Monday 6 November 2023

संघर्षातून स्वप्नपूर्ती

                                 संघर्षातून स्वप्नपूर्ती - स्वप्नांना पंख नवे

                 डॉ.वसुधा भंडारे ६७ व्या वर्षी पीएचडी झाल्या.त्यांच्या मुलाने आणि मुलीने वेदश्री कार्यलयात सत्कार समारंभ आयोजित केला होता.माझी प्राध्यापक म्हणून हजेरी होती.अनेकजण त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होते.शिक्षक म्हणून मन अभिमानाने भरून आले होते.हे यश सहजासहजी मिळाले नव्हते त्यामागे खडतर तपस्या होती.स्वप्न पुर्तीसाठीचा संघर्ष होता.

                 वसुधा ताई अकरावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.बरोबरीच्या मैत्रिणी पुढील शिक्षणासाठी महविद्यालयात गेल्या.वसुधाला मात्र बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते.आपले पदवीचे स्वप्न अधुरे राहणार म्हणून खंत होती.आता लग्न करतील ही भीती होती.अशात एका मैत्रिणीने साताऱ्याला नर्सिंगला प्रवेश घेतला.या व्यवसायाबद्दल फारशी माहिती नव्हती.तरी या साडेतीन वर्षाच्या कोर्समध्ये स्टायपांड मिळणार होता.येथे शिक्षणासाठी खर्च नव्हताच उलट कुटुंबाला मदत होणार होती म्हणून प्रवेश घेतला.

               कोणतेही काम निगुतीने झोकून देऊन करण्याच्या वृत्तीमुळे यात प्रविण्य मिळवले.दीड वर्षाचा बाॅंड संपला. आणि वर्षभरात लग्न झाले.सुरुवातीला खाजगी आणि नंतर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल झाल्या.४६ वर्षे नोकरी केली. पती गरवारे नायलॉन मध्ये होते.आता पुणे हीच कर्मभूमी होती.पदवीचे स्वप्न डोके वर काढत होते.नोकरी,संसार,संसारवेलीवर फुललेली दोन मुले यात स्वप्न मागेच पडले.शिक्षणाची आवड पाठ सोडत नव्हती.तरी योगासन कोर्स,होमिओपॅथी कोर्स असे काहीना काही सुरु होते.

                दूरशिक्षण पद्धत सुरु झाली आणि वसुधा सारख्या अनेक वंचितांना शिक्षणाची दारे खुली झाली.पन्नासाव्या वर्षी त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.ए.अभ्यासक्रमास बिचकतच प्रवेश घेतला.त्या माझ्या संपर्कात आल्या.आपल्यापेक्षाही अधिक वयाचे विद्यार्थी पाहून त्यांचा वयाचा गंड मनातून गेला.दिलेल्या अध्ययन साहित्याच्या आधारे घरी राहून अभ्यास करायचा होता शनिवार, रविवार संपर्क सत्रे असत तेही जमणार होते.

                मनात एक खंत होतीच.आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत आपल्या शिक्षणावर खर्च करणे त्यांना लक्झरी वाटत होती.गरवारे नॉयलॉन बंद पडल्याने पतीची नोकरी गेली होती ते छोटी,मोठी कामे करत होते.पण बेताची आर्थिक परिस्थिती त्यांच्या पाचवीलाच पुजली होती.परीचारीकेची नोकरी म्हणजे शिफ्ट ड्युटी,आईकडून मिळालेला दम्याचा वारसा.अशा अनेक अडचणी होत्या.आता स्वप्न हाताशी आल्याने डोंगराएवड्या अडचणी आल्या तरी त्या माघार घेणार नव्हत्या.

                         त्यांच्या भरगच्च दिनक्रमातूनवेळ काढून त्या मन लाऊन अभ्यास करत होत्या.शंका विचारायला येत होत्या.'मला जमेल ना हो' हे पालुपद मात्र सारखे चालूच असायचे.योग शिक्षक म्हणून काम करणे,नर्सिंगवर व्याख्याने देणे,असे इतर लष्करची भाकरी भाजण्याचे उद्योगही चालूच होते.तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला.त्यांचे स्वप्न आता नजरेच्या टप्प्यात होते.त्या प्रथम श्रेणीत पदवीधर झाल्या.समाजशास्त्रा या विषयात  पहिल्या आल्या.पदवीदान समारंभात त्यांना त्यासाठीचे पारितोषिकही मिळाले.

                  आता त्यांच्या प्रतिभेला बहार आला होता.कथा, लेख लिहिणे चालूच होते.त्यांच्या सर्व्हिसबुकमध्ये आता पदवीधर झाल्याची नोंद होणार होती.पगारवाढही होणार होती.आता त्यांच्या स्वप्नाला नवे पंख फुटले.त्यांना एम.ए.करायचे होते.तेही बहिस्थ पद्धतीने करता येणार होते.

                       त्या एम,ए.ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.आता त्या थांबणार नव्हत्या.टिळक विद्यापीठाच्या नेहरू विद्यास्थानात मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी प्रवेश दिला जातो.तेथेही त्यांची निवड झाली.अभ्यासक्रमाला उपस्थिती गरजेची असते.वर्ग शुक्रवार,शनिवारी दुपारी असल्याने नोकरी सांभाळून हजर राहणे त्यांना शक्य होणार होते.नोकरीचा व्याप,मुलीचे बाळंतपण,स्वत:चे आजारपण ही तारेवरची कसरत करत त्यानी जीद्दीने एम.फिल. पूर्ण केले.  
                        परीक्षेच्यावेळी मणक्याचा आजार उद्भवला.आता माघार घेतली तर पुन्हा हे होणार नाही हे त्यांना माहिती होते.त्यामुळे निर्धाराने परीक्षा दिली.बाकावर बसणे अशक्य झाले.विद्यापीठाने पाठीला आधार घेऊन बसता येईल असी स्वतंत्र व्यवस्था केली.एक निवृत्त परिचारिका सोबत थांबून त्यांच्या औषध आणि इंजक्शनचे पाहत होती.एमफिल साठी थेसिस करावा लागतो.'Sociological study of nurses' या विषयावर थेसीस होता. तोही त्यांनी पूर्ण केला.
                       आता पुढचा टप्पा पीएचडीचा.नवीन स्वप्न.हे त्यांच्यासाठी शिवधनुष्यच होते.मणक्याच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या.त्यांच्या समोर तीन चार विषय होते.दरम्यानच्या काळात त्या परिचारिका म्हणून रक्तपेढीसाठी मदत कार्य करत होत्या.ते करताना त्यांची इतरांना पटवण्याची शैली पाहून रक्तदानाचे महत्व,भीती घालवणे यासाठी समुपदेशन करण्याची विनंती केली गेली.हे करताना पीएचडीसाठी ररक्तपेढीवरचा विषय निवडला.'स्वेच्छां रक्त्दानासंबंधी पुणे शहरातील रक्तपेढ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास' असा विषय होता.काम चिकाटीचे,कष्टाचे,वेळखाऊ होते.हिंडावे लागणार होते.त्यांना उरकाउरकीही करायची नव्हती.तब्येतीची कुरकुर चालूच होती.संकटावर मात करत त्यांनी यशश्री खेचून आणली. ६७ व्या वर्षी त्यांनी  मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे'.
                  जिथे शिकल्या तेथे बी.ए.च्या अभ्यासक्रमासाठी काम करण्याची संधी मिळाली.एमएसडब्ल्यू आणि मास्टर ऑफ जर्नालिझम अभ्यासक्रमासाठी असलेल्या सामजिक संशोधन पद्धती विषयासाठी लेखन केले.विद्यापीठाच्या नर्सिंग कोर्ससाठीही काम केले. 
                  हे इथेच थांबले नाही.'दिशा' हा कथा संग्रह,'सेवा स्मरण' नावाने त्यांनी नर्सिंगच्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिले.रक्तपेढीचे 'समर्पण' नावाचे मासिक चालते त्यात लेखन,प्रुफ रीडिंग त्या करतात.संपादक मंडळात त्या आहेत.
                  रोटरी क्लबतर्फे शालेय विद्यार्थिनीसाठी.हिमोग्राम तपासणी त्यानंतर आहार आणि आरोग्याविषयी समुपदेशन सुरु केले.यातून 'ग्रामीण आणि शहरी महिला हिमोग्लोबिन अभ्यास' हा प्रकल्प केला.यादी खूप लांबणारी आहे.अशीच आहे.
                 या सर्व कार्यात अनेक बाक्षिसे, पुरस्कार मिळाले.यात आदर्श परिचारिका म्हणून Florence Nightingale पुरस्कार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी अखिल मध्यवर्ती ब्राह्मण समजाकडून मिळवलेल्या पुरस्कार यांचा उल्लेख करावा लागेल.
यापुढेही त्या सातत्याने आव्हाने स्वीकारत राहतील याची खात्री आहे.त्यांची धडपड पाहून गुरु ठाकुरांची कविता आठवते 
'असे जगावे छाताडावर आव्हानांचे लाऊन अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची नको आंधळ्या तार्यांची
आयुष्याला भीडतानाही चैन करावी स्वप्नांची.'
              

              

                               
                               
                       

पार्किन्सन विषयक गप्पा ८७

                                                      पार्किन्सन विषयक गप्पा ८७

                     पार्किन्सन झाल्यावर औषधोपचारासाठी डॉक्टर असतात.सेवा करायला कुटुंबीय असतात.पार्किन्सनमुळे होणाऱ्या नॉनमोटार लक्षणांसाठी मात्र शुभार्थी आणि कुटुंबीय यांना स्वमदत गटाचा आधार हवा असतो.यात नैराश्य,स्वारस्याचा अभाव(Apathy) अशी लक्षणे येतात त्या पाठोपाठ सामजिक भयगंड,आत्मविश्वास गमावणे,असुरक्षितता असा नकारात्मकतेचा गोतावळाही बरोबर येतो.स्वमदतगटाच्या एकत्रित शक्तीने आपण या सर्वाशी सामना करू शकतो.

            उदाहरण द्यायचे तर शुभार्थी उमेश सलगर आज इतरांसाठी रोल मॉडेल आहेत.ग्रुपमध्ये येण्यापुर्वी मात्र.पत्नीचे अकाली निधन,पार्किन्सनचे आगमन यामुळे ते नैराश्यात गेले होते.भांबावून गेले होते.त्यांनी काही दिवसापूर्वी हिंदी दिनानिमित्त वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.आयत्यावेळचा विषय अशी ती स्पर्धा होती.त्यामुळे तर याचे विशेष कौतुक होते.ग्रुपवरील कौतुकानंतर त्यांनी आपल्या स्वमदत गटाविषयी भावना व्यक्त केल्या.त्या त्यांच्याच शब्दात देत आहे.

 "खरंतर हा ग्रुपच माझं शक्तिस्थान आहे या ग्रुपने माझं कौतुक करून माझं बल वाढवले. पूर्वी मी फारसा सक्रीय नव्हतो, नैराश्यात गेलो होतो. मी या ग्रुप मध्ये आलो तसे, सर्व मेंबर्स सभासद आणि कमिटी मेंबर्स यांनी माझे बोट धरलं आणि  मला बळ दिलं. प्रेरणा दिली ,माझ्या,छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करून माझा उत्साह वाढवला आणि नकळत या स्पर्धेच्या प्रवाहात सोडून दिले जिंकण्यासाठी, त्यामुळे थँक्स टू आपला सपोर्ट ग्रुप आणि सर्व पदाधिकाऱी  व सभासद बंधू भगिनी
 खूपदा, फसतोही.पदार्थ फसतो, स्पर्धेमध्ये हरतो, पण पुन्हा वर यायचं प्रयत्न करायचा आणि ठरवलेलं साध्य हे साधायचं भिंतीवरचा कोळी नाही का दहा वेळा खाली येतो, पुन्हा वर जातो तसं परिस्थितीतून वर खाली होत राहतो. कधी मानसिक अवस्था बिघडते कधी शरीर साथ देत नाही कधी माणसं साथ देत नाही या सगळ्यातून वर यायचं. सतत आनंदी राहायचं. यासाठी शुभेच्छा देणारी आणी,फोनवर सांगणारी आणि आपली जीवाभावाची अशी ही सर्व म्हणजे पार्किन्सन सपोर्ट ग्रुप. अर्थात मला ती माझ्या 
  माहेरची माणसं अशीच वाटतात. त्यांची सोबत फार मोलाची आहे तीच आपल्याला पुढे घेऊन जाते, हसवते, धीर देते, खूप काही देते जे शब्दात व्यक्त करता येत नाही, फक्त ऋणात राहू शकतो आपण सर्वांच्या.
 खरंच ही सगळी आपली माणसं आहेत ही रक्ताची नात्याची नाहीयेत  पण एका सहवेदनेने आपण एकत्र गुंफलो आहोत. एकमेकांना धीर देतो आनंद देतो कौतुक करतो, जसं काही आपण एका घरातली ,एका आईची लेकरं आहोत ,किती छान आहे ना हे सगळं? देवा हे सगळं असच राहू दे. उलट यात भर पडू दे."
 उमेश सलगर यांची ही भावना प्रतिनिधिक आहे.अनेक शुभंकर,शुभार्थीची पार्किन्सनमित्रमंडळाबद्दल हीच भावना असते.