Monday 11 October 2021

सविता ढमढेरे मंडळाचा आणखी एक भक्कम आधार स्तम्भ.

 

सविता ढमढेरे
मंडळाचा आणखी एक भक्कम आधार स्तम्भ.
आमच्या कडे तिची एन्ट्री हळूवार झाली. अगदी तिच्या शांत व नाजूक स्वभावा प्रमाणे. सावकाश आमच्यात मिसळू लागली. मंद , हलका , सुखद वारा असतो ना तशी.
आमच्या बहुतेक मीटिंग तिच्याकडे होऊ लागल्या. खाऊ घालण्यात अतिशय उत्साही असल्याने ते ही ती आगत्याने करू लागली.
Dr. डोळे यांनी आमच्या पेशंट साठी होमिपॅथी औषधांचा experiment करण्याची तयारी दाखवली तेव्हा वसुमती देसाई सह तिनेही आपला बंगला पेशंट तपासण्यासाठी दिला.
सहलीच्या वेळी खाण्याची पाकिटे व लागणारे इतर साहित्य तयार ठेवण्याचे काम अगदी हसत मुखाने करते.
वार्षिक मेळाव्या नंतर, पुढील सुधारणा, झालेल्या चुका, प्रगती साठी अजून काय करावे हे गप्पा मारत, खाऊ खात, चहा व कॉफी पीत श्रम परिहार करण्यासाठी सविताने तिच्या आईचे बंद असलेले घर स्वच्छ करून , तयारी करून मंडळासाठी सुसज्ज करून ठेवले होते. तो बंगला मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वांना सोईचे होईल हा तिचा हेतू होता.
सर्वात महत्वाचे म्हणजे मंडळाला तिच्या यजमानांचे खास मित्र श्री. येरवडेकर हे चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून लाभले. त्यांनी तर मंडळा कडून आज तागायत एक पैसा घेतला नाही . कर्मण्ये वाधिकरस्ते ..... असे त्यांचे काम चालले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत व सविताला किती धन्यवाद द्यावे ते समजत नाही.
आणखी एक तेवढंच मोलाचं काम तिने आपल्यासाठी केलं आहे, ते म्हणजे, तिच्या मालकीच्या एका इमारतीत एक खोली नाममात्र भाड्याने (ते ही सरकारी नियम म्हणून) तिने मंडळाच्या ऑफिस साठी दिली आहे.
मंडळ इतकं मोठं व्हावं की त्याने पार्किन्सन्सच्या शुभार्थीसाठी एक डे केर सेंटर काढावं, त्यांच्या शुश्रुषा साठी नर्सेस ना स्पेशल ट्रेनिंग द्यावं वगैरे तिची स्वप्न आहेत. देव नेहमी तथास्तु म्हणत असतो म्हणे, आम्ही तिच्या जागेच्या मंडळाच्या ऑफिस मध्ये बसून तिची स्वप्ने साकार होउदेत म्हणू, मग तो तथास्तु म्हणेल.. नक्की.
विजयालक्ष्मी (आशा) रेवणकर

No comments:

Post a Comment