Wednesday 17 May 2023

क्षण भारावलेले - २३
















                                                    क्षण भारावलेले - २३

                        ९ एप्रिलचा मेळावा होउन इतके दिवस होऊन गेले पण झिंग अजून उतरली नाही.भारावलेपण संपले नाही.मेळाव्यापुर्वी,मेळाव्याच्या दिवशी आणि मेळाव्यानंतर सातत्याने सुखावणारे काहीना काही घडत राहिले. 'भेटीत तृष्टता मोठी' अशी भावना अनेकांच्या मनात होती.एकमेकाना न पाहता Whatsapp च्या माध्यमातून ओळखी झालेल्या सर्वाना प्रत्यक्ष भेटीची ओढ वाटत राहिली.या प्रत्यक्ष कार्यक्रमाना, सहलीला भरभरून प्रतिसाद मिळाला.नाती अधिक दृढ झाली.या कार्यक्रमांचे फोटो व्हिडीओ पाहून न आलेल्यानाही यावेसे वाटत राहिले.या सर्व दिवसात आमच्या सर्वांतील नाते संबंधाची घट्ट विण दर्शन देत राहिली.सुखावत राहिली.

                     जानेवारी,फेब्रुवारीपासूनच शुभंकर,शुभार्थींचे लेखन यायला सुरुवात झाली.शैला भागवत यांनी लेखनाबरोबर पेंटिंग केलेल्या बाटल्यांचे फोटो,व्हिडीओ पाठवला.कला हा माझा प्रांत नाही तरी हे करताना मन रमते म्हणून करत आहे असे त्या म्हणत असल्या तरी पेंटिंग पाहिल्यावर व्वाव असे सहज उद्गार निघाले.अशा ५० बाटल्या करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले होते.कलाकृती प्रदर्शनाच्या एन्ट्रीची सुरुवातच दमदार झाली होती.

                    गीता पुरंदरे त्यांचा मुलगा लंडनहून येणार होता त्यामुळे कार्यक्रमाला येणार नव्हत्या पण कलाकृती पाठवून देईन म्हणाल्या.उमेश सलगर सांगलीला जाणार होते.गीताताईना भेटायला गेले.त्यांचे आदरातिथ्य,बाग सर्व पाहून खुश झाले.येताना त्यांची ४५ पेंटिंग्ज बरोबर घेऊन आले.पेंटिंग्ज देताना त्यांनी ती मोजलीही नाहीत याचे सलगरना खूप आश्चर्य वाटत होते.काही कारणाने थोडे नैराश्यात जाऊ लागलेले सलगर भरभरून उर्जा घेऊन आले

                    नागपूरच्या ज्योती पाटणकर याही कुरिअरने आपल्या विहीणबाईंच्याकडे मण्यांच्या विविध कलाकृती पाठवणार होत्या.परगावच्या शुभार्थींचा उत्साह् पाहून आनंद वाटत होता.पुण्यातल्या काहीना मात्र परगावी जावे लागणार होते.

                  राजीव कराळे नेपाळला जाणार होते.ते फोटोग्राफी उत्तम करतात.व्यक्तींच्यापेक्षा निसर्ग,वास्तू,देश परदेशातील प्रेक्षणीय स्थळे यांचे फोटो असतात. Instagram वर त्यांचे हजारो फोटोग्राफ आहेत.आपण कार्यक्रमाला असणार नाही याची त्याना हळहळ वाटत होती.त्यांनी निवडक फोटोग्राफ पुठ्ठ्यावर चिकटवून आशाकडे आणून दिले.                         

             सुनील कर्वेही अमेरिकेला निघाले होते.त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी सविताकडे आणून दिली.मी त्यांच्यावर थोडी रागाऊन म्हणाले होते कार्यक्रम उरकून जायचे ना? ते काहीच बोलले नाहीत.४ एप्रिलला त्याना नात झाल्याचा मेसेज आला आणि त्याना जायची घाई का होती समजले.त्यांचे लक्ष मात्र येथेच होते. कार्यक्रम लाईव्ह करा असा त्यांचा आग्रह चालला होता.त्यांच्या फोनमधून, मेसेजमधून कार्यक्रम चुकतोय याचे त्याना किती वाईट वाटते हे समजत होते.१० तारखेला कार्यक्रमाचे वर्णन करणारी त्यांची कविता आली. प्रत्यक्ष हजर असल्यासारखे त्यांनी वर्णन केले होते. 

            मुलाच्या treatment साठी गेलेल्या गोटखिंडीकरांचा पुत्तुरहून उपस्थित राहणार नसल्याचा आणि नंतर शुभेच्छा देण्यासाठी असा दोनदा फोन आला.त्यानाही कार्यक्रम चुकणार याची खंत वाटत होती.   वेगवेगळ्या कारणांनी उपस्थित राहू शकणार नसणार्यांच्या भरभरून शुभेच्छा येत होत्या.whats app वर सर्व वातावरण मेळावामय झाले होते. 

               मेळावा यशस्वी होण्यासाठी अनेक मदतीचे हात हवे होते.दरवर्षी फोन करून सर्वाना कार्यक्रमाची माहिती दिली जाते.असे १९/२० जण फोन करण्यास तयार झाले.यात पुण्यातील लोकांबरोबर इंदूरहून वनिता सोमण,औरंगाबादहून रमेश तिळवे,सांगलीहून गीता पुरंदरे,नाशिकहून संगीता आगाशे,बेळगावहून आशा नाडकर्णी याही फोन करणार होत्या.सर्वांनी उत्तम  काम केले.कोण येणार कोण नाही आणि का नाही हे सर्व आता समजले होते.कलाकृती कोण ठेवणार हेही नक्की झाले.

               एस.एम.जोशी सभागृहातून मिळणारी टेबले पुरणार नव्हती.दाते मंडपवाल्यांकडून भाड्याने टेबले आणली.तीही अपुरीच पडली.नेहमीप्रमाणेच काहींनी ऐन वेळी कलाकृती आणल्या. आम्ही त्या नाकारत नाही.हा शुभार्थींचा उत्सव असतो.त्याना आनंदी राहण्यास प्रवृत्त करण्यासाठीच तर आटापिटा असतो.      

              गीता पुरंदरेना कलाकृती पोचल्याचा फोन केला तर त्या म्हणाल्या, मुलागा त्यावेळी दुसरीकडे जाणार आहे त्यामुळे आम्ही येत आहोत.त्यांचे येणे सार्थकी लागले.कारण कार्यक्रम संपतासंपता प्रेक्षकातून आवाज आला त्या गीता पुरंदरे कोण ते पाहू दे आम्हाला.त्यांना स्टेजवर बोलवले गेले.आपल्या पुष्परचनेने सर्वांची रोजची  सकाळ आनंदी करणार्या फुलराणीला सर्वाना याची देही पाहता आले.             

              कलाकृती मांडणे,निमंत्रितांचे आगत स्वागत,नोंदणी,पुस्तक विक्री,देणग्या स्वीकारणे, स्मरणिका देणे,ताक,खाउची  पाकिटे वाटणे,स्टेज व्यवस्था अशी कितीतरी कामे असतात.याकामासाठी उत्साहाने आपणहून स्वयंसेवक आले.गिरीश,शिरीष बंधुद्वय,वैशाली खोपडे हे तर आमचे एव्हररेडीअसतात.उमेश सलगर,मनीषा लिमये,मिलिंद भावे,अंजली भिडे, याना हक्काने मदतीला बोलावले,गौरीच्या पतीने,सुर्वेनी आपणहून मदतीला येणार असल्याचे सांगितले.नकार कोणीच दिला नाही. मनीषाताईंनी मला बैठे काम नको.फिरण्याचे द्या असे मोकळेपणानी सांगितले.मृद्लाची सून क्षितिजा आणि माझी लेक सोनाली या घरच्याच.या शिवाय आशाच्या मैत्रिणी ललिता,विजू,अंजलीची मैत्रीण पुष्पा,ऐनवेळी मदतीला आलेले आणि मलाही माहित नसलेलेही अनेक.सगळेजण तीन वाजल्यापासून आले होते.

             अतुल ठाकूर अगदी लवकर आले होते. यावर्षी ते प्रथमच कार्यक्रमाला आले होत.ते ग्रुपमध्ये सर्वाना प्रिय आहेत.त्याना पाहण्यास सर्व उत्सुक होते. मला स्टेजवर बोलावून सत्कार करणार नसाल,काही भेट देणार नसाल तरच मी येईन असे त्यांनी सांगितले.आम्ही अट मान्य केली.वेबसाईट, मंडळासंबंधी बोलण्यास मात्र ते तयार झाले.कार्यक्रमाची सुंदर आणि सविस्तर वृत्त लगेच लिहून त्यांनी ग्रुपवर टाकले.त्याची लिंक सोबत देत आहे.त्याबद्दल मी काहीच लिहिणार नाही.

           आणखी एक सुखद धक्का. काही निमित्ताने औरंगाबादच्या रमेशभाऊना फोन केला तर ते म्हणाले मी बसमध्ये आहे.गीरीशही आहे. चार पर्यंत पोचेन.त्याना पाहून सर्वच खुश झाले.आल्यावर दोघेही मदतीला लागले.त्यांचे चार शब्द,स्पर्श सर्वांनाच दिलासा देतात.ते दोघे आले की मला अदृश्य रुपात त्यांची शुभार्थी पत्नी कै.नीला दिसत असते तिच्यामुळे तर ते ग्रुपमध्ये आले.कार्यक्रम संपल्यावर ते लगेच मिटिंग असल्याने परतही गेले.रक्ताच्या नात्यातही आढळत नाही असा जिव्हाळा आमच्या सर्वात निर्माण झाला आहे.

           संगीता आगाशे नाशिकहून आल्या तेही भेटीच्या ओढीनेच.आगाशेना जाऊन त्यादिवशी बरोबर महिना झाला होता.मंडळाचे कोणतेही काम मला सांगा हे त्यांनी आवर्जून सांगितले.ठाण्याच्या अनुराधा गोखले याही गोखले गेल्यावर संपर्कात आहेत सहलीला येतात.गोखलेंच्या स्मरणार्थ देणगी देतात.तीन वर्षात प्रत्यक्ष संपर्क झाला नव्हता.यावेळी आल्या.प्रत्येक जण येऊन भेटत होते.मला कोणाकोणाशी किती किती बोलू असे झाले होते.आनंदाने मन भरून आले होते.मिठीतून स्पर्शातून भावना जाणवत होत्या.

         प्रमुख वक्ते हिमांशू वझे यांच्या अतिशय उपयुक्त अशा भाषणाबरोबर ,वागण्यानेही आम्ही भारावूनन गेलो. त्यांनी आपल्या कार्यबाहुल्यातून आमच्या स्मरणिका वाचल्या होत्या.त्याबद्दल कौतुक केले. अर्धातास आधी येऊन कलाकृती प्रदर्शन पाहिले.सर्वाना ते आपल्यातलेच वाटले.

          इतर आलेले लोकही शुभार्थींच्या कलाकृती पाहून चकित होता होते,न मागता देणग्या देत होते.एकुण कार्यक्रमातून एक हार्मनी जाणवत होती.

           कार्यक्रमानंतरच्या, कार्यक्रमाबाबत, स्मरणिकेबाबत प्रतिक्रिया.'आनंद पोटात माझ्या मावेना' अशाच होत्या.या सर्वातून केलेल्या श्रमाचे सार्थक झाले असे वाटले.'मी आहे कारण आम्ही आहोत' हे उबंटू तत्वज्ञान सर्वार्थाने अमच्याबाबत खरे ठरत असल्याचा पुन्हा प्रत्यय आला.

             

           

                 

                  

 

 

                   

Saturday 13 May 2023

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ८२

                                              पार्किन्सन्सविषयक गप्पा  - ८२

                                      जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांची एक सभा घेतो. झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा घेऊन काही सुधारणा हव्यात का हेही पहिले जाते.प्रत्येक जण आपापले मत सांगत होते.डॉ. अमित करकरे यांनी या ग्रुपकडून मला काय मिळाले हे सांगताना आमच्या झूम मिटिंगबद्दल  सांगितले त्यांनी अनेक ठिकाणी झुमवर व्याख्याने दिली इतरत्र दिसणारा ढिसाळपणा मंडळाच्या सभेत दिसला नाही.प्रत्येकजण शिस्तबद्धपणे ऑडिओ,व्हिडीओ म्युट करून होता.हवे तेंव्हा अनम्युट करत होता.त्यांच्या या निरीक्षणाने आम्ही नक्कीच सुखावलो.हे सहजासहजी झाले नव्हते.सुरु केले तेंव्हा सर्वांनाच हे तंत्र नवीन होते.  

             लॉकडाऊनच्या काळात अतुल ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स चा प्रस्ताव मांडला.रमेश तिळवे,डॉ.रेखा देशमुख,वनिता सोमण,जोस्ना सुभेदार यांनी कल्पना उचलून धरली. झूम लोड करण्यापासून आमची सुरुवात होती. पहिली ट्रायल एप्रिल २०२० झाली.यानंतर दोन तीन ट्रायल मिटिंग झाल्या.अमेरिकेहून आमच्या अध्यक्ष श्यामला शेंडेही हजर राहिल्या.सभा यशस्वी झाल्या.पहिली ट्रायल व्याख्यानही आपल्यातल्याच कोणाचे तरी ठेवावे म्हणू डॉ. रेखा देशमुख यांचे 'आनंदी कसे रहावे' या विषयावर व्याख्यान झाले.

         मोफत झूम वापरत असल्याने.४० मिनिटांनी थांबावे लागे.हा एक अडथळाच होता.दुसरा अडथळा झुमच्या विश्वासार्हतेबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या.आपले बँकेतील पैसे जातील इथपर्यंत भीती होती.मग इतर काही app वापरून पाहिली.ती सोयीची वाटत नव्हती.हृषिकेशने १२ मेला झूमवर ऑनलाईन डान्स सुरु केला.PDMDSचे कार्यक्रमही झुमवर होते. या दोन्हीकडे हजर राहणार्यांनी झूमचा आग्रह धरला.बहुमताने झूम सुरु झाले.झुमचे पैसे भरून ४० मिनिटात बंद होण्याच्या अडथळ्यावर मात केली.या सर्व काळात रमेश तिळवे, मयूर श्रोत्रीय आदींनी तंत्रज्ञानविषयक भ्रामक समजुती दूर करण्याचे प्रयत्न केले.अतुल यांनी होस्ट म्हणून आणि गिरीशनी कोहोस्ट म्हणून उत्तम कामगिरी केली

             अतुलने भेटू आनंदेची कल्पना सुचविली तिनेही बस्तान बसवले.यु ट्यूबवरील व्हिडीओ आणि Viewer वाढू लागले.या काळात वेळोवेळी ऑडीओ,व्हिडीओ म्युट कसा करायचा.प्रश्न विचारताना चालू कसा करायचा, काय टाळायचे.याबाबत सूचना Whats app वर दिल्या जाऊ लागल्या.जे करत नाहीत त्याना पर्सनली ते कसे करायचे हे समजाऊन दिले जाऊ लागले.सार्वजण झुमला सराईत झाले.

             या काळात आणखी एक काम केले ते म्हणजे सर्व सभासदाना फोन करून झूम मिटिंग चालू झाल्याचे सांगितले.ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्याना आधी घरातील इतरांच्या फोनवरून जॉईन होउन नंतर स्वत:चा फोन घेण्यासाठी प्रवृत्त केले गेले.वैशाली खोपडेनी हे काम चोख केले. स्मार्टफोन हे त्यांची मानसिक अवस्था सुधारण्यासाठीचे औषध आहे असे ती सांगे.आता बहुतेक जण स्मार्ट फोन वापरतात.सगळीकडे निराशेचे वातावरण असताना आमचे शुभंकर आणि शुभार्थी मात्र Whatsapp वरील इतरांच्या कलाकृती, कविता. सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मोटीवेट होत होते.एकमेकाना आधार देणारा सुंदर परिवार झाला.परगावचे लोक मंडळाशी जोडले गेले.आता समाजात मिसळायला कोणते बंधन नसले तरी ऑनलाईन सभा चालूच आहेत.

             कदाचित ही सर्व जंत्री कंटाळवाणी वाटेल पण डॉ.अमित करकरे यांच्या वाक्याने २० सालापासून चालू झालेली झूम मिटिंग अनेकांच्या सहकार्यातून कशी स्थिरावत गेली याच्या आठवणी जाग्या झाल्या.या प्रक्रियेचीची नोंद व्हायला हवी असे वाटले.एखादा उपक्रम यशस्वी व्हायचा असला तर त्याला  सर्वांनी एकत्र येऊन भिडायला लागते हे सांगावेसे वाटले.