Monday 22 May 2017

चूक पथ्यावर पडली.

                     घर सोडून एकदोन दिवस जरी कुठे बाहेर जायचे असले तरी आठवणीने प्रथम औषधे बरोबर घ्यावी लागतात.पार्किन्सन्सची औषधे तर सगळीकडे मिळतीलच असे नाही म्हणून जबाबदारीने घ्यावीच लागतात.आम्ही मुलीकडे ८/१० दिवसासाठी गेलो आणि शेवटच्या दिवशी ह्यांच्या  गोळ्या कमी पडतात असे लक्षात आले. तातडीने जवळच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो नशिबाने गोळ्या मिळाल्या.दुकानदाराने तुम्हाला पीडी आहे का? विचारले.मग आम्ही  हा धागा पकडून पार्किन्सन्स मित्रमंडळाची माहिती सांगितली त्यांच्याकडे कोणी पेशंट येत असल्यास पाठविण्यास सांगितले.त्यांनी खूपच उत्सुकता दाखवली.आमचा फोन नंबर,सभा जेथे होतात त्या अश्विनी हॉटेलचा पत्ता, वेबसाईट अशी माहिती लिहून घेतली.मी पेशंट तर पाठ्वेनच पण मलाच यावेसे वाटले असे ही म्हटले.आम्ही काही वेळापूर्वी गोळ्या विसरणे ही तुझी चूक की  माझी चूक असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होतो ते आता एकदम म्हणालो,' गोळ्या विसरलो चांगले झाले.'
                          आम्ही घरी आलो आणि दोन दिवसातच खडकीच्या पिलये नावाच्या पेशंटचा फोन आला.ते आम्हाला भेटण्यास उत्सुक होते.आणि ते नेमके माझ्या मुलीच्या सोसायटीत राहणारे निघाले.आमच्याकडे त्यांनी येण्याऐवजी मुलीकडे आम्ही पुन्हा जाणार होतो त्यावेळी भेटायचे ठरले.त्याप्रमाणे पती पत्नी दोघेही आले. आमच्या तासभर गप्पा झाल्या.पहिल्याच भेटीत आमचे छान जमले.खूप दिवसाची ओळख असल्यासारखे वाटले.त्यांना पीडी होऊन ९ वर्षे झाली होती.इंजिनिअर असलेले पिलये कल्याणी फोर्ज मधून मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाले होते. आपल्याला इतक्या दिवसात या ग्रुपची माहिती का झाली नाही असे त्यांना वाटत होते.लगेच whats app ग्रुपमध्ये ते  सामील झाले.मातृभाषा मराठी नसली तरी मराठीतून असलेली वेबसाईट पाहण्याची त्यांना उत्सुकता होती.पुन्हा एकदा वाटले गोळ्या विसरलो ते चांगले झाले.आणखी एक प्रकर्षाने जाणवले आपली लोकांपर्यंत माहिती पोचविणारी यंत्रणा अधिक सक्षम करायला हवी.
                          
                     

Wednesday 10 May 2017

शुभार्थीच्या कलाकृती

१) प्रदर्शन एप्रिल २०१० २) प्रदर्शन एप्रिल २०१५ ३) प्रदर्शन एप्रिल २०१७
                            

  जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात शुभार्थीच्या कलाकृतीचे प्रदर्शन एप्रिल २०१० साली प्रथम ठेवले होते.२००९/१० हे वर्ष कलोपचार या विषयालाच वाहिलेले होते.त्यामुळे असे प्रदर्शन संयुक्तिकही होते.घरभेटीत अनेक कलाकार भेटल्याने याला पुष्टी मिळाली.त्यानंतर २०१५ मध्ये असे प्रदर्शन भरले.शुभार्थी विजय राजपाठक यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधवी यांनी राजपाठकांचे एक पेंटिंग मला भेट दिले.अशी अनेक पेंटीग असल्याचे त्यांनी सांगितले.ती सर्व अप्रतिम होती.वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तासनतास काम करून त्यांनी ती काढली होती.शुभार्थीना त्यामुळे प्रेरणा मिळावी म्हणून हे प्रदर्शन होते. आणि आता २०१७ मध्ये तिसऱ्यांदा असे प्रदर्शन आयोजित केले गेले.शांतीवन सहलीत ओरोगामीसाठी सर्वाना कागद दिले होते. शुभार्थी विजय ममदापूरकर यांनी त्या कागदावर चालत्या बस मध्ये अर्कचित्रे काढली.ती पाहून शीलाताई कुलकर्णीना चित्रे काढण्याची  प्रेरणा मिळाली.अनिल कुलकर्णी यांच्या आजारपणात त्यांचे चित्रे काढणे थांबलेच होते.ममदापूरकर यांच्या उत्साहाची लागण अनेकांना झाली आणि  यावर्षी प्रदर्शन ठेऊया असे ठरले. मेळाव्याच्या अनेक दिवस आधीपासून वेळोवेळी  प्रदर्शनाची माहिती दिली जात होती पण कितपत प्रतिसाद मिळतो याबाबत शंका होती.शुभार्थिंनी शंका फोल ठरवली.अनेकांनी कलाकृती आणल्या, त्यात विविधताही होती.या सर्वांनी घेतलेले कष्ट,कल्पकता आणि यातून आजाराचा विसर पडणे,काही लक्षणे कमी होणे हे सर्व आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हा लेखन प्रपंच.
                       कलाकृतीत  मोठ्ठी जागा व्यापली होती ती विजय देवधर यांच्या रंगीबेरंगी कागदाच्या ओरिगामीने.फुलपाखरू,बदक, अनेक प्राणी पक्षी,फुले अशा विविध वस्तू केल्या होत्या.ओरिगामी ही अक्षरेही ओरिगामीतच तयार केलेली.विशेष म्हणजे पीडी झाल्यावर पुस्तकात पाहून त्यांनी ही कला आत्मसात केली.तासनतास मी हे करत राहतो. मला खूप आनंद मिळतो असे ते सांगत होते.
                       पंचाहत्तरी ओलांडलेल्या पद्मजा ताम्हणकर यांच्या  उत्साहाला  कोणताही उपक्रम असला तरी उधाण येते..त्यांनी कागदी फुले,पिस्त्याच्या कव्हरची फ्रेम,ग्रीटिंग्ज अशा विविध वस्तू केल्या होत्या.
                       प्रदर्शनात पाककृती ठेवल्या तरी चालतील असे सांगितले होते.यात महिला वर्ग सहभागी होईल असे वाटले होते परंतु उमेश सलगर यांनी भरली मिरची ठेवली आणि ही मक्तेदारी स्त्रियांची नाही हे दाखवून दिले.आणलेल्या मिरच्या त्यांनी तेथेच वाटून टाकल्या.प्रमुख पाहुण्यांना देण्यासाठीही त्यांनी मिरच्यांचे स्वतंत्र पाकीट आणले होते.
                      पूर्वी दिवाळीला आकाश कंदील घरी केले जायचे. आता कोणी फारसे करताना दिसत नाही आमचे शुभार्थी रमेश रेवणकर मात्र आकाश कंदील घरीच करतात.तो आकाश कंदील प्रदर्शनात ठेवला होता.
                      खास विनंती वरून कै.विजय राजपाठक यांची पेंटिंग्ज त्यांच्या पत्नीने आणली होती.त्यांचे एक पेंटिंग मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राच्या आनंदयात्री या मासिकाचे मुखपृष्ठ म्हणून झळकले.
                      विजय ममदापुरकर यांची सहलीच्यावेळी काढलेली अर्कचित्रे आणि त्यांनी खास प्रदर्शनासाठी काढलेली चित्रे होती.याशिवाय त्यांनी स्वरचित कविताही ठेवली होती.
                      ८० वर्षे ओलांडलेले यशवंत एकबोटे सहल असो, सभा असो की पदयात्रा असो, फोटो आणि व्हिडिओ चित्रण करत असतात, फेसबुक,whats-app वर पाठवत असतात.यातील त्यांचे फुलगाव सहलीचे फोटो प्रदर्शनात विराजमान झाले होते.
                     रेखा आचार्य,केशव महाजन,शशिकांत देसाई यांनी भेटकार्डे ठेवली होती याशिवाय शशिकांत  देसाई यांनी  रांगोळी आणि महाजन यांनी वर्तमानपत्रात आलेल्या जुन्या हिंदी गाण्यांचा अल्बम तयार करून ठेवला होता.
                      प्रज्ञा जोशी प्रत्येक प्रदर्शनात विविध कलाकुसरीच्या वस्तू ठेवतात. यावर्षीच्या प्रदर्शनातही त्यांनी त्या ठेवल्या होत्या.
                      गोपाळ तीर्थळी यांनी ज्ञानेश्वरांचा हरिपाठ स्वहस्ताक्षरात लिहिला आणि पुस्तकरूपात सजवून ठेवला होता.
                       शीलाताई कुलकर्णी यांनी विणकामाच्या विविध वस्तू तयार करून ठेवल्या होत्या.यात मोबाईल कव्हर,आसन,पायमोजे,बेबी स्वेटर अशा विविध गोष्टी होत्या.
                        जयकुमार देशपांडे यांनी स्वत: तयार केलेला  कपडे वाळत घालायचा stand ठेवला होता.
 याशिवाय पृथ्वीच्या गोलात बल्ब बसवून तो फिरेल अशी यंत्रणा तयार केली होती.त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले.
                        नव्यानेच दाखल झालेल्या आणि मराठवाड्यातून आलेल्या बाळाभाऊ जोशी यांनी स्वत: लिहिलेले 'श्री क्षेत्र माहूर सर्वदर्शन' हे पुस्तक ठेवले होते.
                        ही सर्व जंत्री झाली.पण यासर्वांचे थरथरणारे हात,ताठरलेले स्नायू,काहीना होणारा फ्रीजिंगचा त्रास या सर्वावर मात करत जिद्दीने त्यांनी हे केले. सर्वसामान्यांपेक्षा त्यांना यासाठी कितीतरी जास्त वेळ लागला असणार हेही समजू शकणारे आहे.पीडिला विसरून आनंदी राहण्यासाठी त्यांनी शोधलेले  हे मार्ग नकळत लक्षणांवर मात करतात हेही आता लक्षात आले आहे.इतर शुभार्थींसाठी हे प्रेरणादायी आहे.