Thursday 17 May 2018

आठवणीतील शुभार्थी - उषाताई गोगटे.

                                  - उषाताई गोगटे यांचे भरतकाम


                              
                        " खुदिको कर इतना बुलंद कि हर तहरीरके पहले 
                          खुदा बंदेको पुछे,'बोल तेरी रजा क्या है'| "
ऐकायला,लिहायला हे छान वाटत,  प्रत्यक्षात अशा व्यक्ती सापडणे कठीण. पण आमच्या मित्राने,पार्किन्सन्सने आमच्यापर्यंत असे बंदे आणले.उल्हास गोगटे आणि उषा गोगटे हे जोडपे  यातील एक.८१ वर्षांच्या  उषाताईंच ३ ऑगस्ट २०१६ ला निधन झाल.
उषाताईंच्या निधनाने  साठी  ओलांडलेल,परस्पराविषयी प्रेम आदर,कौतुक यांच्या अतूट नात्यात बांधलेलं  सहजीवन रूढार्थाने संपल.त्यांचं सांत्वन करायला गेलेलो आम्ही त्यांच्या आगळ्यावेगळ्या सहजीवनाच्या दर्शनाने थक्क होऊन आणि प्रेरणा आणि ५००० रुपयाची देणगी घेऊन परतलो. होण हीच प्रतिक्रिया असते  उल्हास गोगटे आणि उषा ताई
 दिवाणे यांच्या घरी झालेल्या डेक्कन गटाच्या सभेत उल्हास गोगटे प्रथम भेटले.ते पूर्णवेळ न थांबता घाईघाईने गेले.पार्किन्सन्स झालेली शय्याग्रस्त  पत्नी,आणि आणि आता ५८ वर्षाचा असलेला विकलांग मुलगा, यांना ते घरी सोडून आले होते.न पाहिलेल्या उषाताईंची ही पहिली ओळख. यशस्वी व्यावसायिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गोगटे यांनी इतर सर्व गोष्टी बंद करून पत्नी आणि मुलाच्या सेवेस वाहून घेतलं होत.१००० रुपयाची देणगी त्यांनी दिली.मंडळाला मिळालेली ती पहिली देणगी होती.नंतर अनेकवेळा ते अशीच देणगी द्यायला घाईघाईने येऊन गेले.त्यांचं सर्व लक्ष पत्नी आणि मुलाकडे असे.आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा उषाताईना प्रथम प्रत्यक्ष पाहिलं.घरी शय्याग्रस्त कोणी असल की घरात एक उदासवाण वातावरण असत.शय्याग्रस्त व्यक्ती थोडी ओशाळलेली, कंटाळलेली, त्या व्यक्तीकडे पाहायला कोणीतरी पगारी व्यक्ती नेमलेली असते.इथ तर एक शय्याग्रस्त आणि एक विकलांग व्यक्ती.पण उदासवाणेपणाचा मागमूसही नव्हता उलट प्रसन्न वातावरण होत.या दोघांच सर्व काही स्वत: गोगटे करत होते.पगारी माणसे नेमली की झाल असे समजणारे अनेक शुभंकर पाहिले होते,आम्हाला आमच लाईफ नाही का? किती दिवस आम्ही अडकून राहायच? अस विचारणारेही पाहिले होते.कोणताही आव न आणता समर्पित भावाने सर्व काही करणारे गोगटे यांच्यासारखे मात्र विरळाच.
 ना .सी.फडकेंच्या कादंबरीतील नायक, नायिका शोभतील असे हे जोडपे.एकमेकाच्या आकंठ प्रेमात बुडालेले. दोघेही सर्वगुण संपन्न.नायक हँडसम,नायिका ब्युटिफुल.नियतीने  यांच्या कथेतील सहजीवनाच्या सुंदर चित्रावर दु:ख,वेदना,हतबलता यांचे वार करत बाधा आणण्याचा प्रयत्न केला.परंतु यांच्या प्रेमाच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या सहजीवनाच्या गडद रंगात नियतीचे फटकारे निष्प्रभ ठरले.
पहिला फटकारा १९६४ मध्ये अमरच्या जन्मानंतर मिळाला.त्याच्या जन्माच्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता.फोर्सेप्स डिलिव्हरी करावी लागली.मेंदूला इजा झाली आणि विकलांगता चिकटली.
जन्मताच सर्व अवयाववरच नियंत्रण गमावलं.पती पत्नींनी हार न मानता त्याला नॉर्मल स्थिती आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.नॉर्मल नाही झाला तरी दोन गुडघ्यावर, हातावर चालू लागला.अस्पष्ट का असेना बोलू लागला. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला.त्याच्या नाटकाच्या  संगीताच्या आवडीला खतपाणी घातले.त्यावेळी गोगटे उद्योग व्यवसायात गढलेले त्यामुळे जास्त भार उषाताईनीच उचलला.उषाताई स्वत: खेळाडू  होत्या. सुंदर विणकाम भरतकाम करायच्या. त्यांनी आपले सर्व छंद बाजूला ठेवले अमरला घडवले.गोगाटेना कविता करताना शब्द अडला तर तो सांगतो.त्यांनी आपल्याच जीवनावर एक कथाही लिहिली.त्याला नेत्रदान आणि देहदान करायचं आहे. विकलांग  अमरला घडवण्यात,निरोगी आणि सुंदर मन देण्यात या पती पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले असतील,पेशन्स ठेवावे लागले असतील याची आपण कल्पना करू शकतो.इतर कुटुंबीयांचीही यात मदत होतीच.
                         १९९६ मध्ये उषाताईंना पार्किन्सन्स झाल्याच निदान झाल.त्यातच अ‍ॅस्टीओपोरोसिसही झाला. जरा कुठ पडल की हाड मोडल अस होऊन अनेक ठिकाणी ऑप्रशन करून  रॉड घालावे लागले.बॅटमींटन चँपियन असलेल्या उषाताई अंथरुणाला खिळल्या.त्यातच ताठरता कमी करणारे पार्किन्सनन्सवरचे महत्वाचे औषध सिंडोपा घेतल्यावर त्याना जोरदार चक्कर येत असे त्यामुळे सिंडोपाच्या गोळ्या  देता येणार नव्हत्या.न्युरॉलॉजीस्ट दिवटे यांनी Pacetane,Amentral या गोळ्या चालू ठेवल्या.अमरबरोबर आता  उषाताईनाही पाहावे लागणार होते. गोगटे ते समर्थपणे करत होते.त्यांच्या खाण्यापिण्याबरोबर, औषधोपचाराबरोबर त्यांचा व्यायाम करून घेणेही ते करत होते.मन आनंदी ठेवण्यासाठी धडपडत होते.घरात बसून कंटाळा येईल म्हणून दोघानाही गाडीतून बाहेर फिरऊन आणत होते. अमरला पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरात आवडतो म्हणून बऱ्याच वेळा तेथे ते जात. हे किती कठीण आहे, हे ते या दोघांना एकदा अश्विनिमध्ये सभेला घेऊन आले तेंव्हा लक्षात आल.त्यांनी गाडी अश्विनी हॉटेलच्या अगदी दारापाशी आणली.प्रथम अमरला गाडीतून काढून व्हीलचेअरवर घेतलं.हॉलमध्ये आणून बसवलं.नंतर उषाताईना गाडीतून बाहेर काढून हॉल मध्ये आणल.घरापासून हॉलपर्यंत असा दोघानाही आणण्याचा  मला वाटत विचारही कोणी केला नसता.उषाताईही मन रमवण्यासाठी स्वत:चे मार्ग शोधत होत्या.नामजपाने त्यांच्या अनेक वह्या भरल्या.उषाताईंच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती तरीही गोगटे काहीना काही उपाय पाहत होते. मध्यंतरी श्री गोखले यांनी पीडी पेशंटच्या घरी जाऊन संमोहन उपचार करण्याची तयारी दाखवली. गोगटे यांनी तो प्रयोग करून पाहिला.उषाताईना त्यामुळे थोडा फायदा झाला.गोखले यांचे व्याख्यान आम्ही मंडळात ठेवले तेंव्हा  आपला अनुभव सांगायला घाईघाईने गोगटे येऊन गेले.सगळ थोड स्थीरस्थावर होत होत तर नियतीला पुन्हा परीक्षा घेण्याची लहर आली.गोगटेना सुधारता येऊ शकत नाही अशी दृष्टीची समस्या निर्माण झाली.कमी दिसू लागल.वाचन लिखाणावर मर्यादा आली.चारचाकी बंद झालीच होती दुचाकीवर जाणही बंद झाल.सेवेत मात्र खंड नव्हता.
आता त्यांच सभांना येण जवळजवळ बंदच झाल.फोनवर संपर्क होता.एकदा त्यांनी 'पार्किन्सन्स मित्र' नावाची कविता पाठवली.एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत 'परका  होता घरचा झाला अखंड नाते जडले' अस म्हणण, 'रडण्यापेक्षा मुळूमुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा' म्हणत पीडीशी हातमिळवणी करण,खरच ग्रेट.आम्ही ही कविता २०१६ च्या अंकात छापली.इतर अनेक छंद असलेल्या गोगटेना घरी राहण्याच्या काळात त्यांच्या कविता सखीने साथ दिली. त्यांच्या कविताच्या पहिल्या वाचक उषाताई असत.काही पटले नाही तर परखडपणे सांगत.उषाताईंच्या मृत्युनंतर तीन चार  दिवस, ही सखी सुद्धा त्यांच्याजवळ जाऊ शकली नाही.६ ऑगस्टला मात्र धीर करून ती जवळ आली. त्यांची 'भयकंपित अवस्था' कागदावर उतरली. आम्ही भेटायला गेलो तेंव्हा टेबलवर कवितेची वही होती.' वर्षा सहल,श्रावण,उषाताईंचा १६ ऑगस्टचा वाढदिवस अशा आठवणीच्या सरीवर सरी अनेक कवितेतून कोसळत होत्या. 'जाणे तुझे मनाला गेले लुळे करून'.असा विलाप मन करत होत.
त्यांनी यापूर्वी आपल्या एका दीर्घ कवितेत 'जगावेगळी माझी प्रार्थना देवा प्रथम ने या दोघांना ' अस म्हटल होत.हे बुद्धीला समजल तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर मन मात्र हा वियोग सहन करू शकत नव्हत.उल्हासराव हळूहळू सावरले.कविता अजून चालूच आहेत पण कवितेची पहिली वाचक मात्र आता नाही.

Saturday 12 May 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - १५

                                 पार्किन्सन्सविषयी गप्पा  - १५
                                 आम्ही  १५० शुभार्थींची प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा केली होती. प्रश्नावलीतील माहिती   नुसार १५० पैकी १२५ जणाना म्हणजे जवळजवळ ८३.३३% % लोकाना कंप हे लक्षण होते.. यातील ९६ जणांच्या पीडीची सुरुवात  कंपाने झाली.म्हणजे ५४ जणांची सुरुवात इतर लक्षणाने झाली. यातील काहीना नंतर कंप हे लक्षण दिसू लागले.काहीना कंप हे लक्षण नव्हतेच.कंपावर बऱ्याच गप्पा झालेल्या आहेत.आमच्या सुरुवातीपासूनच्या कार्यकर्त्या शीलाताई कुलकर्णी आणि अनिल कुलकर्णी यांच्या पार्किन्सन्सच्या निदानाबद्दल सांगताना पुन्हा कंप असणाऱ्यांचे पार्किन्सन्सचे निदान लवकर होते हे आठवले.या दोघांनाही पार्किन्सन्स झाला.
               शीलाताई स्वत: डॉक्टर होत्या.भारतात तसेच इंग्लंडमध्येही Practice केली होती.त्यांना चालताना त्रास व्हायला लागला पाठीत दुखत होते.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मानेची शस्त्रक्रिया केली.पण चालण्यात फरक पडला नाही.अनेक तपासण्या झाल्या पण योग्य ते निदान होत नव्हते.न्यूरॉलॉजिस्टकडे गेल्यावर बरोबर असलेल्या अनिल कुलकर्णींकडे पाहून त्यांनी सांगितले की यांना पार्किन्सन्सची सुरुवात आहे.त्यांचा हात थोडा थरथरत होता.अनुभवी .न्यूरॉलॉजिस्टला पाहताक्षणी जाणवावीत अशी त्यांची लक्षणे असावीत.त्यांना धक्काच बसला.'अहो आम्ही हिच्यासाठी आलोय. माझ्याबद्दल काय सांगताय?हिच्या इतक्या तपासण्या झाल्या काहीच निदान होत नाही आणि माझी कोणतीच तपासणी न करता तुम्ही कसे काय सांगताय?'अशी अनिल कुलकर्णी यांची प्रतीक्रिया होती.ते केपीआयटी मध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते.कामाचा व्याप,शीलाताईंच्या आजाराचे न होणारे निदान या सर्वात त्यांचे पार्किन्सन्सचे निदान त्यांना धक्कादायकच होते.काहींची लक्षणे इतकी स्पष्ट असतात की, तज्ज्ञ डॉक्टरना पाहताक्षणीच निदान होऊ शकते.याचवेळी शीलाताईंच्या आजारावरही पार्किन्सन्सचे शिक्कामोर्तब झाले.काहीतरी निदान झाले बुवा एकदाचे असे वाटून शिलाताईना मात्र हायसे वाटले.हे दोघे नंतर अमेरिकेला मुलीकडे गेले.तेथील सपोर्ट ग्रुप मिटिंगना हजर राहिले.नव्वदी पर्यंतचे पेशंटही पार्किन्सन्ससह आनंदाने जगतात हे पाहिले, पार्किन्सन्सबद्दलची योग्य माहिती मिळाल्याने त्यांचे नैराश्य दूर झाले.भारतात जाऊन स्वमदत गट सुरु करायचा असे ठरवून नव्या उत्साहाने ते भारतात परत आले.येथे असा गट कार्यरत आहे हे समजल्यावर आमच्यात सामील झाले. आज अनिल कुलकर्णी आपल्यात नाहीत. शीलाताईही वय आजार यामुळे खूप काम करत नाहीत पण मंडळाच्या पायाभरणीत त्यांचे दोघांचे मोलाचे योगदान आहे.          

  अधिक माहितीसाठी हा ब्लॉग पहा :
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune हा युट्युब channel पहा.
 

           
                          

Sunday 6 May 2018

सचित्र सहल वृत्त

                                                            पहिला टप्पा
                                            वर्षातून एकदा जाणारी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल शुभंकर शुभार्थींसाठी आनंदोत्सव असतो.शब्दांपेक्षा हा आनंद छायाचित्रातून (फोटोतून ) अधिक पोचेल असे वाटल्याने टप्प्याटप्प्याने तो आपल्यापर्यंत छायाचित्रातून  पोचवत आहे.
 यावर्षीची सहल १ नोव्हेंबरला पानशेत जवळील अभिरुची फार्म हाऊस येथे गेली होती.३१ शुभंकर, शुभार्थी सहभागी झाले.४५ वर्षापासून ९५ वर्षापर्यंतचे शुभार्थी सहभागी होते.सात शुभार्थी शुभंकराच्या सोबतीशिवाय एकटे आले होते हा यावेळच्या सहलीचा विशेष होता.सहल सकाळी  साडे आठ वाजता हॉटेल अश्विनी पासून निघाली.सर्वजण अगदी वेळेत हजर होते.चिंचवडहून आलेल्या पाडळकर पती पत्नीना वेळ गाठण्यासाठी पहाटे ६.३० लाच घरातून निघावे लागले.सर्व मंडळी बसमध्ये स्थानापन्न झाल्यावर अंजलीने हजेरी घेतली. केशवरावांसाठी लवकर व्हीआरएस घ्यावी  लागलेल्या अंजलीतील शिक्षिकेचे हे आवडते काम.सुरुवातीलाच ती हे काम करताना आजार विसरून सर्वांना शाळकरी मुले व्हायला लावते.सर्वाना ओरिगामी साठी कागद वाटण्यात  आले.बसमध्येच sandwich आणि खोबऱ्याच्या वड्या देण्यात आल्या.शुभार्थी उमेश सलगर यांनी रात्री बारापर्यंत जागून खास स्वत: बनवलेले रव्याचे लाडू आणले होते.अंताक्षरी,गप्पा यात अभिरुची कधी आले समजलेच नाही.आल्या आल्या  चहापान झाल्यावर उन्हे वाढण्याआधी ज्यांना शक्य आहे त्यांनी आजूबाजूचे निसर्ग दर्शन करायचे ठरले.सर्वजण निसर्ग पाहताना हरखून गेले होते.मोबाईलमध्ये आठवणी साठवून ठेवत होते.          
                                                         दुसरा टप्पा
                       दुसरा टप्पा ११.१५ ला सुरु व्हायचा होता.निसर्ग दर्शनात रमलेल्यांचा ११.३० पर्यंत पत्ताच नव्हता.हळूहळू सर्व येऊ लागले.गोलाकारात सर्व स्थानापन्न झाले.शोभना तीर्थळी यांनी इडली डोसा खेळ घेतला आणि श्रीपाद कुलकर्णी प्रथम,रेखा आचार्य दुसऱ्या आल्या.लगेच श्यामाताईनी त्यांना बक्षिसे दिली आणि परस्पर परिचयाचा कार्यक्रम सुरु झाला.९५ वर्षाचे कलबाग आणि ८६ वर्षाच्या सुमन जोग यांच्या परिचयाने सर्व भारावून गेले.त्यांचे सहलीत असणेच प्रेरणादायी होते.इतरांनी अगदी थोडक्यात ओळख करून दिली. प्रत्येकाची पूर्वपीठीका वेगळी असली तरी सर्वांचाच  पीडीसह आनंदी राहण्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता.आणि स्वतंत्र लेखाचा विषयही आहे.
यानंतर नोव्हेंबर महिन्यात जन्म असलेल्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस हास्याचा केक कापून आणि  हास्याचाच फुगा फोडून साजरे करण्यात आले.अमेरिकेत राहणारी सून पीएचडी झाल्याबद्दल श्यामलाताईंनी सर्वाना खरे पेढे वाटले.
                     आता चुलीवरचा गरमागरम स्वयंपाक तयार झाला होता.गरम गरम भाकरी,चपाती,भरले वांगे,मुगाची उसळ,बटाटा भाजी,भजी, पापड,लोणचे,चटणी,वरण भात आणि शिरा असा मेनू होता.वाढण्याची जबाबदारी काही शुभंकर शुभार्थीनी उचलली.जेवताना जवळ बसलेल्यांची  गप्पातून अनुभवाची देवाण घेवाण चाललीच होती.
                                                        अभिरुची फार्म हाउस सहल  तिसरा टप्पा
                    खेळ, करमणुकीचे कार्यक्रम,ओरिगामीच्या कलाकृतीतून बक्षिसासाठी निवड अशा अजून बऱ्याच
गोष्टी व्हायच्या होत्या. विश्रांती न घेता लगेच सर्व कामाला लागले.अंजलीनी प्रत्येकाला काय कार्यक्रम करणार याची विचारणा केली.सुमनताई आणि श्यामाताईनी ओरीगामीचे नंबर काढले.इतर गोलाकर  खुर्च्या मांडत होते. कोण शुभंकर कोण शुभार्थी कोणालाच ओळखता आले नसते.सर्वांचा उत्साह पाहून पीडीनेच शरमेने मान खाली घातली होती.अंजलीनी खेळ तयार करून आणला होता १० प्रश्न आणि त्याला दिलेल्या पर्यापैकी अचूक पर्याय निवडायचा होता.सर्वाना कागद वाटण्यात आले.दहा मिनिटे वेळ दिला होता. चीद्दरवार यांचे १० पैकी १० बरोबर आले.सुरेश बागल,केशव महाजन,रामचंद्र करमरकर,स्नेहलता जोशी,आशा रेवणकर यांचे ९ बरोबर आले.सर्वाना लगेच बक्षिसे देण्यात आली.ओरिगामी मध्ये सविता ढमढेरेच्या फुलपाखराला प्रथम आणि आशाच्या इस्त्रीच्या शर्टला दुसरा क्रमांक मिळाला.
                    यानंतर जोस्ना सुभेदार यांच्या गीतेच्या १५ व्या अध्यायाने करमणुकीच्या  कार्यक्रमास सुरुवात  झाली.अंजलीने आपल्या खुसखुशीत शैलीत सूत्रसंचालन केले.सविता ढमढेरे आणि शोभना तीर्थळीसह सर्व शुभंकर शुभार्थिनी 'चांदणं,चांदण झाली रात' हे कोळीगीत म्हटले.उमेश सलगर यांनी आईची महती सांगणाऱ्या कवितेचे वाचन केले.सुरेंद्र महाजन यांनी 'शिवशक्तीचा अटीतटीचा' हे नाट्यगीत म्हटले.केशव महाजन यांनी पाकिजातील संवाद म्हटले,स्नेहलता जोशी यांनी'या सुखानो या' आणि लोकाग्रहासाठी' केतकीच्या बनी तिथे ' हे गीत म्हटले.अंजलीने स्वरचित कवितेत एका चिमुकलीचे मनोगत व्यक्त केले. श्रीपाद कुलकर्णी यानी विनोदी पुणेरी पाट्यांचे वर्णन करून सर्वाना हसवले 'मेरा दिल मचल.गया तो मेरा क्या कसूर' हे गीत गाऊन सर्वाना जुन्या काळात नेले.विजया मोघे यांनी 'गौरिहारी दिनानाथा' हे भक्तीगीत म्हटले.शोभना तीर्थळी यांनी' रसिक बलमा'  म्हटले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सहभागी सर्वाना श्यामाताई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
                   तोवर चहा आलाच.चहा घेऊन लगेच निघायचे होते.यावेळी सर्वांचा  एकत्रित फोटो काढायचाच असे दीपाने ठरवले होते. आणि ते पूर्णत्वास आणले.अंजलीने हजेरी घेतली आणि बस परतीच्या प्रवासाला निघाल्या.खवय्या उमेश सलगर यांनी तेवढ्यात नीर फणस विकत घेतले. जेवणात त्याची भजी होती.जाताना अनोळखी असणाऱ्यात आता जवळीकीचे नाते निर्माण झाले होते.
( सचित्र सहल वृत्त म्हटले असले तरी येथे फोटो घालता आले नाहीत.फोटोसाठी वेबसाईट www.parkinsonsmitra.org  पहावी.)




क्षण भारावलेले - ५

                           जागतिक पार्किन्सन्स मेळावा जास्तीत जास्त शुभार्थीकेन्द्री असावा असा आमचा प्रयत्न असतो. कलाकृती इशस्तवन,नृत्य हे सर्व शुभार्थींचेच असते.आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर असा इशस्त्वनात सहभाग असायचा.यावर्षी आम्ही ९४ वर्षाचे शुभार्थी कलबाग काकांचे ( नारायण कलबाग )  इशस्तवन ठेवायचे ठरवले.ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान  कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
                     त्याचे असे झाले,सोमवार ११ डिसेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती  कलबागकाकांचा  फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले.त्यांच्या अनेक कृती त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतात.कलबागकाका  हे आदर्श शुभार्थी आहेत.त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका  एकटेच राहतात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत  नाहीत तर इतरांनाही मदत करतात.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला आहे. त्यानुसार दिनचर्या आखली आहे.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे.यावर स्वतंत्र लिहायला हवे.सभाना ते नियमित हजर असतात.सहलीचा आनंद लुटतात.या वयातील त्यांचा उत्साह अनेकांना प्रेरित करू शकेल असे वाटल्याने.यावर्षी ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यात त्यांचे इशस्तवन ठेवले.त्यांनी ही लगेच होकार दिला.हा माझा सन्मानच आहे म्हणाले.
                 आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असतात.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते.
                 मेळाव्याचा दिवस जवळ आला आणि अनेकांचे चौकशीचे फोन येवू लागले.'सभा ११ तारखेला आहे ना?' 'नर्मदा हॉल मध्येच यायचं ना?'  'केसरीवाड्यात सभा आहे ना?' खर तर सभा ९ तारखेला आणि एस.एम.जोशी सभागृहात होती.सर्वाना फोन गेले होते,विविध माध्यमातून वेळोवेळी निवेदन दिले होते.पण दर वर्षी अशा तऱ्हेच्या चौकशा होताच असतात.कलबागकाकाना तारीख,वेळ ठिकाण लक्षात असेल ना? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्यांना वेगवेगळ्या वेळी फोन करायचा प्रयत्न केला.पण ते फोन उचलत नव्हते. ते येऊ शकले नाही तर अडणार नव्हते.पण त्यांचे इशस्तवन व्हावे ही आमची  मनापासूनची इच्छा होती.९ तारखेला सकाळी त्यांचा फोन आला.'मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?' 'हॉल माहित आहे ना'? मी खात्री करून घ्यायला विचारले'.हो.पत्रकार भवनच्या शेजारी एस.एम.जोशी हॉल'.माझा जीव भांड्यात पडला.खर तर त्यांचा व्यवस्थितपणा पाहता.मला ही शंका येणच चुकीच होत.
 ते ठरल्याप्रमाणे वेळेवर आले.
                   ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले'.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला  तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील' असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते.ते बोलताबोलता संगीतकार वसंत देसाई यांच्याबरोबर आपण कार्यक्रमात सहभागी असायचो असे ते म्हणाले होते हे आठवले.म्हणजे त्यांना सराव होता  तरीही  त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.सुरुवात छान झाली आणि कार्यक्रम रंगतच गेला.
                प्रमुख पाहुणे डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
             ही त्यांच्या कर्तुत्वाची एक झलक.त्यांचाकडे आणि त्यांच्याबद्दल सांगण्याजोगे  खूप आहे.कोणीतरी त्यांच्याशी  बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.
                    

Thursday 3 May 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - १४

                                                पार्किन्सन्सविषयी गप्पा - १४   

  माझ्या मैत्रिणीकडे मला एक भूल तज्ज्ञ भेटल्या.मैत्रिणीने आम्ही पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करतो असे सांगितल्यावर म्हणल्या,'मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला.माझे कामाचे स्वरूप पाहता मी दिवसभर बिझी असते पण तरीही जसा वेळ मिळेल तसे माझ्याजोगे काम आहे ते करीन.' बोलता बोलता त्यांच्या आईला  पार्किन्सन्स होता असे समजले.त्या म्हणाल्या'.'माझ्या आईला नैराश्यानी पार्किन्सन्सची सुरुवात झाली. बरेच दिवस तिला नैराश्य होते. मानसोपचार तज्ज्ञांना दाखवले.औषधोपचार सुरु होते.एक दिवस माझा डॉक्टर मित्र घरी आला होता.तो म्हणाला अग तिचे चालणे,चेहरा  पाहिलास, का? मला वाटते तिला पार्किन्सनन्स आहे.न्यूरॉलॉजिस्टकडे ने.त्यांनी म्हटल्यावर मलाही जाणवले, अरे खरेच की,माझ्या कसे लक्षात आले. नाही'. ज्यांच्या घरी डॉक्टर आहे तेथेही हे घडू शकते.ज्यांनी पार्किन्सन्स हा शब्दही ऐकला नाही अशा व्यक्तींना नैराश्य आल्यावर न्यूरॉलॉजिस्टना दाखवावे हे लक्षात येणे शक्यच नाही.यापूर्वी काही व्यक्तींची पार्किन्सन्सची सुरुवातच नैराश्याने होते असे ऐकले होते.येथे प्रत्यक्ष उदाहरण दिसत होते.मी सहज त्यांना आईचे नाव विचारले.त्यांनी नाव सांगताच माझ्या लक्षात आले. हे नाव आमच्या यादीत होते.रामचंद्र करमरकर त्यांच्याकडे घरभेटीसाठी जाऊन आले होते.त्यांची अवस्था सभेला येण्यासारखी नव्हती.त्यांचे वयही जास्त झाले होते.पण त्या म्हणाल्या होत्या मला फोन केलेला किंवा कोणी भेटायला आलेले आवडेल.त्यामुळे मीही त्यांच्याशी एकदोनदा फोनवर बोलले होते.मंडळाबद्दल उशिरा समजले याची त्यांना हळहळ वाटत होती.बऱ्याचजणांबद्दल असे होते.माझ्या गप्पा या अशा पीडी शुभार्थींपर्यंत आमच्या स्वमदत गटाबद्दल माहिती पोचवणारे साधन ठरावे म्हणुनतर आहेत.नैराश्यासारख्या लक्षणासाठी तर स्वमदतगट निश्चित उपयोगी पडू शकतो.मंडळात यायला लागल्यावर अनेकजण नैराश्यातून बाहेर येतात.पार्किन्सन्स आणि नैराश्य यावर स्वतंत्रपणे मी लिहिले असल्याने पुन्हा येथे लिहित नाही त्या लेखाची लिंक मात्र देत आहे
https://parkinson-diary.blogspot.in/2017/04/blog-post_7.html
                           येथे जाताजाता एक सांगावेसे वाटते,सभेला येऊ न शकणाऱ्या शय्य्ग्रस्तांसाठी मोबाईलवर वेब साईट पाहता येईल अशी यंत्रणा आणि शुभंकर सारखे App म्हणूनच मला महत्वाचे वाटते.शय्याग्रस्त हा एक स्वतंत्र गप्पांचा विषय आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune हा युट्युब channel पहा.