Sunday 17 October 2021

*स्थिर मती - वसुमती*

 


*स्थिर मती - वसुमती*
सहावा आधारस्तंभ
' पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्रीशक्ती ' या नवरात्रीनिमित्तच्या लेखमालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत ती आमच्या मित्रमंडळाच्या ट्रस्टची खजिनदार वसुमती देसाईमधील स्त्रीशक्तीची.
वसू म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती तिची सदैव हसतमुख मुद्रा. ती खूप प्रेमळ आहे. सगळ्यांशी आपलेपणाने बोलते आणि वागते. कुणाच्याही मदतीला सदैव तत्पर असते. कोणतेही छोटे- मोठे काम उत्साहाने, व्यवस्थितपणे पार पाडते.मग ते मासिक सभेच्यावेळी पेशंट्सच्या सह्या घेण्याचे काम असो, चहावाटपाचे काम असो, सहलीच्यावेळी करमणुकीचे खेळ घेण्याचे काम असो, स्मरणिकेसाठी लेख लिहिण्याचे काम असो, इतरांच्या लेखांचे proof reading चे काम असो, phone callers ना वेळोवेळी सभेसाठी सर्व पेशंट्सना फोन करण्याची आठवण करणे असो, त्याच्या नोंदी ठेवणे असो, पेशंट्सच्या list updating साठी मदत करणे असो, ट्रस्टची खजिनदार म्हणून काम करणे असो, तिने ही अशी सगळी कामे अत्यंत जबाबदारीने पार पाडलेली आहेत.
तशी ती खूप शांत आणि adjustable स्वभावाची आहे खरी, पण कधीकधी तिच्या मतांबद्दल ती आग्रही असते, स्पष्टपणे बोलते. तिचे घर मोठे असल्यामुळे कित्येकदा आमच्या कार्यकारिणीच्या सभा, वार्षिक मेळाव्यानंतर श्रमपरिहाराची सभा तिच्याकडे होते. अशावेळी ती सगळ्यांना खास पदार्थ करून खाऊ घालते. सर्वांना आपल्याबरोबर घेऊन वाटचाल करणे, आपल्याला दिलेले कोणतेही काम चोखपणे पार पाडणे, सगळ्यांची आत्मीयतेने चौकशी करणे, स्वतःला माहित असलेल्या छोट्या छोट्या टिप्स् इतरांबरोबर शेअर करणे, हे तिचे गुण प्रकर्षाने अनुभवास आले आहेत. पार्किन्सन्स मित्रमंडळाशी सुरुवातीला एक शुभंकर म्हणून जोडलेले नाते तिने नंतर हळूहळू अनेक जबाबदारीची कामे - " हो मी करेन की " असे आनंदाने म्हणत म्हणत केली आहेत. कार्यकारिणी सदस्य ते ट्रस्टची खजिनदार या पदापर्यंत तिने केलेला प्रवास म्हणूनच कौतुकास्पद आहे.
इतरांप्रमाणे तिलाही एक स्त्री म्हणून घरच्या पातळीवरही अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात आणि त्याही ती समर्थपणे निभावत असते.
तिच्या मिस्टरांना म्हणजे शशिकांत देसाई यांना गेली 15 -16 वर्षे पीडीचा त्रास आहे. त्यांची शुभंकर म्हणून वावरताना वेळोवेळी देवाने तिच्या सहनशीलतेची परीक्षाच पाहिली आहे. अडचणी तरी किती वेगवेगळ्या प्रकारच्या याव्यात! भास होणे, अचानक पडणे, पडल्यामुळे झालेल्या जखमांवर टाके घालणे, असे अनेकदा घडत असते. या सगळ्या प्रसंगांना ती शांतपणे, विचारपूर्वक, योग्य तो निर्णय घेत तोंड देत असते.
जवळ जवळ गेली 5 - 6 वर्षे स्मरणिकेत लेख लिहून आपले अनुभव काही उपयुक्त सूचनांसह तिने इतरांपर्यंत पोचविले आहेत. विविध प्रकारचे भास होणाऱ्या व्यक्तीला त्या त्या वेळी समजून घेऊन, शांतपणे परिस्थिती हँडल करणे किती अवघड असते, हे ज्यांना त्याचा अनुभव आहे त्यांनाच समजेल. पण वसूने हेही शिवधनुष्य वेळोवेळी मोठ्या हिमतीने पेलले आहे. मिस्टरांचे मन गुंतून रहावे यासाठी त्यांना काही कलाकुसरीच्या वस्तू बनवायला ती प्रोत्साहन द्यायची. CD's चे वॉल हँगिंग, आरसे वगैरे लावून केलेली wooden pattern ची रांगोळी, इत्यादी त्यांनी केलेल्या वस्तू आमच्या वार्षिक मेळाव्यातील कला प्रदर्शनात ठेवल्या होत्या.
मिस्टरांच्या बाबतीतला तिचा एक निर्णय तसा धाडसी म्हणावा लागेल. त्या काळात मिस्टर देसाई खूप गप्प गप्प असायचे, नुसते बसून रहायचे. टीव्ही नाही, वाचन नाही, काही नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने काही काळ त्यांना एका डे केअर सेंटरमध्ये ठेवले होते. तिथे ते चांगले रमलेही होते. समवयस्कांबरोबर तिथल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भागही घ्यायचे. आपल्या माणसाच्या भल्यासाठी तिने घेतलेला हा निर्णय बरोबर ठरला होता.
एक शुभंकर म्हणून वसूचा रोल आदर्श म्हणावा लागेल. वेळोवेळी बद्दलत्या परिस्थितीनुसार तिने विचारपूर्वक निर्णय घेतला. गरज पडली तेव्हा 24 तास मदतनीस ठेवला. मिस्टरांच्या रोजच्या व्यायामाकडे, संध्याकाळच्या फिरण्याकडे, त्यांना आवडणारे पदार्थ करून कौतुकाने खाऊ घालण्याकडे ती विशेष लक्ष देत असते. एकंदरीत मित्रमंडळ आणि आपले घर या दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडणाऱ्या वसूमधील स्त्रीशक्तीला म्हणूनच मनापासून सलाम!
 
 

 

*स्थिर मती - वसुमती*
 
 
शब्दांकन - दीपा होनप.

No comments:

Post a Comment