Thursday 22 June 2017

पार्किन्सन्स मित्रमंडळात तरुणाई



                                   

      ८ जूनच्या सभेला सविता,शरच्चंद्र पटवर्धन, दीपा,अजित कट्टी,आशा रेवणकर, श्यामाताई,व्ही.बी.जोशी, प्रज्ञा जोशी अशी खंदी कार्यकर्ती मंडळी वेगवेगळ्या  कारणाने अनुपस्थित असणार  होती.इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची अनुपस्थिती प्रथमच होती.अशातच कमिन्सच्या  इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी शर्वरीचा फोन आला.काकू, आम्हाला चौघींना तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी यायचे आहे.आणि सर्वाना काहीतरी खायला पण आणायचे आहे.मी तातडीने तिला म्हटले आजच सभा आहे या.यानंतर पुन्हा महिन्यांनीच सभा असेल.आणि चारलाच या. आम्हाला मदतीची गरज आहे.या चौघींना म्हणजे देवयानी आणि गौरी कुलक र्णी,मृगाली भट,शर्वरी इनामदार याना जानेवारीच्या १७ च्या सुरुवातीला डॉक्टर विद्या काकडे आमच्याकडे घेऊन आल्या होत्या.घाबरतच आमच्यापर्यंत पोचलेल्या त्या थोड्याच दिवसात  आमच्या परीवारातल्याच झाल्या.त्यानी परीक्षेचा भाग म्हणून प्रकल्पासाठी कंप मोजणारे App केले होते.यासाठी शुभार्थिंची मदत हवी होती.
   .या Appद्वारे कंप पार्किन्सन्सचेच आहेत का  हे समजू शकणार होते..पीडी असणाऱ्यांचाही कंप केंव्हा कमी होतो, केंव्हा जास्त होतो हे मोजता येणार होते आणि शुभार्थीना कोणताही त्रास न होता कंप मोजता येणार होता.शुभार्थींच्या घरी  जाऊन त्यांच्या ऑफ पिरिएडमध्ये त्या  हे काम करणार होत्या.जानेवारीच्या सभेत त्यांनी याबद्दल माहिती सांगितली.लगेच प्रयोगाला सुरुवातही झाली.शुभार्थींच्या मदतीमुळे प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला. यानंतर त्यांनी या प्रयोगावर आधारित  ICCSP conference on signal processing,Chennai 2017 साठी रिसर्च पेपर पाठविला. त्याची निवड झाली आणि तेथे त्याचे कौतुकही झाले.त्यामुळे त्या खुश होत्या.
 ८ जूनच्या सभेत त्या  त्यांच्या प्रकल्पाला शुभार्थिनी मदत केली,विश्वास दाखविला यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आल्या होत्या.जानेवारी १६ च्या सभेत त्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगण्यासाठी आल्या तेंव्हा शुभार्थिंचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल असे त्यांना वाटले नव्हते.पण प्रत्येक शुभार्थिंनी मनापासून त्यांना प्रयोगासाठी हवा तेवढा वेळ दिला.पीडी सारख्या आजाराला झेलत आनंदी राहणाऱ्या शुभार्थिंकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली असेही त्यांनी सांगितले.सर्वांच्या विनंतीवरून आपल्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. त्यांनी तयार केलेल्या  App चे प्रात्यक्षिक दाखवले.त्यांनी सर्व शुभार्थिंसाठी स्वत: तयार केलेली भेटकार्डे आणली होती.त्यादिवशी वट पोर्णिमा होती.कदाचित काहींचा उपवास असेल म्हणून वेफर्स,बर्फी आणली होती.त्यांना वाटणारी कृतज्ञता आणि आनंद त्यांच्या देहबोलीतूनही जाणवत होता.भेटकार्डातून व्यक्त होत होता.
 त्यातील दोघी आता एमएस करण्यासाठी अमेरिकेत जाणार होत्या.हाच प्रयोग आणखीन पुढे नेण्यासाठी कमिन्स कॉलेजच्या पुढच्या batch च्या विद्यार्थिनी येणार आहेत.होमिओपॅथी,फिजिओथेरपी, स्पीच थेरपी अशा विविध शाखांच्या तरुण, तरुणी अभ्यासासाठी मंडळात येत असतात. शुभार्थींच्या जीवनात काही क्षण आनंदाचे जातात.आम्ही प्रयोगासाठी उपयोगी पडलो ही भावनाही असतेच.संशोधनाच्या अवकाशात हे नगण्य असेलही, पण शुभार्थीना मात्र असे छोटे छोटे क्षण पीडीसह आनंदी राहण्यासाठी महत्वाचे असतात.
धन्यवाद देवयानी,गौरी, मृगाली,शर्वरी.पुढील कार्यासाठी खूपखूप शुभेच्छा!

1 comment:

  1. Kaku, tumhala khup motha thank you tumhi evadhi madat keli, tumchya sagalyanshivay amcha project nasta jhala!

    ReplyDelete