Tuesday 1 November 2016

अंतर्बाह्य उजळूया.

 दिवाळी संपली.फराळ करणे,फराळाची देवाण घेवाण,आकाशकंदील,रांगोळ्या,पणत्या लावणे,भेटीगाठी, हसण-णे खिदळणे आणि फॉरवर्डेड का असेना मेसेज पाठवणे.हे सर्व झाले.परदेशातील नातेवाईक,सैन्य दलातील जवान यांच्यापर्यंत आनंद पोचवण्याचाही आपण प्रयत्न केला.अगदी आनंदी आनंद.हे सर्व ओसरताना गुरु ठाकुर यांच्या कवितेतील
"बाहेर आहे झगमगाट
उजळलाय सारा गाव
आतल्या अंधारच काय?
तिथे एक दिवा लाव."
या ओळी रेंगाळत राहिल्या.थोड आत डोकावूयात का? पार्किन्सन्स शुभंकर शुभार्थींचा विचार करता मला जाणवलं,दिवा लावण्यासाठी आपल्याला पणती,निरांजन काही तरी हवे. ते म्हणजे  पार्किन्सनचा  स्वीकार.तो  तर मंडळातल्या सर्वांकडे आहेच असे मला तरी वाटते. नसेल  तर  आधी मिळवणे महत्वाचे.डॉक्टरांचा सहानुभाव,शुभंकराच प्रेम,आधार,काळजी घेणे या सर्वाच तेल,पार्किन्सन्स विषयीच्या यथार्थ माहितीची वात, आजारावर मात करून स्वत:च जीवन उजळविणाऱ्या अनेकांकडून स्फुल्लिंग घेऊन तुमच्यापर्यंत पोचविणाऱ्या,आत्मविश्वास,दिलासा देणाऱ्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काडीचे माध्यम असेल.यामुळे आतला अंधार नक्कीच दूर होईल.सर्वांच्या एकत्रित प्रकाशात नवीन सामील होणाराही सुरुवाती पासूनच प्रकाशित होईल.
आता पुढची पायरी.आपलेच दु:ख गोंजारत न राहता.
"नेणिवेच्या दारावर
जाणीवेच्या पारावर
जिथे जिथे असेल वाव
तिथे एक दिवा लाव."

No comments:

Post a Comment