Thursday 28 September 2023

पार्किन्सन विषयक गप्पा ८४

                                                  पार्किन्सन विषयक गप्पा ८४

                   गणपती बाप्पा येतो तो आनंदाची उधळण करत.आधी मूर्ती करणे,मखर,डेकोरेशन,विविध तर्हेचे प्रसाद,गौरीची सजावट, गणपती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम यातुन प्रतीभेला उधाण येते.आज प्रतिथयश असलेल्या अनेक कलाकारांच्या सादरीकरणाची सुरुवात गणेशोत्सवातून झालेली दिसते.आज राजकारणात असणाऱ्या अनेकांनी सार्वजनिक मंडळाचे स्वयंसेवक बनत राजकारणाचा श्रीगणेशा गिरवलेला असतो.समाजतल्या सर्व स्तरात या उत्साहाची झिरपण झालेली असते.

                   पार्किन्सन मित्रमंडळाचा Whats-app Group याला अपवाद नाही.आमच्या शुभंकर,शुभार्थींची प्रतिभा ओसंडून वाहत आहे.डॉ.जावडेकर यांनी गणपतीचे पेंटिंग शेअर करून उत्सव साजरा करायला सुरुवात केली.

                   शुभार्थी गीता पुरंदरे रोज पुष्परचना टाकत असतात.हरितालिकेच्या दिवशी त्यांनी शंकराची पिंडी केली होती आणि रोज नवनवीन गणपतीची पुष्परचना. त्या सध्या इंग्लंड मध्ये आहेत. तिथल्या साहित्यातूनही त्या मनमोहक रचना करतात.त्यांनी जेंव्हापासून पुष्परचना सुरु केली तेंव्हापासून एकदाही गणपती रिपीट झाला नाही.त्यांची क्रिएटिव्हीटी थक्क करणारी आहे.पार्किन्सनही पाहत थांबलेला आहे.

                   रमेश भाऊंच्या अभिव्यक्तीसाठी सीताफळाच्या बिया,इडली कापलेली फळे काही चालते. सातत्याने ते कलाकृती टाकून सर्वाना प्रवृत्त करत असतात.

                शुभार्थी विनोद Bhatte अमेरिकेत आहेत.मुलाकडे लॉसएंजलीस मध्ये गणपती आणि ह्यूस्टनला मुलीकडे गौरी साजऱ्या केल्या.दोन्हीकडे सजावटीत सहभाग होताच.शिवाय विविध गणपती काढले. 

             शुभार्थी उमेश सलगर मागील वर्षी नवीन जागेत राहायला गेल्यावर आपल्या बोलक्या स्वभावाने तेथेही जम बसवला.सोसायटीतल्या सर्वाना बरोबर घेऊन गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा उपक्रम सुरु केला.यावर्षी यात स्त्रियाही सामील झाल्या.पुढील वर्षी आजूबाजूच्या सोसायटीतील लोकांनाही ते गोळा करणार आहेत.

                अशा सणांच्या निमित्ताने पारंपारिक पदार्थांना उजाळा मिळतो.आशा रेवणकरने स्वत:च्या घरी वाढवलेल्या हळदीच्या पानात पातोळ्या केल्या त्याचा फोटो टाकला.उमेश सलगर यांनी गणपतीला खतखते हा अनेक भाज्यांचा पदार्थ करतात तो केला होता.

                शुभार्थी सविता बोर्डे यांनी करावकेवर गणपतीचे गाणे म्हणण्याचा प्रयोग करून पाहिला.घरात गौरी आहेत गौरीसाठी स्वयपाकाचा कुटाणा मोठ्ठा असतो झेपेल की नाही वाटले.देवी करून घेईल या विश्वासाने करायला सुरुवात केली.आणि चक्क झेपला.भक्तीत शक्ती असते ती हीच.सजलेल्या गौरीचे फोटो साविताताई आणि नीता संत यांनी टाकले.

               शिघ्र कवयित्री अंजली महाजनने बाप्पावर दोन कविता केल्या.डॉ.अविनाश बिनीवाले यांच्या "इरान"पुस्तकाची नवी आवृत्ती प्रसिद्ध झाली. डॉ.विद्या जोशी यांचे "श्रीमद् दासबोध जीवनाचा मार्गदर्शक" या शिक्षक पालकांच्यासाठीच्या पुस्तकाचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला.डॉ.क्षमा वळसंगकर यांच्या वृत्तबद्ध कविता ग्रुपची शान असतात.आजूबाजूच्या झगमगाटात शांत तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे त्यांच्या कविता असतात.देवराज वृत्तातील त्यांची अर्थगर्भ कविता अंजली भिडे यांना कविता वाचता वाचताच रेकोर्ड करावी असे वाटले.

             आमचे उत्साही शुभार्थी किरण सरदेशपांडे बेंगलोरला मुलाकडे गेले आहेत.तेथेही ते स्वस्थ बसले नाहीत.नातवाच्या शाळेच्या कार्यक्रमासाठी चंद्र बोलतो असे स्क्रिप्ट तयार करून दिले.कार्यक्रमाचा व्हिडीओ ग्रुपवर टाकला.

              ढोल ताशा नृत्य नसले तर गणेशोत्सव होणारच नाही. आमचे तरूण शुभार्थी फडणीस सरांनी तरुणांच्या ढोलपथकात सामील होऊन तेवढ्याच उर्जेने ताशा वाजवला.अरुण सुर्वे झुम्बा शिकत आहेत. त्यांनीही सोसायटीच्या कार्यक्रमात तरुणांच्या बरोबरीने डान्स परफॉर्मन्समध्ये सहभाग घेतला.हृषीकेशच्या डान्स ऑनलाईन क्लासमध्ये ५० तरी सदस्य असतात.गुरु युरोपमाध्ये आहेत.श्रुती,तन्वी,पूर्वा इ. शिष्या समर्थपणे धुरा चालवत आहेत.त्यांनी 'सूर निरागस हो' गीतावर नृत्य बसवले होते.एक दिवस  सर्वांनी पारंपारिक वेशभूषा करून ऑनलाईन समारंभ साजरा केला.

आनंदात भर टाकणारी आणखी एक बातमी आली.शुभार्थी विश्वनाथ भिडे आणि शुभंकर अंजली भिडे यांची नात सायुलीला Rheumatology research foundation कडून तिच्या संशोधनासाठी मानाची र्रीसर्च ग्रांट मिळाली.याशिवाय वर्षातून एकाच व्यक्तीला मिळते अशी Dr.EphraimP.Engleman Resident research Preceptorship मिळाली.

              ग्रुपवर दाद देणारे रसिकांचीही कमी नाही.किरण सरदेशपांडे यांच्या प्रतिक्रियेतून सर्वांच्या मनातील भावना व्यक्त झाल्या आहेत.ते लिहितात,

                "इथे आगत स्वागत आहे ,हुरहुर आहे मैफिल आहे, बाप्पा आहे, आशीर्वाद आहेत, पुस्तक प्रकाशन आहे आणि सारखं काहीतरी घडतं आहे.किती कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या गमती आणि घटना इथे घडतायत,मनानेही जिवंत आणि रसरशीत माणसांचा हा ग्रुप आहे."सर्वांची अशा तर्हेचीच भावना आहे.
              या सर्व आनंदाला एक दु:खाची किनारही आहे.डॉ.डोईफोडे आणि डॉ.श्रीपाद कुलकर्णी यांचे या काळात दु:खद निधन झाले ग्रुप थोडा स्तब्ध झाला.पण आमच्या अनेक पूर्व सुरीनी 'शो मस्ट गो ऑन' असा स्वत:च्या कृतीने धडा घालून दिला आणि पाणी वाहते झाले.


             

No comments:

Post a Comment