Monday 5 June 2017

आठवणीतील शुभार्थी - अरविंद वेतुरकर

                                     पार्किन्सन्स हा वृद्धांचा आजार असाच सर्वसाधारण समज असतो परंतु घरभेटी करायला सुरुवात केल्यावर तरुण वयात पीडी झालेले अनेकजण भेटत गेले.कै.अरविंद वेतुरकर हे त्यातील महत्वाचे नाव. लहान वयात पीडी झालेल्या सर्वाना मी त्यांचे उदाहरण देते.ते सभेला दोन तीन वेळाच पत्नी आणि मुलीसह आले. सभा गुरुवारी आणि ते नोकरी करायचे. त्यामुळे सुट्टी नसायची.मी मुलीकडे गेले की,औंध रोडच्या त्यांच्या घरी मात्र आवर्जून जायची.मला त्यांच्या पीडीसह जगण्याचे खूप कुतूहल होते'so what' असा त्यांचा attitude असायचा.पीडी त्यांच्या खिजगणतीतच नाही असे ते वागायचे.३६ व्या वर्षी त्यांना पीडी झाला.पिडीचे निदान झाले तरी कितीतरी दिवस पत्नीलाही सांगितले नाही.तिला एकदा फाईल दिसली आणि समजले.सात वर्षापूर्वी आम्ही त्याना प्रथम भेटलो तेंव्हा ते ५६ वर्षांचे होते.म्हणजे पीडी होऊन २० वर्षे झाली होती.मंडळाकडून गेलेली पत्रे, वृत्तपत्राची कात्रणे त्यांनी  एका फाईलमध्ये व्यवस्थित जपून ठेवलेली होती.डिफेन्समध्ये स्टोअर सुप्रीडेंट म्हणून ते काम करत होते.त्यांच्या मते काम फार कष्टाचे  नव्हते.नोकरीसाठी पुणे तळेगाव असे रेल्वेने अप डाउन करत होते.घरापासून स्टेशनपर्यंत बसने जायचे.घर दुसऱ्या मजल्यावर.लिफ्टची सोय नाही तरी अनेकवेळा जिना चढ उतार करायचे.भाजी,सामान यांच्या भरलेल्या पिशव्या घेऊन चढताना मी त्यांना पाहिले आणि मला आश्चर्यच वाटले.कारण त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना हे शक्य आहे असे वाटायचे नाही.डिस्कायनेशिया म्हणजे अनैच्छिक हालचाली हा त्यांना होणारा त्रास दिसायचा.त्यांच्या मनोबलावरच ते कामे करायचे.बऱ्याच पेशंटना पीडी पेक्षा कमकुवत मनच जास्त अधू करते.ते कणखर असले तरी पत्नीला मात्र खूप काळजी वाटायची.पण ही काळजी करणारी पत्नी कर्क रोगाने त्यांच्या आधीच निवर्तली. मुलीचेही लग्न झाले.आता ते एकटेच राहत होते स्वयंपाकाला बाई ठेवली होती.
                               असे एकटे राहणारे शुभार्थी इतरही आहेत त्यावर लेख लिहावा असे मला वाटले.तसेच   अमेरिका, इंग्लंड येथील सपोर्ट ग्रुपच्या शुभार्थिंचे अनेकवेळा आशावाद निर्माण करणारे व्हिडीओ असतात. वेतुरकरांचा असा व्हिडिओ घ्यायला हवा असे मला नेहमी वाटायचे.आता माझ्याकडे स्मार्ट फोन होता त्यामुळे हे शक्य होते.
                               त्यांचा फोन बरेच दिवस लागत नव्हता.यादी अपडेट करण्याचे काम शरच्चंद्र पटवर्धन करतात.ज्यांचे  फोन लागत नाहीत.अशा सर्वाना त्यांनी पत्रे पाठवली त्याचेही उत्तर आले नाही.यात बरेच दिवस गेले. मुलीकडे गेल्यावर मी नेहमीपणे त्यांना भेटायला गेले.जिने चढून जाण्यापूर्वी तेथे असणाऱ्या दुकान मालकाकडे चौकशी करायचे ठरवले.ते त्यांचे मित्र होते.'भाभी अरविंद भाईना जाऊन दोन महिने झाले ते पडले. ऑप्रेशन झाले. मुलीनी मुंबईला नेले होते' अशी माहिती त्यांनी सांगितली मला एकदम शॉकच बसला.
मला यायला उशीर झाला होता.माझ्या मनातील अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले.                  

No comments:

Post a Comment