Friday 4 June 2021

डॉक्टर पराग ठुसे यांचा प्राणायाम वर्ग

                                       डॉक्टर पराग ठुसे यांच्याकडे प्राणायाम शिकायची खूप वर्षांपासून  इच्छा होती.कोरोनामुळे ऑनलाईन क्लास सुरु झाले आणि आमची इच्छा पूर्ण झाली.२०१२ मध्ये डॉ.ठुसे प्रथम पार्किन्सन्स मित्रमंडळात व्व्याख्यान देण्यासाठी आले होते.आजाराबरोबर चांगले जगण्यासाठी योग आयुर्वेद यांचा उपयोग कसा करता येईल हे सांगताना प्राणायाम, मेडिटेशन यांचीही माहिती त्यांनी सांगितली.त्या छोट्याशा भाषणातुनही त्यांचे आयुर्वेद ,योग याबद्दलचे सखोल ज्ञान,ते नेमकेपणाने,व्यवहारातील उदाहरणे सांगत पटवण्याची हातोटी आवडली.आम्ही प्राणायाम करत होतो पण तो योग्य पद्धतीने होतो की नाही हे त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे असे वाटले.वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले जात असल्याने प्राणायाम करताना नेमके बरोबर काय हे समजेनासे झाले होते.डॉ. ठुसे यांच्याकडे याचे निरसन होईल असे वाटले. त्यानंतर २०१७ मध्येपण त्यांनी 'ताणताणाव निरसन' या विषयावर व्याख्यान दिले.त्यावेळी त्यांच्या प्रत्यक्ष कार्यशाळा सुरु होत्या. परंतु आमच्या पासुन खूप लांब असल्याने ते जमले नाही.

                              हा योग येण्यासाठी २०२१ साल उजाडायला लागले.६ दिवसाचा  बेसिक प्राणायाम वर्ग केला.यानंतर आता आठवड्यातून एकदा फॉलोअप प्राणायम करत आहे आणि कायम करणार आहे.कारण एका दिवसात आठवड्याभराची उर्जा मिळते. पहिल्याच दिवशी ऑनलाईन वर्गात प्राणायाम आणि मेडीटेशन शिकणे शक्य आहे का हा संभ्रम  दूर झाला.एका वर्गात खूप विद्यार्थी नसतात आणि प्रत्येकाकडे सरांचे लक्ष असते प्रत्येकाची क्षमता, आजार,वय या सर्वांचा विचार करत कोणी काय करायचे,काय करायचे नाही,कोठे थांबायचे हे सांगितले जात असल्याने प्राणायाम करताना आता निर्धास्त वाटते.योगाबरोबर आयुर्वेद आधुनिक वैद्यक,शरीरशास्त्र,सायकोलॉजी याचे त्यांचे सखोल ज्ञान,या सर्व क्षेत्रातील होत असलेल्या संशोधनाचा पाठपुरावा हे सर्व ज्ञान पोचवण्याची तळमळ हे मला भावले  गेली ३० वर्षे विविध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या वयाच्या लाखो लोकांना योग,प्राणायामबरोबरच सायकोथेरपी,स्ट्रेस मॅनेजमेंट,लाइफस्टाइल मॅनेजमेंट याचेही प्रशिक्षण त्यांनी दिल्याने अनुभवाची बाजूही भक्कम आहे.हे सर्वच फॉलोअप वर्गातूनआपसूकच होते. 

                     श्वसन ही आपली मुलभूत गरज आहे. मनाची उभारी ठेवण्यासाठी श्वसन महत्वाचे आहे.श्वसनात  पद्धतशीर बदल करणे हे प्राणायामातून होते.प्राणायाम आणि ध्यान म्हणजे नेमके काय? ते कसे करायचे हे आता समजून करत असल्याने तो आनंददायी अनुभव असतो.हा अनुभव आता सत्तरी नंतर मिळत आहे. तरुण वयातच हे झाल्यास शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी महत्वाचे ठरेल त्यामुळे या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे मला सांगावेसे वाटते.

                          

No comments:

Post a Comment