Friday 27 May 2022

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७७

                                                    पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७७

                  भर दुपारच्या रणरणत्या उन्हात श्री. कापसे आमचे घर शोधत आले होते.तीर्थळी ज्या कंपनीत काम करत होते तेथे ते वेल्डर होते.'बरेच दिवस साहेबांना भेटायचे होते.साहेबांमुळे आम्ही घडलो.' ते सांगत होते.साहेब तिन, तिन पायऱ्या एकदम चढायचे,फास्ट चालायचे आम्ही दमायचो.साहेब येताना दिसले की सर्वजण आपापल्या जाग्यावर जायचे.दराराच तसा होता साहेबांचा.अशी बरीच माहिती ते पुरवत होते.ह्यांच्या बरोबर काम करणारे बरेच जण भेटतात आणि असे काही काही सांगत असतात.त्यांचे एक ड्रायव्हर सांगत होते साहेब इतर गाड्यांच्या इतक्या जवळून गाडी नेत मला भीती वाटे. पण साहेबांचा अंदाज अगदी इंचभरही चुकत नसे. तीर्थळीना निवृत्त होऊन २३/२४ वर्षे झाली. पण त्यांच्याबरोबर काम केलेले आणि त्यांच्याबद्दल प्रेम,आदर असणारे असे अनेकजण  भेटायला येतात.त्यांची शारीरिक अवस्था पूर्वीसारखी नाही. वजन खूप कमी झालेले आहे, बोलण्याला प्रॉब्लेम येतो,कमरेत वाकलेले आहेत,खुर्चीवरून उठताना धरावे लागते.हे सर्व पाहून येणाऱ्याना सुरुवातीला वाईट वाटते. तरी साहेब आनंदी आहेत, आपल्याला ओळखु शकतात,आपल्या येण्याने खुश होतात हे पाहून त्याना चांगलेही वाटते.अशा सातत्याने येणाऱ्या प्रसंगांची आता सवय झाली आहे.८१ वर्षे वय आणि तेवीस वर्षाचा पीडी त्यामानाने चांगलीच आहे यांची तब्येत असे मी सांगत असते पण त्यादिवशी मला प्रकर्षाने जाणवले इतकी एनर्जी आणि उत्साह,धाडस असणाऱ्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टीसाठी अवलंबून राहणे किती कठीण आहे.

                आम्ही घरभेटीत असे पीडीला स्वीकारता न आलेले अनेक शुभार्थी पाहिले. माझे अक्षर किती छान होते आता तसे नाही,मी किती ट्रेक केले आता जिना चढता येत नाही,मी किती वजन उचलायचो आता पेला उचलता येत नाही,मी ५० माणसांचा स्वयंपाक करायची आता स्वत:चा चहा करता येत नाही.असे दु:ख उगाळत त्यांचे जीवन तेथेच थांबलेले असते.पार्किन्सन्स मात्र आपली लक्षणे झपाट्याने वाढवतो. 

                 तीर्थळींचे मात्र असे झाले नाही.पार्किन्सन्सचा अनकन्डीशनल स्वीकार केल्यामुळे या अवलंबित्वाचा त्यांनी बाऊ केलेला नाही.दु:खीही झाले नाहीत.मनाने ते पूर्वीसारखेच रुबाबात असतात.पार्किन्सन्स झाल्यावर सुरुवातीला काही चुकीच्या गोष्टी केल्या.पार्किन्सन्स बरा होऊ शकतो असे सांगणारे भरवशाचे वाटले.मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन यांच्या भेटीनंतर म्हणजेच पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर मात्र पार्किन्सन्सला मित्र बनवले ते पुन्हा मागे वळून पहिले नाही.ही मैत्री २३ वर्षाची आहे.

                पार्किन्सन्सला स्वीकारले की त्याला समजून घेणे सोपे जाते.त्याला हाताळणे सोपे जाते आणि त्याच्यासह आनंदाने राहता येते.हा स्वीकार महत्वाचा हे मी वेळोवेळी हे सांगितले आहे असे जगणाऱ्या अनेकांची उदाहरणे पण दिली आहेत.ज्यांच्या कडे पार्किन्सन्स नव्याने पाहुणा आला आहे त्याना याचा नकीच उपयोग होईल.हा स्वीकार पार्किन्सन्स झाल्यावर एकदाच करावा लागतो असे नाही. पार्किन्सन्स आपल्या भात्यातून हळूहळू एकेक बाण काढतो.त्यामुळे वेगवेगळ्या अवस्था येतात त्या प्रत्येक वेळी स्वीकार नव्याने करावा लागतो.

               ह्यांचेच उदाहरण द्यायचे तर पीडी झाल्यावर कंप आणि गती मंद होणे एवढेच होते.ते फोर व्हीलर चालवायचे.एकटे प्रवास करायचे.नंतर बोलण्यावर परिणाम झाला.लिखाण चालू होते.हळूहळू अक्षर बिघडले, फोर व्हीलर चालवणे बंद झाले.पण रिक्षाने एकटे जात.चालतानाही कोणी बरोबर लागत नसे.अगदी पार्किन्सन्स झाल्यावर १९ वर्षे झाल्यावरही एकटे समोर बागेत व्यायामाला जात. नंतर पाठीत बाक आला.कोविदने तब्येत खालावली ब्युरोचा माणूस ठेवण्याची गरज पडली त्यातूनही ते आता बर्यापैकी बाहेर आले.ह्यांचे गोळ्यांचे प्रमाणही फार वाढले नाही.या प्रत्येक टप्प्यात स्वीकार एका क्षणात होत नाही. त्यासाठी शुभंकर ,शुभार्थी दोघानाही प्रयत्न करावे लागतात.सातत्याने व्यायाम, प्राणायाम ,मेडिटेशन,छंद,कुटुंबीय,स्नेहीजन यांचे सहकार्य, स्वमदतगट हे नक्की सहकार्य करतात.

            आणखी एक महत्वाचे सुरुवातीपासून बरेच जण याना रोल मॉडेल म्हणतात.मी जर आनंदी राहू शकलो नाही तर त्याचा इतरांवर परिणाम होईल असेही ह्यांच्या मनात असते.त्यांची ही इमेज त्याना कायम ठेवायची असते.तुम्हीही असे रोल मॉडेल बनू शकता.चला तर एकमेकांच्या सहकार्याने 'अवघे धरु सुपंथ'.