Tuesday 13 February 2018

सुमन ताईना श्रद्धांजली

                      पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या हितचिंतक, पाठीराख्या,आम्हाला सतत सकारात्मक उर्जा पुरविणाऱ्या आदरणीय सुमनताई जोग यांचे १२ फेब्रुवारीला  निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 अरुण जोग यांना पार्किन्सन्स झाल्याने त्या मंडळात सामील झाल्या.अरुण जोग यांच्या मृत्युनंतर ही परिवाराशी नाते तसेच राहिले.
                    तरुणपणीच  संधीवाताने गाठलेली छोटीशी कुडी,वाकडी झालेली बोटे,अनेक आजाराने शस्त्रक्रीयानी पोखरलेले शरीर पण त्यात वास करणारे कणखर, स्वत:चा आजार जपताना आजूबाजूच्या व्यक्ती,घडामोडी यांचा विचार करणारे विशाल मन,फक्त विचार न करता ठोस कृती करून त्यावर उत्तर शोधण्याची वृत्ती.या कृतीत त्यांच्यातल्या सिव्हीलल इंजिनिअरने निट भविष्यकालीन आराखडा काढलेला असे.पुणे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अध्यापन केल्याने हा आराखडा समोरच्याला पटेलच अशा तऱ्हेने मांडण्याची हातोटी, समोर १५० विद्यार्थ्याना व्याख्यान देत आहेत असा खणखणीत आवाज.नुसत्या एका फोनवर कोणत्याही कामासाठी हजर होतील अशी जोडलेली उत्तम वकूबाची माणसे.८५ व्या वर्षी संधिवातावर स्वमदत सुरु करण्याची आणि प्रत्यक्षात आणण्याची  कल्पना सुमन ताईनाच सुचू जाणे.
                 त्यांच्या घरची दारे पार्किन्सन्ससाठी हृषीकेशने सुरुवात केलेला नृत्योपचार वर्ग असो,जे.कृष्णमूर्तीच्या तत्वज्ञानाची चर्चा करणारा त्यांचा ग्रुप असो की आमच्या कार्यकारिणीची मिटिंग असो सर्वाना सदैव खुलीच होती.
                   आमच्या मंडळावरचे त्यांचे प्रेम आणि पाठिंबा हे आमचे बळ होते.त्या सभेला आल्या की चैतन्य निर्माण व्हायचे.यावर्षीच्या आमच्या सहलीला त्या आवर्जून आल्या होत्या. खरे तर चार पाच पावले चालले तरी त्यांना झेपत नव्हते पण त्यांच्याबरोबर त्यांची सहाय्यिका आशा आली होती.येताना त्यानी बाजेवर टाकण्यासाठी चादर आणि उशी आणली होती इतर सर्व निसर्ग दर्शन करताना त्यांनी थोडा आराम केला.आपला आजार आणि शरीराची क्षमता त्यांनी समजून घेतली होती आणि शरीर आणि मन यांचा योग्य तो समतोल राखत त्या इतकी मोठ्ठी कामे करत होत्या.सहलीत ओळखीचा कार्यक्रम होता तेंव्हा त्यांनी सांगितले,मंडळाची सर्व माणसे साधी सरळ आहेत, मनापासून काम करतात. म्हणून मला हा ग्रुप आवडतो.रोख ठोक बोलणाऱ्या सुमनताईंची  कौतुकाची पावती आम्हाला सुखाऊन गेली. केअरटेकर साठी एक अभ्यासक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.सुमनताईंचा एकूण वावरच सहलीला आलेल्या सर्वाना सुखावणारा होता.आमच्या शुभंकर आशा रेवणकरवर त्यांचा विशेष जीव. दोन्ही आशांना शेजारी घेऊन त्यांनी स्वत:चा फोटो काढून घेतला.
                 आमची डिसेंबर मधली कार्यकारिणीची मिटिंग त्यांच्या घरी झाली होती. इंदूरच्या वनिता सोमण या पुण्याला आल्या होत्या त्यांना आम्हाला भेटायचे होते.आम्ही अगदी हक्कानी मध्यवर्ती असलेल्या   सुमनताईंच्या घरी भेटायला बोलावल.आम्ही सर्व येण्यापूर्वीचा वनिताताई आल्या.पण अनेक वर्षांची ओळख असल्यासारखी सुमनताईंनी त्यांचे स्वागत केले. अशा त्यांच्या किती तरी आठवणी आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील.                  

No comments:

Post a Comment