Tuesday 13 February 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - ११

पार्किन्सन्सविषयी गप्पा - ११
वृद्धत्व आणि पार्किन्सन्स ह्यांची जशी सांगड घातली जाते, तशीच कंप आणि पार्किन्सन्स ह्यांचीही सांगड घातली जाते. माझीदेखिल आधी पार्किन्सन्स म्हणजे कंप हीच ठाम समजूत होती. पण पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम सुरू केल्यावर आणि घरभेटी द्यायला लागल्यानंतर मला वीस ते पंचवीस शुभार्थी असे आढळले, ज्यांना अजिबात कंप नव्हता. तेव्हा हे पार्किन्सन्सचे कंप नसलेले स्वरूप माझ्या लक्षात आले.
आमच्या मंडळाच्या शुभार्थी सभासदांची यादी अद्यावत करण्याचे काम श्री. शरच्चंद्र पटवर्धन ब-याच काळापासून करत अाहेत. काही सभासदांचे निधन होते, काही नवे सभासद येतात, काहींचे घर अथवा गाव बदलल्यामुळे पत्ते बदलतात, कोणाचे फोन नंबर बदलतात. अशा ब-याच दुरुस्त्या सातत्याने कराव्या लागतात. पण ह्यामध्ये एक अशीही दुरूस्ती येते, जेव्हा शुभार्थी सांगतात की आम्हाला आधी पार्किन्सन्स होता, पण आता तो नसल्यामुळे आमचे नाव आता यादीतून वगळा. हे शुभार्थी चांगले चार ते पाच महिने सभेला उपस्थित रहातात, त्यांनी तेव्हापासून आवश्यक ते औषधोपचारही सुरू केलेले असतात आणि त्यानंतर त्यांना पार्किन्सन्स नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. यांच्यात एक समान धागा होता.तो म्हणजे या सर्वांना कंप होता.त्यापैकी काही जण त्यांना पार्किन्सन्स नाही हे कळल्यानंतरही मंडळात रमल्यामुळे आपले येणे सुरू ठेवतात. अर्थात त्याबद्दल आम्हालाही हरकत नसते. पार्किन्सन्सचा शिक्का असलेल्यांनीच मंडळात यावे असा काही नियम नाही.
ह्याबाबतीत पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. महादेवकर ह्यांचे उदाहरण येथे देता येईल. सुरुवातीला आपल्या हातांची थरथर जाणवून आपल्याला पार्किन्सन्स आहे असे समजून ते आमच्यामध्ये सामील झाले. नंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी आणि न्युरॉलॉजिस्टनी त्यांना 'रायटर्स क्रँप' असल्याचे निदान केले. रायटर्स क्रँप्स हे लिखाण करणा-यांना येतात आणि ते केवळ हातांपुरते मर्यादित रहातात, त्यांचा इतर अवयवांवर परिणाम होत नाही.
त्याचप्रमाणे जे 'इसेन्शिअल ट्रीमर्स' असतात किंवा ज्याला 'अकारण वाढणारी थरथर' असे म्हटले जाते, ते पार्किन्सन्सशी संबंधित नसतात. त्या प्रकारात फक्त कंप असतो. अर्थात कोणताही कंप पार्किन्सन्सचा आहे अथवा नाही, ह्याचे निदान केवळ तज्ज्ञ डॉक्टर्स किंवा न्युरॉलॉजिस्टच करू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी कंप असेल तर पार्किन्सन्स असेलच असे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रा. महादेवकरांच्या मनात तर डॉक्टरांनी सांगूनसुद्धा पुढे काही काळ स्वत:ला पार्किन्सन्स असण्याची शंका होती. पण पार्किन्सन्स मंडळात आल्यावर विविध व्याख्याने ऐकल्यानंतर, पार्किन्सन्सविषयी अनेक पुस्तके वाचल्यानंतर त्यांना आपल्याला पार्किन्सन्स नसल्याची खात्री पटली. एका मित्राला पीडी झाल्यानेही त्यांना मंडळात येणे गरजेचे वाटले.
आमचे एक सभासद श्री. राजकुमार जाधव नेहमी म्हणायचे की त्यांना एकोणिसाव्या वर्षापासून पार्किन्सन्स आहे. त्यांच्या आईलाही तो होता आणि त्यामुळे आईला होणारा त्रास बघून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ते शिपाई पदावर काम करतात. त्यांनी न्युरॉलॉजिस्टकडून स्वत:ची तपासणी करून घेतलेली नाही, ते औषधेही घरगुतीच घेतात. आज ते साठ वर्षांचे आहेत. त्यांच्या प्रकृतीत काही फरक नाही, इतरही काही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे मला सारखे असे वाटते की त्यांना पार्किन्सन्स नसून वर उल्लेख केल्याप्रमाणे केवळ इसेन्शिअल ट्रीमर्स असावेत.
दै. पुढारीमध्ये दि. ३० जून २०१६ रोजी प्रकाशित झालेला डॉ. अविनाश भोंडवेंचा 'अकारण होणारा शारिरीक थरकाप' नावाचा एक लेख मी मध्यंतरी येथे शेअर केला होता. त्या लेखामध्ये इसेंशिअल ट्रिमर्स ह्या प्रकाराबद्दल विस्ताराने माहिती दिलेली आहे. ज्यांना त्याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यांनी तो नक्की वाचावा.
पार्किन्सन्सच्या बाबतीत कोणतीही एक ठरावीक तपासणी नाही. रक्तदाब तपासता येतो, मधुमेह तपासता येतो, मात्र पार्किन्सन्स झालाय हे लक्षणांवरूनच ओळखता येते. त्यामुळे त्याचे निदान पूर्णपणे तज्ज्ञांवर अवलंबून असते. असे असूनही ब-याचवेळा निव्वळ कंप आहे म्हणून रुग्ण स्वत:च स्वत:ला पार्किन्सन्स असल्याचे ठरवतात किंवा काही वेळा फॅमिली डॉक्टर्सही पार्किन्सन्सचे निदान करून रुग्णाला तशी औषधे सुरू करतात. हे घातक ठरू शकते. इसेंशिअल ट्रिमर्सना पार्किन्सन्स म्हटले तर बिघडत नाही, पण पार्किन्सन्सची औषधे घेणे सुरू केल्यास ते चुकीचे होऊ शकते. त्यामुळे माझ्या मतानुसार कंपवात आणि पार्किन्सन्स ही सांगड घातल्यामुळे पार्किन्सन्स आहे असे समजले जाण्याची चूक होऊ शकते, जी घातक आहे. रुग्णांनी आपला कंप पार्किन्सन्सचा आहे किंवा नाही ह्याची खातरजमा न्युरॉलॉजिस्टकडून तपासून घेऊनच केली पाहिजे.
आता मात्र ह्याबाबत एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. आमच्याकडे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या एका प्रकल्पांतर्गत एक अॅप तयार केले आहे. त्या अॅपच्या मदतीने कंप पार्किन्सन्सचाच आहे किंवा नाही हे ओळखता येऊ शकेल. त्यासाठी एका छोट्या पट्टीसदृश साधनाचा उपयोग केला जातो. ती पट्टी हाताला लावल्यानंतर योग्य निष्कर्ष मिळू शकतो. ह्या अॅपचे प्रयोग त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभासदांवर केले. त्यांचा प्रकल्प आता पूर्ण झाला असून लवकरच त्या विद्यार्थिनी ह्या प्रयोगाचे पेटंटही घेणार आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता पार्किन्सन्स ओळखणे आणखी सोपे होईल. त्यांच्याविषयी मी माझ्या ब्लॉगवर 'पार्किन्सन्स मित्रमंडळात तरुणाई' नावाचा लेख लिहीला आहे. ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी तो लेख जरूर वाचावा.
नेहमी असे घडते की, हातांची थरथर झाली की ताबडतोब लोकांना पार्किन्सन्सची शंका येऊन ते डॉक्टरांकडे जातात. तर ह्याउलट कंप नाही म्हणून डॉक्टरांकडून तपासणीच करून घेतली गेली नाही आणि पार्किन्सन्स होऊन चार पाच वर्षे उलटली तरी तो लक्षातही आला नाही, अशीदेखिल उदाहरणे आहेत. त्यासाठीच कंप आणि पार्किन्सन्सची सांगड घालू नये, हे मी वारंवार सांगू इच्छिते. कारण कंप नाही म्हणजे पार्किन्सन्स नाही अशा स्वरुपाची एक मानसिकता तयार होते, जी चुकीची आहे. तर पुढच्या गप्पांमध्ये आपण कंप नसलेल्या पार्किन्सन्सच्या रुग्णांना पार्किन्सन्सचे निदान होताना कोणकोणत्या समस्या निर्माण झाल्या ते पाहू.
शब्दांकन - सई कोडोलीकर.

www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune हे युट्युब चॅनेलसुद्धा अवश्य पहा.

No comments:

Post a Comment