Saturday 5 January 2019

जानेवारी २०१९ पासून सभावृत्त

                                                                निवेदन
सोमवार दिनांक १४ जानेवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यस्तरीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे 'आपली तब्येत सांभाळा' या विषयावर व्याख्यान होणार आहे सर्वांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा
विशेष सूचना - संक्रांतीनिमित्त तिळगुळ समारंभ असणार आहे सर्वांनी या निमीत्ताने काळ्या रंगाचे कपडे घालून यावे
यावेळी जानेवारीचा संचारचा अंक देण्यात येईल.
वेळ : दुपारी ४.०

ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
ज्यांना स्मरणिकेसाठी लेखन द्यावयाचे आहे त्यांनी कृपया बरोबर आणावे.
  १४ जानेवारी २०१९ सभा वृत्त.
                         पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमाची  सुरुवात १४ जानेवारीच्या सभेने झाली.यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यस्तरीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांचे 'आपली तब्येत सांभाळा'  या विषयावर व्याख्यान झाले.सभेस ७०/८० जण उपस्थित होते.चिपळूणहून प्रदीप करोडे,औरंगाबादहून रमेश आणि आरती तिळवे,सांगलीहून श्री मुळीक हे आलेले होते.मंडळाचा मोठ्ठा आर्थिक भार उचलणाऱ्या अमेरिकास्थित सुधाताई कुलकर्णी आता भारतात आलेल्या आहेत, त्याही आवर्जून उपस्थित होत्या.कलबाग यांची भाची हळदीपूर कॅनडाहून आल्या की सभेस येतात, त्याही आल्या होत्या. ठरल्याप्रमाणे संक्रांतीनिमित्त बहुसंख्य जण काळे कपडे घालून आले होते.ओळखी करून घेतल्या जात होत्या. एकूण उत्साहाचे वातावरण होते.
                    शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे झाल्यावर मृदुला कर्णी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.
         डॉक्टर भोंडवे यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात केली. आपली तब्येत सांभाळून पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी प्रथम त्याचा स्वीकार आवश्यक. 
         यानंतरची पायरी  न्यूरॉलॉजिस्टकडे जाणे. ते त्यातले तज्ञ असतात. कोणतेही प्रश्नचिन्ह मनात न आणता त्यांनी सांगितल्यानुसार औषधे घेणे. यानंतर आपल्या तब्येतीत काही बदल होत आहेत का हे पाहून त्यानुसार डॉक्टरांना सांगणे हे आवश्यक आहे. तब्येत सांभाळण्यासाठी हे सर्व  १० टक्केच असते. ९० टक्के आपल्या हातात असतात. यासाठी   आहार, व्यायाम, व्यसने टाळणे , तपासण्या आणि मानसिक आरोग्य ही पंचसूत्री वापरायला लागेल. आजार पूर्ण बरा होणार नसला तरी तो काबूत ठेवण्यासाठी ही आयुधे आहेत.
                   आहार समतोल असावा. त्यात कर्बोदकेप्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार , जीवनसत्वे यांचा समावेश आवश्यक आहे. पाणी ही महत्त्वाचे आहे. दोन - तीन लिटर तरी पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिणे शक्य नसल्यास सरबत प्यावे. रक्तदाब असणाऱ्यांनी मीठ कमी घालावे आणि मधुमेह असणाऱ्यांनी साखर कमी घालावी. पार्किन्सन्स व्यक्तींसाठी तंतुमय पदार्थ आहारात असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यात पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये असावीत.याशिवाय दूध असावे. पार्किन्सन्स पेशंटसाठी Omega 3  Fatty Acid  ही आवश्‍यक आहे. यामुळे  चांगले  कोलेस्टेरॉल वाढू शकते. गाईचे तूप,अक्रोड,बदाम ई. मध्ये ते असते.पार्किन्सन्समध्ये गिळण्याची, चावण्याची समस्या असू शकते. यासाठी सर्व आवश्यक अन्न घटक असलेल्या  पावडरची रेडीमेड  पाकीटे मिळतात. तेही वापरण्यास हरकत नाही. हाताला कंप असल्यामुळे पाणी पिण्यासाठी स्ट्रॉ असलेले ग्लास वापरावे.एकावेळी जास्त खाणे शक्य नसते म्हणून थोड्या थोड्या वेळाने खावे.
                                आहाराइतकेच महत्व व्यायामाला आहे. व्यायामात आधी उद्दिष्ट ठरवावे. फिटनेस महत्त्वाचा. व्यायाम केल्यावर हालचाली सुकर होणे आणि व्यायाम केल्यावर ताजेतवाने वाटणे, दमल्यासारखे न वाटणे याला फिटनेस म्हणता येईल. सर्वात सोपा आणि उपयुक्त व्यायाम चालणे हा आहे. चालताना टाच आधी टेकायची.चालताना पोश्चर योग्य असावे.खाली पाहून चालू नये.समोर पाहून चालावे म्हणजे तोल जाणार नाही. वळताना यु टर्न घेतला जातो तसे वळा. पाऊल टाकताना दोन पायात जास्त अंतर असावे, हातात काही घेऊ नये. पाण्यात चालणे, पोहणे, पाण्यात खेळ खेळणे हेही व्यायामासाठी उत्तम. यात तोल गेला आणि पडले तरी लागण्याची भीती नसते. कोणताही व्यायाम करताना दमलात की थांबा. अर्थात कंटाळा आला म्हणून थांबणे असे नको. जे शय्याग्रस्त आहेत त्यांनी गादीवर झोपून  हातापायाच्या, सांध्यांच्या हालचाली कराव्यात. ज्यांनी योगासने,सूर्यनमस्कार आधी केले आहेत त्यांनी ते  करण्यास हरकत नाही, पण ज्यांनी केले नाहीत त्यांनी मात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते करावे. नृत्योपचारही शरीर,मनासाठी चांगला.बोलण्याचा व्यायामही महत्वाचा.
           विश्रांतीही महत्वाची आहे.रोजची झोप आवश्यक.झोप किती असावी हे प्रत्येकासाठी वेगळे असेल.झोपून उठल्यावर मन आणि शरीर फ्रेश वाटले तर झोप झाली,अंग जड वाटले तर ती अधिक झाली.झोपेची वेळ पक्की ठरवा. रात्री उठावे लागल्यास थोडे थांबून नंतर उठा.
         कोणतीही व्यसने टाळावीत. शारीरिक तपासण्या नियमित कराव्यात.
         मानसिक शांतता,समाधान महत्वाचे.स्वास्थ्यासाठी तणावाचे नियोजन करावे. यासाठी आजार स्वीकारणे महत्वाचे.मन स्वस्थ राहण्यासाठी ध्यान महत्वाचे.ध्यान म्हणजे मन विचार विरहित असणे.पूजा करताना, कोणतीही कृती करताना मनापासून करा.एकाग्रता महत्वाची.वर्तमानात राहावे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीत व्यग्र राहावे. छंद जोपासावे.आजार दुर्धर असला तरी वरील  सर्व गोष्टी सांभाळून आनंदी राहू शकता.
        विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्याने अनेक प्रश्न विचारले गेले.डॉक्टर भोंडवे यांनी त्याची समर्पक उत्तरे दिली. WhatsApp वरून येणाऱ्या आरोग्यविषयक पोस्टवर, डाएटवर विश्वासू नका. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या, असा सल्ला दिला.              
                यावेळी  जानेवारीचा संचारचा अंक सर्वांना देण्यात आला. मंडळाकडून तिळगुळ देण्यात आला. इतरांचीही तिळगुळाची देवाण घेवाण चालू होती.औरंगाबादहून आलेल्या शुभार्थी आरती तिळवे यांनी संक्रांतीनिमित्त स्वत: विणलेले रुमाल महिलांना दिले.
        हे सर्व चालू असताना डॉक्टरांच्या भोवती प्रश्न विचारण्यासाठी अनेकांनी कोंडाळे केले होते.ते आता वक्ते न राहता आमच्यातील एक होवून गेले होते. हा सिलसिला त्यांनी स्कुटरला किक मारेपर्यंत चालू राहिला.
                                                         निवेदन
सोमवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंळाची  सभा आयोजित केली आहे.
 स्पीच थेरपिस्ट नमिता जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.यावेळी  शुभार्थींची तपासणीही केली जाणार  आहे. सर्वांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा
यावेळी विजयालक्ष्मी रेवणकर यांनी अनुवादित केलेल्या 'पार्किन्सन्सविषयक मौलिक सूचना' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले जाणार आहे.
 स्मरणिकेसाठी ज्यांना लेखन द्यायचे आहे ते त्यांनी यावेळी आणावे 
वेळ दुपारी- ४.१५
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४


११ फेब्रुवारी २०१९ सभा वृत्त.
                       सोमवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती. यावेळी स्पीच थेरपिस्ट डॉक्टर नमिता जोशी यांचे व्याख्यान झाले. सभेस ४०/५० जण उपस्थित होते.यावेळी शुभार्थींची तपासणीही त्यांनी केली
                       प्रार्थनेनंतर शुभंकर, शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.वाढदिवसानिमित्त नारायण कलबाग यांनी राजगिरा वडी आणि वसू देसाई यांनी आंबा बर्फी आणली होती.
 यानंतर विजयालक्ष्मी रेवणकर यांनी अनुवादित केलेल्या 'पार्किन्सन्सविषयक मौलिक सूचना' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ शुभार्थी नारायण कलबाग यांच्या हस्ते झाले. शोभना तीर्थळी यांनी पुस्तकाची पार्श्वभूमी आणि  विजयालक्ष्मी रेवणकर  यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
                   शरच्चंद्र पटवर्धन यांनी श्रवणोपचार म्हणून छोटा एम पी थ्री प्लेअर शुभार्थीना मोफत दिला होता. त्याबद्दल मनोगत व्यक्त केले.शेखर बर्वे यांनी वैविध्यपूर्ण शब्दकोडी असणारे, घरातल्या सर्वांसाठी ज्ञान आणि मनोरंजन करणारे  'फुल मनोरंजन' हे मासिक सर्व शुभार्थीना मोफत दिले.त्यांनी आपल्या पत्नीवर याचा आधी प्रयोग केला होता.मेंदूला व्यायाम म्हणून हे साधन त्यांना उपयुक्त वाटले.
                     डॉक्टर नमिता जोशी आणि त्यांच्या  सहकारी यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.नमिता जोशी यांची ओळख शोभना तीर्थळी यांनी करून दिली.त्यांच्याबरोबर स्पीच थेरपिस्ट ऋतिका सोनटक्के,पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या साक्षी,निधी आणि फिजिओथेरपिस्ट मेघन फुटाणे आल्या होत्या.
                   डॉक्टर नमिता यांनी सुरुवातीला पार्किन्सन्ससाठी स्पीचथेरपीची थोडक्यात माहिती दिली. 
             पार्किन्सन्ससाठी घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांचा बोलण्यावर परिणाम होतो असे सांगितले.त्यामुळे गोळ्या घेतल्या घेतल्या फोनवर बोलायचे असेल तर तसे  न करता गोळ्यांचा परिणाम संपत आल्यावर बोलावे असा सल्ला दिला.बोलताना आवाज,उच्चार, अनुनासिकता आणि सहजता यांचा विचार करण्याची गरज सांगितली.श्वासाची तीव्रता जितकी जास्त तितकी आवाजाची तीव्रता जास्त असते.श्वासाचे नियंत्रण,श्वास रोखण्याची क्षमता आणि बोलताना त्याचा वापर या बाबी महत्वाच्या असल्याचे सांगितले.'Think loud  speak shout' असा कानमंत्र दिला.याला अनुसरून सर्वांच्याकडून एक Activity करून घेतली.आपल्या  आवाजाचे रेकॉर्डिंग करून व्यायामाने आवाजात फरक पडत आहे का हे पाहण्यास सांगितले.
              यानंतर भ्रामरी प्राणायाम कसा करायचा हे सांगून त्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.श्वास घेतला की पोट पुढे येणे,श्वास सोडताना पोट आत घेणे असा श्वासोच्छवास करायला हवा.
             आता सर्वांची तपासणी करण्याचा तिसरा टप्पा सुरु झाला.ज्यांनी गोळी घेवून बराच वेळ झाला आहे त्यांची तपासणी आधी करण्यात आली.याबाबत सर्वांनी सहकार्य केले.
            यावेळी उर्वरित शुभंकर, शुभार्थी एकमेकांशी ओळखी करून घेणे,बर्वे यांनी दिलेल्या पुस्तकातील कोडी सोडवणे, अनुभव शेअर करणे यात गुंतले होते.
           नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकाची विक्रीही यावेळी करण्यात आली.
                                                           निवेदन
सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंळाची  सभा आयोजित केली आहे.
फिजिओथेरपिस्ट मेघन फुटाणे या 'पार्किन्सन्स शुभार्थीसाठी श्वसनक्रिया आणि ह्रुदयसंबंधी फिजिओथेरपी' याविषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत. 
वेळ दुपारी- ४

ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)

TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
                                                   ११ मार्च २०१९ सभावृत्त
                             सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची  सभा आयोजित केली होती.
फिजिओथेरपिस्ट मेघन फुटाणे यांनी  'पार्किन्सन्स शुभार्थींसाठी श्वसनक्रियेसंबधी  फिजिओथेरपी' या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.सभेस ५०/६० जण उपस्थित होते.सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपांजली कद्दू यांनी त्या करत असलेल्या  नॉनमोटर सीम्पटम्स्च्या प्रयोगाविषयी माहिती दिली आणि त्यात सहभागी होण्यास सांगितले.भरत नाट्यम नृत्यांगना डॉक्टर मीनल भिडे या होमिओपाथी,बाखरेमेडी,आरईबीटी आणि नृत्योपचार याद्वारे शुभार्थींना मदत करू इच्छितात, त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.ज्योत्स्ना सुभेदार यांनी वाढदिवसानिमित्त बर्फी देवून सर्वांचे स्वागत केले.अशोक पटवर्धन यांनी चहा दिला.
                             मृदुला कर्णीं यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि व्याख्यानाला सुरुवात झाली.वक्त्यांनी सुरुवातीला पार्किन्सन्सची विविध लक्षणे सांगून श्वसनाला त्यामुळे कसा अडथळा येतो याची माहिती दिली.बरगड्यांच्या आत असलेली फुफ्फुसे, हृदय, पाठीचा कणा, मानेचे स्नायू हे श्वसनासाठी महत्वाचे असतात.ताठरता या लक्षणामुळे फुफ्फुसाजवळचे स्नायू कडक झाल्याने आणि पाठीचा कणा वाकल्याने फुफ्फुसाच्या प्रसरण पावणे आणि आकुंचन पावणे या क्रियेत व्यत्यय येतो.फुफ्फुसाच्या खाली डायफ्राम असतो.तोही कडक होतो.त्यामुळे छातीच्या, पर्यायाने फुप्फुसाच्या कार्यातही व्यत्यय येतो.श्वास घेणे, सोडणे पुरेसे होत नाही .ऑक्सिजनचा  पुरवठा कमी होते. श्वासनलिका ताठर झाल्याने कार्बनडायऑक्साईड बाहेर येत नाही.प्राणवायू येण्यास जागा राहत नाही.यासाठी श्वासाचे व्यायाम गरजेचे.याशिवाय कोणत्याही प्रकारचे व्यायाम ४०/५० मिनीटे तरी करावेत.
                        यानंतर दीर्घ श्वसन आणि तोंडाने फुंकर घालत श्वास सोडणे असा व्यायाम त्यांनी सर्वांकडून करून घेतला.श्वास घेताना पोट पुढे येणे आणि सोडताना आत घेणे गरजेचे.यानंतर डायफ्रामिक, सेगमेंटल ब्रीदिंग कसे करायचे ते दाखवले.बायपास सर्जरी झालेल्यांनीही हे करावयास हरकत नाही. श्वासाचे सर्व व्यायाम दिवसातून कधीही प्रत्येकी १० वेळा करण्यास सांगितले.यासाठी व्यायामाच्या आधी खाण्यापिण्याचे बंधन नाही.
                     यानंतर मानेपासून पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवांची हालचाल ३/४ वेळा करण्यास सांगितले.पायात थोडे अंतर ठेवून व्यायाम केल्यास तोल जाणार नाही.याशिवाय पोहणे, नृत्य, चालणे,  जागच्याजागी पळणे असे कोणतेही व्यायाम करु शकता.
                    यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.वक्त्यांच्या विषयाशी संबंधीत नसलेल्या विषयाबाबत प्रश्न विचारले जात होते त्यांनाही मेघन फुटाणे यांनी उत्तरे दिली.बरेच प्रश्न  वैयक्तिक स्वरूपाचे होते.
त्यातील महत्वाचे मुद्दे :
                  आयसीयूमध्ये एसीत ठेवलेल्या पेशंटला कफ होतो असे आढळते.याचे एक कारण तेथे असणारे पेशंट बहुतेकवेळा शस्त्रक्रियेनंतर ठेवलेले  असतात. शस्त्रक्रियेच्यावेळी भूल दिली जाते. त्यामुळे ९५% पेशंटना कफ होतो.सक्शनद्वारे तो काढला जातो.शस्त्रक्रियेपुर्वी काही श्वसनाचे व्यायाम शिकवले जातात, ते शस्त्रक्रियेनंतर करावेत.
                 एरवी कफ झाल्यास वाफारा घ्यावा.फुंकर घालण्याचा व्यायाम २५/३० वेळा करावा.कफ होऊ नये म्हणून स्नायूंची, फुफ्फुसाची ताकद वाढवणे,सर्वसाधारण  ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढवणे महत्वाचे.
                 पार्किन्सन्स आणि न्युमोनिया याबद्दल सांगितलेली माहिती सर्वांसाठीच गरजेची आहे.इन्फेक्शनमुळे न्युमोनिया होतोच पण पीडी पेशंटच्या श्वासनलीकेच्या आजूबाजूच्या स्नायूंची ताकद कमी होते आणि त्याचा पॅरालीसीस होतो. श्वासनलिका दाबली जाते.अन्ननलिका जवळच असते.त्यातील अन्नकण श्वासनलीकेतून फुफ्फुसात जातात.त्यामुळे  न्युमोनिया होतो.याप्रकारचा न्युमोनिया होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी म्हणजे, जास्त सॉलिड पदार्थ न खाता पातळ पदार्थ घ्यावेत.खाताना बोलू नये.ठसका लागल्यास लगेच अडकलेले कण खोकून बाहेर काढावे.
                   दम लागणे,थकवा येणे असे झाल्यास भिंतीला टेकून उभे राहावे, वाकावे आणि फुंकर घालण्याचा व्यायाम करावा.
                     वक्त्यांच्या उत्तरांमुळे सर्वांचेच समाधान झाले.
  
                                              निवेदन

११ एप्रिल २०१९  रोजी असणाऱ्या जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त पार्किन्सन्स मित्रमंडळ,शनिवार दि.१३ एप्रिल २०१९ रोजी सर्वांसाठी मेळावा आयोजित करत आहे.

प्रमुख वक्त्या - डॉक्टर  चारुलता सांखला ( न्यूरॉलॉजिस्ट ) मुंबई

स्थळ : एस.एम.जोशी सभागृह,नवी पेठ,पुणे

वेळ : दुपारी ४. ते ६.३० 

यावेळी स्मरणिका प्रकाशन

शुभार्थींचे ( पार्किन्सन्स पेशंट ) नृत्य आणि

शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन असणार आहे.
जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा २०१९ - वृत्त
                        ११ एप्रिलच्या  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दरवर्षी पार्किन्सन्स मित्रमंडळ  मेळावा आयोजित करते. हा मंडळासाठी आनंदोत्सव असतो.यावर्षी शनिवार १३ एप्रिल रोजी एस.एम.जोशी हॉल येथे हा मेळावा आयोजित केला होता.दुपारी चार वाजताच्या कडक उन्हाची पर्वा न करता साधारण २५० च्या आसपास श्रोते उपस्थित होते.आल्याआल्या मोरेश्वर मोडक, प्रकाश जोशी सर्वांचे अत्तर लावून आणि ताक देऊन स्वागत करत होते आणि सर्वाना रजिस्ट्रेशन टेबलकडे जाण्यास सांगत होते.
                          रजिस्ट्रेशन टेबलवर नाव नोंदणी,नवीन आलेल्या शुभार्थींचे फॉर्म भरून घेणे,पुस्तक विक्री, स्मरणिका देणे या सर् वकामांची व्यवस्था केली होती.वैशाली खोपडेकडे हे काम सोपवले होते.
                     हॉलबाहेर शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
                    डॉक्टर प्रकाश जावडेकर,विजय देवधर,रमेश रेवणकर, केशव महाजन,उमेश सलगर, आरती तिळवे,उल्हास बापट या शुभार्थींनी आपल्या कलाकृती ठेवल्या होत्या.सोनाली मालवणकरला गिरीश कुलकर्णी आणि वैभव शिरसाट या कामात मदत करत होते.
                    मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटल येथील न्यूरॉलॉजिस्ट, पीडीएमडीएस या स्वमदत गटाच्या अध्यक्ष आणि पार्किन्सन्सवर अनेक वर्षे संशोधन करणाऱ्या डॉ.चारुलता सांखला या प्रमुख वक्त्या म्हणून आल्या होत्या.त्यांनी 'पार्किन्सन्सच्या औषधांचे दुष्परिणाम आणि औषधांचे नियोजन' या विषयावर व्याख्यान दिले.वक्त्या आणि विषय या  दोन्हींचेही सर्वांना आकर्षण होते. 
                          मृदुला कर्णी यांनी सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले.त्यानंतर  ९६ वर्षाचे शुभार्थी नारायण कलबाग यांनी इशस्तवन म्हटले.तब्येत बरी नसतानाही ते मुंबईहून कार्यक्रमासाठी आले होते.यानंतर संस्थेचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला कर्णी यांनी केले.
                        यानंतरचा  कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता. नृत्यामध्ये रेखा आचार्य, प्रज्ञा जोशी नारायण जोगळेकर, उषा शर्मा, शीला वाघोलीकर,मंगला  तिकोने,विजय देशपांडे, श्री. पारेख, कर्नल प्रमोद चंद्रात्रेय,धीमंत देसाई,श्रीराम भिडे,पारिजात आपटे,मंजिरी आपटे, या शुभार्थी व  शुभंकरांनी सहभाग घेतला.सुरुवातीला त्यांचे शिक्षक हृषीकेश पवार यांनी नृत्योपचाराची पार्श्वभूमी सांगितली.त्यानंतर नृत्यास सुरुवात झाली.'बार बार देखो हजार बार  देखो' 'इना मीना डिका' या उडत्या चालीच्या गाण्यांवर नृत्याविष्कार झाला. श्रोत्यांनीही  ठेका धरला.यानंतर 'तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालंना' हे गाणे सादर केले.या गाण्याला वन्समोअर मिळाला.
                           यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉक्टर चारुलता सांखला  यांचे शोभना तीर्थळी  आणि रामचंद्र करमरकर यांच्यासह मंचावर आगमन झाले. शरच्चंद्र पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.मृदुला कर्णी यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
                          मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर चारुलता सांखला  यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.याचवेळी वेबसाईटवरही अतुल ठाकूर यांनी  स्मरणिका प्रकाशित केली.
                          वक्त्यांच्या  व्याख्यानासाठी सर्वच उत्सुक होते.डॉक्टर सांखला यांनी सोशल मिडीयावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमुळे 'Apomorphine   मुळे पार्किन्सन्स बरा होतो 'हा गैरसमज  निर्माण झाला  आहे, तो प्रथम दूर.केला.असे व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका असे त्यांनी सुचविले. यानंतर डीबीएस सर्जरीबाबतही ती सर्वांनाच उपयोगी नाही, त्याबाबतही न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा असे प्रतिपादन केले. विविध औषधे, ते घेण्याच्या पद्धती,त्यांचे दुष्परिणाम,नियोजन याबाबत विस्ताराने चर्चा केली.भारतात आलेल्या आणि येऊ घातलेल्या नविन उपचारांविषयीही माहिती सांगितली.
                       विषय जिव्हाळ्याचा असल्याने प्रश्नांची सरबत्ती झाली.हळूहळू वैयक्तिक प्रश्न सुरु झाले. परंतु वक्त्यांनी अजिबात न कंटाळता सर्व  प्रश्नांची उत्तरे दिली.या उपयुक्त व्याख्यानाची लिंक पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या www.parkinsonsmitra.org या वेबसाईटवर  दिलेली आहे ती सर्वांनी जरूर पहावी.
                         यानंतर वसू देसाई यांनी काही निवेदने सांगून आभार प्रदर्शनाचे काम केले.
                         डॉ. सांखला या मुंबईहून स्वत: गाडी ड्राईव्ह करत आलेल्या होत्या. पुन्हा त्यांना लगेच मुंबईला परत जायचे होते तरीही त्यांनी जाताना शुभार्थींच्या कलाकृती पाहून त्यांचे कौतुक केले.
                        दरवर्षी जाताना वाहन मिळत नाही म्हणून अनेक लोक लवकर उठतात किंवा यायचे टाळतात.यावर्षी कार्यक्रम संपल्यावर पाऊस पडत होता त्यामुळे वाहने मिळणे अधिकच कठीण झाले होते.परंतु विद्यार्थी सहाय्य समितीचे गिरीश कुलकर्णी आणि वैभव शिरसाट यांनी शेवटपर्यंत थांबून सर्वाना रिक्षा आणून द्यायचे काम केले.
सर्व कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त पत्रकार अमोल आगवेकर यांनी Bytes of India वर ईशस्तवन आणि नृत्याच्या व्हिडिओसह दिले.

                           
                                                 निवेदन
                          सोमवार दिनांक १३ मे  रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
संगणक अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखिका नीलांबरी जोशी  या 'चित्रपट आणि साहित्यात डोकावणारा पार्किन्सन्स' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे.  
वेळ : दुपारी ४
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
                         १३ मे २०१९ - सभावृत्त
                       १३ मेच्या सभेत  निलांबरी जोशी या 'चित्रपट आणि साहित्यातून डोकावणारा पार्किन्सन्स' या विषयावर व्याख्यान देणार होत्या.परंतु त्या आजारी पडल्यामुळे येऊ शकल्या नाहीत.आयत्यावेळी परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करण्याचे ठरले .'शुभंकरांनी स्वत:ला स्पेस देत शुभार्थीला हाताळण्यासाठी कोणते उपाय योजले' असा विषय ठरला.
                     सुरुवातीला नेहमीप्रमाणे प्रार्थना,चहापान आणि वाढदिवस साजरे करण्यात आले.रेवणकर यांनी वाढदिवसानिमित्त चॉकलेट दिली.त्यानंतर एकेकांनी आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली.प्रथम आशा रेवणकर यांनी आपले अनुभव सांगितले.त्यांच्या पतीना पीडी होऊन १६/१७ वर्षे झाली.स्वमदत गटाबद्दल समजल्यावर रेवणकर सभेस येण्यास फारसे उत्सुक नव्हते.परंतु आशाताई जाऊन तरी पाहू म्हणून सभेस आल्या.तज्ञांच्या व्याख्यानांमुळे पीडीला हाताळणे सोपे आहे असे वाटू लागले.मंडळातील लोकांचे डेडिकेशन पाहून या कामात सहभागी होण्यास त्या प्रवृत्त झाल्या.या सहभागामुळे पेशंटला हाताळताना पेशंटला स्पेस देत,स्वत:लाही स्पेस द्यायला हवी हे त्यांना समजले.प्रत्येक पेशंट वेगळा, त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध सभेस येण्यास न लावता त्यांच्या प्रवासाची आवड जपली.पीडी झाल्यावर जास्तीतजास्त प्रवास झाला.त्यांनीही प्रवासात स्वत:स एखाद्या स्थळाला भेट देण्यास जायचे नसल्यास एकटे खोलीवर राहून आशाताईना जाऊ दिले.आशाताईनी सतत त्यांच्याबरोबर न राहता  लेखन,एस.एस.सी बोर्डातील काम अशी स्वत:ला आनंद देणारी कामे केली.गरज पडल्यावर कामाचा वेळ कमी केला.   
                  अंजली महाजन अनेक दु:खद घटना,धक्के पचवत अत्यंत हळव्या मनाच्या पतीच्या पार्किन्सन्सशी दोन हात करण्यास कणखर झाली.२००३ ला पीडीचे निदान झाले.नोकरी करणे अशक्य झाल्याने व्हीआरएस घेतली.अंजलीने त्यांच्या गाण्याची ,सिनेमाची आवड ओळखून सीडी,डीव्हीडी खरेदी केल्या.वाचनाची आवड जाणून अनेक उत्तमोत्तम पुस्तके दिली.लाईव्ह कार्यक्रमांनाही नेले.अंजली मुख्याध्यापिका म्हणून नोकरी करत होती.२०१२ पर्यंत नोकरी करत सर्व सांभाळणे शक्य होते. त्यानंतर मात्र केशवरावांचा एकटेपणा, नैराश्य आणि पीडी वाढतोय हे लक्षात आल्यावर २०१२ मध्ये तिने व्हीआरएस घेतली.आता ती विविध प्रकारांनी पतीला आनंदी ठेवण्याचा  प्रयत्न करते.Whatsapp, वर्तमानपत्रातील चांगल्या गोष्टी वाचून दाखवणे,पत्ते, कॅरम खेळणे,कोडी सोडवणे,फिरवून आणणे इत्यादी. हे करताना  लेखन,सामाजिक कार्य या स्वत:च्या आवडीही जपते.१०५ वर्षाच्या सासूबाई आठ महिन्यांपूर्वी गेल्या. आईवेडे केशवराव दु:खातून अजून बाहेर पडले नाहीत.त्यांना प्रेमाने,समजुतीने तर कधी नाठाळ मुलाला वठणीवर आणणाऱ्या मुख्याध्यापिकेच्या भूमिकेत शिरून ती त्याना हाताळते.'मित्रमंडळाचा या सर्वात खूप आधार वाटतो' असे अंजली म्हणाली.
                      शशिकांत देसाई यांना १५ वर्षे पीडी आहे.त्यांना हाताळण्याचे अनुभव वसुमती देसाई यांनी सांगितले.सुरुवातीला ते हे स्वीकारत  नव्हते. औषधोपचाराने  ठीक होते.पण चार वर्षांपासून  त्यांना भास होऊ लागले. आई जाऊन पाच वर्षे झाली पण त्याना अजून आई आहे असे वाटते.त्यांच्याशी बोलल्यावर, समजावल्यावर  त्यांच्या लक्षात यायचे आई नाही.पण पुन्हा मुळ पदावर. हळूहळू त्यांचे बोलणे कमी झाले.संवाद हा अत्यंत आवश्यक असल्याने डॉक्टरांनी डे - केअरचा पर्याय सुचवला.संवादासाठी हा उपचाराचा भाग होता. त्यांना ते पटत नव्हते.फिजिओथेरपिस्ट याबाबत मन वळवण्यात यशस्वी झाल्या.मुलीशीही याबाबत बोलणे झाले. हा चौकटीबाहेरचा विचार होता, त्रासदायक होता पण त्यांच्या हितासाठी तो स्वीकारला.आणि रेनबो डे - केअर सुरु झाले. सकाळी ९ ते ५  तेथे देसाई जातात. न्यायला गाडी येते.चांगल्या लोकांच्या सहवासात चांगल्या गोष्टी केल्या जातात.तेथे गेल्यापासून धीम्या गतीने पण फरक पडतोय.रेनबोच्या प्रतिनिधीकडून तो समजत जातो. दिवसभर  वसुमतीलाही वेगवेगळी कामे करण्यासाठी वेळ मिळतो.पूर्वी सगळीकडे त्यांना न्यावे लागायचे. त्यांच्या औषधांच्या वेळा, खाण्याच्या वेळा सांभाळून ते करणे कठीण जायचे.आता स्वत:साठी थोडा वेळ देता येतो,वाचन करता येते.पती चांगल्या ठिकाणी आहेत याचा आनंदही आहे.वसुमतीनी याचबरोबर फिजिओथेरपी सुरुवातीपासून करावी असेही सुचविले.
                   यानंतर शोभना तीर्थळी यांनी आपले अनुभव सांगितले.'शुभार्थी असावा तर असा' असे त्यांनी तीर्थळी यांचे वर्णन केले.त्यांना काहीजण 'रोल मॉडेल' म्हणतात .'तुम्हीही बना रोल मॉडेल' असा लेख लिहून तीर्थळी यांनी आपण काय करतो ते लिहिले होते. त्यांनी पीडीला स्वीकारले आहे. ते सातत्याने व्यायाम करतात.स्वत:ची कामे स्वत: करतात.'माझा रोल कॅटॅलिस्टचा आहे. मी स्वत: प्रत्यक्ष काही करत नाही.परंतु  त्यांच्या आजुबाजुचे वातावरण आनंदी राहील असा प्रयत्न जाणीवपूर्वक करते' असे शोभना तीर्थळी यांनी सांगितले.त्यांना माणसे आवडतात,बोलायला आवडते हे माहित असल्याने माणसांच्या सहवासात सतत राहण्याचा प्रयत्न असतो.प्राणायामासाठी रोज आजुबाजुच्या व्यक्ती येतात. त्यामुळे त्यात सातत्य राहते.त्यांना एकटे कोठे जाऊ द्यायचे,बरोबर केंव्हा राहायचे याचे भान ठेवावे लागते.त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि इगो जपला जाईल अशा वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न असतो. घरातच गाण्याचा क्लास असतो त्यामुळे स्वत:ला स्पेस मिळते आणि माणसांचा वावर राहतो. तो शुभार्थीसाठीही आवश्यक असतो.दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींसाठी पैशाचा फार  विचार न करता हाकेला लगेच हजर होतील अशी  आपली सपोर्ट सिस्टीम उभी केली.छोट्या मोठ्या कामासाठी सहाय्यक व्यक्ती पुरविणाऱ्या 'क्रोनी केअर' सारख्या सेवेचा गरजेनुसार वापर केला.
                         यानंतर आपले मनोगत व्यक्त करणारे शुभार्थी डॉक्टर प्रकाश जावडेकर  यांचे अनुभव मोलाचे होते.त्यांच्यातील डॉक्टर त्यांचा शुभंकर बनून विचार करत होता.पीडीचा स्वीकार पती पत्नी दोघांनीही करायला हवा. पत्नीला  तू माझे निरीक्षण कर आणि माझ्यातील बदल नोंदवून मला सांग असे त्यांनी सांगितले.नैराश्य येऊ द्यायचे नाही कारण ते शरीर,मन, मेंदू सर्वालाच खाते.त्यासाठी कामात रहायचे. ते स्वत: भाजी चिरण्यापासून गरजेनुसार स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व कामे करतात. यामुळे बोटांना व्यायाम होतो. व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे.प्रत्येक अवयवाची  हालचाल होईल असा व्यायाम करावा.डॉक्टर शरीरावर उपचार करतात. मनावर उपचार स्वत:च करायला हवेत.मन खंबीर असले तर शरीर नीट राहते.आपला मेंदू सतत नको ते विचार करतो.ते थांबविण्यासाठी  छंद जोपासा.यात  चित्रे काढणे, वाचन,घर साफ करणे,चेस खेळणे,स्वयंपाक करणे असे सर्व काही येऊ शकते. छंदामुळे नवीन गोष्टीत मन गुंतल्याने मेंदूतील  पेशी  कार्यान्वित राहतात.जावडेकर यांनी पेंटिंगचा छंद जोपासला.निद्रानाशाच्या त्रासाला चित्रकलेत उत्तर शोधले.आकाशकंदील करणे,लेखन करणे.पदार्थ करून खाऊ घालणे या गोष्टीही ते करतात.या सर्वातून मेंदूला आनंदाचे पंपिंग सातत्याने होत राहते.यामुळे लक्षणावरही मात होते.त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या व्हिडीओत त्यांच्या  हाताचा कंप ठळकपणे दिसतो पण आत्ता कंप राहिला नाही. 'मी माझा आजार एन्जॉय करतो' असे ते म्हणाले.इतर अनेक आजारांपेक्षा पीडी सुखावह आहे असा विचार करा असाही सल्ला दिला.
                      शेखर बर्वे यांनी आपल्या मनोगतात शुभंकर आणि शुभार्थी यांच्या एकत्र प्रयत्नातून पीडीला हाताळताना शुभार्थी हा नेता असतो आणि शुभंकर हा कार्यकर्ता असतो असे सांगितले.विचार, आचार आणि उपचार याबाबत जे जे करता येईल ते दोघांनी करावे.उपचाराच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीनुसार, अवस्थेनुसार गरज वेगळी असेल. विचार आणि आचाराबाबत मात्र दोघांचे संगनमत असेल तर आजाराला हाताळण्याचे काम सोपे होते.शुभार्थीला काय करणे शक्य आहे हे माहित असल्यास चांगले.शुभार्थीला जे जमते, आवडते त्याबाबतच आग्रह धरावा.या आजारात सुधारणा शक्य नाही हे समजल्यावर काही शुभार्थीच्याबाबत  हालचाली,बोलणे,विचार करणे,व्यक्त होणे सर्वच कमी होते.शुभार्थीच्या मर्यादा लक्षात घेऊन Optimization साठी काय प्रयत्न करता येतील हे पाहावे.शुभार्थीचे निरीक्षण करून योग्य माहिती डॉक्टरांना दिल्यास औषधोपचार योग्य होतात.आहार,विहारही महत्वाचा. वजन कमी होणे, ताकद कमी होणे, सांध्याची ताठरता वाढणे या सर्वांसाठी पूरक गोष्टींवर जास्त लक्ष द्यावे. त्या महत्वाच्या ठरतात.शुभार्थीला काय आवडते हे आपण ठरवतो ते आपल्या पूर्वानुभवावरून. पण त्यांच्या आवडी निवडी बदललेल्या असतात.त्यामुळे तसे न करता शुभार्थीचा कल पहावा.जबरदस्ती करू नये.या सर्वांमुळे आजार आहे त्यापेक्षा जास्त सुसह्य होईल.
                       शुभार्थी बा.दा.जोशी नांदेडहून खास आले होते.महाविद्यालयातून विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यांचे इतर कार्य आणि अनुभव हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.ते दैनंदिन कामे स्वत:ची स्वत: करतात. शिवाय बारमाही शेतीची कामे करतात. यासाठी ४/५ मैल चालावे लागते पण ते काठी वापरत नाहीत.एकटे फिरतात.प्राध्यापक पत्नीची मदत होते.ज्येष्ठ नागरिक संघ, ग्राहक पंचायत,  ग्राम पंचायत अशी इतर सामाजिक कामेही सुरु असतात.त्यांनी आणि त्यांच्या पत्नींनी लिहिलेले 'श्रीक्षेत्र माहूर' हे पुस्तक मंडळाला भेट दिले. लेखन अजून सातत्याने चालू आहे.प्रादेशिक वृत्तपत्रात त्यांचे दैनंदिन सदर असते.अनेक विद्यापीठांसाठी ते पीएचडीचे गाईड आहेत.शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपण स्वत: हाताने लिहिता की लेखनिक घेता असे विचारले  असता त्यांचे उत्तर 'स्वत: लिहितो' असे होते..लिहिताना कंप पूर्ण थांबतो. फक्त अक्षर आता बारीक झाले आहे असे ते म्हणाले.शरच्चंद्र पटवर्धन त्यांच्या यांच्या उदाहरणावरून 'लिहिते रहा' असा सल्ला दिला.
                       शुभार्थी शीला पागे म्हणाल्या, 'मी ७५ वर्षाची आहे.माझ्याबाबतीत शुभार्थी कोण, शुभंकर कोण हा प्रश्न पडतो'. त्या बँकेत नोकरी करत होत्या. बाहेरची कामेही त्यांनाच करावी लागत.पतीना दम्याचा त्रास आहे.औषधाचा परिणाम थोडावेळ राहतो. घरी राहून ते सल्लामसलत, मिटिंग करतात. त्यांचा जनसंपर्क मोठ्ठा आहे पण ते बरोबर येऊ शकत नाहीत.ही वस्तुस्थिती स्वीकारली.आपल्याला आपले आपणच उभे राहायचे आहे, काम करायचे आहे असे मनाला पटवले, निर्धार केला. त्यामुळे सर्व कामे जमतात. १५ वर्षे झाली पीडी तसा नियंत्रणात आहे.शेजारी असलेला दीर आणि भाचा यांची मदत होते.
                   यानंतर अमिता धर्माधिकारी बोलल्या.शुभार्थी अविनाश धर्माधिकारी यांना पीडी झाल्याचे समजून २ वर्षे होताहेत.त्याआधी छुप्या स्वरुपात तो होता.पण वेळोवेळी तपासण्या करूनही तो सापडला नव्हता.आधी कोणताच आजार नसल्याने गोळ्या घेणे टाळत.रागावून त्या  घ्यायला लावाव्या लागत.निवृत्त झाल्यावर बंगलोरच्या 'व्यास युनिव्हर्सिटी फॉर योगा, आयुर्वेद आणि नॅचरोपाथी' येथे गेलो.तेथे आजारानुसार विभाग असतात.दिवसभर वेगवेगळ्या Activity असतात.त्यांना याची आवड असल्याने त्यांनी त्या मनापासून केल्या. तेथे त्यांचा कंप गेला.डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनाही फरक जाणवला.तुम्ही करता त्या गोष्टींची क्लिप करून द्या, इतर पेशंटना उपयोग होईल असे सांगितले.त्यांना बोलायला आवडते.ती त्यांची  आवड जपली जाते. अजूनही ते सल्लागार म्हणून काम करतात. हे करतानाही बोलणे होते, आजार विसरला जातो .बौद्धिक खाद्य आणि बोलणे दोन्हीही होते.परंतु दिवसभर बाहेर जाऊन काम करण्यास मात्र विरोध केला.त्यांचे खाणे पिणे,औषधे घेणे या वेळा सांभाळण्यासाठी चार्ट करायला लावला.
                आत्तापर्यंत कधीही न बोललेले शुभार्थी दिलीप कुलकर्णी हे स्वत:हून बोलायला पुढे आले.त्यांच्या प्रगतीचे ते निदर्शक वाटले. त्यांनीही व्यास युनिव्हर्सिटीची कार्यशाळा केली.त्याचा त्यांना चांगला उपयोग झाला असे सांगितले.वर्षभर ते त्यानुसार ओंकार,प्राणायाम करत आहेत.त्यांच्या  निगेटिव्ह विचार करण्याच्या वृत्तीत फरक झाला.त्यांच्या पत्नी शैलजा कुलकर्णी म्हणाल्या, बंगलोरला जाण्यासाठी त्याना खूप पुश करावे लागले.त्यांची परिस्थिती खूप वाईट होती.व्हीलचेअरवरून न्यावे लागले.शुभार्थीच्या मनात नाही तर आपण इतका आटापिटा का करतो असेही वाटत होते.परंतु आत्ता त्यांनी आपणहून झालेला फायदा सांगितल्याने आपण कठोर वागून घेतलेला निर्णय योग्य होता असे वाटले.त्यामुळे प्रसंगी कठोर वागावे लागले तरी ते शुभार्थीच्या हिताचे असल्याने त्याचे वाईट वाटून घेऊ नका अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
                सर्वानांच ही अनुभवांची देवाघेवाण उपयुक्त वाटली.पुन्हापुन्हा असे कार्यक्रम ठेवावेत असे सुचविण्यात आले.

         निवेदन
                          सोमवार दिनांक १0  जून रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
            डॉक्टर यश वेलणकर हे 'आरोग्यासाठी सजगता ध्यान ( Mindful Meditation) '
 या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे.  
वेळ : दुपारी ४
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, विवेकानंद केंद्र, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५,
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४

                   
                
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 
                           
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               
                           

             
               


               

No comments:

Post a Comment