Thursday 29 April 2021

पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६८

                                                 पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६८

                            आज आकाशवाणीवर सकाळी सकाळी जागतिक नृत्यदिनाच्या शुभेच्छा ऐकल्या.विशेष म्हणजे सुरुवातीला भक्ती गीते लावतात त्यात 'गणराज रंगी नाचतो' हे गाणे लागले.त्यानंतर विशेष ऐकिवात नसलेले पंत महाराज  बाळेकुंद्री यांचे 'नाचू गुरुभजनी' आणि संत एकनाथ यांचे 'विठ्ठल नाम छंदे' ही नृत्यावर आधरित गाणी लावली होती. आमचे नृत्यगुरू हृशिक्केश याच्या 'सेंटर फॉर कॉनटेमप्रररी डान्स' तर्फे फिल्म फेस्टिव्हल २५ एप्रिल पासूनच सुरु झाला आहे.तज्ञांच्या व्याख्यानाबरोबर वेगवेगळे डान्स परफॉर्मन्सही चालू आहेत.२९ एप्रिलचा नृत्यदिन आम्हाला प्रथम माहित झाला २०१० साली.

त्या आधी डान्स या प्रकाराशी आमचा पर्किन्सन्स मित्र भेटेपर्यं दुरान्वयानेही संबध नव्हता पण या आमच्या मित्रांनी अनेक गोष्टी करायला भाग पाडले.आता  शुभंकर, शुभार्थी आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ यासाठी डान्स हा महत्वाचा भाग झाला आहे.

२९ एप्रिल २०१० रोजी पुण्याच्या अर्काईव्हज थिएटर मध्ये नृत्यदिनानिमित्त ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स आणि मॅक्समुल्लरभवन यांच्या संयुक्त विद्यमाने नृत्यावरील 'व्हाय डान्स फॉर पार्किन्सन्स' नावाची पंधरावीस मिनीटाची एक जर्मन फिल्म दाखवण्यात आली.कार्यक्रमाची जाहिरात वाचून आशा रेवणकर आणि रामचंद्र करमरकर हा कार्यक्रम पाहण्यास गेले होते.सर्व तरुण, वृद्ध,स्त्री, पुरुष पीडी रुग्ण संगीताच्या तालावर कोणतीही लाज न बाळगता नाचताहेत.हे पाहून करमरकर खूपच प्रभावित झाले.पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभासदाना ही फिल्म दाखवायचीच यासाठी त्यानी आटापिटा केला.याची परिणती म्हणून ३० मे २०१० रोजी मंडळाच्या सभासदांसाठी ही फिल्म पुना हॉस्पिटलच्या आडिटोरियमध्ये दाखवण्यात आली.पाश्च्यात्य.संगीता ऐवजी भारतीय संगीतावर आधारित प्रयोग करता येईल का असा विचार झाला.
ऋषीकेशच्या मनात २००४ मधे लंडनला असल्यापासुन ही कल्पना घोळत होती.रोहिणी भाटे यांच्याकडे तो कथ्थक शिकला होता.नंतर तो कंटेंपररी डान्सकडे वळला. Palucca Schule Dresden, Germany यांच्या टिचर्स ट्रेनींग प्रोग्रॅममध्ये बोलवला गेलेला तो पहिला गेस्ट स्टुडंट होता.त्यानी जगभर प्रवास केला आणि आता भारतात येऊन पुण्यात 'ऋषिकेश सेंटर फॉर कंटेंपररी डान्स'या संस्थेची निर्मिती केली. एका नृत्यविषयक मासिकात त्यानी मार्क मोरीस डान्स कंपनी आणि त्यांच्या पीडी रुग्णावरील डान्सविषयक प्रयोगाबद्दल वाचले होते..प्रयोग करु इच्छिणारा आणि प्रयोगात सह्भागी होऊ इच्छिणारे यांची गाठ सहा वर्षानी पडत होती.एक नव्या प्रायोगिक प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली गेली.११ वर्षे हृषीकेश शुभार्थीना विना मोबदला डान्स शिकवत आहे.

 ११ वर्षे झाली.अनेक अडचणींवर मात करत शुभार्थीची पावले थिरकत आहेत.नृत्यामुळे शुभार्थीला होणारे फायदे सिद्ध झाले आहेत

.शुभार्थिंच्या स्नायुंच्या हालचालींची मर्यादा वाढली;
हालचालीच्या गतीवरील नियंत्रण सुधारले
जमिनीवरील हालचालीच्या वेळी तोल सांभाळण्यात सुधारणा झाली,
नृत्यातील हालचालीचा क्रम लक्षात ठेवण्यात सुधारणा.झाली.
बोलण्यातील स्पष्टपणा आणि आवाजाच्या पातळीत वाढ झाली.
काही पेशंटचा औषधाचा डोस २५%नी कमी झाला. आत्मविश्वास वाढणे,नैराश्य कमी होणे,सकारात्मकता वाढणे या गोष्टीही झाल्या.कोरोना काळातही डान्स क्लासमध्ये  व्यत्यय आला नाही.उलट ऑनलाईन क्लास सुरु झाल्याने परगावचे शुभार्थीही सहभागी होत आहेत.जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या प्रत्येक मेळाव्यात शुभार्थींचे नृत्य आकर्षण ठरत आहे.पाहुणे म्हणून आलेले न्यूरॉलॉजिस्ट,न्यूरोसर्जन,मनोविकारतज्ज्ञ यांच्याकडून हृशिकेशला शाब्बासकी मिळाली आहे.सहभागी शुभार्थी आणि शुभंकरांसाठी तर तो देवदूतच आहे.

 डान्स हा उपचार न राहता  आता आनंदासाठी डान्स या विचारापर्यंत हृषिकेशने शुभार्थीना आणले आहे.बाय प्रोडक्ट्स म्हणून फायदे होतच आहेत.ऑनलाईन डान्स सुरु झाल्यावर सहभागी झालेल्या शुभदा गिजरे क्लासमध्ये सांगत होत्या.माह्या डॉक्टरनी गोळ्या कमी केल्या डान्सक्लास सोडू नका सांगितले.नुकत्याच झालेल्या ११ एप्रिल २०२१ च्या पार्किन्सन्सदिन मेळाव्यात अनेक शुभार्थीनी डान्सपासून झालेले फायदे आणि हृषीकेशबद्दल कृतज्ञता भरभरून व्यक्त केली. हृषिकेशने  शुभार्थीना .आम्ही डान्सर आहोत असे वाटायला लावले आहे.

जागतिक नृत्यदिनाच्या हृषिकेश, त्याच्या सर्व सहकार्यांना आणि शिष्याना शुभेच्छा! 

(पार्किन्सन्स मित्रमंडळ एक प्रयोगशाळा या लेखात विस्ताराने याबाब लिहिले आहे.त्याची लिंक सोबत देत आहे)

https://parkinson-diary.blogspot.com/2014/01/2.html


                          

No comments:

Post a Comment