Tuesday 26 July 2022

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७८

                                                   पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७८

                     शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे. पार्किन्सन्स शुभार्थीसाठी तर तो औषधाइतकाच महत्वाचा आहे.पार्किन्सन्समध्ये स्नायूंचा ताठरपणा हे एक महत्वाचे लक्षण आहे.या लक्षणावर नियंत्रण आणायचे तर व्यायाम अत्यावश्यक आहे 'वापरा नाही तर गमवा' हे लक्षात ठेवायला हवे.व्यायाम नाही केला तर बेडरीडन व्हायला वेळा लागत नाही.'भेटू आनंदे' कार्यक्रमात शुभार्थी शैला भागवत यांनी व्यायामाने स्वत:ला शारीरिक दुरावस्थेतून कसे बाहेर काढले ते सांगितले.त्यांच्या व्याख्यानाने सर्व प्रभावित झाले छान प्रतिक्रिया आल्या. त्यांच्या जिमने आमच्या शुभार्थीसाठी मोफत प्रात्यक्षिक दाखवण्याची तयारी दाखवली. शैलाताईनीही उत्साहाने उपक्रमाची आखणी केली.जवळ राहणार्यांना फोन केले.तीन शुभार्थिनी नावे दिली.

              शुभार्थी गौरी इनामदार यांनी पार्किन्सन्सबरोबरच प्रवास सांगताना व्यायामाला दिलेले महत्व सांगितले त्या स्वत: योग शिक्षक आहेत.त्यांनी योग शिकवण्याची तयारी दाखवली होती.पण प्रतिसाद मिळाला नाही.बेंगलोरच्या व्यास योग विद्यापीठाचे परमेश्वर यांचा तर पीएचडीसाठी पार्किन्सन्ससाठी योग हा विषय घेतला आहे. त्यांनी ही सात आठ जण असल्यास मोफत योग शिकवण्याची तयारी दाखवली होती.पण पाचच नावे आली.यापूर्वी या क्षेत्रातले नावाजलेले अरुण दातार सर,हास्ययोगी विठ्ठल काटे सर यांनीही मोफत शिकविण्याची तयारी दाखवली होती.प्रतिसाद शून्य.एकूणच व्यायामाबद्दल उदासीनताच दिसते.आणि आम्हा अयोजकानाही हतबल झाल्यासारखे वाटते.

              आम्ही सुरुवातीपासून न्यूरॉलॉजिस्ट,मानसोपचारतज्ज्ञ,इतर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या व्याख्यानाइतकेच व्यायामावरील प्रात्यक्षिके,व्याख्याने याना महत्व दिले.यात फिजिओथेरपी, योगासने, ताईची,स्ट्रेचिंगचे व्यायाम,योगासने प्राणायाम,मेडीटेशन,हास्ययोग,स्पीचथेरपी,डान्स थेरपी या सर्वांचा समावेश होता.डीवायपाटील फिजिओथेरपी कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी यांनी अश्विनी हॉल येथे लक्षणानुसार विभाग करून प्रात्यक्षिके घेतली होती.प्रवरानगर फिजिओथेरपी कॉलेजच्या नेहा शर्मा आपल्या विद्यार्थीनिना बसने घेऊन आल्या होत्या आणि प्रत्येक शुभार्थीला स्वतंत्रपणे व्यायाम शिकवले होते.अर्थात हे वैयक्तिक पातळीवर फारच थोड्यांनी अमलात आणले.या सर्वाचा फायदा त्यावेळी उपस्थीत असणार्यांना मिळाला. पण यातील बर्याच जणांनी स्मरणिकेत लेख दिले आणि ते वेबसाईटवर उपलब्ध आहेत.अतुल ठाकुर यांनी शुभार्थीसाठी योगावर एक मालिकाही लिहिली होती. २०१५ पासूनच्या स्मरणिकेच्या पीडीएफ फाईल आणि त्यापूर्वीच्या स्मरणिकेतील स्कॅन केलेले लेख पीडीएफ स्वरुपात स्वतंत्रपणे वेबसाईटवर उपलब्ध आहेत.या सर्वांची यादी देणे विस्तार भयास्तव टाळते पण दिवंगत शुभार्थी मोरेश्वर काशीकर यांच्या लेखांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही.ते कबीर बागेत योग शिक्षक होते.त्यांनी स्वत:वर प्रयोग करून अभ्यासपूर्ण लेख लिहिले.शेवटपर्यंत ते शुभार्थिनी व्यायाम करावा यासाठी धडपडत होते.आणि कोणी ऐकत नाही म्हणून निराश होत होते.

                    व्यायामाचा विषय चालला होता आणि मृदुला म्हणाली.कर्णींचे डोके वेगाने धावायचे मात्र व्यायाम त्यांनी केलाच नाही तो केला असता तर त्यांचा पार्किन्सन्स लवकर वाढला नसता.अनेक शुभंकराना व्यायामासाठी शुभार्थींच्या मागे लागून त्यात यश येत नाही.कितीही शोध लागले,नवीन औषधे निघाली,शस्त्रक्रिया निघाल्या तरी व्यायामाला पर्याय नाही हे लक्षात घ्यायला हवे.या लेखाद्वारे सर्व शुभार्थीना कळकळीची विनंती व्यायाम करा आणि पीडीला नियंत्रणात ठेवा.हा लेख वाचल्यावर एकाही शुभार्थिनी वेबसाईटवर लेख शोधले, व्यायामाला सुरुवात केली तर हा लेख किहीण्याचे सार्थक झाले असे वाटेल.

 

                                                                                                                                       No photo description available.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             

Friday 8 July 2022

आठवणीतील शुभार्थी - शुभलक्ष्मी पटवर्धन

 

     आठवणीतील शुभार्थी - शुभलक्ष्मी पटवर्धन 

(लाल काठाची साडी नेसलेल्या पटवर्धन वहिनी)

२७ऑक्टोबर, पटवर्धन वहिनींचा( शुभलक्ष्मी पटवर्धन ) यांचा जन्मदिन. त्या आज आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण वेळोवेळी येते. वहिनी सभाना नेहमी नाही आल्या तरी जेंव्हा येत तेंव्हा आम्हाला मनापासून आनंद व्हायचा..कमी पण नेमक बोलण हे त्याचं वैशिष्ट.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्वाची वाटायची.एकदा परस्पर ओळखीच्या कार्यक्रमात आपल्या शेजारच्या व्यक्तीची ओळख करून द्यायची होती.मी त्यांच्या शेजारी होते.माझी ओळख त्यांनी करून दिली.माझ्या कामाबद्दल कौतुकानी सांगितलं. मला माझ्या कामाची ती मोठ्ठी पावती वाटली.माझ्या रेडीओवरच्या लिखाणाबद्दल कधीही फोन न करणार्‍या त्यांनी फोन करून लेखन आवडल्याच सांगितलं.आत्तापर्यंत खूप लिहील पण माझ्या लिखाणावरची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सर्वात मोलाची होती.कमलाकर सारंगबद्दल विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं वाचून पिडीबद्दल त्याना भीती बसली. लिखाण करताना त्याचं हे वाक्य माझ्या नेहमी लक्षात असायचं.असेलही.
पटवर्धन यांच्या बोलण्यात नेहमी माझी पत्नी अस म्हणाली आणि आता अस म्हणाली असती अस येत. मायबोली च्या अंकात मी’ चैतन्याचा झरा’ असा पटवर्धन यांच्यावर लेख लिहिला.त्यावर माझी पत्नी अस म्हणाली असती अस म्हणून त्यांच्या प्रतिसादात एक कविता दिली.

‘चैतन्याचा झरा?’ नव्हे, हा तर ऊर्जेचा भिक्षेकरी
दिवसाही हा झोपा काढी, घरची कामे मुळि ना करी||
कधी काढले काम घरातिल, तरी हा घाली खूप पसारा
मला सांगतो ‘असार पसारा शून्य संसार सारा’||
‘गाणे कुठल्या नाटकातले शोधू आधी’ म्हणतो हा
शोध तयाचा घेण्यासाठी अधिक पसारा घालि पहा ||
शोध घेतला पण तरी शिल्लक तसाच मूळ पसारा
उत्तर देई ‘तव प्रभुने तरी आवरला का विश्व पसारा?’|

मी अनेक शुभार्थी,शुभंकर पाहिले पण शुभंकर आणि शुभार्थी परस्पर संबंधाबद्दल पटवर्धन पती पत्नी मला आदर्श वाटतात..एकमेकाना स्पेस देत दोघांनी मिळून हे नात सांभाळल. पटवर्धनांनी आपल्या शुभंकरत्वाची व्याप्ती सार्वत्रिक करून आणि वहिनीनी त्याला साथ देऊन या नात्याला खूप उंचीवर नेऊन ठेवल..मी त्याना म्हणायची, तुमच्यामुळे मित्रमंडळ अस्तित्वात आल.तुम्हाला पीडी झाला नसता तर हे अस्तित्वातच आल नसत.तेंव्हा त्यां म्हणायच्या अस काही नाही दुसर्‍या कुणीही केलच असत.पटवर्धनांच्या घरी मिटिंग असली की वहिनींचा घरातला अबोल वावर, देहबोलीही सुखावह वाटायची.पीडी मुळे चेहरा भावविहीन होतो. पण वहिनींचे डोळे नेहमी बोलताना जाणवायचे.

सर्वच कुटुंबीयांनी त्यांच्या शेवटच्या काळात खूप सेवा केली खूप धीरांनी घेतल.

त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणे आम्हालाही वहिनींची आठवण वेळोवेळी येतच राहील.

 

आठवणीतील शुभार्थी - चंद्रकांत दिवाणे

 

 आठवणीतील शुभार्थी - चंद्रकांत दिवाणे

(सभेत आठवणी शेअर करताना चंद्रकांत दिवाणे)

११ऑगस्टला नेहमीप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा होती.या महिन्यात वाढदिवस असणाऱ्यांना सभेस येण्याची आठवण करायला फोन करायचे होते.यात चंद्रकांत दिवाणे यांचे नाव होते.पण त्यांना फोन करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली.अत्यंत बुद्धिमान,मितभाषी, शांत स्वभावाच्या दिवाणे यांचा मंडळाच्या कामात विविधांगी सहभाग असायचा.

२००८ मध्ये दीनानाथ हॉस्पिटल मध्ये झालेल्या मेळाव्यानंतर मंडळाची नौका वेगाने पुढे नेणारी नव्या उमेदीची कुमक सामील झाली.त्यात चंद्रकांत दिवाणे हे शुभार्थीही होते.सुरुवातीला पुण्यातील वेगवेगळ्या भागात सभा घेण्यासाठी सात विभाग करण्यात आले. त्यातल्या डेक्कन विभागाची धुरा दिवाणेनी उचलली.स्वत:च्या घरी डेक्कनच्या सभासदांची सभा आयोजित केली.सभासदांना सुंदर हस्ताक्षरात सभेची पत्रे पाठवली.वास्तुरचनाकार असल्याने कार्डाच्या मागे त्यांच्या घराकडे कस यायचं हे दाखवणारा नकाशाही होता.सहवास वाढत गेला तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समजत गेले.

त्यांच्या यशाची भव्य वास्तू परिश्रम,माणुसकी आणि नैतिकतेच्या भक्कम पायावर उभी होती.सकाळी ड्राफ्ट्समनचे काम करायचे आणि संध्याकाळी अभिनवकलाच्या आर्किटेक्चर डिप्लोमाच्या व्याख्यानांना हजर राहायचे,असे करत त्यांनी शिक्षण पुरे केले.इतरांना असे कष्ट घ्यावे लागू नयेत म्हणून आजही गरजूंना शिक्षणासाठी ते मदत करीत, शैक्षणिक संस्थानाही ते मदत करीत होते.१९६५ मध्ये स्वतंत्र प्रॅक्टीस सुरु केली मग मागे वळून पहिलेच नाही. बंगले,चर्चेस,सोसायट्या विविध प्रकार हाताळले.मुलेही हाताशी आली व्याप वाढत गेला.२०१० पासूनच्या सर्व स्मरणिकेत त्यांनी दिलेल्या जाहिरातीतून तो आमच्यापर्यंत पोचला.त्यांनी न सांगताच स्मरणिकेत एक पान आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेले असायचे. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात दिवाणे पती पत्नीचा सक्रीय सहभाग असायचा.सहली हा त्यांचा आवडीचा विषय.मंडळाची पहिली पानशेतची दिवसभराची सहल फक्त कार्यकारिणीच्या लोकांची पायलट सहल होती. त्यानंतरची आठ दिवसाची आनंदवन सहल,प्रत्येक वर्षाच्या छोट्या सहली यात ते सपत्नीक हजर होते.सहलीतील खेळ,ओरिगामी स्पर्धा,क्विझ या सर्वात ते पुढे असत बक्षीसही मिळवत.कठीणातल्या कठीण प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे असे.मागच्या वर्षीच्या फुलगाव सहलीत तर त्यांनी स्वत:च एक क्विझ तयार करून त्याच्या सर्वाना द्यायला झेरॉक्स कॉपी करून आणल्या होत्या.आनंदवनच्या सहलीत चार जणांना एक खोली शेअर करावी लागली.अंजली आणि केशव महाजन हे दिवाणे यांच्या बरोबर होते.शिक्षिका असलेल्या अंजलीनी आपल्या पतीसाठी व्हीआरएस घेतली होती.आनंदवन,हेमलकसा येथील शाळा आणि मुले पाहिल्यावर तिला शिकवण्याची उर्मी आली.दिवाणे यांनी केशव महाजन यांच्याकडे पाहण्याची जबाबदारी घेतली.आणि अंजलीला आपली इच्छा पूर्ण करता आली.सहलीत खूप फोटोही काढले.सहलीतील त्यांचा वावर पाहता यांना खरच पीडी आहे का? अशी कोणालाही शंका आली असती.

दर महिन्याच्या सभासाठी सभासदांना फोन केले जातात.हे काम बहूतेक शुभंकर करतात.कारण बऱ्याच शुभार्थीना स्पष्ट बोलता न येण्याची समस्या असते.पण मागच्या महिन्याच्या सभेपर्यंत दिवाणे यानी हे काम केले.या महिन्याच्या सभेसाठीही त्यांनी नावांची यादी काढून ठेवली होती.

शेवटपर्यंत मंडळासाठी काम करण्याची त्यांची धडपड होती.व्यावसायाबद्दलही तेच.आता मुलांच्यावर व्यवसाय सोपऊन त्यांनी निवृत्ती घेतली होती खरी,पण त्यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार ते ऑफिसमध्ये जात नव्हते, प्रत्यक्ष काही करत नव्हते तरी सर्व काही करत होते.त्यांनी केलेल्या कामाच्या फायली अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळल्या आहेत.आजही ज्यांचे काम केले त्यांना कागदपत्रे सापडली नाही तरी दिवाणे यांच्या फायलीत ती सापडतात.स्वत:पुरते न पाह्ता कोणतही काम परफेक्ट करायचं हा त्यांचा गुण.त्यांच्या इतक परफेक्शन आमच्याकडे नाही अस त्यांच्या मुलांनी सांगितलं.

दिवाणे,यावर्षीच्या स्मरणिकेतही तुमची जाहिरातीची परंपरा तुमच्या कुटुंबीयांनी जपली.विजयाताईनी तर यावेळी जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात गणेश स्तवनात भाग घेतला.सभा सहलीत आठवणीच्या रूपाने नेहमीच तुम्ही आमच्याबरोबर असाल.

 



आठवणीतील शुभार्थी - सुधाकर अनवलीकर

 

मंगळवारी सकाळी सकाळी आकाशवाणीवर शुभार्थी सुधाकर अनवलीकर यांच्या निधनाची वार्ता ऐकली.लगेच महाराष्ट्र टाईम्समध्येही वृत्त वाचले.तसे हे अनपेक्षित नव्हते. ८०वर्षाच वय,गेली तीन वर्षे डायलेसीसही चालू होते. तरीही यापुढे त्यांचा हसतमुख चेहरा सभामधून दिसणार नाही याच दु:ख होतेच.

झुंझार पत्रकार म्हणून ते ओळखले गेले असले तरी आमची ओळख झाली ती पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट) म्हणूनच.पार्किन्सन्स मित्रमंडळात येणाऱ्या शुभार्थीत बरेचसे मलाच का? भूमिकेत असतात.काही पीडीशी सामना करायच्या तयारीत, काही पीडीचा सहज स्वीकार करून त्याला मित्र बनविणारे.अनवलीकरांचा खाक्या मात्र वेगळाच होता. पीडी त्यांच्या खिजगणतीतही नव्हता.सो व्हाट? असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. त्यांना तोल जाण्याची समस्या होती ते सभेला सुरुवातीला एकटेच यायचे.एकदोनदा पडलेही पण काहीच झाले नाही अशा अविर्भावात उठून बसले.त्यांना बोलण्याची समस्या निर्माण झाली होती.पण पार्किन्सन्स त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र पुसू शकला नाही.पिडीमुळे चेहर भावविहीन होतो हे त्यांच्यासारखेच आमचे अनेक शुभार्थी खोटे ठरवतात.पत्रकार म्हणून त्यांची ओळख आम्ही घरभेटीचा उपक्रम सुरु केला तेंव्हा झाली. सहजी संवादिजे या आगामी पुस्तकाची प्रुफे आली होती.अतिरथी महारथींची व्यक्ती चित्रे त्यात होती. नानासाहेब परुळेकर,बालगंधर्व,कृष्णराव फुलंब्रीकर,ग.दि.माडगुळकर,पु.ग सहस्त्रबुद्धे,श्री कृ.कोल्हटकर,मनोहर माळगावकर अशी कितीतरी नामवंत मंडळी, प्रुफ चाळताना मला दिसली. पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनवलीकर यांचे सहाध्यायी शंकर सारडा यांच्या प्रस्तावनेतून अनवलीकारांच्या जडणघडणीतल्या ,व्यक्तीमत्वातल्या अनेक बाबी निदर्शनास आल्या’.सिद्धहस्त वार्ताहर आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व’ असे त्यांचे वर्णन त्यानी केले. घरची परिस्थिती बेतासबात असल्याने शिक्षणासाठी, जगण्यासाठीचा झगडा खडतर होता.अर्थार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या कामातून साहित्यिक विचारवंत यांचा सहवास लाभला.त्यांतून जे अनौपचारिक शिक्षण मिळाले ते व्यक्तिमत्व संपन्न करणारे,बहुश्रुत करणारे होते.दहावीनंतर लगेच सकाळ मध्ये अर्धवेळ शिकाऊ पत्रकार म्हणून वर्णी लागली.सुंदर अक्षर आणि बिनचूक लेखन यामुळे डॉक्टर परुळेकर यांचा लेखनिक होता आल. आणि पत्रकारितेत पाय रोवण्यासाठी पत्रकारितेला आवश्यक असे विविध विषयाचे ज्ञानही झाले.बरोबरीने मराठी विषयात एम.ए.झाले.६२ सालपर्यंत ते सकाळ मध्ये होते.महाराष्ट्र टाइम्स दैनिकाच्या पहिल्या अंकापासून ते ३३ वर्षे मटाच्या सेवेत होते.अनेक प्रकरणे उघडकीस आणून त्यांनी शोध पत्रकारितेचे विश्व गाजवले.त्यांच्या लेखणीने विविध विषयांत स्वैरसंचार केला.पु.ल.देशपांडे,ग,दि माडगुळकर,श्री.के क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बरांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले.त्यांच्या लेखांची ‘भुलाये न बने,” बोला अमृत बोला’,’सुजन कसा मन चोरी’ ही पुस्तके झाली.अभिनेत्री हंसा वाडकर यांचे आत्मकथन ‘सांगत्ये ऐका’ हे त्यांनीच माणूस मध्ये शब्दांकित केले.

मंडळात ते सामील झाले तेंव्हा हा भूतकाळाचा झगमगाट उरलेला नव्हता.वळणदार अक्षर आणि थोरामोठ्यांच्या मुलाखती घेण्याची क्षमता असणारी वाणी ही अस्त्रेच पार्किन्सन्सने बाधित झाली होती.प्रसन्न चित्ताला मात्र पार्किन्सन्सला हात लावता आला नाही.ज्यांच्या व्यवसायात बोलण हे महत्वाच असत असे प्राध्यापक,वकील,समुपदेशक असणारे अनेक शुभार्थी वाणीवरच्या हल्ल्याने कोसळून जातात.पार्किन्सन्स झाल्याच लपवतात.शुभार्थीच नाहीतर तरुणवयात मोठ्ठी पद भूषविणारे अनेक जेष्ठ नागरिकही वास्तव नाकारून भूतकाळच उगाळत बसतात. अनवलीकरांच मात्र अस नव्हत.मासिक सभाना ते यायचे,जेष्ठ नागरिकांच्या मेळाव्यातून दिसायचे. स्मरणिकेत त्यांनी स्वत:च्या कविता दिल्या. डायलेसीस सुरु झाल्यावरही ते सभांना आले.जानेवारीत दिनानाथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉक्टर मंदार जोग यांच्या व्याख्यानाला तर ते डायलेसीस करून लगेच आले होते.एप्रिलमध्ये जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या मेळाव्यालाही ते हजर राहिले.आता त्यांची अवस्था खर तर विकलांग म्हणता येईल अशी होती पण अशा परीस्थितीतही त्यांना सभांना यावेसे वाटे आणि त्यांची पत्नी त्यांना घेऊन येई.दोघानाही दाद द्यायला हवी.

‘सहजी संवादिजे ‘ या अनवलीकारांच्या पुस्तकात त्यांनी श्री.के.क्षीरसागर यांची जीवनविषयक भूमिका दिली होती.” माझ्यासारखे रोमँटिक पिंडाचे लोक पुष्कळदा नकळत सुखाकरता नव्हे,दु:खाकरता नव्हे तर केवळ अनुभवाकरता जगत असतात.’ अनुभव ‘ म्हणूनच त्याचं अनुभवावर प्रेम असत….बाह्य जीवनात यश येवो वा अपयश येवो,सुख येवो वा दु:ख येवो,आरोग्य वा रूग्णावस्था येवो,माझा हा मानसिक प्रवास चाललेलाच आहे.”अनवलीकराना हे पटलेलं असाव.पार्किन्सन्सकडेही त्यांनी एक अनुभव म्हणूनच पाहिलं असेल का?

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– डॉ. सौ. शोभना तीर्थळी

आठवणीतील शुभार्थी - केशव महाजन

                                    आठवणीतील शुभार्थी - केशव महाजन

 तरी व्हाट्सअप वर मोहम्मद रफी हिट ची लिंक पाठवली आणि सवयीने फॉरवर्ड करण्यासाठी अंजली महाजनला नकळतपणे सर्च करू लागले आणि एकदम थबकले आणि आता केशवराव आपल्यात नाही याची जाणीव झाली. मोहम्मद रफी चे काही आले की मी अंजली ला पाठवायची आणि केशवरावांना ती ते ऐकवायची. ते खुश व्हायचे शोभनाताईनी आपल्यासाठी आठवणीने पाठवले याचाही आनंद असायचा बरेच पार्किन्सन्स शुभार्थी होमस्टर झाल्याने एकटे पडतात. फक्त सहचर पुरेसा पडत नाही. इतर कोणीतरी आपली दखल घेतली ही भावना त्यांना हवीशी वाटते आणि छोटीशी कृती ही यासाठी पुरते.
एका उमद्या व्यक्तिमत्वाला पार्किन्सन्सने होमस्टक केलं होतं.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारीणी सदस्य अंजली महाजन यांचे पती केशवराव यांचे 27 जून 2020 ला दुःखद निधन झाले.
अत्यंत हळव्या मनाच्या केशवरांवाना आनंदी ठेवण्यासाठी अंजलीने केलेल्या कल्पक प्रयत्नांची पराकाष्ठा आठवत राहिली. 2008 पासून आमचे केशवरावांशी अत्यंत जिव्हाळ्याचे असे संबंध होते.
सीडीए मध्ये ते
सीनियर ऑडिटर म्हणून काम करत होते. 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला. 1980 ते 2001 पर्यंत अत्यंत आनंदात संसार होता. दोन हुशार मुली अंजली, केशवराव दोन्ही माणसात रमणारे, लोकसंग्रह मोठा होता. दोघेही कोणाच्या अडीअडचणीला धावून जाणारे. साहित्य, संगीत, सिनेमा, नाटके यात रमणारे.
अंजली चे भाऊ मोरेश्वर मोडक यांनी आमच्या एका स्मरणिकेत ‘एक धीरोदात्त व्यक्तिमत्व केशवराव’ असा लेख लिहिला होता. त्यांच्या आनंदी विनोदी स्वभावाचे वर्णन केले होते. सर्वांना हवेहवेसे वाटणारे केशवराव भावंडात धाकटे.सर्व छान चालले
असतांना
2002 मध्ये या सर्वाला दृष्ट लागली. 19 वर्षांची त्यांची धाकटी मुलगी स्वरूपाला cancer
झाला. वर्षभरात ती गेली. केशवरावांना हा धक्का जबरदस्त होता.
दुसर्या मुलीचा विवाह,वर्षसण,नातवंडाचे आगमन यातच काही काळ चांगला गेला.थोडे स्थीर होते तोच
पन्नाशीत असलेल्या केशवरावांना 2003 मध्ये पार्किन्सन्स ने गाठले. तीन चार वर्षे त्यांनी कशीबशी नोकरी केली. हळूहळू संगणकावर काम करणे, लेखन काम करणे,आडिट करणे या सर्व गोष्टी अशक्य होऊ लागल्या. स्कूटर चालवणे जमेना. मग स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.
पत्नीअंजली मुख्याध्यापिका म्हणून शाळेत नोकरीला होती. सकाळी लवकर शाळेला जावे लागेल मुख्याध्यापिका असल्याने अनेक जबाबदार्या असायच्या. घरी यायला वेळ व्हायचा. आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे घर भेटीला गेलो त्यावेळी केशवरावांच्याकडे त्यांच्या वृद्ध आईने दार उघडले. आम्ही बराच वेळ बसलो तरी केशवराव बाहेर येत नव्हते. थोड्यावेळाने आले. त्यांचा ऑफ पीरीएड चालू होता त्यामुळे गोळीचा असर सुरू झाल्यावर ते हालचाल करू शकले होते. त्यावेळी फारशी ओळख नसल्याने त्यांच्या off पिरीएड बद्दल आम्हाला माहीत नव्हते. एकदा बाहेर आल्यावर मग मात्र खूप गप्पा झाल्या सर्व माहिती त्यांनी सांगितली. स्वतःचे घर फिरवून दाखवलं अंजलीचे फोन येत होते मी निघतच आहे जाऊ नका.आल्या आल्या लगेच पदर खोचून ती कामाला लागली. त्या दिवसापासून आमच्या दोन्ही कुटुंबात जवळीक निर्माण झाली ती आजपर्यंत.
कधी पावभाजी केली की केशवराव म्हणायचे काका काकूंना बोलाव आणि त्यांच्या आनंदासाठी आम्ही जायचो. लोकांनी घरी येण्यात त्यांना खूप आनंद असायचा. त्यांना बेळगावचा कुंदा आवडायचा. बेळगावला कधीही गेले तरी मी त्यांच्यासाठी कुंदा आणायची. ते खुश व्हायचे. मग त्यांचा फोन यायचा. कुंदा खाल्ला फार छान होता. आमचे वाढदिवस, नवीन वर्ष, दिवाळी यासाठी त्यांचा फोन आवर्जून यायचा. ‘भयंकर असला जरी तो रीपु. मात कर त्यावरी’ असे स्वतःला बजावत पार्किन्सन्सने कितीही छळवाद मांडला तरी ‘सुखी जीवनाचीच स्वप्ने पाहावी’ अस अंजलीने एका कवितेतून सांगितले होते. केशवरावांनी त्याला साथ दिली.
केशवराव कॅरम खेळण्यात एकदम एक्स्पर्ट होते. त्यांच्याशी कॅरम खेळायला अंजली कोणी ना कोणी शोधायची. स्वतः खेळायची. अजित कट्टी त्यांच्याकडे कॅरम खेळायला गेल्याचे आठवते. अंजलीचे भाऊ मोरेश्वर मोडक त्यांच्या लेखात सांगतात, ते मला कायम हरवायचे.क्वीन कधी मला मिळायची नाही. पण त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मी जिंकलेले असायचो. त्यांना आनंदी ठेवणे यासाठीच तर होता अट्टाहास. मोडक आणि त्यांची पत्नी विनया, अंजली आणि केशवराव असे स्पेशल गाडी करून केरळ, कर्नाटक, हंपी अशा सहली करून आले. 2 जानेवारी 2013 ते 8 जानेवारी 13 अशी आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा सहल गेली होती. केशवराव यांची परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या सहलीला जाण्याचा निर्णय हे धाडस होते पण डॉक्टरांनी परवानगी दिली होती. वर्ध्यापर्यंत रेल्वेने आणि नंतर बसने सर्व प्रवास होता. येताना नागपूर ते पुणे रेल्वे. नागपूर स्टेशन केवढं मोठं तेथे व्हीलचेअर लागेल असे वाटले होते आनंदवन मध्ये ही व्हीलचेअरची सोय झाली असती पण कोठेही व्हीलचेअर न घेता केशवरावांनी पूर्ण सहल केली. त्यातून त्यांना एक नवीन ऊर्जा मिळाली. त्यांच्या त्या सहलीवरील लेखाची लिंक सोबत दिली आहे. तेथील कुष्ठरोगी शरीराचे काही अवयव नसतानाही ठामपणे आजारावर मात करतात. ताठ मानेने जगतात. आपल्याला तर सर्व अवयव नीट आहेत मग पार्किन्सन्सने खचून
का जायचे ही सकारात्मक ऊर्जा त्यांना सहलीत मिळाली. मंडळाच्या सर्व सहलींसाठी ही आवर्जून हजर राहात. केशवरावांचे राजकुमार चे डायलॉग प्रत्येक सहलीत व्हायचेच. स्वतःच्या निवृत्तीनंतर सहा वर्षे ते अंजली ऑफिसला गेल्यावर वृद्ध आईसह दिवसभर एकटे राहायचे.पण हळूहळू त्यांना एकटेपणा जाणवू लागला.नैराश्य येऊ लागले. ते उठण्या आधीच अंजली शाळेत गेलेली असायची. 2012 मध्ये केशवरावांची अवस्था पाहून अंजलीने मुलगी,जावई सर्वांशी चर्चा करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘पत्नीची स्वेच्छानिवृत्ती आणि माझी वाढली आनंदी वृत्ती’ असे त्यांच्या लेखात त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या लेखाची लिंक दिल्याने त्यावर जास्त लिहीत नाही.
आता अंजली त्यांच्याबरोबर पूर्णवेळ देण्यास मोकळी झाली होती.
कधी सारसबागेतील कमळे दाखवायला ने, कधी नाटक, सिनेमाला ने असे तिचे त्यांना रमवणे
चालू झाले. असे वेळोवेळी त्यांना तिन जीने उतरवून बाहेर नेणे अंजलीच करू जाणे.एकदा अचानक ती एका कार्यक्रमात भेटली. नवचैतन्य परिवाराचे विठ्ठल काटे यांचा 75 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त अण्णाभाऊ
साठे सभागृहात गफार मोमीन यांचा मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 75 गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या मागेच अंजली आणि केशवरावांना पाहून मला आश्चर्य वाटले कारण ते दोघे तर हास्यक्लबला जात नव्हते. अंजली म्हणाली, त्यांना मोहम्मद रफीची गाणी आवडतात ना म्हणून आलोय. हे थीएटर जवळ आहे. कोणतेही चांगले कार्यक्रम असले की आम्ही येतो. केशवरावांचा चेहरा आनंदाने फुलला होता. पार्किन्सन्सने थोड्या काळाकरता दडी मारली होती. त्यांच्यासाठी मध्ये भूक लागली तर काही खायला, पाणी, त्यांच्या गोळ्या अशा सर्व सरंजामासह अंजली आली होती.
अशी किती उदाहरणे सांगावी?
पार्किन्सन्सही हटणारा नव्हता. त्याची कुरघोडी चालूच होती अंजली ला आता केअरटेकर ठेवण्याची गरज वाटायला लागली. आपल्यामुळे अंजली आणि इतरांना त्रास होतो हे केशवरावांना जाचत होते. यातच दीड वर्षापूर्वी त्यांच्या
आईचे एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले. त्या आधीचे त्यांचे आजारपण आणि निधन आईवेड्या केशव रावांना सहन होत नव्हते. आईच्या दुःखातून केशवराव बाहेरच येत नव्हते. आजारामुळे घरात राहावे लागल्याने ही कदाचित ते कंटाळले असतील. अंजली त्याना दुःखातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.जावई,मुलगीही प्रयत्न करीत होते परंतु केशवराव कोषात जाऊ लागले. त्यांनीच हत्यार टाकल्यावर लढणे कठीण होते. तरी शेवटपर्यंत अंजलीने जिद्द सोडली नाही आता त्यांच्या जगण्याची गुणवत्ता घसरत चालली होती आणि उमेदही. मृत्यूला चांगली संधी मिळाली मिळाली.
शेवटचा काही काळ सोडला तर केशवरावांनी पार्किन्सन्स विरोधात धीरोदात्तपणे तोंड दिले. त्यांच्या कितीतरी आठवणी येतच राहतील. अंजलीच्या लेखना खाली केशवांजली असेच येत राहिल आणि या नावाने ते कायम तिच्या बरोबर असतील.
त्यांना भावपूर्ण