Sunday 12 August 2018

पार्किन्सन्सविषयक गप्पा - २१


                           
                     पार्किन्सन्सविषयक गप्पा - २१
                            जुन्नरच्या शुभंकर वंदना नानावटी पुण्यात आल्या की वेळात वेळ काढून ५ मिनिटे तरी भेटून जातात.कधी स्मरणिका पोचली सांगायला,कधी देणगी द्यायला,कधी शंका विचारायला कधी मन मोकळे करायलाही.मला त्यांचे नेहमीच कौतुक वाटते. सातवी पर्यंत शिक्षण झालेल्या वंदना  ताईनी त्यांच्या पतीच्या पीडीला छान समजून घेतले आहे.त्यांच्या न्यूरॉलॉजीस्टनी दिलेली माहिती,आमच्या स्मरणिका, पुस्तके, संचारचे अंक हे लिखित साहित्य हे त्यांच्या माहितीचे स्त्रोत आहेत.हे सर्व साहित्य मराठीतून आहे.शेखर बर्वे यांचे' पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत हे पुस्तक ' शुभंकर, शुभार्थीसाठी गीता, बायबल म्हटले तरी हरकत नाही. विजयालक्ष्मी रेवणकर यांनी रुपांतर केलेले' पार्किन्सन्स विषयक मौलिक सूचना ' हे पुस्तक शुभार्थीचे  दैनंदिन जीवन सुखकारक होण्यासाठी मोलाचा सल्ला देणारे आहे.ही दोन पुस्तके पूर्ण वाचली तरी शुभंकर,शुभार्थी निर्भय, निश:न्क होऊ शकतात.वंदनाताई  हे सर्व मनापासून  वाचतात.समजून घेतात.आचरणात आणतात.
                         त्यांना मुलबाळ नाही.परंतु त्यांची सपोर्ट सिस्टीम भक्कम आहे.दीरजाऊ,पुतणे अशी सासरची आणि भाऊ, भावजया, भाचरे ही माहेरची माणसे, शेजारी पाजारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोणाचा उगाच गैरफायदा घ्यायचा नाही.पण अगदी मदत लागली तरी भीड करायची नाही असा त्यांचा खाक्या आहे.जुन्नरहून वेळोवेळी आपल्या पतिना त्या पुण्याला  न्यूरॉलॉजीस्टना दाखवायला आणतात.त्यांच्या पतीला चालायला त्रास होतो. वजन ही जास्त आहे.दोन चार किलोमीटरवर न्यूरॉलॉजीस्ट असून वर्ष वर्षभर आपल्या शुभार्थीना न्यूरॉलॉजीस्टकडे न नेणारे कुटुंबीय पाहता मला त्यांच्या कृतीला  दाद द्यावी असे वाटते.सुरुवातीला त्या बसनी यायच्या.पण आता बसमधून पतीना उतरवणे,त्यांना थांबऊन रीक्षा पाहणे त्यांना कठीण होऊ लागले.आता दिराकडे त्या गाडी आणि ड्रायव्हर मागतात. यापूर्वीही भाऊ,दीर त्यांना गाडी देऊ करायचे पण जोपर्यंत झेपले तोपर्यंत त्यांनी ती नाकारली.
            पतीचे वय ८० वर्षे,वंदनाताईंचे ७९ वर्षे.त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या तब्येतीच्या  तक्रारी आहेतच.त्या स्वत:च्या तब्येतीचीही काळजी घेतात स्वत:ला वेळ देतात.पतीची पूजा वगैरे १ तास चालते. तेवढ्यात त्या फिरून येतात. पतीला ही सक्तीने थोडे चालायला लावतात.कितीही वेळ लागला तरी जेवण्यासाठी टेबलपर्यंत यायला लावतात.या सर्वाबरोबर त्या त्यांच्या जैन धर्मियांच्या पाठशाळेत स्तोत्रे शिकवायला,संस्कार वर्ग चालवायला जातात.हे काम त्या अनेक वर्षे करीत आहेत. आदर्श शुभंकर म्हणून त्यांचे कौतुक वाटते.आदर वाटतो तसेच त्यांच्याबाबतचा अनुभव अनेक निराशाजनक अनुभवावर उत्तम उताराही आहे.आपण केलेल्या  कामामुळे एक व्यक्तीला जरी पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यास मदत झाली आहे हे समजल्यावर कामाचा उत्साह वाढतो. 
                            
               
                            

No comments:

Post a Comment