Thursday 25 August 2016

खुदिको बुलंद करणारे बंदे - २




                            


                                                 
                                           हा छंद जीवाला लावी पिसे
                                    (उल्हास गोगटेना पेट्रोल पंपवाले गोगटे किंवा गॅरेजवाले गोगटे म्हणून बरेच जण ओळखतात अस पहिल्या लेखा नंतर मला लक्षात आल.त्याना ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल चांगलीच भावना आहे. या लेखांमुळे त्याना ओळखणाऱ्यांना गोगटे यांची दुसरी बाजू समजेल.)
                                   'मला नेहमी मेकॅनिकच्या वेषात सर्व पाहायचे.त्यामुळे फॉर्मल वेषात कोणी ओळखायच नाही' गोगटे सांगत होते.यांत्रिक,कलाकार,कवि,सौजन्यशील दिलदार माणूस अशी त्यांची शब्दात पकडता न येणारी विविधांगी रूपे आहेत.उल्हास गोगटे याना आम्ही आदर्श शुभंकर (केअरटेकर) म्हणतो.खर तर गोगटे आणि कुटुंबिय,  शुभंकर शुभार्थी अशी लेबल्स लावण्या पलीकडचे आहेत.हरहुन्नरी गोगटेनी  पत्नी आणि मुलासाठी स्वत:ला बंदिस्त केल. तसच त्यांचे दोन्ही भाऊ आणि मुलगा केदार यांनी गोगटे यांच्या ग्लायडिंगच्या वेळखाऊ छंदासाठी कामातून मोकळीक दिली.१९७८ पासून सुरु झालेला हा छंद २० वर्षे चालू होता.
यात अनेक चित्त थरारक अनुभव आले आणि अनेकांना  हवाई सफर घडवून आणता आली हा आनंदही मिळवता आला.हा त्यांच्या अनेक छंदांमधील एक होता.
 १९३४ मध्ये ते जन्मले.रमणबाग इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झाले.लहानपणापासूनच ते विविध कला मध्ये रमले.शाळेत असतानाच फोटो काढून घरीच डेव्हलप करून प्रिंटस् काढायचे.स्वत: साचा बनवून गणपती मूर्ती तयार करून विकायचे.जुन्या बाजारातून सायकली आणून दुरुस्त करून विकायचे,हा जुन्या बाजारातून वस्तू घेवून नवीन वस्तू बनवायचा सिलसिला  नंतरही चालूच राहिला.त्यांना  ६५० रुपयाला जुन्या बाजारातून हॉइस्ट मिळाला,कॉम्प्रेसरही तेथूनच मिळवला.दुरुस्त्या केल्या.हजार बाराशे रुपयात  गॅरेजमध्ये हॉइस्टची सुविधा सुरु करता आली.चाळीस वर्षे ती चालवली.पुण्यात ही सुविधा त्यावेळी अभावानेच होती. गॅरेजमध्ये गाड्यांच्या  कुशनच काम झाल्यावर उरलेल्या रंगीत रेक्झिनच्या तुकड्यापासून पर्सेस,पाउच,पाकिटे करून विविध प्रसंगात भेटवस्तू म्हणून ते  देत.वूड कार्विंग म्हणजे लाकडात कोरीव काम करून ते  विविध शोभिवंत  वस्तू बनवतात.   हे सर्व  करताना पैसे मिळवणे,वाचवणे यापेक्षा निर्मितीचा आनंद मोठ्ठा होता. स्वत:च हार्मोनियम,व्हायोलीन,सिंथेसायझर शिकून संगीताची आवडही त्यांनी जोपासली.शिवणकामही त्यांना करता येत. मुलगा अमरचे कपडे ते स्वत:च  शिवतात.अमरलाही ते चालतात.भात,आमटी,भाजी,पोळी असा वेळ पडली तर स्वयंपाकही त्याना करता येतो.
जुन्या घड्याळांची डागडुजी करणे हाही त्यांचा छंद आहे.त्यांचे मित्र डॉक्टर राम काळे सांगतात, 'माझ्या घरी डझनभर तरी जुनी भिंतीवरची घड्याळे आहेत.काही तर १००/ १२५ वर्षापूर्वीची,काही दुसऱ्या मह्युद्धापूर्वीची,जपानी,जर्मन अमेरिकन बनावटीची आहेत.ही  सुस्थितीत ठेवण्याचे संपूर्ण श्रेय उल्हासरावांचे.'

त्यांच्या घरात गेल्यावर अशा स्वनिर्मित अनेक कलावस्तू ,सोय पाहून केलेल्या सुविधा,टाकाऊतून केलेली कलाकुसर दिसते.फ्रीज उघडताना बऱ्याचवेळा दोन्ही हातात वस्तू घेऊन दार उघडणे शक्य नसते.यासाठी पॅडलने दार उघडता येईल अशी सोय केली आहे.बाजूला,आतून नळी काढून दरवाजा न उघडता गार पाणी घेण्याचीही सोय केली आहे.घडीची खुर्ची वापरून त्यांनी एक व्हीलचेअरची बनवली आहे. त्यामुळे ती फोल्ड करून सहजपणे गाडीत घालता येते.
आम्ही त्यांच्या घरी गेलेल्यावेळी अशा अनेक वस्तू पाहिल्या. भेट वस्तू म्हणून आलेल्या फळांच्या बाउलची  त्यांनी लाइटसाठी सुंदर शेड केलेली आहे.बऱ्याच घराचे अशा वस्तूंनी म्युझियम होते.गोगटे यांच्याकडे मात्र या वस्तू घरपणावर हवी होत नाहीत.
 पत्नी आणि मुलासाठी घरी राहताना त्यांना अनेक छंद कमी करावे लागले असतील.परंतु क्रियेटीविटी हा त्यांचा स्थायीभाव आहे.पाण्याचे उष्णतेनुसार वाफ, बर्फ असे रुपांतर होते. मूळ पाणी तेच असते.तसेच त्यांची हीच क्रियेटीविटी घरी राहावे लागल्यावर आश्चर्यकारक रित्या कवितेच्या रुपात प्रगट झाली. याबद्दल पुढच्या लेखात.
संदर्भ -' कविमनाचे,गोगटे - गॅरेजचे सव्यसाची उल्हासराव ' डॉ.राम काळे
                दीपावली विशेषांक व्यापारीमित्र

No comments:

Post a Comment