Tuesday 24 July 2018

पर्किन्सन्स विषयक गप्पा - १९

                                        पार्किन्सन्स विषयक गप्पा - १९
                               'केल्याने देशाटन' म्हणतात तसे मी 'केल्याने घरभेटी' असे म्हणेन घरभेटीनी आम्हाला समृद्ध केले.शुभंकर आणि शुभार्थी कसा असावा,कसा नसावा याची जाण दिली. भाराऊन टाकणारे अनुभव दिले,आमच्या कार्याला दिशा दिली.यादी अशी खूपच लांबत जाईल. माझी मैत्रीण निरुपमा जोशीला मी घरभेटी झाल्या की, भरभरून त्याबद्दल सांगायचे.एका घरभेटीच्यावेळी तिला बरोबर न्यायचा प्रसंग आला.आम्ही के. के.मार्केटजवळ जाणार होतो.तेथेच एक शुभार्थी राहतात मी तिला म्हटले जायचे का? तिलाही उत्सुकता होती.आम्ही आधी फोन करून येऊ का विचारले.त्यांनी होकार दिला.
                            गप्पा सुरु झाल्या.शुभंकर बाई शुभार्थीना बोलूच देत नव्हत्या.विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्याच देत होत्या. माझे सर्व प्रश्न त्यांना निरर्थक वाटत होते.मी नेलेले पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत पुस्तक त्यांना दाखवले.याची ६० रुपये किंमत आहे.त्यांना ते घ्यायचे नव्हते.मी त्यांना म्हणाले, 'घ्यायचे नसेल तर तसेच राहूदे.वाचून झाले की परत द्या' यालाही त्यांचा नकार होता.त्याना वेळच्यावेळी खायला प्यायला देतो,औषधोपचार करतो,वेळच्यावेळी डॉक्टरकडे जातो.या वयात आणखी काय हवे.असा त्यांच्या एकूण बोलण्याचा आशय होता.संभाषण पुढेच जात नव्हते.मी ते पुढे नेण्याचा परोपरीने प्रयत्न करत होते.
'तुम्ही सभांना का येत नाही?मी विचारले.
'आम्हाला शक्य नाही' त्या.
'.अंतर लांब पडते म्हणून का? जवळ सभा असली तर याल का?' मी.
त्यांनी नुसतीच नकारार्थी मान हलवली.'त्यांना नेणे आणणे शक्य नाही का?आम्ही कोणी सोबत दिली तर येतील का?' पुन्हा मानेनेच नकार.
शेवटी वैतागलेल्य चेहऱ्यानीच दिलेल्या उत्तराचा  त्याना वेळच्यावेळी खायला प्यायला देतो,औषधोपचार करतो,वेळच्यावेळी डॉक्टरकडे जातो.या वयात आणखी काय हवे.असा आशय होता.आता बोलणेच खुंटले होते.नेमकी माझी मैत्रीण बरोबर असताना असा अनुभव यावा याचे मला वाईट वाटत होते.
                   त्या चहा करायला आत गेल्या आणि आता शुभार्थी बोलायला लागले.त्यांच्या डोळ्यात चमक आली होती. आम्ही आल्याचे त्यांना छान वाटले होते.आपले अक्षर पार्किन्सन्सने बिघडले याचे त्यांना वाईट वाटत होते.ते भरभरून बोलत होते. पत्नी आली आणि कळ दाबावी तसे त्यांचे बोलणे बंद झाले.
चहा घेऊन आम्ही निघालो.थांबून काही निष्पन्न होईल असे वाटत नव्हते.
                 मला मात्र त्या बाईना ( शुभंकर म्हणावेसे वाटत नाही.) हलवून हलवून 'त्याना तुमचे प्रेम हवेय,मायेचा स्पर्श हवाय,बोलायला माणसे हवीत,त्यांना सभानाही यायचे आहे.व्यक्त व्हायचे आहे असे सांगावेसे वाटत होते.
                 घरात असे वातावरण असल्यावर उदासीनता,नैराश्य असे मानसिक आजार शुभार्थीला गाठायला तयार असतातच आणि यातून शेवटची शय्याग्रस्त अवस्था यायलाही वेळ लागत नाही.
                या शुभार्थीचे असेच झाले.
 हे सर्व सांगायचे कारण शुभार्थीच्या आनंदी असण्यात शुभंकराची भूमिका किता महत्वाची आहे हे सांगणे.त्याविषयीच आणखी पुढच्या गप्पामधून.


                            
                             

No comments:

Post a Comment