Friday 23 April 2021

क्षण भारावलेले - १५ भाग २

 

                                                              भाग  २
                                                      क्षण भारावलेले - १५
 
 
वेबसाईटमुळे मंडळाचा चेहरा मोहरा बदलणे,मंडळाच्या उद्दीष्टपुर्ततेचा वेग वाढणे हे सर्व आज वेबसाईट सुरु झाली आणि लगेच झाले असे नाही. वेबसाईट ची भूमिका कॅटलिस्ट ची राहिली.
सुरुवातीला पार्किन्सन्स मित्रमंडळ, पार्किन्सन्स विषयी माहिती होती मग काही जुन्या स्मरणिकेतील लेख काही नवीन लेख घातले गेले. प्रत्येक महिन्याचे वृत्त येऊ लागले. यापूर्वी वर्षभराचे वृत्त एकदम स्मरणिकेत येई त्यामुळे ते थोडक्यात द्यावे लागे. वेबसाईट मार्फत सभेस उपस्थित राहू न शकणाऱ्या, परगावच्या लोकांपर्यंत वृत्त पोचते त्यामुळे सविस्तर वृत्त दिले जाऊ लागले. दर महिन्याच्या सभेचे भरपूर फोटो टाकले जाऊ लागले त्यामुळे मासिक सभा, सहल या सर्वांचे भरपूर फोटोही घेतले जाऊ लागले यापूर्वी फक्त जागतिक पार्किन्सन्स मेळाव्याचे फोटो काढले जात आणि फक्त सभेला येणाऱ्या लोकांना ते दाखवले जात. आता फोटो आणि सविस्तर वृत्तामुळे ते वाचणार्या, पाहणाऱ्या सर्वांना पाहता येऊ लागले.एक फोटो पानभर लेखातून व्यक्त होणार नाही इतके सांगून जातो.ते पाहणार्यांना
आपण सभेस हजर आहोत असे वाटू लागले. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या लोकांना एकातरी सभेला उपस्थित रहावे असे वाटू लागले बेळगावच्या आशा नाडकर्णी, नाशिकच्या संध्या पाटील, नागपूरची मीनल दशपुत्र आणि जोशी दांपत्य, औरंगाबादचे तिळवे दाम्पत्य,नांदेडचे नांदेडकर,चिपळुणचे करोडे अशा अनेकांनी मासिक सभांना उपस्थिती लावली,
वेबसाईटवर काय काय करता येईल याबाबत आम्ही अगदीच अनभिज्ञ होतो अतुलनेच विविध गोष्टी सुचविल्या.त्यांनी मोबाईलवर पाहता येईल असे सुटसुटीत डिझाईन केले.शुभंकर नावाने appही केले पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यातील स्मरणिकेची पीडीएफ फाईल वेबसाईटवर टाकली जाऊ लागली.पुण्यात स्मरणिकेचे सभेत प्रकाशन होत असतांना त्याचवेळी वेबसाईट वरही प्रकाशन होऊ लागले.
सभा संपवून आम्ही घरी जाण्यापूर्वी अगदी अमेरिकेतील व्यक्तीनेही ती वाचलेली असायची. स्मरणिका पोस्टाने पाठवली तरी सर्वांना पोहोचत नसे. आता वेबसाईटमुळे कोणीही केव्हाही पाहू शकते. इंटरनेट न वापरणाऱ्यांना त्यांची मुले नातवंडे स्मरणिकेचे प्रिंटआऊट काढून देऊ लागले. अतुलने आपण तज्ज्ञाच्या भाषणांच्या व्हिडिओची लिंक देऊ शकू असे सांगितल्याने प्रोफेशनल व्यक्तीकडून जागतिक पार्किन्सन्स मेळाव्याचे व्हिडिओ घेतले जाऊ लागले. त्यातून यूट्यूब चानल बनवले गेले.
नवीन स्मरणिका वेबसाईटवर आल्या पण जुन्या चे काय? त्यावरही आतुलनी उपाय सुचवला लेख स्कॅन करून वेबसाईटवर टाकावे असे ठरले. आता वेबसाईट पार्किन्सन्स मित्र मंडळाची अर्काइव बनली आहे. काम आधीही करत होतो पण ते आता जगभर पोचले. अनेकांच्या कडून आपण होऊन देणग्या येऊ लागल्या.
स्मरणिकेत वर्षभरातील कामाचे फोटो टाकले जाऊ लागले. वेबसाईटवर सर्व फोटो उपलब्ध असल्यांने फोटोंची निवड सोपी झाली.
वेबसाईटचे काम मीच पहात असल्याने माझ्या आजारपणाच्या काळात महिन्याच्या सभेच्या वृत्तांता शिवाय काही जात नव्हते यावेळी अतुल ने पुढाकार घेतला.
येथे एक गोष्ट सांगावी लागेल अतुल ठाकूर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आहेत त्यांच्यातील संशोधकाला शुभंकर, शुभार्थी, त्यांच्या समस्या अनुभव, आनंद, दुःख कला या सर्वांसह येथे भेटतात. स्वमदत गटाचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व समजते. अतुल ठाकूर यांचे संशोधनातून निघालेले निष्कर्ष तपासले जाऊन त्याचे सिद्धत्व लक्षात आल्याने त्यांना वेगळे समाधान मिळत असावे. या काळात अतुल नी सर्वांना अनुभवाचे बोल, कवितेचे पान, कलादालन, अन्न हे पूर्णब्रम्ह असे विविध विषय दिले आणि वेबसाईट वर ते टाकण्याचे आश्वासन दिले. अनेक शुभंकर, शुभार्थी लिहिते झाले त्यांचे अनुभव, कला लोकांपर्यंत आले. इतक्या दिवसात मलाही हे जमले नव्हते.
अतुल लेख लिहिताना आमचे पार्किन्सन्स मित्र मंडळ म्हणतात ते फार छान वाटते. ते आमच्या परिवारातले आहेत यावर शिक्कामोर्तब होते.
Lock down च्या काळात तर अतुलनेच पार्किन्सन्स मित्र मंडळ कार्यरत ठेवले. तंत्रज्ञानात अनभिज्ञ असणारे आम्ही काहीच करू शकलो नसतो. अतुलने व्हिडीओ कॉन्फरन्स ची कल्पना मांडली त्यासाठी तीन-चार ट्रायल मिटिंग झाल्या आणि आता दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्स होते अतुल होस्ट असतात.परगावचे लोकही उपस्थित राहू शकतात. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सचे रेकॉर्डिंग यूट्यूबवर टाकून त्याची लींक वेबसाईटवर दिली जाते.
उमेश सलगर यांनी Lock down च्या काळात गाण्याचे कार्यक्रम केले. त्यांना प्रवृत्त करण्याचे काम अतुलने केले.
स्मरणिकेच्या वेब एडिशनच्या प्रकाशनाचा उत्साह आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त होता.
एरवी प्रत्यक्ष
प्रकाशनात प्रकाशन करणारे बांधलेल्या पुस्तकांची रीबन कापतात
येथेही त्यांनी अशीच सुंदर रीबनची फिरत केली.तिच्यावर क्लीक केले की स्मरणिका दिसणार होती.
त्यांना आता अनेकजण नावासकट माहित आहेत ते त्यांची अगत्याने चौकशी करतात
पुर्वी सभेला येणाऱ्यांनी पार्किन्सन्सला स्वीकारलेले नसायचे.कारण अज्ञान आणि त्यातून निर्माण झालेली भीती आता मात्र सभेला येण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत वेबसाईट वरील पार्किन्सन्स बाबत माहिती पोचलेली असते काहीजण तर वेबसाईटवरील मंडळाची माहिती पाहूनच मंडळात सामील होतात. आता येणारे शुभार्थी पार्किन्सन्सला स्वीकारूनच आलेले असतात.
यापुर्वी सभेला प्रथम येणारे शुभार्थी पार्किन्सन्सला स्विकारता न आल्याने भाऊक होऊन रडायचे.त्यांना समजवावे लागायचे.आता ती परीस्थिती राहिली नाही.अज्ञान दूर झाले त्यामुळे भिती गेली आणि स्वीकार सोपा झाला.
अतुल ची मदत अशी विविध मार्गाने मंडळाला उपयुक्त ठरली. अतुल खूप भीडस्त आहेत. त्यांचे असलेले हे श्रेय त्यांना दिले तरी ते अवघडून जातात.मंडळांने त्यांना संधी दिली,विश्वास दाखवला,याचेच त्यांना अप्रूप वाटते.
मी त्यांना एकदा विचारले 'या व्यवहारी जगात असे मोफत काम तुम्हाला का करावेसे वाटते?' त्यांचे उत्तर त्यांच्याच शब्दात.
'लहानपणापासून एकाकीपणाची भावना फार प्रबळ आहे. त्यामुळे माणसांच्या प्रेमाची भूक आहे अाहे असं वाटतं. मदत केली की माणसं जोडली जातात. कुठेतरी तुमच्यासारखी खुप प्रेम करणारी माणसं मिळतात. हे एक महत्वाचं कारण. दुसरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला पैसा लागण्याच्या या काळात आपण निदान एक गोष्ट विनामोबदला करावी असं वाटतं. मानसिक समाधानासाठी.'
अतुलच्या कामामुळे आम्हाला मिळालेले समाधान अतुलच्या समाधानपेक्षा
शतपटीने जास्त आहे. लॉकडाउनच्या काळात तर मंडळासाठी ते देवदूतच ठरले.
एका क्लिक मध्ये माहितीचा खजिना शुभंकर शुभार्थींना पाठवताना होणारे आत्मिक समाधान खूप मोठे आहे आणि हे क्लिक करताना अतुल बद्दलच्या अपार कृतज्ञतेने मन भरून येते. अतुल तुम्ही कायम आमच्या बरोबर आमच्यासाठी राहा. खात्री आहे राहालच.
-
पहिला भाग वाचून आमच्या शुभंकर, शुभार्थींनी अतुलचे भरभरून कौतुक केले.आपल्यात साधेपणाने वावरणारी ही व्यक्ती नेमकी काय आहे हे त्यांना प्रथमच समजत होते.भुषणा भिसे या शुभार्थींनी कृतज्ञता म्हणून स्वता बनवलेले पेंटींग भेट दिले.त्याचा फोटोही येथे देत आहे
 
 

 

No comments:

Post a Comment