस्तक नुकतच वाचनात आले.त्यात त्यानी लिहिले आहे की,सामुहिक खेळ,सहली,सार्वजनिकरीत्या साजरे होणारे करमणुकीचे कार्यक्रम यातून मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचे संप्रेरक तयार होते.यामुळे ताणतणाव कमी होतात माणूस जास्त मनमिळाऊ, समाजाभिमुख होतो,असे शास्त्रज्ञाना दिसून आले आहे.त्यांच्या या विधानाला पुष्टी देणारी अशी  आमची सहल झाली.

Sunday 27 November 2016

मित्रा

                                                                                                                २३ ऑक्टोबर २०१६
मित्रा पर्किन्सना,
सॉरी,व्हेरी व्हेरी सॉरी. ऐक ना,मीच नाही तर आशा,हेमा ताई यांचाही तुझ्याबद्दल असाच गैरसमज झाला होता.तू आहेसच अनप्रेडीक्टेबल,गुंतागुंतीचाम्हणून होत अस.झाल काय,आम्ही बाहेरून आलो.आल्यावर हे झोपले.सर्व काही ठीक होत.जागे झाल्यावर तर अजिबात उठताच येईना,हालचाल करता येईना.बघता बघता काय अवस्था केलीस यांची.एकदम डोक्यातच गेलास.सारखा तुझ्या कलाकलाने घेऊनही,तू मात्र पाठीत खंजीर खुपसलास.डॉक्टरना बोलावलं.थोडा ताप होता.क्रोसिन दिली.डॉक्टर म्हणाले,'आता व्हीलचेअर आणायला हवी'.संध्याकाळपर्यंत ताप उतरला.आणि काय आश्चर्य? मघाचे हे आणि आत्ताचे हे दोघे वेगळे वाटावेत इतका फरक झाला होता.ते सहजपणे उठून टॉयलेटला  गेले.म्हणजे कलप्रीट तू नव्हतासच.खर सांगू जितक्या वेगाने डोक्यात गेलास तितक्याच वेगाने अगदी मनापासून तुला सॉरी म्हटलं.तापामुळे अगदी निरोगी तरुणांचीही अशीच अवस्था होत असल्याच नंतर समजल,पण ज्यांच्या घरी तू होतास ,त्यांच्या संशयाची सुई तुझ्याकडेच वळली.
                अनेकदा अनेकांकडे असं होत.शेंडे साहेबांची पंचाहत्तरी होती.ते व्हीलचेअरवर आले.तुझ्यासाठी झटणाऱ्या शेंडेसाहेबांची ही तू केलेली अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले.पण तेच शेंडेसाहेब पुढच्याच महिन्यात त्यांच्या घरी झालेल्या मिटींगमध्ये हातात चहाचा  ट्रे घेऊन आले.सारखे तुझ्याबद्दल संशय  घेणे सोडलं पाहिजे हे समजत रे.पण अस का होत? आम्हा सर्वसामान्यांनाच नाही तर,शास्त्रज्ञांनाही अजून तू पुरता उमगला नाहीस.मायावी राक्षसासारखा तू प्रत्येकाकडे आणि वेळोवेळी रूप बदलत असतोस.आधुनिक वैद्यकानी तू बरा न होणारा आणि सतत वाढत जाणारा अस तुझ्यावर शिक्कामोर्तब केलयं ते इतक डोक्यात बसलय.
              आता तुझ्याशी मैत्री केलेले,जगभरातील शुभंकर, शुभार्थी तंत्रज्ञानामुळे,सोशल मीडियामुळे एकत्र येत आहेत.काहीजण तर या गृहीतकावरच ऑबजेक्शन घेत आहेत.रॉबर्ट रॉजर्स यांनी 'An observation to recovery' मधून आपल्या विधानाला पुष्टी देणाऱ्या अनेकांना बोलत केल आहे.त्यांच्या विकली रेडीओ प्रोग्रॅममधून या सर्वाना पाहता ऐकता येत.हे एक उदाहरण झाल.असे अनेक आहेत.
                 आम्हा विज्ञानाच बोट धरून चालणाऱ्याना अस एकदम मान्य करण अशक्य आहे.पण तुझ्यासह तुला आहेस तसा स्वीकारून आनंदी कस राहायच हे दाखवून देणारेही अनेक आहेत.प्रसिद्ध बॉक्सर महमद अलीने शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याशी मैत्री निभावली.करोडो डॉलर्स तुला समजून घेण्यासाठी खर्च केले.इस्त्रायलचे डॉक्टर रफी एल्डर,रोंबा चाचाचा शिकले.उत्तम डान्स टीचरही बनले.यातून तुझ्याशी मैत्री निभावण त्यांना सोप जातंय.
              १७ व्या वर्षी ज्याला तू गाठलस त्या जॉर्डनसारख्या तरुणांनी स्वत:च्या अनुभवावरून तुझ्यावरच प्रकल्प केला.मानसशास्त्रातील पदवी मिळवली.'लीन युंग' हे प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळवले.पुढच संशोधनही तुला समजून घेण्यासाठी असणार आहे.
              एवढच कशाला? आमच्या पार्किन्सनन्स मित्रमंडळाचीही कितीतरी उदाहरणे आहेतच की.हृषीकेश पवारनी नृत्योपाचाराने आमच्या शुभार्थींचे आयुष्याच बदलून टाकले.त्यांचे परफॉर्मन्सेस पाहून न्युरॉलॉजीस्ट,न्यूरोसर्जन,फिजीशियन यांनीही तोंडभरून कौतुक केले.भारती विद्यापीठ आणि संजीव डोळे होमिओपॅथीच्या आधारे प्रयोग करत आहेत.तुझ्याबरोबर येणारे डिप्रेशन,चीन्तातुरता,अलिप्तता,गोंधळलेपणा अशा अनेक लक्षणांपासून मुक्त होत आहेत.डॉक्टर विद्या काकडे यांच्या सायको न्युरोबिकचा प्रयोगही चांगले रिझल्ट देत आहे.पण हे सर्व स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे.सात आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखे झाले आहे.तू सर्वांगाने कुणाला दिसताच नाही आहेस.
              आधुनिक वैद्यकानेच या विविध प्रयोगांना एकत्र घेऊन सत्यापर्यंत पोचण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आमचे प्रत्यक्ष अनुभवही गृहीतक म्हणून नाही तरी निरीक्षण म्हणून लक्षात घ्यावयास काय हरकत नाही.
       'Together we move better' आम्ही हे सर्व व्हाव म्हणून आमच्या परीन धडपडत आहोत.आमच्या हयातीत तू सर्वांगाने गवसला नाहीस तरी आमचा वसा आम्ही पुढच्या फळीकडे सोपवू.तुझ्याशी केलेली मैत्री निभाऊ.गेला ना राग आता? माफ केलास ना?

Thursday 17 November 2016

तुम्हीही बना रोल मॉडेल



तुम्हीही बना रोल मॉडेल
                                गोपाळ तीर्थळी
“You are role model for P D Community”
श्री.श्रीकांत शेट्यें या शुभार्थीनी इ-मेल मधून लिहिले होते, मी शुभंकर-शुभार्थींना वाढदिवसाची पत्रे लिहायला लागल्यापासून फोनवर प्रत्यक्ष भेटीत याच आशयाचं बरेच जणांनी सांगितले. याशिवाय आश्विनी हॉटेलमधल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यक्रमात परस्पर शेअरींग चालू होतं. श्री. करमरकरांनी गोपाळराव पहा ह्यांना पाहिल्यावर पार्किन्सन्स आहे असे वाटते का? असा सवाल केला. माझे अनुभव सांगण्याची विनंती केली. मी लेखातून ते सविस्तर सांगत आहे. प्रत्येक शुभार्थी रोल मॉडेल बनू शकेल इतकं साधं सोप आहे.
मी पार्किन्सन्ससह आनंदी असण्यात आणि माझा पी.डी. नियंत्रणात असण्यात माझे मते
औषध उपचार २५%
मी स्वत: ३५%
शुभंकर (केअरटेकर) ४०% असा वाटा आहे.
सुरुवातीच्या काळात अज्ञानामुळे मी औषधोपचार उशिरा सुरु केले. पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर तज्ञांच्या व्याख्यानातून आणि इतरांच्या अनुभवातून गैरसमज दूर झाले. दर ३ महिन्यांनी मी न्युरॉलॉजीस्टकडे जातो. त्यांनी सांगितलेली औषधं घेतो. सुरुवातीला मी औषधाच्या वेळा पाळायचो नाही. डॉ. राहूल कुलकर्णींच्या व्याख्यानातून औषधाची वेळ पाळणे किती महत्त्वाचे आहे ते समजले, डॉ. संजय वाटवेंच्या व्याख्यानातून औषधाच्या गोळ्या आनंदाने घेतल्यास त्यांचा उपयोग चांगला होतो हे समजले. कंप, मंदगती, हस्ताक्षरात बदल, बोलण्यात थोडा प्रॉब्लेम ही माझी पी. डी. ची लक्षणे आहेत. औषधेपचाराबरोबर इतर ही उपायांनी ती आटोक्यात आहेत. गेल्या ३/४ वर्षात माझा औषधाचा डोस बदलला नाही.
इतर उपचार म्हणजे काय करतो? तर सर्वात प्रथम मी मला पार्किन्सन्स झाला आहे याचा बाऊ न करता त्याचा स्वीकार करून त्याचे बरोबर राहाणे पसंत केले. त्याच्यातील उणिवा न शोधता त्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टी देखील शोधल्या. पूर्वीची लाइफ स्टाइल बदलून पार्किन्सन्सला जुळणारी लाइफ स्टइल आत्मसात केली. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कुणीतरी आहे हे विसरावयाला पाहिजे. पी.डी.मुळे मला छोट्या छोट्या गोष्टींना वेळ लागतो. पण तरीही मी शक्यते स्वत:च्या गोष्टी स्वत: करतो. गरज वाटल्यास मदत मागायला लाजत नाही. माझे हस्ताक्षर बदलले आहे. बरेच शुभार्थी या गोष्टी मनाला लावून घेताना दिसतात याने काही साध्य होत नाही. वापरा नाही तर गमवा हे सूत्र माहित असल्याने मी ह्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी ५.३० ला उठून ६.३० पर्यंत सगळे प्रात:र्विधी आवरतो. आणि चैतन्य हास्य परिवारला जातो. त्यानंतर दोन अडीच कि.मी. चालून येतो. बोलणे सुधारावे म्हणून रोज संध्याकाळी रामरक्षा, स्तोत्र म्हणतो, नंतर ओंकार, प्राणायाम, मेडीटेशन या सर्व गोष्टी औषधा एवढ्या सातत्याने करतो.
पी. डी. ला मित्र बनविल्याने मला त्याची लाज वाटत नाही. सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला, सामाजिक कार्यक्रमाना, सवाई गंधर्व सारख्या कार्यक्रमांना ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य परिवार यांच्या सहलीला नॉर्मल माणसाइतके सहजपणे जातो.
हस्ताक्षराबाबत मी काहीतरी लिहिण्याचे ठरविले पण ते केले जात नव्हते. मग मला माझ्या पत्नीने वाढदिवसाला शुभंकर, शुभार्थींना पत्रे पाठविण्याचा मार्ग सुचविला. मला हे करण्यात आनंद मिळतो. इतरांना आनंद वाटता येतो. या पत्रावर स्केचपेनने डिझाइन काढताना माझे मन रमते आणि हळूहळू कंप देखील थांबतात आपणच असे स्वत:च्या आवडीनुसार, स्वभावानुसार छोटे छोटे मार्ग शोधायला हवेत.
अनेक शुभार्थींच्या घरी मी गेलो आणि जातो पण घर भेटीत माझ्या अनुभवाचा त्यांना फायदा होतो. याचा मला आनंद होतो. तसेच अनेक शुभार्थींकडून प्रेरणाही मिळाली. शुभार्थी कसा नसावा हेही समजत गेले. त्यांच्या प्रमाणे दोष माझ्यात नाहीत ना हे आत्मपरिक्षण करू लागलो त्याचाही मला फायदा झाला हे सर्व शक्य झाले ते अनेक शुभंकरांच्या पाठींब्यामुळे.
शुभंकरात सर्वात पहिले स्थान पार्किन्सन्स मित्रमंडळाचे, इथे येण्यापूर्वी आम्ही पती पत्नी दोघेही नैराश्याने घेरलेले होतो. श्री. मधुसुदन शेंडे आणि पटवर्धन वहिनी आमच्यासाठी रोल मॉडेल झाले. मित्रमंडळाबरोबर मित्र परिवारही मिळाला. त्यांच्या बरोबर मित्रमंडळाच्या कामात झोकून देताना आनंद वाटू लागला. शुभंकरामध्ये दुसरे स्थान पत्नी आणि परिवाराचे, त्याशिवाय शेजारी, घरी काम करणारे नोकर, हास्य क्लबमधील सहकारी, मित्रमंडळाlला  कोणत्याही मोबदल्याशिवाय सभेसाठी जागा देणारे श्री. देवस्थळी. मित्रमंडळाचे कार्य चालू ठेवण्यास ज्यांची मदत होते, अशा विविध लोकांना मी शुभंकर मानतो.
डॉ. संजय वाटवे यांनी आपल्या भाषणात शुभंकराबद्दल कृतज्ञता बाळगा असे सांगितले ते मला पटले. डॉ. अनिल अवचटांनी दिलेला तरी बरं झालंहा मंत्र आचरतो.पार्किन्सन्स झाला कॅन्सर नाही झाला, हार्ट अँटॅक आला नाही, मधुमेह आणि त्याचे पथ्य नाही करावे लागणार असे मी आता म्हणतो. पार्किन्सन्सला मित्र मानण्यापर्यंत तयारी होण्यात अशा अनेकांचा हातभार लागला.
अजून तरी रोजच्या व्यवहारात मला शुभंकराची फारशी मदत लागत नाही पण माझी मानसिकता सकारात्मक रहाण्यास आणि नैराश्याला माझ्यापर्यंत येऊ न देण्यात माझ्या पत्नीचे सहकार्य असते. मी ही चहा करणे मशीनवर कपडे धुणे, दुध आणणे, इत्यादी कामात वाटा गरजेनुसार उचलतो. शुभंकरांबद्दल कृतीतून कृतज्ञता मला विशेष महत्त्वाची वाटते.
असं माझं पार्किन्सन्ससह सहज सोपे जगणे प्रत्येकाला जमण्याजोगे. मग तुम्हीही बनताय ना रोल मॉडेल?

जागतिक पार्किन्सन्स दिवस स्मरणिका २०१५ मधील लेख.
◊◊◊◊◊◊◊◊◊

Tuesday 1 November 2016

अंतर्बाह्य उजळूया.

 दिवाळी संपली.फराळ करणे,फराळाची देवाण घेवाण,आकाशकंदील,रांगोळ्या,पणत्या लावणे,भेटीगाठी, हसण-णे खिदळणे आणि फॉरवर्डेड का असेना मेसेज पाठवणे.हे सर्व झाले.परदेशातील नातेवाईक,सैन्य दलातील जवान यांच्यापर्यंत आनंद पोचवण्याचाही आपण प्रयत्न केला.अगदी आनंदी आनंद.हे सर्व ओसरताना गुरु ठाकुर यांच्या कवितेतील
"बाहेर आहे झगमगाट
उजळलाय सारा गाव
आतल्या अंधारच काय?
तिथे एक दिवा लाव."
या ओळी रेंगाळत राहिल्या.थोड आत डोकावूयात का? पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थींचा विचार करता मला जाणवलं,दिवा लावण्यासाठी आपल्याला पणती,निरांजन काही तरी हवे. ते म्हणजे  पार्किन्सनचा  स्वीकार.तो  तर मंडळातल्या सर्वांकडे आहेच असे मला तरी वाटते. नसेल  तर  आधी मिळवणे महत्वाचे.डॉक्टरांचा सहानुभाव,शुभंकराच प्रेम,आधार,काळजी घेणे या सर्वाच तेल,पार्किन्सन्स विषयीच्या यथार्थ माहितीची वात, आजारावर मात करून स्वत:च जीवन उजळविणाऱ्या अनेकांकडून स्फुल्लिंग घेऊन तुमच्यापर्यंत पोचविणाऱ्या,आत्मविश्वास,दिलासा देणाऱ्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काडीचे माध्यम असेल.यामुळे आतला अंधार नक्कीच दूर होईल.सर्वांच्या एकत्रित प्रकाशात नवीन सामील होणाराही सुरुवाती पासूनच प्रकाशित होईल.
आता पुढची पायरी.आपलेच दु:ख गोंजारत न राहता.
"नेणिवेच्या दारावर
जाणीवेच्या पारावर
जिथे जिथे असेल वाव
तिथे एक दिवा लाव."