Friday 25 June 2021

मन:पूर्वक अभिनंदन

                                      मन:पूर्वक अभिनंदन

                     शुभार्थी अरुण सुर्वे यांचे खूप खूप अभिनंदन.माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील श्री छत्रपती शिवाजी तंत्र माध्यमिक शाळेत सुर्वे निदेशक ( तंत्र शाळा ) म्हणून काम करतात.नुकतीच त्यांची मुख्याध्यापक पदी नेमणूक झाली आहे.त्याना पार्किन्सन्स होउन १२ वर्षे झाली. नोकरीत असताना पीडी झाला कि आता नोकरी झेपणार का असे अनेकांना वाटते. पण पार्किन्सन्स असूनही ते चोख काम करू शकले स्वकर्तुत्वावर उच्च्य स्थानही मिळवले.इतरांसाठी हे प्रेरणादायी आहे.

ते स्कूटरवर नोकरीच्या ठिकाणी जातात. चारचाकीही चालवतात.रोज भरपूर चालतात.घरातील कामे करतात.निसर्गात रमतात.फोटोग्राफीची आवड आहे निसर्गाचे  फोटो काढून ग्रुपवर टाकतात.सहल,सभासदांचे वाढदिवस यांचे सुंदर व्हिडिओही टाकतात.   

सुर्वे असेच आनंदी राहा आणि आनंद लुटा.पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.     May be an image of 1 person, standing, waterfall and nature


Monday 14 June 2021

पर्किन्सन्सविषयक गप्पा - ७०

                                             पर्किन्सन्सविषयक गप्पा - ७०

                                        डॉक्टर पराग ठुसे यांच्या प्राणायाम फालोअप वर्गात त्यांनी नासिबो ( Nocebo ) आणि प्लासिबो ( Placebo ) इफेक्टबद्दल माहिती सांगितली.प्लासिबो हे अनेकवेळा ऐकण्यात आले होते.नासिबो मात्र प्रथमच ऐकत होते.आमच्या शुभंकर शुभार्थीना या संकल्पनांची ओळख करून देणे गरजेचे वाटले.औषधाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांशी या निगडीत आहेत.पार्किन्सन्स शुभार्थीबाबत गोळ्यांची नेमकी निवड हा कळीचा मुद्दा आहे.प्रत्येक शुभार्थीची लक्षणे वेगळी आणि समान लक्षणे असली तरी औषधांचे परिणाम,दुष्परिणाम वेगळे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात शुभार्थीचे निरीक्षण करून शुभंकरानी नोंदी ठेवल्या तर न्यूरॉलॉजिस्टना गोळ्या आणि डोस ठरवणे सोपे जाते.आता येथे नासिबो आणि प्लासिबोचा काय संबंध असे मनात येईल ना? त्यासाठी या संकल्पना आधी समजून घेऊ.

                        नासिबो इफेक्ट म्हणजे एखाद्या औषधाचे किंवा उपचाराचे दुष्परिणाम पेशंटला या औषधाने मला असे होणार ही तीव्रतेने वाटणारी धारणा, विश्वास असतो आणि त्यामुळे होतात. डॉक्टर ठुसे यांनी यासाठी एखाद्या फुलाची अलर्जी आहे असे वाटणाऱ्याला तेच फुल प्लास्टिकचे समोर आले  तरी शिंका येतात.असे उदाहरण दिले होते.मन आणि शरीर यांचा घनिष्ट संबंध आहे.अलोपाथीच्या गोळ्यांचे साईडफेक्ट असतात त्या अजिबात घेऊ नयेत असाही अनेकांचा ठाम ग्रह करून दिला गेलेला असतो.अशा चुकीच्या ग्रहांना  थारा न देणे हे चांगले..मनोविकार तज्ज्ञ संजय वाटवे यांनी आपल्या व्याख्यानात गोळ्या घेताना त्या आनंदाने घ्या असे सांगितले होते.एक जणांनी मला सांगितले होते.गोळ्या घेण्यापूर्वी ५ मिनिटे ध्यान करा किंवा जप करा. त्यामुळे औषधाचा परिणाम चांगला होतो.येथेही मन शांत होणे.कोणतेही गैर विचार मनात नसताना गोळ्या घेणे हाच विचार असेल.

बरेच जण औषधे दिल्यावर गुगल सर्च करतात प्रत्येक गोळ्यांचे काहीना काही साईड इफेक्ट दिलेले असतात.खरेतर ते काहींनाच होण्याची शक्यता असते पण अशा चिकित्सक मंडळींचा नासिबो इफेक्ट सुरु होण्याची शक्यता राहते.मलाही अशी सवय होती पण आता मी ती बंद केली.पार्किन्सन्सच्या गोळ्यांच्याबाबत एका गोळीचा स्मरण शक्तीवर परिणाम होतो तर एका गोळीने भास होतात असे वाचल्याने माझ्या यजमानांना असे होणार असा  मला ताण असायचा ते मात्र कोणताही विचार मनात न ठेवता गोळ्या घेतात. आत्तापर्यंत त्यांना असे कोणते दुष्परिणाम झाले नाहीत.बुद्धी तल्लख आहे. भासही झाले नाहीत.कदाचित माझ्यासारखा सतत विचार केला तर त्याना तसे झाले असते.येथे ज्यांना भास होतात,इतर काही दुष्परिणाम होतात त्यांना नासिबो इफेक्ट असतो असे मला म्हणायचे नाही.औषधांचा अपोआप दुष्परिणामही  असू शकतो. पण तो तसा होणार नसल्यास आपल्या विचारामुळे झाला असे होऊ देऊ नये एवढेच सुचवायचे आहे.

करोनाच्या आत्ताच्या परिस्थितीत तर नासिबो इफेक्ट होऊ नये यासाठी सावध राहिले पाहिजे.चुकीची माहिती ,ऐकून अनेक गैर गोष्टी मनात ठाण मांडून बसतात.आणि करोना पेक्षा त्याच घातकी ठरतात.तीर्थळी कोविद झाल्यावर हॉस्पिटलमध्ये जातानाही हसत हसत गेले.घरी आल्यावर शरीर थकले होते,पार्किन्सन्स थोडा वाढला होता पण शांत आणि आनंदीच होते, कोणताही आफ्टर इफेक्ट न होता लवकर पूर्वीसारखे झाले.मला मात्र गोळ्या घेतानाच मला हे साईड इफेक्ट होणार असा विचार करताच गोळ्या घेतल्याने गोळ्यांचे दुष्परिणाम हमखास व्हायचे. आता मात्र मीहे आवर्जून टाळते. डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवते जास्त चिकित्सा करत नाही सकारात्मक राहते. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामातून मिळणारी ऊर्जाही असतेच.परिणाम म्हणून कॅन्सरसाठी दिलेल्या रेडीएश्न,किमोचा मला त्रास झाला नाही असा माझा समज आहे.पूर्वीची मी असते तर कदचीत तो झाला असता.

याउलट प्लासिबो मध्ये मानसिक धारणेमुळे, विश्वासामुळे आजाराची लक्षणे कमी झाली असे वाटते.क्लिनिकल रिसर्चमध्ये एखाद्या औषधाची ट्रायल घेताना दोन गट केले जातात एका गटाला खरे औषध दिले जाते दुसऱ्या गटाला तशाच दिसणाऱ्या पण खरे औषध नसणाऱ्या गोळ्या दिल्या जातात.अशा गटासाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या इंजेक्शन किंवा इतर काही असेल त्याला प्लासिबो म्हणतात.आणि नंतर जो परींणाम होतो तो प्लासिबो इफेक्ट.आजारासाठी जे औषध द्यायचे ते न देताही आजार बरा झाल्यासारखे वाटते. तेंव्हा तो प्लासिबो इफेक्ट असतो.येथे प्लासिबो कधी श्रद्धेने लावलेला अंगारा असेल, आपल्या अराध्याबाबतच विश्वास असेल किंवा एखादी पर्यायी उपचारपद्धती असेल.

पार्किन्सन्सचे निदान झाले की आम्ही पार्किन्सन्स बरा करतो असे सांगणारे अनेक पुढे येतात आणि पार्किन्सन्स बरा न होणारा आजार आहे असे सांगणाऱ्या डॉक्टरपेक्षा हे लोक जवळचे वाटतात.खूप विश्वासाने गेल्याने काही काळ चांगले वाटते.हा प्लासिबो इफेक्ट असतो.तो तात्परता असतो. काही काळाने गुण येत नाही असे दिसल्याने पैसा,शक्ती,वेळ वाया गेल्याचे लक्षात येते.

नासिबो आणि प्लासिबो हा खूप मोठ्ठा विषय आहे.याच्यावर खूप संशोधन झाले आहे.होत आहे. पण याबाबत मला जास्त खोलात शिरायचे नाही. पार्किन्सन्स बद्दलच्या अज्ञातून चुकीचे निर्णय घेणे टाळले जावे गोळ्या आनंदाने घेऊन त्याचा जास्तीजास्त चांगला परिणाम करून घेणे आणि निदान मानसिकते मुळे होणारे दुष्परिणाम टाळणे.एवढेच शुभंकर,शुभार्थीपर्यंत पोचवायचे आहे.

                                

Friday 4 June 2021

डॉक्टर पराग ठुसे यांचा प्राणायाम वर्ग

                                       डॉक्टर पराग ठुसे यांच्याकडे प्राणायाम शिकायची खूप वर्षांपासून  इच्छा होती.कोरोनामुळे ऑनलाईन क्लास सुरु झाले आणि आमची इच्छा पूर्ण झाली.२०१२ मध्ये डॉ.ठुसे प्रथम पार्किन्सन्स मित्रमंडळात व्व्याख्यान देण्यासाठी आले होते.आजाराबरोबर चांगले जगण्यासाठी योग आयुर्वेद यांचा उपयोग कसा करता येईल हे सांगताना प्राणायाम, मेडिटेशन यांचीही माहिती त्यांनी सांगितली.त्या छोट्याशा भाषणातुनही त्यांचे आयुर्वेद ,योग याबद्दलचे सखोल ज्ञान,ते नेमकेपणाने,व्यवहारातील उदाहरणे सांगत पटवण्याची हातोटी आवडली.आम्ही प्राणायाम करत होतो पण तो योग्य पद्धतीने होतो की नाही हे त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे असे वाटले.वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले जात असल्याने प्राणायाम करताना नेमके बरोबर काय हे समजेनासे झाले होते.डॉ. ठुसे यांच्याकडे याचे निरसन होईल असे वाटले. त्यानंतर २०१७ मध्येपण त्यांनी 'ताणताणाव निरसन' या विषयावर व्याख्यान दिले.त्यावेळी त्यांच्या प्रत्यक्ष कार्यशाळा सुरु होत्या. परंतु आमच्या पासुन खूप लांब असल्याने ते जमले नाही.

                              हा योग येण्यासाठी २०२१ साल उजाडायला लागले.६ दिवसाचा  बेसिक प्राणायाम वर्ग केला.यानंतर आता आठवड्यातून एकदा फॉलोअप प्राणायम करत आहे आणि कायम करणार आहे.कारण एका दिवसात आठवड्याभराची उर्जा मिळते. पहिल्याच दिवशी ऑनलाईन वर्गात प्राणायाम आणि मेडीटेशन शिकणे शक्य आहे का हा संभ्रम  दूर झाला.एका वर्गात खूप विद्यार्थी नसतात आणि प्रत्येकाकडे सरांचे लक्ष असते प्रत्येकाची क्षमता, आजार,वय या सर्वांचा विचार करत कोणी काय करायचे,काय करायचे नाही,कोठे थांबायचे हे सांगितले जात असल्याने प्राणायाम करताना आता निर्धास्त वाटते.योगाबरोबर आयुर्वेद आधुनिक वैद्यक,शरीरशास्त्र,सायकोलॉजी याचे त्यांचे सखोल ज्ञान,या सर्व क्षेत्रातील होत असलेल्या संशोधनाचा पाठपुरावा हे सर्व ज्ञान पोचवण्याची तळमळ हे मला भावले  गेली ३० वर्षे विविध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वयाच्या लाखो लोकांना योग,प्राणायामबरोबरच सायकोथेरपी,स्ट्रेस मॅनेजमेंट,लाइफस्टाइल मॅनेजमेंट याचेही प्रशिक्षण त्यांनी दिल्याने अनुभवाची बाजूही भक्कम आहे.हे सर्वच फॉलोअप वर्गातूनआपसूकच होते. 

                     श्वसन ही आपली मुलभूत गरज आहे. मनाची उभारी ठेवण्यासाठी श्वसन महत्वाचे आहे.श्वसनात  पद्धतशीर बदल करणे हे प्राणायामातून होते.प्राणायाम आणि ध्यान म्हणजे नेमके काय? ते कसे करायचे हे आता समजून करत असल्याने तो आनंददायी अनुभव असतो.हा अनुभव आता सत्तरी नंतर मिळत आहे. तरुण वयातच हे झाल्यास शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वाचे ठरेल त्यामुळे या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे मला सांगावेसे वाटते.