Thursday 5 October 2023

पार्किन्सन विषयक गप्पा ८५

                                                   पार्किन्सन विषयक गप्पा ८५

                        डॉ.मनजीतसिंग अरोरा यांचे मासिक सभेत झूमवर "First Aid Tips" या विषयावर व्याख्यान ठेवले होते.त्यात त्यांनी नेहमी येणाऱ्या अनेक समस्यांवर हसतखेळत माहिती सांगितली.बऱ्याच वेळा जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोवर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.आमचेही असेच झाले.bed soar होऊ नयेत म्हणून काय करावे यासाठी त्यांनी उपयुक्त सूचना दिल्या होत्या.त्याकडे तीर्थळीना bed soar झाल्यावरच माझे लक्ष गेले.यावर बरेच दिवस लिहायचे होते.पण जखम पूर्ण बरी झाल्यावर लिहू असे ठरवले.आता जखम पूर्ण बरी झाली.

                        जे बेडरीडन असतात त्यांनाच bed soar होतात. असा माझा समज होता.हे फक्त दुपारी अर्धा तास आणि रात्री १०वाजता झोपतात सकाळी सातला उठतात.याशिवाय कधी आडवे होत नाहीत.त्यामुळे bed soar व्हायचा प्रश्नच येत नाही असे मला वाटत होते.इतरांनी अशा भ्रमात राहू नये म्हणून हा लेखन प्रपंच.

                   हा प्रश्न फक्त पार्किन्सन शुभार्थी पुरता मर्यदित नाही.अनेक जेष्ठ नागरिकांना ही समस्या येते.एका ठिकाणी नाही तर जेथे जेथे शरीराचा भाग सतत टेकलेला राहतो अशा अनेक ठिकाणी bed soar होतात.ते बरे करणे जिकीरीचे होते.सारखे एका जागी पडून राहील्याने त्वचेवर शरीराचा भार पडतो.त्वचा हुळहुळते, कोरडी आणि लाल होते.नंतर त्या ठिकाणी जखम होते.थोडक्यात कातडीवर भार झाल्याने ती फाटते.

                ह्यांच्या बाबत माकड हाडाच्या वर थोडे लाल दिसत होते.केअरटेकरने ते दाखवले.दुसऱ्या दिवशी लगेच जखम दिसायला लागली.ह्यांना रोज मसाज असतो.त्वचा कोरडी दिसल्यावर क्रीम लावत होतो.आम्ही पुरेशी काळजी घेत होतो.तरी जखम झालीच.लगेच आमच्या शेजारीच असलेले डॉ.राजू शेठ यांना सांगितले.ते पाहायला येईपर्यंत बाय डीफाल्ट गुगलबाबाकडे धाव घेतली.तेथे बरीच माहिती मिळाली.बेडसोरला हलक्यात घेऊ नका ते जीवघेणेही ठरू शकते हेच लक्षात राहिले.

            डॉक्टर आल्यावर त्यांनी ड्रेसिंग केले.एअरबेड किंवा वाटरबेड आणायला सांगितले.आम्ही लगेच एअर मॅट्रेस आणली.हे त्यावर झोपायला तयार होतील का वाटले होते. पण त्यांना याबाबत कोणताच प्रोब्लेम आला नाही.बरे व्हायला वेळ लागेल हेही सांगितले.आमचे अगदी घरगुती संबंध असल्याने.जाता ता ते जखमेची काय परिस्थिती आहे पाहून जात.एरवी मी आणि केअर टेकर ड्रेसिंग करत होतो.राजुचीच वहिनी डॉ.लीना शेठने होमिओपथी औषधही दिले.आम्ही तसे नशीबवान आहोत.आमचे शेजारीच आमचे फॅमिली डॉक्टर आहेत.

            मला डॉ.आरोरांच्या सूचना आत्ता आठवल्या.बेडसोर होऊ नये म्हणून जेथेजेथे शरीर एकमेकावर टेकलेले राहते,एकाच ठिकाणी टेकलेले राहते.तेथे तेथे नारळ तेल,कोरफड जेल लावा.एअरबेड किंवा वाटरबेड घ्या.अंघोळीला फक्त जॉन्सन बेबीसोप वापरा. अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या.

           पीडीमुळे बऱ्याच जणांचे वजन कमी होते.शरीराचे मांस न राहता.कातडी सुरकुतते.त्यामुळे बेड्सोरची शक्यता वाढत असावी.ह्यांच्याबाबत हेच झाले.ज्यांचे वजन खूप कमी झाले आहे.त्यांनी सातत्याने शरीरातील सर्व भागांकडे लक्ष द्यावे.आरोरानी दिलेल्या सूचना पाळाव्यात.असे सुचवावेसे वाटते.एकदा जखम झाली की आटोक्यात आणणे कठीण होते.

             ह्यांना डायबेटीस नाही ही एक चांगली गोष्ट होती.ड्रेसिंगबरोबर बर्याच वेळा जखम उघडी ठेऊन जखमेला वारा लागेल असा फॅन ठेवत होतो.त्याचा जखम बरी होण्यासाठी खूप उपयोग होत होता.बेडसोर झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व करावे.माझा येथे उपाययोजना काय करावी हे सांगण्याचा हेतू नाही तर.जखम होण्यापुर्वी खबरदारी घ्यावी हे सांगायचे आहे.मुख्यता एअरबेड किंवा वाटरबेड घ्या.ह्यांची जखम फार खोल नव्हती तरी बरी होण्यास दोन अडीच महिने लागले.


            

                                                 

No comments:

Post a Comment