Wednesday 16 February 2022

आठवणीतील शुभार्थी - आरती तिळवे

                                                   आठवणीतील शुभार्थी - आरती तिळवे

                       आज नीलाचा ( आरती ) वाढदिवस. तिची प्रकर्षाने आठवण येत आहे.खरे तर तिने दिलेले क्रोशाचे फुल मी माझ्या कपड्यांच्या कपाटावर लावलेले आहे.ते पाहून रोजच तिच्या अनेक आठवणी दाटून येत असतात.   

                      ती पूर्वाश्रमीची नीला कॉलेजमध्ये माझ्या वर्गात होती आणि शुभंकर रमेश तिळवे तीर्थळींचे बालमित्र.बेळगावला एका गल्लीत राहत होते.हल्ली खूपच क्वचित गाठीभेटी होत.परंतु पार्किन्सनने आमच्या नात्याची विण घट्ट केली.१८ साली ते पार्किन्सन मित्रमंडळात आणि Whatsapp ग्रुप मध्ये सामील झाले.आणि परीवाराचे महत्वाचे घटक झाले.ग्रुपचे admin झाले. ग्रुपमध्ये त्यांनी आपल्या विविध कलाकृतींनी जान आणली.त्यांच्या बरोबरीने निलाच्याही नवनवीन कलाकृती येऊ लागल्या.ग्रुपसाठी ती एक शुभंकर, शुभार्थीची आदर्श जोडी झाली. तिच्याकडून करून घेतलेल्या व्यायामाचे व्हिडीओ ते टाकू लागले.फोन Whats app वरून संपर्क होत होता परंतु प्रत्यक्ष भेटीची ओढ वाटू लागली.

            औरंगाबादला असल्याने मासिक सभेस हजर राहता येत नव्हते.मासिक सभांचे फोटो पाहून निलालाही एकदा सभेला यावे असे वाटत होते.आणि तसा योग लवकरच जुळून आला.तीर्थळी आणि रमेशभाऊंचे कॉमन मित्र मदन जहागीरदार हे अमेरिकेहून बऱ्याच वर्षांनी पुण्याला येणार होते. पुण्यात सर्व मित्रांचे गेट टुगेदर ठरले. त्याचवेळी आमची १३ जानेवारीला मासिक सभा आणि तिळगुळ समारंभ असणार होता.नीलाला प्रवास झेपत नव्हता म्हणून बाहेर पडणे होत नव्हते पण आता या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने तीही उत्साहाने तयार झाली.हे दोघे आणि त्यांचा मुलगा गिरीश १२ तारखेलाच पुण्यात आले.

              १३ तारखेला सकाळी ते आमच्याकडे आले.आणि आमच्या घरूनच आम्ही सभेला गेलो हा अगदी छोटा वाटणारा काळ आम्हा सर्वांसाठी खूप क्वालिटी टाईम देवून गेला.वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत असे वाटले.नीलाने स्वत: केलेले तिळाचे लाडू आणले होते.ती आनंदात होती.तिचा पार्किन्सन शाहण्यासारखा वागत होता. तीही एका जागी बसून न राहता मधून मधून उठत होती फेऱ्या मारत होती.पीडीला सहकार्य करत होती.नीला,रमेशभाऊ आणि गिरीश आणि बरोबरीने पार्किन्सन मित्र यांच्यातील समन्वय,नाते याचे मला मनापासून कौतुक वाटत होते. त्यादिवशी भोगी होती.बेळगावकर असल्याने भरले वांगे,बाजरीची भाकरी,खोबऱ्याची कढी,पत्रवडे असा भोगी स्पेशल टिपिकल बेळगावी स्वयंपाक होता.बेळगावच्या आठवणी काढत रमतगमत जेवण झाले.

                नीलाने स्वत: तयार केलेली लेस लावलेले रुमाल संक्रांतीचे वाण म्हणून आणले होते. सभेला साधारण किती बायका असतात हे औरंगाबादहून निघण्यापूर्वीच त्यांनी विचारून घेतले होते.मी म्हटले, 'हे देण्यापूर्वी सगळे एकत्रित ठेवून फोटो काढू'. फोटो काढला खूपच छान दिसत होता. थरथरत्या हाताने केलेले हे सुंदर काम सर्वाना प्रेरणादायी ठरणार होते.संक्रांतीसाठी काळे कपडे घालायचे ठरले होते.नीलाने स्वत: भरलेली काळी साडी आणली होती.शुभार्थीना साडी नेसणे आणि ती सांभाळणे किती कठीण असते हे घरात शुभार्थी असणाऱ्यांनाच समजू शकते.येथेही रमेशभाऊंची मदत होती.

               चारच्या मिटींगसाठी तीन सव्वातीन पर्यंत निघणे गरजेचे होते.आम्ही चहा घेऊन निघालो.या सर्वात नीलाला आराम करण्यास थोडाही वेळ मिळाला नव्हता तरी ती फ्रेश होती.सभेला गेल्यावर सगळ्यांच्या ओळखी झाल्या.सभा संपल्यावर नीलाने सर्व स्त्रियांना रुमाल वाटले.सर्वाना ते खूपच आवडले.

               आमच्या घरची भेट खुपच धावती झाली होती.पुन्हा आम्ही गेटटुगेदरसाठी 'ला मेरेडीयन' मध्ये भेटलो.ही फारच थोड्या वेळाची भेट त्यात अनेकजण होते.तरीही भेटीत तृष्टता मोठ्ठी असे वाटत होते.

                औरंगाबादला परत गेल्यावर, दोनतीन दिवसातच तिला पुणे भेटीत मी दिलेली पुस्तके तिने रंगउन त्याचे फोटो पाठवले होते. तिचा उरक आणि तत्परता यामुळे मी थक्क झाले. ती हाडाची कलाकार. पेंटीग,विणकाम,भरतकाम,क्रोशावर्क असे ती पीडी होण्यापूर्वीही करत होती.पीडीमुळे थोडा वेग कमी झाला असेल पण मनाचा उत्साह कमी झाला नव्हता.ती कॉलेजमध्ये असताना खेळाडू होती हे स्पोर्ट्समन स्पिरीट आणि रमेशभाऊ, गीरीशसारखे शुभंकर यामुळे ती पार्किन्सनसह आनंदी राहू शकत असावी.

               ११ एप्रिलच्या कार्यक्रमातील कलाकृती प्रदर्शनासाठी कलाकृती तयार करण्यासाठी आता  मी तिच्या मागे लागले.तिने नातीसाठी दोन क्रोचे फ्रॉक,१ स्कर्ट,परकर - ब्लाउज,एक भरलेली साडी तयार केली होती पण उन्हाळ्यामुळे येऊ शकत नाही असे तिने कळवले.हे सर्व प्रदर्शनात मांडायचे राहून गेले.

                पुणे भेटीनंतर जवळीक,मैत्री अधिकच वाढली.तिच्यातील स्टोरी टेलर माझ्या लक्षात आली होती.जेवताजेवता तिने दिल्ली भेटीचे गमतीदार किस्से सांगितले होते.पीडीबद्दलचे अनुभव स्मरणिकेसाठी द्यायची  मी तिला विनंती केली.तिने भासावरचा तिचा अनुभव पाठवून दिला. सर्वाना तो खूप आवडला.कोणी भासाच्या समस्येबाबत बोलू लागले की मी तिचा हा लेख पाठवून देते त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.अनेकांच्या ओळखी झाल्याने  आता Whatsapp group वरही ती चांगलीच रमली होती.

             याच काळात मला कॅन्सरने गाठले.माझा सर्वकडचा वावर कमी झाला.शुभार्थीना त्रास नको म्हणून सांगितले नव्हते.मी बरी झाल्यावर सर्वाना सांगितले.पण कर्णोपकर्णी ते नीला पर्यंत गेले.तिचा फोन आला.मी खूप रडले असे ती सांगत होती.तिला मी समजावले अग मी आता बरी झाली आहे.

                लॉकडाऊन नंतर ऑनलाईन डान्स क्लास सुरु झाला त्यात ती सहभागी झाली.हृषिकेशने दिलेला होमवर्क सर्वात प्रथम तिचा येई.आता आठवड्यातून तीन वेळा ऑनलाईन का असेना भेटू लागली.ही छोटीशी भेटही छान वाटे.डान्स क्लासमुळे तिच्यात सुधारणा होऊ लागली होती.ती ताठ चालू लागली.

             आता पार्किन्सनदिन मेळावा ऑनलाईन होणार होता. तिच्या कलाकृतीचे फोटो पाठवूनही चालणार होते.अशातच मार्च मध्येच रमेशभाऊ आणि तिला करोनाने गाठले.त्यातच तिला चेस्ट इन्फेक्शन झाले. दोघांच्याही टेस्ट निगेटिव्ह आल्या पण इन्फेक्शन बरे होईपर्यंत नीलाला हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार होते.ती शांतपणे या सर्वाला तोंड देत होती पण शरीराने साथ दिली नाही.पार्किन्सनने गळीत गात्र करण्यापूर्वी जीवनालाच राम राम करू न तिने पर्किन्सन्सला चकवले होते.देहदान करून एक नवा आदर्श घालून दिला.

             आज ती नाही पण तिचे रुमाल तिच्या कलाकृती,आनंददायी आठवणी आमच्यासमोर सतत राहतील.तरीही तिनेच पाठवलेल्या एका कवितेतील ओळी मात्र माझ्या मनात आत कुठेतरी आहेत.

                      कालपासून गळ्यात बांध

                       डोळ्यामध्ये झरा आहे

                        पारा निघून गेलाय आणि,

                       आरशावरती चर्हा आहे.

May be an image of 1 person, sitting, standing and indoor


         No photo description available.        

No comments:

Post a Comment