Wednesday 28 October 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६२

                                      





    पार्किन्सन्सविषयक गप्पा  ६२

                      आमचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांना आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडावे असे सांगण्यासाठी मी फोन केला.विषय कोणता या बाबत विचारले तर म्हणाले, सध्या माझा करोनावर अभ्यास चालू आहे.त्यांचा करोना या आजाराचे स्वरूप,करोनाच्या चाचण्या,करोनामुळे होत असलेले सामाजिक मानसिक परिणाम असा  करोना वर विविधांगी अभ्यास आकडेवारीसह झाला होता.एकीकडे या विषयाकडे तटस्थपणे पाहात असताना करोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या दोन घटना वाचून ते व्यथित  झाले होते आणि यासाठी जेष्ठांसाठी स्वमदत गट तयार करावा का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.२००० मध्ये त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हाचाच उत्साह आज ८५ व्या वर्षी तब्येतीच्या थोड्या तक्रारी असूनही पाहून मी अवाकच झाले.

याच्या उलट मी करोनाविषयी अजिबात वाचायची नाही.बातम्या पहायच्या नाही. प्राथमिक माहिती आहे तेवढी बस झाली असा विचार करणारी.अनेक मानसोपचार तज्ञही सारख्या अशा  बातम्या पाहू नका, ऐकू नका असे सांगत असलेले दिसले.मध्यंतरी एक शुभार्थी करोनामुळे गेल्याने whats app group वरच्या अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली मी पाहिली.त्यामुळे यावर काही लिहायचे नाही असे मी ठरवले होते.पटवर्धन यांच्या करोनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे  मला या विषयावर गप्पा माराव्या असे वाटले.या वातावरणात निराश झाला असाल घाबरला असाल तर ग्रुपमधल्या कोणाशी तरी बोलून मन मोकळे करा आमच्या whats app group वर सामील व्हा,व्हिडिओ कॉन्फरन्स जॉईन करा,ऑनलाईन डान्सक्लास जॉईन करा हेही आवर्जून सांगावेसे वाटले.या गप्पातून थोडी माझ्यापर्यंत पोचलेली सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न.

 करोना हा रक्तदाब,मधुमेह,कर्करोग हे आजार असणाऱ्यांना धोकादायक आहे असे सांगितले जाते.अर्थात हे आजार असणारेही करोना झाल्यावर सही सलामत बाहेर पडल्याची उदाहरणे आहेतच.इंडिअन मेडिकल असोशिएशनचे डॉ.अविनाश भोंडवे आणि न्यूरॉलॉजिस्ट डॉ.श्रीपाद पुजारी यांनी आपल्या व्याख्यानात पार्किन्सन्स हा आजार या यादीत नसल्याचे सांगितले.त्यामुळे हायसे वाटले.तरीही पार्किन्सन्स झालेले बरेच जण जेष्ठनागरिक असतात त्यामुळे त्यादृष्टीने मात्र काळजी घेतली पाहिजे असेही सांगितले होते.येथे करोनाविषयी मी जास्त लिहिणार नाही. परंतु करोनाची भीती थोडी कमी करणारे काही अनुभव लिहिणार आहे.

लॉकडाऊन मध्ये घरात राहावे लागते याबद्दल आमच्या शुभंकर, शुभार्थीना समस्या वाटत नव्हती पण बऱ्याच जणांना इतर काही आजारामुळे किंवा पार्किन्सन्स वाढल्यामुळे हॉस्पिटल मध्ये जावे लागले तर आपल्याला करोनाची लागण होईल अशी भीती वाटते.पण अनेकांना पर्याय नसल्याने हॉस्पिटल गाठावे लागले.सुरुवातीला पार्किन्सन्स वाढल्याने एका शुभार्थीना हॉस्पिटलाईज करायची गरज वाटली त्यावेळी कोविद्ची तपासणी झाल्याशिवाय कोणतेही हॉस्पिटल admit करायला तयार नव्हते कोविद्च्या टेस्ट आता घरीही येऊन घेतल्या जातात तशा तेंव्हा नव्हत्या. ससून मध्ये न्यायची वेळ आली.तेथे टेस्ट निगेटिव्ह निघाली.नंतर शस्त्रक्रिया झाली.त्यानंतर दोन महिने नर्सिंग होम मध्ये राहावे लागले परंतु करोना मात्र निगेटिव्ह राहिला. आमच्या मंडळाच्या कार्यवाह आशा रेवणकर यांचे पती रमेश रेवणकर याना त्यांचे दोन्ही हात खूप भाजल्याने आठवड्यातून तीनदा अनेक दिवस सर्जनना दाखवायला  जावे लागत होते.शिवाय घरीही ड्रेसिंगसाठी तास सव्वा तास लागायचा ही सर्व काळजी आशाने उत्तमप्रकारे घेतली..( हे भाजले कसे याची मोठ्ठी कथा आहे ती पुन्हा सांगेनच).अर्थोपेडीककडेची वारीही झाली. त्यातच त्यांची शेजारीणच कोविद पॉझिटिव्ह निघाली.परंतु या सगळ्यातून करोना यांच्यापर्यंत पोचू शकला नाही.आता ते पुर्ववत होऊन दिवाळीचा आकाशकंदील करायच्या तयारीला लागले आहेत.

शुभार्थी वनिता कुलकर्णी घरातच पडल्या.खांद्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागणार होती.सर्व तपासण्या नॉर्मल होत्या पण कोविद टेस्ट पॉझिटिव्ह निघाली.ती निगेटिव्ह आल्याशिवाय शस्त्रक्रिया शक्य नव्हती.त्याना लक्षणे कोणतीच नव्हती.मुलगा आणि सून यांनी त्याना घरातच क्वारेनटाइन करून उत्तम काळजी घेतली.शस्त्रक्रिया होईपर्यंत प्रचंड वेदना सहन करणे हे मात्र वनिताताईनाच करावे लागले हेवी पेन किलर त्याना दिल्या होत्या.पण त्यांनी धीर सोडला नाही.शस्त्रक्रिया क्रिटीकल होती हाडांचे तुकडे झाले होते.ती यशस्वी होऊन त्या घरीही आल्या.मी त्यांच्याशी बोलल्यावर त्या या सर्व काळात मनाने कोलमडल्या नव्हत्या हे लक्षात आले.त्यांची सूनही म्हणाली त्या अगदी पॉझिटिव्ह होत्या.

मनाने न खचता  कोविद्शी लढा देऊन पूर्ववत झालेल्या माझ्या नवऱ्याची गोपाळ तीर्थळी यांची कथा थोडी विस्ताराने सांगायची आहे कारण घरचाच अनुभव आहे.ती पुढच्या गप्पात.या सर्वात योग्य डॉक्टर केअरटेकर,कुटुंबीय हितचिंतक यांचाही मोठ्ठा रोल असतो हे नक्की.येणाऱ्या परिस्थितीला धीराने तोंड देणे ही महत्वाचे.बऱ्याचशा समस्या घाबरून गेल्यानेच वाढतात.

 


Tuesday 6 October 2020

पार्किन्सन्सविषयक गप्पा ६१

                                              पार्किन्सन्सविषयक गप्पा ६१   

                                   मागच्या गप्पात  डॉ. सतीश वळसंगकर यांच्यावर लिहिले होते.या गप्पात त्यांच्या पत्नी भूल तज्ज्ञ( Anesthesiologist ) डॉ.क्षमाताई वळसंगकर यांच्यावर लिहित आहे.शुभंकर, शुभार्थीची ही युनिक जोडी आहे.त्या आमच्या संपर्कात एकदोन वर्षापूर्वी whats app द्वारे आल्या.आणि आमच्यातल्याच होऊन गेल्या.

.आमच्या Whats App  group चे नाव  Parkinsons info & sharing असे आहे.पार्किन्सन्सशिवाय काही बोलायचे नाही असे ठरले होते.पण  करोनाचे संकट आल्यापासून थोडी मोकळीक दिली गेली आणि  शुभंकर आणि शुभार्थींच्या क्रिएटिवीटीला उधाण आले आहे.गीता पुरंदरे यांची ताजी टवटवीत फुलांची आरास आणि भूल तज्न डॉ.क्षमाताई वळसंगकर यांच्या तितक्याच टवटवीत नित्य नूतन कविता सर्वांची मने प्रफुल्लीत करत असतात.पर्किन्सन्सला थोडे विसरायला लावतात.अनेकाना त्यांच्या कविता वाचून बा.भ.बोरकर,इंदिरा संत,अरुणा ढेरे यांच्या कवितांची  आठवण येते..क्षमा ताईंची कविता सखी त्यांच्या कामाच्या व्यापातून त्या आपल्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही हे लक्षात येऊनही  स्वस्थ होती आता त्या थोड्या मोकळ्या आहेत म्हटल्यावर ती उफाळून वर आली आणि आता ती पिच्छा सोडत नाही आहे.खरे तर त्यांच्या कविता हा स्वतंत्र लेखाचा विषयआहे.

त्यांची पहिली ओळख झाली ती त्यांनी शेअर केलेल्या 'दूर चांदण्याच्या गावा' या अलबम मधून.क्षमाताईंनी लिहिलेल्या गाण्यांना नीरज करंदीकर यांनी स्वरसाज दिला होता.सुरेशजी वाडकर,आर्या आंबेकर आणि प्रियांका बर्वे यांच्यासारख्या वलयांकितांनी गाणी गायली होती.२२ डिसेंबर २०१९ ला याचे सोलापूर येथे प्रकाशन झाले होते.पहिली एन्ट्रीच अशी दमदार झाली होती.नंतर त्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचे अविष्कार आम्ही आ वासून पाहतच राहिलो.यापूर्वी उधाण हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.आता दुसरा कविता संग्रह बनेल इतक्या कविता तयार आहेत.

अतुल ठाकूरनी तुमच्या कविता वेबसाईटवर टाकल्या तर चालतील का विचारले.त्यावर त्यांनी 'चालेल ना' म्हणत लगेच परवानगी दिली. ' माझा हेतू फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात आंनदाचे काही क्षण देता यावे एवढाच आहे.व्यवसायाने मी anesthesiologist  असल्याने दुसऱ्याच्या वेदना कमी करणे हे काम मी गेली ४० वर्षे करत आहे.कविता वेबसाईटवर दिल्याने मला आनंदच होईल असे त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले.आणि त्यांच्याशी फोनवर बोलण्याईतका मोकळेपणा माझ्यातही आला.फोनवर बोलताबोलता  त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समाजत गेले.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे बाळकडू लहानपणीच मिळाले.छानछोकीपेक्षा वडिलांनी वाचनाची चैन पुरविली.हवी ती पुस्तके विकत आणून दिली.पुण्यात वाचनालयांचीही कमी नव्हती.मराठी हिंदी,इंग्रजी सर्व भाषातील विविध विषयावरची पुस्तके वाचली.व्यक्तिमत्वाची परिपक्वता,सारासार विवेक,मनाचा उमदेपणा,सर्जनशीलता असे आयुष्यभरासाठी पुरणारे पाथेय यातून मिळाले.

एम.बी.बी.एस.झाल्यावर इंटर्नशिप चालू होती आणि डॉ.सतीश वळसंगकर यांच्याशी विवाह झाला.पुरोगामी उदारमतवादी सासरी व्यक्तिमत्व आधीकच उजळले.सासऱ्यांचे हॉस्पिटल होते.गरिबांचे डॉक्टर म्हणून ते ओळखले जात.तेथेच इंटर्नशिप पूर्ण केली.सासऱ्यांनी जर्मन शिकायला लावले.ड्रायव्हिंगही शिकल्या.पुण्यात येवून बीजेमधेच एम.डी.( Anesthesiology ) प्रथम क्रमांकाने पारितोषिकासह केले.आणि स्वत:च्याच हॉस्पिटलमध्ये आणि स्वतंत्रपणेही Practice सुरु केली.

पुण्याहून सोलापूरसारख्या छोट्या गावात गेल्यावर जमवून घेणे त्याना फारसे कठीण गेले नाही.सकाळी पाच वाजल्यापासून दिवस सुरु व्हायचा.रात्री आठपर्यंत शस्त्रक्रिया असायच्या.भूल तज्ञाचे काम किती महत्वाचे असते ताण  प्रचंड असणार.पण हे काम त्यांच्या आवडीचे. मेंदूच्या शस्त्रक्रीयानाही भूल दिली.सोलापूरला असल्याने विविध तर्हेच्या शस्त्रक्रिया हाताळता आल्या.पुण्यात कदाचीत इतका अनुभव मिळाला नसता असे क्षमाताईना वाटते.एकुणात आहे त्या परिस्थितीतून चांगले शोधायचा त्यांचा गुण त्यांच्याशी बोलताना मला जाणवला.

या नियमित कामाबरोबर १९९८ मध्ये 'इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्टस,सोलापूर' शाखेचे अध्यक्षपद भूषविले.राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील भूलात्ज्ज्ञांच्या परिषदेत अभीभाषणे केली.शास्त्रीय निबंध आणि शोध निबंधासाठी प्रथम पारितोषिके मिळवली.स्वत:चे हॉस्पिटल असल्याने व्यवस्थापकीय जबाबदार्या होत्याच. वळसंगकरांच्या घरात या सर्वाला प्रोत्साहनच मिळाले.दीर.पुतण्या,जाऊ,नणंद,मुलगा ,सून सर्वच डॉक्टर.कुटुंब रंगलय वैद्यकीय व्यवसायात असे यांच्याबाबत म्हणता येईल.या सर्वात करियर आणि पैसा यामागे न धावता मिशन म्हणून व्यवसायाकडे पाहिले.हे करताना नाते संबंध, सगेसोयऱ्यांची ये जा,त्यांचे अदारातीथ्य,सणसमारंभ हेही आवडीने सांभाळले.आमची कार्यकारिणी सदस्य सविता ढमढेरे त्यांच्या न्यूरॉलॉजिस्ट दिराना दाखवण्यासाठी सोलापूरला गेली होती.येताना परतीच्या रेल्वे प्रवासात क्षमाताईनी डबा करून दिला. एवढ्या व्यापातून त्यांनी दाखवलेल्या  अगत्याचे तिला अप्रूप वाटले होते.त्या, नणंद आणि जाऊ एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेतच पण सुनेच्या वैद्यकीय कर्तुत्वाबद्दल बोलतानाही त्याना किती सांगू किती नको असे होते.

 हे सर्व पाहिल्यावर सुखी माणसाचा सदरा यांच्याकडेच मागावा असे वाटेल नाही का? पण तसे नाही.त्यांच्या आयुष्यातही कठीण निर्णय घ्यावे लागलें असतील,अडचणी आल्या असतील पण त्यांचा बाऊ न करता, त्यांनाच कुरवाळत न बसता आनंदाने  जगण्याचे मार्ग दोघांनीही शोधले.

 डॉक्टरना पर्किन्सन्स झाला तेंव्हा  एका प्रतिथयश सर्जनला हाताला कंप सुरु झाल्यावर मानसिक त्रास झालाच असेल. शस्त्रक्रिया करणे  करणे बंद केल्यावर .त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून शस्त्रक्रिया  करणाऱ्या क्षमाताईना निश्चितच त्यांची उणीव जाणवली असेल.हॉस्पिटची बरीच जबाबदारी क्षमा ताईना सांभाळावी लागली असेल.खाजगी हॉस्पिटल सांभाळणे आजचे वैद्यकीय क्षेत्रातले,नियम,कायदेकानू ,पेशंटची बदलती मनोवृत्ती,डॉक्टरना मारहाण करण्याच्या घटना पाहता तारेवरची कसरत असते..क्षमा ताई या त्रासदायक बाजूबद्दल न बोलता या व्यवसायाने दिलेल्या आनंदा बद्द्लच बोलतात.

वास्तवाकडे तटस्थतपणाने पाहता आल्याने .आलेल्या परिस्थितीनुसार योग्यवेळी योग्य निर्णय त्यांनी सहजपणे घेतले.अद्ययावत अशी नवी हॉस्पिटलची इमारत बांधली होती.१५ वर्षे  हॉस्पिटल चालवले.पण वेळ आल्यावर  .हॉस्पिटल विकण्याचा निर्णयही  घेतला. भूलतज्ज्ञ म्हणून त्यांचे काम मात्र चालूच होते.प्रकृती अस्वास्थ्यामुळे एप्रिल २०२० मध्ये काम बंद केले आणि त्यानंतर राहून गेलेल्या छंदाकडे वाट वळवली.यापूर्वीही ६२ व्या वर्षी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते.आता कविता करणे आणि त्या सादर करणे या छंदासाठी त्यांना वेळ मिळू लागलाय..चित्रकलेच छंदही नव्याने डोके वर काढत आहे.

एक शुभंकर म्हणून जबाबदाऱ्या आहेतच.. डॉक्टरांचा स्वभाव कामात झोकून देण्याचा.एक डॉक्टर म्हणून आणि पत्नी म्हणून त्यांच्या औषधाच्या वेळा सांभाळण,.पार्किन्सन्सला मोनिटर करण्याचे काम करावे लागतेच.डॉक्टरांचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यात त्यांच्या सकारात्मकतेचा वाटा आहे तसा क्षमाताईंच्या बरोबर असण्याचाही आहे.

पार्किन्सन्स मित्रमंडळात त्यांच्या असण्याने आम्हालाही विशेषता मला आधार वाटतो.माझ्या पार्किन्सन्स विषयक विविध लेखातून चुकीची माहिती जात नाही ना अशी मला भीती असते.क्षमाताईंचा त्या डॉक्टर असल्याने यासाठी आधार वाटतो.क्षमा ताई तुम्ही आमच्या ग्रुपसाठी asset आहात.

Image may contain: 1 person, standing, tree, plant and outdoor