Saturday 30 November 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४६

                                              पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४६
                                  शुभार्थी अश्विनी दोडवाड यांची मुलगी अनुश्रीचा फोन आला.'काकू कितीतरी दिवसांनी आईचा आनंदी आवाज आणि प्रसन्न चेहरा पाहिला.आता सभेलाही पाठवीन.मंडळाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.'
                             नुकतीच २७ नोव्हेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल मनाली गार्डन येथे गेली होती. आणि हो नाही करता करता अश्विनीताई सहलीत सहभागी झाल्या होत्या.अश्विनीताई सातत्याने सह्लीना,सभाना येत.अगदी आनंदवनच्या सहलीलाही त्या आल्या होत्या.नृत्योपचारात सहभागी होत्या मंडळाच्या मासिक सभेत ५०/६० जणांसाठी वाढदिवसानिमित्त स्वहस्ताने केलेला उपमा त्यांनी एकदा आणला होता.आणि अशा उत्साही अश्विनीताईंचा हल्ली फोनवर बोलतानाही निराशेचा स्वर असे.त्यांची तीनही  मुले त्यांची काळजी घेतात.केअरटेकर ठेवलेला आहे.असे असले तरी पार्किन्सन्स शुभार्थीना गाठण्यासाठी नैराश्य टपूनच बसलेले असते.त्यांनी वरचढ होण्याच्या आतच त्याला हाकलावे लागते.आणि त्याची हकालपट्टी करण्यासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळासारखा स्वमदतगट निश्चित उपयोगी पडतो.आणि सहल तर यासाठी हुकमी एक्का.निराशेने ग्रासलेल्या अश्विनीताईंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे कसब सहलीनी केले होते.दरवर्षी सहलीनंतर असे अनेक सुखद अनुभव येतात.
                            शुभार्थीना आनंद देणाऱ्या सहलीचे आयोजन,नियोजन  २/३ महिने आधीपासूनच केले जाते.पुण्यापासून ३०/४० किलोमीटरवर असणारे निसर्गरम्य ठिकाण निवडले जाते.कार्यकारिणीचे सदस्य प्रत्यक्ष जावून २/३ ठिकाणाची पाहणी करून येतात.त्यातले शुभार्थीना सुखावह होईल असे ठिकाण निवडले जाते.बस अगदी ठिकाणापर्यंत जायला हवी.ठिकाण उंच सखल नको,खूप पायऱ्या नसाव्यात.शौचालय जवळ असावे.कमोड असावा.कार्यक्रम,खेळ यासाठी हॉल हवा.असे सगळे आखुडशिंगी,बहुदुधी हवे.
                         ठिकाण निश्चित झाले की नावनोंदणी सुरु होते.बस ठरवणे संख्येवर अवलंबून असल्याने ठराविक तारीख दिली जाते पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत नावे येतच राहतात.आणि अशा उशिरा आलेलया शुभार्थीचे मन मोडणे कठीण होते.त्यांच्यात सहलीमुळे झालेले परिवर्तन पाहून केले ते योग्यच होते असे वाटते.
बसमध्ये शुभार्थीना नाश्ता देतानाही त्यांचा कंप लक्षात घेऊन चमच्याने खाण्याऐवजी उचलून खाता येईल असा मेनू ठरविला जातो.खेळ करमणुकीचे कार्यक्रम यांची रेलचेल असते.एकुणात सहलीचे सर्व नियोजन शुभार्थी केन्द्री असते.सर्वजण लहान मुल बनून मनसोक्त आनंद घेतात.सामुहिक शक्तीतून उर्जा निर्माण होते ती उर्जा अनेक दिवस पुरते.
                     सहलीला परगावहून शुभार्थी शुभंकर येतात.ठाण्याच्या अनुराधा गोखले,महाडचे मधुकर तांदळे,बेळगावचे आशा आणि प्रदीप नाडकर्णी अशी उदाहरणे सांगता येतील.अनेक शुभार्थी परदेशवाऱ्या,भारत भ्रमण करतात तरीही त्यांना मंडळाची ही मिनी सहल आकर्षित करते.९४ वर्षाच्या कलबाग काकांचा  सहलीतील सहभाग सर्वच शुभंकर शुभार्थीना प्रेरणादायी असतो.
                     
                     सहलीपूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत अनेक अडचणी येतात.तोल जातो,ऑनऑफची समस्या आहे फ्रीजीन्गची समस्या आहे,डिस्काय्नेशियामुळे शरीर सारखे हलते अशा अनेक शुभार्थीना नेताना प्रचंड ताण असतो. सह्लीनंतरच्या शुभंकर, शुभार्थींच्या सुखावणाऱ्या प्रतिक्रिया आणि खुललेले चेहरे पाहून ताण विसरायला होतो.पुन्हा सहल निघते.खरे तर  आमची सहल म्हणजे 'ताण हवासा' असेच म्हणावे लागेल. 

                      
                    

Saturday 16 November 2019

क्षण भारावलेले - ११

                                              क्षण भारावलेले - ११
                   दिवाळी सण आनंदाचा.प्रेमाच्या माणसांच्या भेटीगाठीचा.काहीवेळा दिवाळीत एखादी अनपेक्षित भेट घडते आणि भारावलेले क्षण देऊन जाते.या वर्षी असेच झाले.शुभार्थी उमेश सलगर यांचा फोन आला, मी फराळ घेऊन येतोय.तुम्ही घरी आहात ना? त्यांनी घरी येणे मला आवडलेच असते. पण औंधहून आमच्या घरी येणे म्हणजे दुसऱ्या गावाला जाण्यासारखेच शिवाय ते स्कूटरवर येणार.मी उत्तर देण्यापूर्वीच ते म्हणाले 'ताई मी स्कूटरवर येणार नाही.माझा मुलगा सोडून जाणार आहे.तुम्ही काळजी करू नका'.
                 ठरल्याप्रमाणे ते दुपारी साडेबाराला आले.येता येता आमच्या गेटपाशी ठेवलेल्या कचऱ्याच्या रिकाम्या बादल्या घेऊन आले.आमची कामवाली आत येताना त्या आणत असते.यापूर्वी ते एकदा आले होते आणि कुटुंबांतालेच एक झाले होते.त्यामुळे त्याना काही वाटले नाही तरी मलाच ओशाळल्यासारखे झाले .आमची स्वयंपाक करणारी रंजना अजून आली नाही म्हणून मी काळजीत होते.सलगर म्हणाले मी करतो स्वयंपाक.मी कितीही नाही म्हटले तरी माझ्याकडून त्यांनी भाजी चिरायला घेतली.मला त्यांचा भाजी चिरताना व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मीही थोडावेळ चिरू दिली.थरथरत्या हातानी त्यांनी कांदा आणि कोबी  बारीक आणि एकसारखा चिरला.मलाही इतका छान चिरता येत नाही.इतक्यात रंजना आली आणि तिने सूत्रे हातात घेतली.
               आता सलगर यांचे त्याच्या पोतडीतून एकेक जिन्नस काढणे चालू झाले.त्यांनी गोव्याहून खास आणलेले आंबाडे,त्रिफळे,फणसपोळी आधी काढली.नंतर स्वतंत्र डब्यातून आणलेले वेगवेगळे फराळाचे जिन्नस काढायला सुरुवात केली.अनारसे,दोन तऱ्हेच्या करंज्या,पातळ पोह्यांचा चिवडा,भाजक्या पोह्यांचा चिवडा,रव्याचे लाडू, बेसन लाडू,चकली,शंकरपाळी,आणि खास बेळगावी चवडे असा फराळ होता.विशेष म्हणजे तो सर्व त्यांनी स्वत: केला होता.ते पाहून मी आवक झाले होते.पार्किन्सन्समुळे सतत कंप असताना इतक्या गोष्टी करायचा विचार तरी कसा येऊ शकतो? हे सर्व काढताना त्यांची त्या पदार्थांच्या कृतीबाबत अखंड कोमेंट्री चालू होती.त्यातून अनारस्याचे पीठही त्यांनी घरीच केले होते असे समजले. विशेष टीप म्हणता येतील अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यातून  निघत होत्या.मी त्या लक्षात ठेऊन इतरानाही सांगायच्या असे ठरविले होते.पण माझ्या आता एकही लक्षात नाही.त्यांनाच पुन्हा  बोलते केले पाहिजे आणि त्यावेळी रेकॉर्ड केले पाहिजे असे मला वाटले.या सर्वाबरोबर त्यांनी तांदुळाची खीरही आणली होती.
              रंजनाला काही फराळ काढून ते देत होते तिचा उपवास होता त्यामुळे ती खाऊ शकणार नव्हती.मग लगेच ते म्हणाले.' मी साबुदाण्याची खिचडी आणलीय  ती खा. फणसपोळीही चालेल तुम्हाला.'
              रंजना भाकरी करायला लागल्यावर ते म्हणाले,'शेवटची भाकरी ठेवा मी करतो.' त्यांच्या भाकरी करण्याच्या कौशल्याचे रंजनालाही कौतुक आणि आश्चर्य वाटत होते. मी व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला.रंजना म्हणाली काकू मलाही व्हिडिओ पाठवा.सर्व कामात ते हक्काने मदत करत होते.
              जेवायला बसल्यावर त्यांनी तांदुळाची खीर घेण्याची आठवण केली.आमचे गप्पा मारत हसत खेळत जेवण झाले.बेळगावच्या गप्पा, त्यांचे सांगलीचे घर, त्यांच्या दिवंगत पत्नी लीनाच्या आठवणी,तिचे साहित्य प्रेम, तिला वेळोवेळी भेट दिलेली पुस्तके, त्यांची ३००० पुस्तकांची स्वत:ची लायब्ररी अशा कितीतरी गोष्टी ते सांगत होते.त्यांच्या गप्पातून त्यांनी गावोगावी खूप माणसे जोडली आहेत: लोकांच्या मदतील, धावून जाणे.खायला बनवणे आणि लोकांना खाऊ घालणे, सर्व सणसमारंभ यथासांग पार पाडणे. ही त्यांची आवड आहे हे माझ्या लक्षात आले.पार्किन्सन्समुळे या कशातही खंड पडला नव्हता.उलट पार्किन्सन्स आटोक्यात ठेवण्यात या बाबी उपयुक्तच ठरत होत्या.आपल्या मुलाला आईची उणीव भासू नये यावर त्यांचा कटाक्ष होता.
              थोड्या वेळात त्यांचा मुलगा संदीप न्यायला आला संदीप नाईक हा त्यांचा मानसपुत्र आहे हे त्यांच्याकडून समजले.इन्शुरन्स कंपनीत काम करणाऱ्या सलगर यांना तो गाडीचा इन्शुरन्स करायला आला असताना भेटला.पुण्यात नव्यानेच आलेले सलगर राहण्यासाठी जागा  मिळेपर्यंत जागा शोधत होते. संदीपच्या घराजवळ त्यांना जागा मिळाली.सरकारी जागा मिळाल्यावर सलगर नी त्यांना आपल्या घरीच राहायला बोलावले.त्याला वेळोवेळी मदतीचा हात दिला. आणि आता संदीप त्याना विविध कामात मदतीचा हात देत होता.त्यालाही सलगरच्या रूपाने परक्या गावात वडिलधारे माणूस मिळाले होते.विवाहानंतर तो आता दुसरीकडे राहत असला तरी डॉक्टरकडे नेणे आणणे इतर काही कामासाठीही तो सलगर यांच्याबरोबर असतोच. इन्शुरन्स मध्ये असलेल्या सलगर यांनीअसा भाविष्यकाळासाठी सामाजिक विमा पुरेसा उतरवलेला दिसतो.
             त्यांनी' मनाचा विमा' नावाचा लेख स्मरणिकेसाठी दिला होता. मनाचे ताजेपण टिकवण्याचे अनेक उपाय सांगितले होते.त्यांच्या थोड्यावेळच्या वावरातून हा ताजेपणा प्रत्यक्षातही ते टिकवून आहेत हे लक्षात आले.सलगर आनंद देणे आणि आनंद वाटणे हे असेच चालू राहूदे.  
               
             
          
           
             

Friday 1 November 2019

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४५

पार्किन्सन्स विषयक गप्पा - ४५
अंतर्बाह्य उजळू या..
दिवाळी संपली. फराळ करणे, फराळाची देवाणघेवाण, आकाश कंदिल, रांगोळ्या, पणत्या लावणे, भेटीगाठी, हसणेखिदळणे आणि फॉरवर्डेड का असेनात, पण मेसेजेस पाठवणे. परदेशातील नातेवाईक, सैन्यदलातील जवान ह्यांच्यापर्यंत आनंद पोहोचवण्याचाही आपण प्रयत्न केला. अगदी आनंदीआनंद.
हे सर्व ओसरताना गुरु ठाकूर ह्यांच्या कवितेतील,
'बाहेर आहे झगमगाट, उजळलाय सारा गाव,
आतल्या अंधाराचं काय, तेथे एक दिवा लाव'
ह्या ओळी मनात रेंगाळत राहिल्या.
थोडे आत डोकावूयात का?
पार्किन्सन्स शुभंकर आणि शुभार्थींचा विचार करताना मला जाणवले, दिवा लावण्यासाठी आपल्याला पणती किंवा निरांजन काहीतरी हवे. ते म्हणजे पार्किन्सन्सचा स्विकार. तो तर मंडळातल्या सर्वांकडे आहेच. असे मला तरी वाटते. नसेल, तर तो आधी मिळवायला हवा. डॉक्टरांचा सहानुभाव, शुभंकरांचे प्रेम, आधार, काळजी घेणे, हे सर्व दिव्यातील तेल. पार्किन्सन्सविषयीच्या यथार्थ माहितीची वात. आजारावर मात करून स्वतःचे जीवन उजळविणा-या अनेकांकडून स्फुल्लिंग घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचविणारे, आत्मविश्वास, दिलासा देणारे पार्किन्सन्स मित्रमंडळ हे काडीचे माध्यम असेल. ह्यामुळे आतला अंधार नक्कीच दूर होईल. सर्वांच्या एकत्रित प्रकाशात नवीन सामिल होणाराही सुरुवातीपासूनच प्रकाशित होईल.
आता पुढची पायरी.
आपलेच दुःख गोंजारत न रहाता, नेणिवेच्या दारावर, जाणिवेच्या पारावर, जेथे जेथे असेल वाव, तेथे एक दिवा लाव.
शब्दांकन - सई कोडोलीकर
https://www.parkinsonsmitra.org
https://parkinson-diary.blogspot.com/2019/08/blog-post.html