Thursday 17 November 2016

तुम्हीही बना रोल मॉडेल



तुम्हीही बना रोल मॉडेल
                                गोपाळ तीर्थळी
“You are role model for P D Community”
श्री.श्रीकांत शेट्यें या शुभार्थीनी इ-मेल मधून लिहिले होते, मी शुभंकर-शुभार्थींना वाढदिवसाची पत्रे लिहायला लागल्यापासून फोनवर प्रत्यक्ष भेटीत याच आशयाचं बरेच जणांनी सांगितले. याशिवाय आश्विनी हॉटेलमधल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यक्रमात परस्पर शेअरींग चालू होतं. श्री. करमरकरांनी गोपाळराव पहा ह्यांना पाहिल्यावर पार्किन्सन्स आहे असे वाटते का? असा सवाल केला. माझे अनुभव सांगण्याची विनंती केली. मी लेखातून ते सविस्तर सांगत आहे. प्रत्येक शुभार्थी रोल मॉडेल बनू शकेल इतकं साधं सोप आहे.
मी पार्किन्सन्ससह आनंदी असण्यात आणि माझा पी.डी. नियंत्रणात असण्यात माझे मते
औषध उपचार २५%
मी स्वत: ३५%
शुभंकर (केअरटेकर) ४०% असा वाटा आहे.
सुरुवातीच्या काळात अज्ञानामुळे मी औषधोपचार उशिरा सुरु केले. पार्किन्सन्स मित्रमंडळात सामील झाल्यावर तज्ञांच्या व्याख्यानातून आणि इतरांच्या अनुभवातून गैरसमज दूर झाले. दर ३ महिन्यांनी मी न्युरॉलॉजीस्टकडे जातो. त्यांनी सांगितलेली औषधं घेतो. सुरुवातीला मी औषधाच्या वेळा पाळायचो नाही. डॉ. राहूल कुलकर्णींच्या व्याख्यानातून औषधाची वेळ पाळणे किती महत्त्वाचे आहे ते समजले, डॉ. संजय वाटवेंच्या व्याख्यानातून औषधाच्या गोळ्या आनंदाने घेतल्यास त्यांचा उपयोग चांगला होतो हे समजले. कंप, मंदगती, हस्ताक्षरात बदल, बोलण्यात थोडा प्रॉब्लेम ही माझी पी. डी. ची लक्षणे आहेत. औषधेपचाराबरोबर इतर ही उपायांनी ती आटोक्यात आहेत. गेल्या ३/४ वर्षात माझा औषधाचा डोस बदलला नाही.
इतर उपचार म्हणजे काय करतो? तर सर्वात प्रथम मी मला पार्किन्सन्स झाला आहे याचा बाऊ न करता त्याचा स्वीकार करून त्याचे बरोबर राहाणे पसंत केले. त्याच्यातील उणिवा न शोधता त्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टी देखील शोधल्या. पूर्वीची लाइफ स्टाइल बदलून पार्किन्सन्सला जुळणारी लाइफ स्टइल आत्मसात केली. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कुणीतरी आहे हे विसरावयाला पाहिजे. पी.डी.मुळे मला छोट्या छोट्या गोष्टींना वेळ लागतो. पण तरीही मी शक्यते स्वत:च्या गोष्टी स्वत: करतो. गरज वाटल्यास मदत मागायला लाजत नाही. माझे हस्ताक्षर बदलले आहे. बरेच शुभार्थी या गोष्टी मनाला लावून घेताना दिसतात याने काही साध्य होत नाही. वापरा नाही तर गमवा हे सूत्र माहित असल्याने मी ह्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी ५.३० ला उठून ६.३० पर्यंत सगळे प्रात:र्विधी आवरतो. आणि चैतन्य हास्य परिवारला जातो. त्यानंतर दोन अडीच कि.मी. चालून येतो. बोलणे सुधारावे म्हणून रोज संध्याकाळी रामरक्षा, स्तोत्र म्हणतो, नंतर ओंकार, प्राणायाम, मेडीटेशन या सर्व गोष्टी औषधा एवढ्या सातत्याने करतो.
पी. डी. ला मित्र बनविल्याने मला त्याची लाज वाटत नाही. सर्व कौटुंबिक कार्यक्रमाला, सामाजिक कार्यक्रमाना, सवाई गंधर्व सारख्या कार्यक्रमांना ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य परिवार यांच्या सहलीला नॉर्मल माणसाइतके सहजपणे जातो.
हस्ताक्षराबाबत मी काहीतरी लिहिण्याचे ठरविले पण ते केले जात नव्हते. मग मला माझ्या पत्नीने वाढदिवसाला शुभंकर, शुभार्थींना पत्रे पाठविण्याचा मार्ग सुचविला. मला हे करण्यात आनंद मिळतो. इतरांना आनंद वाटता येतो. या पत्रावर स्केचपेनने डिझाइन काढताना माझे मन रमते आणि हळूहळू कंप देखील थांबतात आपणच असे स्वत:च्या आवडीनुसार, स्वभावानुसार छोटे छोटे मार्ग शोधायला हवेत.
अनेक शुभार्थींच्या घरी मी गेलो आणि जातो पण घर भेटीत माझ्या अनुभवाचा त्यांना फायदा होतो. याचा मला आनंद होतो. तसेच अनेक शुभार्थींकडून प्रेरणाही मिळाली. शुभार्थी कसा नसावा हेही समजत गेले. त्यांच्या प्रमाणे दोष माझ्यात नाहीत ना हे आत्मपरिक्षण करू लागलो त्याचाही मला फायदा झाला हे सर्व शक्य झाले ते अनेक शुभंकरांच्या पाठींब्यामुळे.
शुभंकरात सर्वात पहिले स्थान पार्किन्सन्स मित्रमंडळाचे, इथे येण्यापूर्वी आम्ही पती पत्नी दोघेही नैराश्याने घेरलेले होतो. श्री. मधुसुदन शेंडे आणि पटवर्धन वहिनी आमच्यासाठी रोल मॉडेल झाले. मित्रमंडळाबरोबर मित्र परिवारही मिळाला. त्यांच्या बरोबर मित्रमंडळाच्या कामात झोकून देताना आनंद वाटू लागला. शुभंकरामध्ये दुसरे स्थान पत्नी आणि परिवाराचे, त्याशिवाय शेजारी, घरी काम करणारे नोकर, हास्य क्लबमधील सहकारी, मित्रमंडळाlला  कोणत्याही मोबदल्याशिवाय सभेसाठी जागा देणारे श्री. देवस्थळी. मित्रमंडळाचे कार्य चालू ठेवण्यास ज्यांची मदत होते, अशा विविध लोकांना मी शुभंकर मानतो.
डॉ. संजय वाटवे यांनी आपल्या भाषणात शुभंकराबद्दल कृतज्ञता बाळगा असे सांगितले ते मला पटले. डॉ. अनिल अवचटांनी दिलेला तरी बरं झालंहा मंत्र आचरतो.पार्किन्सन्स झाला कॅन्सर नाही झाला, हार्ट अँटॅक आला नाही, मधुमेह आणि त्याचे पथ्य नाही करावे लागणार असे मी आता म्हणतो. पार्किन्सन्सला मित्र मानण्यापर्यंत तयारी होण्यात अशा अनेकांचा हातभार लागला.
अजून तरी रोजच्या व्यवहारात मला शुभंकराची फारशी मदत लागत नाही पण माझी मानसिकता सकारात्मक रहाण्यास आणि नैराश्याला माझ्यापर्यंत येऊ न देण्यात माझ्या पत्नीचे सहकार्य असते. मी ही चहा करणे मशीनवर कपडे धुणे, दुध आणणे, इत्यादी कामात वाटा गरजेनुसार उचलतो. शुभंकरांबद्दल कृतीतून कृतज्ञता मला विशेष महत्त्वाची वाटते.
असं माझं पार्किन्सन्ससह सहज सोपे जगणे प्रत्येकाला जमण्याजोगे. मग तुम्हीही बनताय ना रोल मॉडेल?

जागतिक पार्किन्सन्स दिवस स्मरणिका २०१५ मधील लेख.
◊◊◊◊◊◊◊◊◊

No comments:

Post a Comment