Thursday 23 August 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - २२


                            श्री. अतुल ठाकुर ह्यांनी त्यांच्या एका लेखात, त्यांच्या एका बरेच दिवस गंभीर आजारी असलेल्या नातेवाईकांचा उल्लेख केला होता. पुढे त्या रुग्ण नातेवाईकाची सेवा करता करता त्या नातेवाईकाच्या पत्नीलाच अचानक अर्धांगवायूचा झटका आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. 

                            ब-याच वेळा असे होते की, रुग्णाची काळजी घेताना शुभंकर, म्हणजेच केअरटेकर इतके व्यग्र होऊन जातात की, त्यांच्या स्वत:च्या तब्येतीकडे, स्वास्थ्याकडे त्यांचे संपुर्ण दुर्लक्ष होते. हे चित्र मी पार्किन्सन्सच्या शुभंकरांच्या बाबतही अनेक वेळा पाहिले आहे. मुळात पार्किन्सन्स हा ज्येष्ठ नागरीकांना होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शुभंकरही ब-याचदा वयस्कर असतात आणि ते स्वत:देखिल वेगवेगळ्या व्याधी किंवा आजारांनी ग्रासलेले असतात. पण त्या व्याधींकडे, आजारांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मग असे अनावस्था प्रसंग ओढवतात. 

                       पार्किन्सन्सच्या गटात काम करताना मला अशी अनेक उदाहरणे आढळली.  एका शुभार्थीच्या पत्नीचा कर्करोग अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत लक्षातही आला नाही आणि शुभार्थीच्या आधी त्या कालवश झाल्या. आणखी एक उदाहरण शुभंकराला  अचानक हृदयविकाराचा झटका आला. कदाचित वेळच्यावेळी तपासण्या केल्या गेल्या नसाव्यात किंवा वर म्हणाल्याप्रमाणे शुभार्थीचे करता करता शुभंकरांकडून स्वत:ची पुरेशी काळजी घेतली गेली नाही. 

                                 ह्या प्रातिनिधिक उदाहरणांवरून स्वत:कडे व्यवस्थित लक्ष देणे आणि त्यासाठी स्वत:ला पुरेसा वेळ देणे, ह्या बाबी शुभंकरांनी आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजेत. स्वत:चे आजार, स्वत:चे मानसिक ताण ह्यासंदर्भात स्वत:ची नीट काळजी घेतली जायला हवी. 

                                 आपली स्वत:ची आणि त्याचवेळी शुभार्थीची तब्येत जपण्यासाठी काही कल्पक उपाय योजता येतात. आमच्या ब-याचशा शुभंकरांनी असे उपाय शोधलेले आहेत. मात्र असे उपाय योजताना त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे येतात. पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही तुमच्या शुभार्थीचा पार्किन्सन्स नीटपणे समजून घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या शुभार्थीचा पार्किन्सन्स एकाच अवस्थेत रहाणार नाही आणि त्याचे टप्पे सातत्याने बदलत रहाणार आहेत ह्याची जाणीव ठेऊन, कोणत्या वेळी तो कोणत्या टप्प्यावर आहे ह्याचे बारकाईने निरिक्षण करत रहाणे, त्या बदलणा-या अवस्थांनुसार आपले पर्यायदेखिल बदलत रहाण्याची खबरदारी घेणे. हे सर्व समजण्याची कुवत शुभंकरांमध्ये असली पाहिजे. 

                             असे होऊ शकले तर शुभार्थी, शुभंकर आणि कुटुंबिय, अशा सर्वांनाच पार्किन्सन्ससह जगणे सोपे होते. गप्पांच्या आधीच्या एका भागामध्ये मी वंदनाताई नानावटींबद्दल लिहीले होते. त्यांच्याबाबतीत मला हे दोन महत्त्वाचे मुद्दे प्रकर्षाने जाणवले. एकतर त्या स्वत:ला स्पेस, वेळ पुरेसा देतात आणि दुसरे म्हणजे, त्यांनी स्वत:च्या पतीचा पार्किन्सन्स उत्तमपैकी जाणून घेतला आहे. पतीच्या पार्किन्सन्समध्ये झालेल्या बदलांनुसार वंदनाताईंनी स्वत:मध्येही बदल केले आहेत. 

स्वत:मध्ये अशा जाणूनबुजून घडवून आणायच्या बदलांविषयी आपण आता पुढच्या गप्पांमधे बोलू. 

शब्दांकन - सई कोडोलीकर.

अधिक माहितीसाठी  :

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.

Parkinson's Mitramandal, Pune(https://www.youtub


No comments:

Post a Comment