Wednesday 2 November 2022

क्षण भारावलेले - २१

                                              क्षण भारावलेले - २१

                      कोजागिरीचा कार्यक्रम संपवून तृप्त मनाने जवळजवळ सर्व शुभंकर, शुभार्थी परतले होते.मोजकेच बाकी होते.कार्यक्रम छान झाल्याच्या सर्वांच्या भरभरून प्रतिक्रिया ऐकून आम्ही आयोजकही सुखाऊन गेलो होते.उरलेल्यांना उबर,ओला करून देण्याचे काम चालले होते.कॅसिओचे सुंदर स्वर कानावर आले आणि मी थबकले.फडणीस सर त्यांच्यासाठी बुक केलेली उबर येईपर्यंत बाहेरच्या बाकावर बसले होते.आजूबाजूचे जग विसरून तल्लीन होऊन हे स्वर छेडत होते.मला तेथेच ऐकत बसावे असे वाटत होते.मृदुलाचा ड्रायव्हर रोहन, गाडी दाराशी घेऊन वाट पाहत होता.पावसाची चिन्हे आहेत चला चला अशी माझ्यामागे घाई चालली होती.मी गाडीत बसले.कॅसिओचे स्वर मनात रेंगाळतच होते.आणि तल्लीन झालेली सरांची मुर्तीही डोळ्यासमोरून हलत नव्हती.'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता', 'पंगु लंघयते गिरिम' हे सर्व आपण म्हणतो ते प्रत्यक्षात येताना दिसले होते.पुण्याच्या कार्यक्रमात सर सुंदर गाणी वाजवतील असे २०२० सप्टेंबरमध्ये कोणी सांगितले असते तर त्यावर विश्वास बसला नसता.

                   ४ सप्टेंबर २०२० ला सरांचा वाढदिवस म्हणून मी मेसेज केला होता.छायाताईंचा मेसेज आला ते गेले आठ दिवस सिव्हीयर चिकन गुनियाने आजारी आहेत.हॉस्पिटलमध्ये आहेत. मला खूपच काळजी वाटली. २०१२ मध्ये त्यांना पार्किन्सन्स झाला होता.इतर लक्षणे होतीच पण त्यांच्यासाठी सर्वात त्रासदायक लक्षण होते बोलण्यावर झालेला परिणाम. गाणे हा त्यांचा प्राण होता आणि आणि त्या गात्या गळ्यावरच पार्किन्सन्सने हल्ला केला होता.गाण्याचे क्लास, गीतरामायणाचे क्लास, सुगम संगीताचे कार्यक्रम सर्व बंद होणार होते.बालगंधर्व,भरतनाट्यमंदिर अशा ठिकाणी त्यांनी कार्यक्रम गाजवले होते.आता ते होणार नव्हते.या गोष्टींचा मानसिक त्रास होत होता.त्यात चिकन गुनियाने पार्किन्सनची लक्षणेही वाढत होती.

                  वेळोवेळी छायाताई अपडेट देत होत्या.बारा तेरा दिवस झाले तरी ताप हटत नव्हता शुध्द हरपली होती,तीन आठवडे आयसीयूमध्ये होते.एक आठवडा कोमामध्ये होते.मुलगा सून सर्व कामे सोडून तळेगावहून सांगलीला दिमतीला आले.मित्र,गीतरामायण ग्रुप,डबे देणे,हॉस्पिटलमध्ये धावपळ करण्यासाठी बरोबर पैसेही ठेऊन तयार असत.माकडहाडाजवळ बेड्सोर्स झाले होते.खूप वेदना होत.रात्रभर झोप लागत नसे.छायाताई त्या काळात हवालदिल झाल्या होत्या.सेवा करता येते.वेदना घेता येत नाहीत.

               यातच हिमोग्लोबिन कमी झाले.आणि ओ निगेटिव्ह हा रेअर ब्लडग्रुप.पुण्याला दिनानाथ हॉस्पिटलमध्ये आणले.त्यातूनही पार पडले.हॉस्पिटलमधून डीसचार्ज मिळाला पण उठता येत नव्हते, चालता येत नव्हते.मुलाने तळेगावला नेले.वर्षभर स्वत: बेड्सोर्सचे ड्रेसिंग केले.मानसिक आधार दिला.यासाठी छायाताईही होत्याच.मित्र नातेवायिक सर्वांच्या प्रेमाने फडणीस सरांनीही उभारी धरली.फिजिओथेरपिस्टचे व्यायम,ओंकार,प्राणायाम चालूच होते.श्रद्धा,प्रयत्नांची,औषधोपचाराची योग्य दिशा यामुळे प्रगती होऊ लागली.औंधला कुलस्वामीनीचे दर्शन घ्यायला जाईपर्यंत मजल गेली.जेंव्हा सरांनी पहिली लकेर घेतली.तेंव्हा छायाताईनी ग्रुपवर शेअर केले.आनंद पोटात माझ्या मायेना अशी त्यांची अवस्था होती.

                         Whats app group वर मधूनमधून सरांची गाणी  येऊ लागली.झूमवर 'भेटू आनंदे' कार्यक्रमात छायाताई आणि सरांनी आपले मनोगत मांडले.त्यावेळीही सुंदर गाणी म्हटली.पार्किन्सनशी मैत्रीपूर्ण लढत पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले त्यावेळी सुरुवातीला त्यांनी 'तू बुद्धी दे तू तेज दे' ही प्रार्थना म्हटली.त्यांच्या गीतरामायण आणि दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे फोटो छायातैनी टाकले होते.विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला त्यावेळीही ते गायले.हे सर्व बसून केलेले.औंध येथील पालखी सोहळ्यात रस्त्यावरून गळ्यात ताशा अडकवून तो वाजवत चाललेले सर हे एक अद्भुत दृश्य होते.संगीताचे मार्गदर्शनही करू लागलेले आहेत.आता तर तळेगावहून मंडळाच्या कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी पुण्याला आले होते.सुरूवातीला एक गाणे कार्यक्रम संपल्यावर दोन गाणी म्हटली.पुन्हा तळेगावला परत जायचे होते.कुठुन येते एवढी उर्जा?

                       २०२२ च्या स्मरणिकेत त्यांनी 'आम्ही फिनिक्स या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’असा लेख लिहिला त्यात त्यांचे मनोगत त्यांनी मोकळेपणाने लिहिले.पार्किन्सन साथीला असला तरी त्यांचा श्वास गाणे त्यांना परत मिळाले आहे,छायाताईसारखी भक्कम जीवनसाथी,सर्व काही करण्यास तत्पर मुलगा सून आणि कुटुंबीय,मित्रपरिवार एवढे सर्व असताना पार्किन्सनची त्रास देण्याची काय बिशाद.पार्किन्सन मित्रमंडळाचा यात खारीचा वाट आहे याचा आम्हाला आनंद आहे.त्यांनी मंडळाला भरभरून दिले.

त्यांनी मनोगतात अंदमानला जायचा संकल्पही व्यक्त केला.तेथे जाऊन सावरकरांच्या कविता ते नक्की गातील.त्यांच्या पार्किन्सनसह आनंदी जगण्याचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्याच लेखातील काव्यपंक्ती नेमकेपणाने सांगतात.

‘कितीक वाटा आल्या कितीक आली वळणे

आले प्रसंग होते तितकेच जीवघेणे

उर्जेचा प्रदीप्तपरी तो अंतरीचा होता वन्ही

आहे फिनिक्स आम्ही आहे फिनिक्स आम्ही’

 

                May be an image of 2 people and indoor  

                 

                  

                  

No comments:

Post a Comment