Saturday 27 January 2018

८ जानेवारी २०१८ पासून सभाव्रुत्त

                                             ८ जानेवारी २०१८ सभावृत्त

                        पार्किन्सन्स मित्रमंडळाची नव्या वर्षाची सुरुवात ८ जानेवारीला नर्मदा हाॅल येथे एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने झाली.डाॅक्टर अमित करकरे यांचे 'फिरुनी नवी जन्मेन मी' या विषयावर व्याख्यान झाले.सुधीर मोघे यांच्याबरोबरचे अनुभव त्यांच्याच कविता व गीतांच्या सोबतीने त्यानी सादर केले.सभेस ५० सदस्य उपस्थित होते.
                        सुधीर मोघे यांच्या 'नादब्रम्ह परमेश्वर' या शोभना तीर्थळी यांनी गायलेल्या गीताने सभेची सुरुवात झाली.यानंतर शुभंकर,शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.कमीन्स काॅलेज ऑफ इंजिनीअरींगच्या इस्ट्रृमेंटेशन  कंट्रोलच्या विद्यार्थिनी राधिका निबंधे, अक्षदा शिंदे, रश्मी अत्रे, आचलसिंह गुलेरीया या त्यांच्या फायनल ईअर प्रोजेक्टची माहिती सांगण्यासाठी आल्या होत्या.त्यांच्या प्रोजेक्टचा विषय डोळ्यांची हालचाल आणि स्किन इंपेडन्स वापरुन पार्किन्सन्सचे निदान असा आहे.त्यानी प्रकल्पाची माहिती देउन त्यामध्ये शुभार्थिनी  सहभागी होउन मदत करावी अशी विनंती केली.नव्याने दाखल झालेले संख्याशास्त्रज्ञ असलेले शुभार्थी अविनाश धर्माधिकारी यांनी प्रकल्पाबद्दल आपले विचार सांगुन मदत करण्याचे आश्वासन दिले.
                       डॉक्टर अमित करकरे यांच्या व्याख्यानाची सर्वांनाच उत्कंठा लागली होती. त्यांची ओळख शोभना तीर्थळी यांनी करून दिली.चाहता ते त्यांचा मित्र,त्यांचे फेसबुक पेज,त्यांचा स्वगत संवाद ब्लॉग हाताळणारा सहकारी,मोघेंच्या भाषेत प्रवक्ता,या क्षेत्रातील त्यांचा सल्लागार असा सुधीर मोघे यांच्याबरोबरचा करकरे यांचा जवळून झालेला अनौपचारिक सहवास होता.एक डॉक्टर, व्यक्ती, प्रोफेशनल अशा विविध अंगांनी तो त्यांना समृद्ध करून गेला.हा  प्रवास मोघे यांच्या स्वभावाचे पैलू,त्यांचेच गद्य लेखन,कविता, गाणी,त्यांच्याबरोबर घालवलेले भारावलेले क्षण  यांचा आधार घेत त्यांनी उलगडून दाखवले.   
                       मोघेना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी शाळकरी वयातच' स्मरणयात्रा' या चित्रपट संगीताची वाटचाल सांगणाऱ्या टीव्हीवर झालेल्या झपाटून टाकणाऱ्या कार्यक्रमातून झाली होती.या कार्यक्रमाचे वर्णन सर्वांनाच जुन्या काळात घेऊन गेले.या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा मोघे होते, हे त्यांच्या भेटीनंतर  समजले '.नक्षत्राचे देणे' या कार्यक्रमाची संहिता,संशोधन त्यांचे होते. त्याचाही त्यांनी गाजावाजा केला नाही. मी,माझे यात न अडकण्याच्या स्वभावाची ओळख तेथे झाली.प्रसिद्धीपासून लांब राहून आपले आपले काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता.                         सुरेश भट यांच्या 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' हे मोघे यांनी चाल दिलेले संगीतकार म्हणून पहिले गाणे.या कवितेतले शब्द मोघे यांच्या आयुष्याला लागू होणारे आहेत. डॉक्टर करकरे यांनी हे सुरेल आवाजात गाऊन व्याख्यानाची रंगत वाढवली.      
                       मोघे यांची स्वभाव वैशिष्ट्ये डॉक्टरांनी त्यांच्याच कवितातून उलगडवून दाखवली.त्यानी ललित गद्य,कादंबरी,कविता,चित्रपट गीते,संगीत,संहिता लेखन,कार्यक्रमाचे सादरीकरण,ब्लॉग अशा विविध गोष्टी समर्थपणे हाताळल्या पण ते कोठेच गुंतून राहिले नाहीत.वागणे, बोलणे,वेशभूषा या सर्वात साधेपणा होता.लहान,मोठे पुरस्कार असो की छोटा कार्यक्रम ते नेहमी त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिवून घेतलेला झब्बा घालायचे.कोणत्याही गोष्टीचे श्रेय स्वत:कडे न घेणारे मोघे इतरांचे श्रेय मात्र ज्याचे त्याला द्यायला विसरायचे नाहीत.'गोमू संगतीने' हे त्यांचे गीत लोकप्रिय झाले.त्याची पहिली पकड घेणारी ओळ शांताबाई शेळके यांची आहे हे आवर्जून सांगायचे.त्यांच्याशी गप्पा मारताना ते स्वत:विषयी बोलायचे नाहीत पण जुन्या नव्या सर्व कवी,लेखकांच्या लेखनाचे कौतुक सांगत राहायचे.आज प्रसिद्ध असलेल्या अनेक कवींनी, मोघेंच्या त्यांना झालेल्या मदतीबद्दल आवर्जून सांगितले आहे.
                   कोणत्याही गोष्टीत ते अडकून राहिले नाहीत. तसेच कोणत्याही गोष्टीची खंत ही बाळगली नाही.काही वाया जात नाही.ज्याचे  त्याचे श्रेय त्या त्या गीताला त्याच्या वेळेनुसार मिळते असे ते म्हणायचे.१८५७ पासूनच्या स्वातंत्र्यसैनिकांवर लिहिलेले 'स्वतंत्रते भगवती' हे त्यांचे पुस्तक,ज्यावर ते कार्यक्रमही करीत त्याची दखल घेतली गेली नाही असे त्यांच्या आईला वाटायचे.मोघेंच्या मनात मात्र याबाबत नाराजी नव्हती.तो इतिहास लढलेल्या हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना जेथे समाज विसरला तर या पुस्तकाचे काय असे त्यानी याबाबत आईला समजावले.                  
                     त्यांच्यात एक निरागस मुल आणि  टेक्नोसॅवी व्यक्ती होती.म्हणूनच Tablet भेट मिळाल्यावर आणि त्याची उपयुक्तता समजल्यावर, वर्डमध्ये शब्द मोजून सांगितले जातात हे समजल्यावर ते हरखून जातात.सध्या भली मोठी फी आकारून Mindfulness वर मोठमोठ्या कार्यशाळा घेतल्या जातात.Mindfulness म्हणजे भूतकाळाच्या आठवणी उगाळून दु:खी होऊ नका आणि भविष्याची चिंता करू नका तर या क्षणात जगा.या क्षणाचा समरसून अनुभव घ्या.मोघे असे जगले.कायम नवीन करत राहिले. आपल्या 'फिरुनी नवी जन्मेन मी ' या गीतातून ही भावना व्यक्त झाली आहे. आपणच आपल्याला नव्याने शोधत राहायचे. हे गीत डॉक्टरांनी खास शुभंकर, शुभार्थींसाठी निवडल्याचे सांगितले. बरीच वर्षे पार्किन्सन्स मित्रमंडळाशी संबंधित असल्याने अनेक शुभंकर, शुभार्थी कळतनकळत असे नव्याने जगत असल्याचे पाहिल्याचे सांगितले.
                          मोघे आपल्या आयुष्यात असे अनेक  गोष्टी नव्याने शिकत राहिले.अखेरच्या काळात ते चित्रकला शिकले.नवीन शिकत राहिल्यास मेंदूतील सर्व पेशी कार्यरत राहतात.मेंदू सतत सतर्क राहतो.एकाच विषयात तज्ज्ञत्व मिळाल्याने  आलेला मीपणा कमी होतो.हे मोघे यांच्याकडून शिकता आले.हाच आशय सांगणाऱ्या' तरीही वसंत फुलतो' या कवितेने डॉक्टर करकरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
                     डॉक्टर करकरे यांना  मोघे यांच्यावर असेच कार्यक्रम करायचे आहेत. पार्किन्सन्स मित्रमंडळाला  त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाचे श्रोते होण्याचे भाग्य मिळाले.मोघे नव्याने समजले.
                    यानंतर मोघे यांचे मित्र शुभंकर उल्हास गोगटे यांना त्यांच्या आठवणी सांगण्याची विनंती करण्यात आली.उल्हास गोगटे यांच्या कवितेच्या पुस्तकाला मोघेनी प्रस्तावना लिहिली आहे.गोगटे यांच्या फार्महाउसची एक किल्ली मोघेना देऊन ठेवली होती. त्यांना वाटे तेंव्हा ते तेथे जाऊन राहत.लेखन करत,पेंटिंग करत.
                   उल्हास गोगटे यांनी त्यांची १९७१ वी कविता दिली. पीडीवरची ही कविता शोभना तीर्थळी यांनी वाचून दाखवली.गोगटे यांच्या कविता नेहमीच सकारात्मक असतात.
                   कार्यक्रमास निपुण धर्माधिकारी यांनी सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर वडिलांचा शुभंकर म्हणून हजेरी लावली.मंडळाच्या उपक्रमात रस दाखवून गरजेनुसार मदत करण्याचे आश्वासन दिले, ही मंडळाच्या दृष्टीने आनंदाची बाब. 
                    शशिकांत देसाई आणि रमेश घुमटकर यांनी वाढदिवसानिमित्त पेढे दिले.अविनाश धर्माधिकारी यांनी चहा दिला.यानंतर चहापान,अत्तर आणि तिळगुळ देऊन समारंभाची समाप्ती झाली..संचारचा जानेवारीचा अंकही सर्वाना देण्यात आला. उपस्थित नसणाऱ्यांना पोस्टाने पाठविण्यात येईल.        
                                                           निवेदन
                     सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पर्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
डॉक्टर मंदा पानसरे या ' शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ओंकार ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
वेळ : दुपारी ४.०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
ज्यांना स्मरणिकेसाठी लेखन द्यावयाचे आहे त्यांनी कृपया बरोबर आणावे.

                

                                                 १२ फेब्रुवारी सभावृत्त

                         सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पर्किन्सन्स मित्रमंडळाने नर्मदा हॉल येथे सभा आयोजित केली होती.डॉक्टर मंदा पानसरे ( MD) यांनी' शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ओंकार ' या विषयावर व्याख्यान दिले.सभेस ६०/७० जण उपस्थित होते.
                         सुरुवातीला शुभंकर शुभार्थी यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.यानंतर भारती विद्यापीठाच्या ऐश्वर्या मोरे आणि मैत्रेयी कुलकर्णी या विद्यार्थीनिंनी त्यांच्या  स्पीच थेरपीवरील प्रकल्पाची माहिती सांगितली आणि यात सहभागी होऊन मदत करावी अशी शुभार्थीना विनंती केली.
                        विजयालक्ष्मी  रेवणकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीला डॉक्टर पानसरे यांनी संस्था निर्माण करणे आणि जनजागृती या दोन्ही गोष्टी कठीण आहेत असे सांगितले.पार्किन्सन्स मित्रमंडळ या दोन्ही गोष्टी करत असल्याने एक डॉक्टर आणि सामाजिक कर्तव्याची जाण असणारी व्यक्ती  म्हणून मला कौतुकास्पद वाटले. ईश्वरापर्यंत पोचण्याचे विविध मार्ग आहेत त्यापैकी एक ओंकार साधना असे सांगून आपल्या व्याख्यानास सुरुवात केली.वेदापासून ते आत्तापर्यंतच्या संत साहित्यात,विवेकानंद आदि आधुनिक विचारवंतांच्या लेखनातही ओंकाराची महती सांगितली आहे.ओंकार हा उपजत,नैसर्गिक,सूक्ष्म,ब्रम्हांडाला व्यापून राहिलेला असतो.प्रत्येकाच्या मनात, हृदयात असलेला असा आहे.फक्त तो सापडलेला नसतो. त्याच्या सततच्या उच्चाराने तो सापडला की अत्त्युच्च्य समाधानाची प्राप्ती होते.

                     ओंकार साधना करताना सुरुवातीला साधी मांडी,पद्मासन,वज्रासन अशा कोणत्याही आसनात बसावे.ज्यांना शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसले तरी चालेल.पाठीचा कणा,मान ताठ ठेवणे महत्वाचे.तोंडाने स्वच्छ स्वरात, स्वत:ला ऐकू येईल  असा ओंकार म्हणावा. मनात अनेक विचार येत राहतील.ते येऊ द्यावेत.पण त्यात गुंतू नये.मन ओंकाराशी जोडलेले असावे.शक्यतो ठराविक वेळ, ठराविक जागा असावी.आसक्ती न ठेवता श्रद्धेने केल्याने फायदा होतो.खर्जात म्हटल्यास अधिक फायदा होतो.सुरुवातीला तीनदा,नंतर ११,२१ असे वाढवत कितीही वेळा म्हटले तरी चालेल.
                     ओंकार साधनेचा शरीर,मनावर चांगला परिणाम होतो.रक्तदाब,दमा,हृदयविकार अशा विकारावर नक्की उपयोग होतो.यानंतर पुण्यातील कापडे नावाच्या ओंकार शिकवणाऱ्या गृहस्थाना खर्जात ओंकार ऐकवल्यावर विकार बरे होतात असे आढळले.मुंबईतील केईएम हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर के.के. दाते यांनी आपल्या सहाय्यक डॉक्टरांना आपल्या हॉस्पिटलमधील रुग्णांवर प्रयोग करून रेकॉर्ड ठेवण्यास सांगितले. आलेल्या अनुभवावरून त्यांना कापडे यांचे म्हणणे पटले.
                      प्रभात कंपनीच्या शांताराम आठवले यांनीही अशाच प्रकारचे संशोधन मांडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील एका संस्थेने त्याच्या ध्वनिमुद्रिका केल्या आणि अमेरिकेत आपल्या हॉस्पिटलमधील रुग्णांवर त्याचा उपयोग केला.यानंतर त्यांनी ओंकारसाधनेने अध्यात्मिक अंगाने कशी प्रगती होते ते मंडोपनिषद,तैतरीय उपनिषद,ज्ञानेश्वरी,स्वामी रामतीर्थ, रमणमहर्षी,यांच्या विचाराच्या आधारे सांगितले.शरीरातील सात चक्रे, त्या त्या चक्रांशी संबंधित अवयवाचे कार्य सुरळीत करतात.याला शरीरशास्त्राचा आधार आहे हे सांगितले. आपल्या पाठीच्या कण्यात फ्लेक्सेसीस असतात त्याचा चक्राशी संबंध आहे.
                       या नंतर पार्किन्सन्सवर माहिती सांगून त्यावर ओंकाराचा काय उपयोग होईल हे सांगितले.ओंकारातील 'अ'च्या उच्चाराने हातापायात कंपने पसरतात',उ 'च्या उच्चाराने छाती व उदर पोकळीत तर' म 'ची मेंदूकडे जातात.व मेंदूचे कार्य सुधारते.ओंकारामुळे मानसिक ताण कमी होतो,शरीराला शैथिल्य आणि एक प्रकारची शांतता मिळते.मेंदूला स्थिरता मिळते.उत्साह निर्माण होतो.पार्किन्सन्समुळे उदासीनता,नकारात्मक विचार येतात ते कमी होतात.मृत पेशी नव्याने तयार होत नाहीत परंतु कार्यान्वित नसलेल्या पेशी कार्यान्वित होतात.पेशींचा मृत्यू कमी होतो.पार्किन्सनन्सच्या पुढच्या अवस्था येण्याचे प्रमाण लांबणीवर पडते.सकारात्मक आयुष्य जगायला शिकतो.
                        व्याख्यानाबरोबर डॉक्टरनी सर्वांकडून ओंकाराचे प्रात्यक्षिक करून घेतले.खर्ज,मध्य आणि तीव्र स्वरात ओंकार कसा म्हणायचा हे ही दाखवले.मध्य आणि तीव्र स्वरात ओंकार जास्तवेळ म्हणता येतो.खर्जातला जास्त वेळ म्हणता येत नाही. परंतु खर्जात म्हणण्याचा प्रयत्न करावा. त्याचा जास्त उपयोग होतो असे सांगितले.यानंतर श्रोत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.अविनाश धर्माधिकारी आणि विजय ममदापुरकर यांनी आपले अनुभव सांगितले.पद्मजा ताम्हनकर यांनी भक्तीगीत म्हटले. वसू देसाई आणि नारायण कलबाग यांनी वाढदिवसानिमित्त पेढे दिले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
 


    निवेदन
                            सोमवर दिनांक १२ मार्च  रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
' पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत पुस्तकाचे लेखक शेखर बर्वे हे' पार्किन्सन्सचे आत्मविश्लेषण' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सखोल अभ्यास,अनेक शुभार्थींचे निरीक्षण आणि अनुभव याचा आधार त्यांच्या व्याख्यानाला असल्याने सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.
स्मरणिकेसाठी लेखन, अनुभव द्यायचे असतील त्यांनी सभेस येताना आणावेत.सोबत स्वत:चा  फोटोही द्यावा.
यानंतर मात्र कोणतेही लेखन स्वीकारले जाणार नाही.
पार्किन्सन्स दिनानिमित्त ९ एप्रिलला मेळावा आयोजित करत आहोत.यावेळी शुभार्थींच्या कलाकृतीचे प्रदर्शन असणार आहे.ज्यांना कलाकृती ठेवायच्या आहेत त्यांनी आत्तापासून तयारीला लागावे.आपण कोणत्या कलाकृती ठेवणार आहात त्याबद्दल.सभेच्यावेळी माहिती द्यावी.
वेळ : दुपारी ४.३०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
   १२ मार्च २०१८ सभावृत्त
                            सोमवार दिनांक १२ मार्च  रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती..
' पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत' पुस्तकाचे लेखक शेखर बर्वे यांचे' पार्किन्सन्सचे आत्मविश्लेषण' या विषयावर व्याख्यान झाले.
                            प्रार्थनेने सभेला सुरुवात झाली.शुभंकर, शुभार्थींचे वाढदिवस साजरे झाल्यावर रामचंद्र करमरकर यांनी शेखर बर्वे यांची ओळख करून दिली. स्वत:च्या पत्नीच्या पार्किन्सन्सचा शोध घेता घेता त्यांनी सर्व  शुभार्थीना आपापल्या  पार्किन्सन्सचा शोध घेण्यास भाग पाडले.त्यांचे व्याख्यान  लेख स्वरुपात याच स्मरणिकेत देत आहोत.शुभंकरानी शुभार्थीला विविध गोष्टी करण्यास प्रेरित करणे,पार्किन्सन्ससाठी विविध उपचार,शुभार्थीचे निरीक्षण करून न्यूरॉलॉजिस्टशी चर्चा,व्यायाम ,आहार,मन प्रसन्न ठेवण्यासाठी विविध उपाय अशा अनेक बाबींवर शेखर बर्वे यांनी चर्चा केली.सखोल अभ्यास,अनेक शुभार्थींचे निरीक्षण आणि स्वानुभव यांचा आधार त्यांच्या व्याख्यानाला असल्याने सर्व उपस्थित प्रभावित झाले.
                      आपल्या  व्याख्यानातील' मन रमविण्यासाठी विविध कलांचा उपयोग' हा धागा पकडत शेखर बर्वे यांनी  सौ वसुधा बर्वे यांना गीत म्हणण्याची विनंती केली.वसुधाताईनी पार्किन्सन्स झाल्यावर मन रमविण्यासाठी संगीत क्लास सुरु केला.संगीताच्या दोन परीक्षाही दिल्या.त्यात प्रथम श्रेणी मिळवली.त्यांनी 'केशवा माधवा' हे भक्तीगीत सुरेल आवाजात म्हटले.त्या गात  आहेत,शेखर बर्वे यांनी हातात माईक धरला आहे, पत्नीकडे कौतुकाने पाहत आहेत हे दृश्य शुभंकर शुभार्थी यांच्यातल्या सुसंवादाचे प्रात्यक्षिकच होते.
                      यालाच पूरक अशी  विजय देवधर यांची 'पेपर  क्विलिंग'च्या आधारे केलेली भेटकार्डे होती.रंगीबेरंगी फुलांची कार्डे पाहून सर्वच प्रभावित झाले.देवधर यांनी हे काम करताना आपणास  वेळेचे भान नसते असे सांगितले.रंग मला बोलावतात असेही ते म्हणाले.आता अनेकाना काहीना काही बोलावे असे वाटत होते.
                 विजय ममदापुरकर यांनी ओंकाराचे अनुभव सांगितले,
              रमेश घुमटकर यांनी चालता चालता एकदम फ्रीज झाल्यावर आपण काय करतो हे प्रात्यक्षिकासह सांगितले,
              श्रीपाद कुलकर्णी यांनी आपले अनुभव सांगितले.
              नारायण कलबाग यांनी प्रार्थना म्हटली.जोत्स्ना सुभेदार यांनी वाढदिवसानिमित्त बर्फी दिली.
                शेवटी मंडळाच्या आधारस्तंभ सुमन जोग आणि नर्मदा हॉल मिळवून देणे आणि तेथील व्यवस्था बसवून देणे यात पुढाकार घेणाऱ्या नंदा रेगे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.
                       निवेदन
                  ठाणे येथील प्रसिध्द आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेची पुणे येथे शाखा सुरु झाली आहे.ठाण्याप्रमाणे पुण्यातही विविध स्वमदतगटांना एका छताखाली आणून आरोग्य चळवळ वृद्धिंगत करण्याचा संस्थेचा विचार आहे.प्रत्येक स्वमदतगटाचे स्वत:चे कार्य एकीकडे चालू राहील. याशिवाय आय.पी.एच.महिन्यातून एकदा प्रत्येक संस्थेला त्यांची जागा सभेसाठी देईल.
दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पार्किन्सन्स मंडळाची सभा नर्मदा हॉल येथे भरते.
आता दर महिन्याच्या चवथ्या सोमवारी आय.पी.एच.च्या जागेत सभा भरणार आहे. प्रतिसाद पाहून पुढे चालू ठेवण्यात येईल
या महिन्याची सभा सोमवार दिनांक २३ एप्रिलला असेल.यावेळी अनुभवांची देवाण घेवाण आणि शरच्चंद्र पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन असेल.
वेळ दु.४ ते ६
ठिकाण
अनैषा,प्लॉट क्रमांक ४,यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ,डी.पी.रोड,कर्वेनगर ,पुणे
खुणेसाठी  - राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली.
                                    जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा २०१८ - वृत्त
       दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त ९ एप्रिल रोजी  मेळावा आयोजित केला होता.यावेळी केसरीवाड्याऐवजी एस.एम.जोशी सभागृहात कार्यक्रम होता.तेथे थोड्या पायऱ्या असल्याने शुभार्थींना त्रासाचे होईल का असे वाटत होते.पण भर उन्हात २००/२५० जण उपस्थित होते. हॉलबद्दल कोणाचीच तक्रार नव्हती.ताक देऊन आणि अत्तर लावून सर्वांचे स्वागत करण्यात येत होते.बाहेर व्हरांड्यात शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडले होते.भरपूर जागा असल्याने प्रत्येक कलाकृती दिसेल अशी ठेवली होती.४ ते ४.३० हा वेळ कलाकृती पाहण्यासाठी ठेवला होता.प्रमुख पाहुणे डॉक्टर लुकतुके यांच्यापासून सर्वांनी कलाकृती पाहून भरभरून कौतुक केले.पद्मजा ताम्हनकर,विजय चिद्दरवार,डॉक्टर प्रकाश जावडेकर,विजय देवधर,भूषणा भिसे,गोपाळ तीर्थळी,केशव महाजन,उमेश सलगर,करणी,शशिकांत देसाई, प्रभाकर जावडेकर,विजय ममदापुरकर या शुभार्थींनी आपल्या कलाकृती ठेवल्या होत्या.
                          ९४ वर्षांच्या नारायण कलबाग यांच्या ईशस्तवनाने  सभेला सुरुवात झाली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्णता, सुरेलपणा थक्क करणारा होता.
                          संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा होनप यांनी केले.
                          सुरुवातीचा कार्यक्रम शुभार्थींच्या नृत्याविष्काराचा होता. नृत्यामध्ये विलास जोशी,मंगला  तिकोने,विजय देशपांडे,कर्नल प्रमोद चंद्रात्रेय,धीमंत देसाई,श्रीराम भिडे,पारिजात आपटे,मंजिरी आपटे,नितीन व सुजाता जयवंत, ,दिलीप कुलकर्णी, या शुभार्थी व  शुभंकरांनी सहभाग घेतला.सुरुवातीलाच हृषीकेशनी आम्ही सादरीकरण करणार नाही तर क्लास मध्ये रोज काय घेतो हे दाखवणार असल्याचे सांगितले.सुरवातीच्या हालचालीत प्रेक्षकांनाही सहभागी करून घेतले.यानंतर' शोला जो भडके' आणि 'गौराई माझी लाडाची लाडाची ग'या थिरकत्या चालीच्या गाण्यांवर नृत्य सादर केले.सर्व सभागृह भारावून गेले होते. प्रतिसाद म्हणून टाळ्यांचा कडकडाट आणि standing ovation मिळाले.या सर्वांच्या आणि हृषीकेशच्या नऊ वर्षांच्या परिश्रमाचे हे फलित होते.यानंतर हृषीकेशने आपले मनोगत व्यक्त केले.प्रेक्षकांनी आवर्जून हृषीकेशचा फोन नंबर मागून घेतला.
                       स्टेजवर टेबल खुर्च्या यांची मांडामांड होईपर्यंत  मंडळाचे संस्थापक सदस्य  शरच्चंद्र पटवर्धन यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रोत्यांशी संवाद साधला.( स्मरणिकेत हे प्रास्ताविक समाविष्ट केले आहे.)
                          यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर उल्हास लुकतुके यांच श्यामला शेंडे  आणि रामचंद्र करमरकर यांच्यासह मंचावर आगमन झाले. शरच्चंद्र पटवर्धन यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला.दीपा होनप यांनी डॉक्टरांची ओळख करून दिली.
                          मंडळ दरवर्षी या कार्यक्रमात स्मरणिका प्रकाशित करते.डॉक्टर उल्हास लुकतुके  यांच्या हस्ते टाळ्यांच्या गजरात स्मरणिकेचे प्रकाशन झाले.याचवेळी वेबसाईटवरही अतुल ठाकूर यांनी स्मरणिका प्रकाशित केली.
                        डॉक्टर उल्हास लुकतुके  यांचे व्याख्यान ऐकण्यास सर्वच उत्सुक होते.
                        स्वमदत गटात माणूस आला की आपली पूर्वीची बिरुदे बाहेर राहतात आणि शुभार्थी गटाशी जुळवून घेतात.आज ते जाणवले असे सांगत त्यांनी व्याख्यानास सुरुवात केली.मी औपचारिक भाषण न करता आपल्याशी येथे जे जे पाहिले त्याचा आधार घेऊन संवाद साधणार आहे असेही त्यांनी सांगितले.ईशस्तवन,नृत्य, कलाकृती या सर्वांचा आधार घेत  त्यामागचे विज्ञान समजावून सांगितले.नृत्य करणाऱ्या  शुभार्थींची नृत्य करताना पार्किन्सन्सची लक्षणे थांबलेली सर्वांनी पाहिली..तादात्म्य,सापडलेली लय यामुळे ती थांबली .जेंव्हा लय बिघडते तेंव्हा रोग होतो.कलाकृतीतही क्विलिंग हे अत्यंत नाजूक काम Movement  Disorder  असणारी व्यक्ती  करु शकते कारण ते काम करताना त्यांचे मन रमते,छान वाटते.या छान वाटण्यात लय असते.मी माझा स्वामी हा भाव असतो.अशी लय सापडणे महत्वाचे.ती मनाची असते तशी शारीरिक वर्तनाची असते.ही सापडवायची कशी?      
                होकारार्थी मानसशास्त्रात ती सापडतील. होकारार्थी मानसशास्त्र हे जगण्याचे शास्त्र आहे. तसेच त्यात सूत्रे असतात, ती लक्षात ठेवायची आणि ती जगण्याचा प्रयत्न करायचा.Four A हे सूत्र यासाठी डॉक्टरांनी सांगितले
                .१)Adapt  - जुळवून घेणे.यामुळे साधनसामग्रीची शक्ती वाढते,नकार असेल तर जुळवून घेणे कठीण होते.
                २)  Adopt - दत्तक घेणे. आजाराशी  भांडू नये.भोवतालच्या परिस्थितीवर आपला ताबा नसतो, आपल्यावर असू शकतो.
                ३) Alter - मुळ डिझाईन कायम ठेवून् दृष्य सोयी बदललणे.आपल्या अपेक्षा,भावना ,वर्तन,सकारात्मक रीतीने अल्टर करणे.
                ४) Accept -  नाईलाजाने नाही तर स्वेच्छेने स्वीकार करणे.आपल्याला यापेक्षा बदलणे शक्य नाही या पातळीवर आणणे.आणि हे म्हणताना पूर्ण प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारणे
              स्वमदत गटात आपल्याप्रमाणे इतर असल्याने स्वीकाराची प्रक्रिया सोपी होते.
         यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली.
         वसुमती  देसाई यांनी काही निवेदने सादर केली, आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.
 जाताना सर्वाना पेढा आणि स्मरणिका देण्यात आल्या.औपचारिकरित्या कार्यक्रम संपला तरी अनेकजण अजून कलाकृती पाहत होते.थांबून एकमेकांच्या ओळखी करून घेत होते.फोटो काढत होते.दिल्लीहून पुण्यात नर्सिंगहोम मध्ये आलेल्या तारा माहुरकर यांनी सर्वाना देण्यासाठी द्राक्षे आणली होती, तीही वाटली गेली.
               या कार्यक्रमाने अनेक शुभार्थींचे  लय सापडण्याचे काम सोपे होईल असे वाटते. 
            ( डॉक्टर उल्हास लुकतुके यांचे भाषण आणि संपूर्ण कार्यक्रम आपल्याला युट्युबवर पाहायला मिळेल.)

       
                           २३ एप्रिल १८ -  आय.पी.एच. सभा वृत्त

                    ठाणे येथील प्रसिध्द आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेची पुणे येथे शाखा सुरु झाली आहे.ठाण्याप्रमाणे पुण्यातही विविध स्वमदतगटांना एका छताखाली आणून आरोग्य चळवळ वृद्धिंगत करण्याचा संस्थेचा विचार आहे.प्रत्येक स्वमदतगटाचे स्वत:चे कार्य एकीकडे चालू राहील. याशिवाय आय.पी.एच.महिन्यातून एक दिवस  प्रत्येक स्वमदतगटाला त्यांची जागा सभेसाठी देणार आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी  दर महिन्याचा चवथा सोमवार दिला गेला आहे.
                    .त्यानुसार या महिन्याची सभा सोमवार दिनांक २३ एप्रिलला दु.४ ते ६ यावेळात आयोजित केली होती.पहिलीच सभा असल्याने किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे अनुभवांची देवाण घेवाण आणि शरच्चंद्र पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन ठरवले होते.पटवर्धन यांनी रोल प्लेद्वारे मार्गदर्शन ठरवले होते.सभेस १६ शुभंकर शुभार्थी उपस्थित होते.बंगल्याच्या बाहेर रस्ता दाखवण्यासाठी आय.पी.एचची व्यक्ती उभी होती. आत आल्यावर आय.पी.एचच्याच प्राची बर्वे हसतमुखाने स्वागत करत होत्या. त्या काहीवेळ आमच्यात सामील झाल्या.त्यामुळे सुरुवातीसच नवखेपणा गेला.
                    प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.बरेचजण नवीन असल्याने सुरुवातीला परस्पर परिचय करायचा ठरले.शरच्चंद्र पटवर्धन,शोभना तीर्थळी,आशा रेवणकर  यांच्या ओळखीतून नकळत मंडळाचा थोडा इतिहास नवीन लोकांना समजला.अरुण सुर्वे,किरण दोषी हे एरवी न बोलणारे नेहमीचे सदस्य भरभरून बोलले.८६ वर्षाचे ताम्हनकर आणि त्यांच्या ८० वर्षाच्या पत्नी यांची उपस्थितीच प्रेरणादायी होती.साताळकर,कुर्तकोटी आणि पटवर्धन पतीपत्नींची नव्यानेच ओळख होत होती.दिल्लीहून नुकत्याच पुण्यात आलेल्या डॉ.रेखा देशमुख स्वत: समुपदेशक असल्याने मधून मधुन त्यांचे मार्गदर्शन होत होते.असे असले तरी त्यांनाही स्वमदत गटाची गरज वाटत होती.गट छोटा असल्याने प्रत्येकजण मोकळेपणाने बोलत होता..प्रत्येक व्यक्तीच्या  पार्किन्सन्सची सुरुवात आणि लक्षणे वेगळी असली तरी  पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी  पार्किन्सन्सचा स्वीकार,आपला आजार समजून घेणे,त्यानुसार निरीक्षण करून न्यूरॉलॉजिस्टना माहिती देणे व त्यांचे औषधोपचाराचे काम सुकर करणे,औषधाच्या वेळा पाळणे,नियमित व्यायाम, शुभंकराचे सहकार्य, स्वमदत गटात सहभाग हे सर्वांनाच आवश्यक आहे हे अधोरेखित झाले. पद्मजा ताम्हनकर यांनी रामाचे भजन म्हणून गप्पांची रंगत वाढवली.परिचय, टाळ्यांचा आणि जिभेचे व्यायाम या सर्वात दोन तास कसे निघून गेले समजलेच नाहीत.
              मधल्या काळात समोर आयता चहा आला.अनेक गोष्टींचे अवधान ठेवण्याची गरज असणाऱ्या आम्हा आयोजकांना.येथे उपस्थित राहण्याशिवाय काहीच करावे लागले नाही.माहेरपण उपभोगल्यासारखे वाटले.
 सहकार्याबद्दल आय.पी.एच.च्या कर्मचाऱ्यांचे आभार.
               एकूण पहिलीच सभा उत्साहवर्धक होती.
                                                   निवेदन
सोमवार दिनांक १४ मे  रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
 डॉक्टर मालविका करकरे या 'आरोग्यदायी आहार 'या विषयावर व्याख्यान देणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहावे.  
वेळ : दुपारी ४.३०
ठिकाण : नर्मदा, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
     १४ मे २०१८ सभा वृत्त
                          
                                          सोमवार दिनांक १४ मे रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.
आहारतज्ज्ञ मालविका करकरे यांचे  'आरोग्यासाठी आरोग्यदायी आहार 'या विषयावर व्याख्यान झाले.सभेला ४०/५० सदस्य उपस्थित होते.आता मासिक सभा या कौटुंबिक मेळावा बनत आहेत.नेहमी उपस्थित राहणारे पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरेच दिवस न आलेले शुभार्थी आलेले पाहून सर्वांनाच आनंद होतो.प्रज्ञा जोशी, आठ महिन्यांनंतर आणि नर्मदा हॉल मध्ये प्रथमच येत होती.वसुधा बर्वे यांना पाऊल उचलून टाकता येत नव्हते त्यामुळे त्या  वार्षिक  मेळाव्यालाही हजर राहू शकल्या नव्हत्या.आत शिरतानाच मला म्हणाल्या की  पाहिलंत का मी आता काही आधार न घेता चालू शकतेय. मोरेश्वर काशीकर प्रार्थना सांगायच्या तयारीने आले होते.डॉक्टर अरविंद पाटील आणि संध्या पाटील  सर्वांना भेटण्याच्या इच्छेने खास नाशिकहून आले होते.सभेत व्याख्यानातून ज्ञान मिळते आणि अशा आनंदी वातावरणातून सकारात्मक ऊर्जा मिळते.व्याख्यात्या मालविका करकरे यांनीही व्याख्यानाच्या सुरुवातीला मला येथे येवून सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.
                                  व्याख्यानाच्या आधी एप्रिल आणि मे महिन्यातील जन्म असणाऱ्या शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले.वसुमती  देसाई यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली.मालविका करकरे यांनी चार्टच्या आधारे स्लाईड दाखवत,विविध उपयुक्त टीप्स देत आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.दर्जा,वेळ,प्रमाण हे आहाराची त्रिसूत्री असल्याचे सांगितले.पार्किन्सन्सची विविध लक्षणे नियंत्रित करण्यासाठी,गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी  जीवनशैली महत्वाची असते.अर्थात हे सर्वांसाठी लागू आहे. यात आहाराला ७०% महत्व आहे. याबरोबर औषधोपचार,व्यायाम,आनंदी राहणे या बाबीही महत्वाच्या आहेत.आहार चांगल्या मनाने, चांगल्या वातावरणात,चांगल्या प्रकारे शिजवला गेला, अन्न हे पूर्ण ब्रम्ह मानले तर त्याचे गुणधर्म लागू पडतील.कुटुंबाचे सहकार्यही महत्वाचे.यानंतर समतोल आहाराचे महत्व आणि समतोल आहार म्हणजे काय हे पिरॅमिडच्या आधाराने त्यांनी सांगितले.महाराष्ट्रीयन आहार हा समतोल असतो असे मतही त्यांनी मांडले.
                            यानंतर काही महत्वाच्या टीप्स त्यांनी दिल्या.
                - लीओडोपा आणि प्रोटीन असलेले अन्न एकत्र घेऊ नये.
                - गोळ्या जेवणाआधी किंवा नंतर,गोळ्यांचे प्रमाण,वेळ हे डॉक्टर लिहून देतात ते तंतोतंत पाळावे.
               -  अन्न नको होते अशा वेळी कर्बोदके असलेल्या गोष्टी थोड्या थोड्या वेळाने घ्याव्यात.
               - बऱ्याचजणांना गिळण्याची समस्या असते.त्यामुळे कमीत कमी १३००  कॅलरीची रोज आवश्यकता असते ती पुरी होत नाही.अशावेळी अॅनिमिया,डी व्हिटॅमीन आणि कॅल्शियम कमतरता होऊ शकते.यासाठी लिक्विड डाएट,सेमी लिक्विड डाएट ३/४ वेळा घेणे गरजेचे.
                - शरीराची गरज ऐकावी.भूक लागल्यावर खावे.
               - पार्किन्सन्समध्ये क्रॅम्प्सची समस्या असते.यासाठी पोटॅशियम,क्षार असणारे नारळ पाणी, लिंबू पाणी,कोकम सरबत असे पदार्थ घ्यावे.
                  - लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी काळा गुळ,बाजरी,मूळ्याचा,फ्लॉवरचा पाला,पुदिना यांचा वापर हवा.सी व्हिटॅमीन हे  अन्न पदार्थाचे शोषण होण्यासाठी गरजेचे असते.यासाठी  लिंबू वर्गीय फळे आहारात असावीत.लोखंडी कढई वापरावी.
                -  अंगदुखी,पायदुखी हे  कॅल्शियमच्या कमतरतेने होतात.ही  कमतरता भरून काढण्यासाठी दुध,दही ताक,पालेभाज्या ,नाचणीचे विविध पदार्थ खावेत.
                -   अॅसिडीटी असल्यास तळलेले,तिखट,मसालेदार पदार्थ टाळावेत.पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरू नये,उपास टाळावेत.पाचक,कोकम सरबत,गुलकंद,तुळशी बी,सब्जा यांचा आहारात समावेश करावा.
                  - पार्किन्सन्सच्या पेशंटना बध्दकोष्ठ्तेचा त्रास होतो.यासाठी पाणी,फायबरयुक्त पदार्थ आणि व्यायाम आवश्यक.
                      यानंतर बाहेरचे तयार पदार्थ न खाता त्याला घरगुती पर्यायी पदार्थ काय खावेत याचा तक्ता त्यांनी दाखवला.
                        श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.यात डॉक्टर अमित करकरेही सहभागी झाले.
                     यानंतर शोभना तीर्थळी यांनी सभा यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली.
            अरुंधती जोशी यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त चहा दिला.मोरेश्वर काशीकर यांनी बिस्किटे दिली.                     -




                                                      निवेदन
सोमवार दिनांक ११ जून रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
बऱ्याच शुभार्थींना पार्किन्सन्सची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपायाबद्दल सांगावयाचे आहे.त्यामुळे यावेळी 'अनुभवांची देवाण घेवाण 'असा विषय ठेवला आहे.आपलयालाही व्यायाम, प्राणायाम,ध्यान,फिजिओथेरपी,नृत्य,पेंटिंग,संगीत,क्विलिंग,ओरिगामी अशा विविध कला इत्यादिंचा उपयोग होत असेल तर अनुभवकथन करावे,व्यक्त व्हावे.
.
वेळ : दुपारी ४
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४

        ११ जून २०१८ नर्मदा हॉल सभा वृत्त
                            
                                सोमवार दिनांक ११ जून रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाने नर्मदा हॉल येथे सभा आयोजित केली होती. बऱ्याच शुभार्थींना पार्किन्सन्सची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी त्यांनी केलेल्या उपायाबद्दल सांगावयाचे होते.त्यामुळे यावेळी 'अनुभवांची देवाण घेवाण 'असा विषय ठेवला होता.सभेस ५० ते  ६०जण उपस्थित होते.
                            सुरुवातीलाच चहापान झाले.वाढदिवसानिमित्त सविता ढमढेरे यांनी चहा,बिस्किटे आणि बर्फी दिली.शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे झाले.त्यानंतर अनुभव कथनाची सुरुवात  शेखर बर्वे यांच्यापासून झाली.त्यांनी  वाचन आणि अनुभव यावर आधरित विचार मांडले.चालणे,उठाबशा काढणे, वजन उचलणे यांनी मेंदू हेल्दी राहतो, असे एका संशोधन विषयक मासिकाचा आधार  घेत सांगितले.डॉक्टर देशपांडे या निसर्गोपचार तज्ज्ञांबरोबर झालेल्या  चर्चेनंतर,त्यांनी बर्वे यांना पत्र पाठवले.ते त्यांनी वाचून दाखवले.होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी दोन्ही प्रकारची औषधे घेत असल्यास  दोन्ही गोळ्यांमध्ये ४५ मिनिटांचे अंतर ठेवावे, असे स्वानुभवावरून त्यांनी सांगितले.कारण अॅलोपॅथीच्या गोळ्या  उत्तेजकता वाढणाऱ्या असतात तर होमिओपॅथीच्या कमी करणाऱ्या..शुभार्थीच्या लक्षणांचे योग्य निरीक्षण करून न्यूरॉलॉजिस्टना सांगितल्यास डोस ठरवणे सोपे जाते.वसुधा बर्वे यांना सकाळी उठल्यावर फ्रीजिंगचा त्रास होत होता.त्यांना संध्याकाळी ७.३० चा डोस बदलून रात्री १०/१०.३० पर्यंत घेण्यासाठी पूर्वी घेत असलेल्या सिंडोपापेक्षा जास्त क्षमतेची गोळी दिली आणि त्रास कमी झाला.बद्धकोष्ठासाठी सहसा रात्री झोपताना गोळी घेतली जाते, त्याऐवजी जेवणाआधी एक तास घेतल्यास चांगला उपयोग होतो असे मत त्यांनी मांडले.वसुधा बर्वे यांनी आपल्याला थोडेसे अंतर चालण्यास खूप वेळ लागतो, पण बर्वे कधीही न चिडता,न कंटाळता  त्यांची सोबत करतात असे सांगितले.
                          अविनाश धर्माधिकारी यांनी फ्रोजन शोल्डरचा त्रास सुरु झाला. हा त्रास  पार्किन्सन्समुळे आहे असे निदान होण्यास वेळ लागला, असे सांगितले.बंगलोरच्या विवेकानंद युनिव्हर्सिटीत प्राणायाम,योग,याचे प्रशिक्षण घेतले होते.सध्या ते ३० मिनिटे प्राणायाम करतात. त्यात अनुलोम विलोमवर भर असतो.तीन मिनिटे अकार, उकार आणि मकार करतात.पाच मिनिटे ओंकार करतात, हे कृतीसह सांगितले.यामुळे त्यांचा कंप कमी झाला.लिहिण्याची समस्या आणि कंबर दुखणे चालू आहे.डॉक्टरांनी निम्म्या गोळ्या कमी केल्या.बद्धकोष्ठासाठी  रात्री झोपताना बेंबीत २ थेंब एरंडेल घालत असल्याचे सांगितले.
                      डॉक्टर प्रकाश जावडेकर यांनी गोळ्या कमी करताना बारीक लक्ष ठेवा, सावधपणे कमी करा, असे सुचविले.बऱ्याचवेळा त्याचे उशिरा परिणाम दिसतात, असे सुचविले.आनंदी राहिलात तर औषधांचा परिणाम चांगला होतो असे सांगितले.आपल्याला कशाने आनंद मिळतो ते शोधावे.जावडेकर यांना  पेंटीगमध्ये आनंद मिळाला.रंग आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.दोन चार दिवसांनी एनिमा घेतल्याने बद्धकोष्ठाचा त्रास त्यांना होत नाही असे सांगितले.स्वत: लिहिलेल्या  पुस्तकातील ' देव असलाच पाहिजे ' हे सकारात्मक विचार देणारे प्रकरण वाचून दाखवले.
                      ८५ वर्षांच्या   यशवंत एकबोटे यांना २००९ पासून पार्किन्सन्स आहे.ते टेबल साफ करणे, भांडी विसळणे, अशी घरातील कामे करतात.यातून समाधान मिळते. तसेच पत्नीला मदत होते.पत्नीही ८० वर्षांची आहे.औषधे नियमित घेतात,व्यायाम,प्राणायाम  करतात. २ किलोमीटर चालतात.खुर्चीवरून उठताना, पायऱ्या चढताना त्रास होतो.मागे तोल जातो,गिळताना त्रास होतो.डोळ्यांना दोन दोन गोष्टी दिसतात.झोप येत नाही.या सर्वामुळे नैराश्य येते.अशा काही समस्या असल्याचे सांगितले.
                       अशा समस्या अनेकांच्या असल्याने त्यावर उपाय सुचविले गेले.शरच्चंद्र पटवर्धन यांनी पीडी नसणाऱ्यांनाही वयामुळे काही समस्या असतात.प्रत्येकवेळी पीडी मुळे होते असे समजून दुसरे काही कारण आहे का हे पाहिले जात नाही.याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे सांगितले.गिळण्याच्या त्रासावर त्यांच्या पत्नीला आयुर्वेदाचा उपयोग झाल्याचे सांगितले.वसुधा बर्वे यांनी नैराश्य जाण्यासाठी संगीत ऐका असे सुचविले. जावडेकर यांनी आपल्याला झोपेचा त्रास होता,तो झोपण्यापूर्वी काहीतरी क्लिष्ट वाचल्याने कमी झाला असे सांगितले.डोळ्यामुळे वाचता येत नाही असे एकबोटे यांनी सांगताच शोभना तीर्थळी यांनी ऑडीओ बुकचा पर्याय सुचविला.उतारवय आणि १० वर्षाचा पीडी असताना एकबोटे व्यवस्थित बोलू शकतात,चालू शकतात,स्मरणशक्ती चांगली आहे, सुसंबद्ध विचार करू शकतात,हेही खूप आहे, असे स्वत:ला समजावल्यास त्रास कमी वाटेल असे सुचविले.
                   रमेश घुमटकर यांनी आपल्याला ५०व्या वर्षापर्यंत घशात कफ होत असे. अनुलोम विलोमने तो कमी झाला असे सांगितले.चालताना मध्येच पाय भरून येतात, पुढे पाऊल टाकता येत नाही.अशावेळी आपण झाडाला धरून उभे राहतो.डावा, उजवा पाय आळीपाळीने १०/१० वेळा झटकतो. असे दोन तीन वेळा केल्यास पुन्हा चालता येते असे सांगितले.पटवर्धन यांनी असा त्रास होत असल्यास पोटरीला बँडेज बांधून बघण्याचा पर्याय सुचविला.पोलीस,पोस्टमन असे चालण्याचे खूप काम करावे लागणारे असे बँडेज बांधतात असे निरीक्षणही नोंदवले.
                   सुनील क्षीरसागर हे आपले मित्र शुभार्थी अजित सरदेसाई यांच्यासाठी आले होते.ते पतंजली योग शिक्षक आहेत.त्यांनी पीडी पेशंटने अनुलोम विलोम करावा असे सुचविले. यामुळे व्यान वायूचे संतुलन होऊन हालचालीवर चांगला परिणाम होतो. याचबरोबर भ्रामरी करावी असेही सांगितले.भ्रामरीने सेन्ट्रल नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो असे मत व्यक्त केले.
                    पद्मजा ताम्हणकर यांनी ओंकार  व सुर्यकवच म्हटल्याने फायदा होतो असे सांगितले.त्यानंतर त्यांनी 'मावळत्या दिनकरा' हे गाणे म्हटले.
                    साताऱ्याहून आलेल्या उर्मिला इंगळे यांनी ८० वर्षे वय असलेल्या, दीड वर्षे शय्याग्रस्त  असलेल्या पतीच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले.दासबोध,मनोबोध आदि ऐकणे, ऐकवणे,नामस्मरण यांच्या सहाय्याने स्वत:चे मनोधैर्य टिकवले आणि पतीलाही जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.
                  आता वेळ बराच झाला होता, त्यामुळे चर्चा थांबवावी लागली.तज्ज्ञांच्या  व्याख्यानाएवढेच असे अनुभव कथन गरजेचे आहे आणि उपयुक्त ठरते असे म्हणावयास हरकत नाही.
                टीप - कृपया कोणतेही उपचार करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
                    


                                                        निवेदन
पार्किन्सन्स मित्रमंडळ आय.पी.एच.,पुणे येथे
या महिन्याची सभा सोमवार दिनांक २५ जून  रोजी आयोजित करीत आहे. यावेळी हृषीकेश पवार यांची 'Dance for Parkinson's Disease ' ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार आहे.
वेळ दु.४. ते ६
ठिकाण
अनैषा,प्लॉट क्रमांक ४,यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ,डी.पी.रोड,कर्वेनगर ,पुणे
खुणेसाठी - राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली.आत शिरल्यावर उजवीकडे चवथा बंगला.

२५ जून २०१८. आय.पी.एच.सभा वृत्त.
                                पार्किन्सन्स मित्रमंडळ आय.पी.एच.,पुणे येथे या महिन्याची सभा सोमवार दिनांक २५ जून रोजी आयोजित केली होती.. यावेळी हृषीकेश पवार यांची 'Dance for Parkinson's Disease ' ही डॉक्युमेंटरी दाखवली गेली.प्रकाश जोशी यांनी आपला Laptop आणून सहकार्य केल्याने आणि IPH च्या कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक सहकार्यामुळे डॉक्युमेंटरी दाखवणे शक्य झाले.पाऊस असूनही १७ जण उपस्थित होते.डॉक्युमेंटरीमध्ये शुभंकर, शुभार्थींचे नृत्योपचाराचे अनुभव,रामचंद्र करमरकर यांनी नृत्योपचाराची सुरुवात कशी झाली ही माहिती,न्यूरॉलॉजिस्ट राजस देशपांडे यांचे तज्ज्ञ म्हणून याबाबतचे विचार,हृषीकेश पवार,मैथिली भूपटकर या शिक्षकांचे अनुभव यांचा समावेश आहे.मंडळाच्या www.parkinsonsmitra.org या वेबसाईटवर या डॉक्युमेंटरीची लिंक आहे. ती अवश्य पहावी.
                                या डॉक्युमेंटरीत सहभागी असलेले प्रज्ञा जोशी आणि नलीन जोशी सभेस उपस्थित होते.त्यांना त्यांचे अनुभव सांगण्याची विनंती करण्यात आली.प्रज्ञाला आत्मविश्वास ,जगण्याची गुणवत्ता वाढणे,नैराश्यातून मुक्तता असे फायदे झाले. ICU मध्ये ठेवावे लागण्याइतकी तिची तब्येत बिघडली होती.त्यातून बाहेर आल्यावर नृत्यामुळे ती पूर्वपदावर आली.नलीन जोशीनी शुभंकर म्हणून याबाबतचे निरीक्षण नोंदवले. प्रत्येकाला व्यक्त व्हायचे असते.ते होता आले की आनंद मिळतो.नृत्यामध्ये याला वाव मिळतो.नृत्यासाठी केलेल्या  छोट्या हालचालीतून क्षमता वाढत जाते.आत्मविश्वास वाढतो.
                         शरच्चंद्र पटवर्धन म्हणाले, त्याच हालचाली पुन्हा पुन्हा केल्याने त्या सुधारतात.क्षमता वाढते.व्यायामातही हे होते. यासाठी त्यांनी काही प्रात्यक्षिके करून दाखवली. एकत्र व्यायाम केल्याने अधिक फायदा होतो असेही ते म्हणाले.आता विषयाला वेगळे वळण लागले.अनुभव कथन सुरु झाले.
                        डॉक्टर जावडेकर यांनी आपल्या भारतीय जीवन पद्धतीत अनेक अवयवांना आपोआप व्यायाम होत असे. पाश्चात्य जीवन पद्धती अनुसरायला सुरुवात केल्यापासून हे कमी झाले असे मत व्यक्त केले.' डॉक्टर कसा निवडावा ' हे आपल्या आगामी पुस्तकातील प्रकरण वाचून दाखवले.आपला आनंद कशात आहे तो शोधावा.त्यांनी स्वत: पेंटीगमध्ये तो शोधला. नव्यानेच शिकूनही दोन वर्षात ५०० पेंटिंग केली.रोज आपण कितीवेळा निराश झालो,कितीवेळा आनंदी होतो, याचे स्वत:चेच निरीक्षण करून,ग्रेड देवून मुल्यांकन करावे. .नैराश्याचे पारडे वर वाटल्यास कार्टून पाहणे,हास्योपचार,प्राणायाम,नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणे हे विविध मार्ग शोधता येतील असे सांगितले.प्रत्येकांनी आपल्या विविध शंकांना प्रेमानी उत्तर देईल असा जनरल Practitioner डॉक्टर शोधावा असे सुचविले.
                      दिल्लीस्थित असलेल्या  रेखा देशमुख यांनी दिल्लीतून पुण्यात आल्यावर  आपल्याला असा डॉक्टर शोधणे कठीण जात असल्याचे मत नोंदवले.
                      आता सहा वाजत आले होते.गट छोटा असल्याने प्रत्येकजण व्यक्त होत होता..शेवटी मिटिंग आटोपती घ्यावी लागली.
                        या सभेच्या अनुभवातून जवळ राहणाऱ्यांनी छोटे गट करून अनुभवांची देवाणघेवाण करणे शुभंकर शुभार्थीसाठी उपयुक्त आहे हे लक्षात आले.
   निवेदन
सोमवार दिनांक ९ जुलैला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.बंगलोर येथील व्यास ( विवेकानंद योग अनुसंधान संस्था ) विद्यापीठाचे ट्रेनर प्रकाश शेल्लीकरी हे प्राणायामावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत.
योगप्रसार हे मीशन असलेले शिन्नीगीरी ६ महिने अमेरिकेत ६ महिने भारतात असतात.आपण उपस्थित राहुन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
वेळ - दु.४
ठिकाण -  ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४

                                                ९ जुलै २०१८ नर्मदा हॉल सभा वृत्त
                          सोमवार दिनांक ९ जुलैला पार्किन्सन्स मित्रमंडळाने नर्मदा हॉल येथे सभा आयोजित केली होती.  पाऊस असूनही ५०/ ६० जण उपस्थित होते.बंगलोर येथील व्यास ( विवेकानंद योग अनुसंधान संस्था ) विद्यापीठाचे ट्रेनर प्रकाश शेल्लीकरी यांनी प्राणायामावर  व्याख्यान दिले.योगप्रसार हे मिशन असलेले शेल्लीकरी ६ महिने अमेरिकेत ६ महिने भारतात असतात.
                         सभेची सुरुवात शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करून झाली.यानंतर अविनाश धर्माधिकारी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.शेल्लीकरी यांनी सुरुवातीला सर्वांना तीन वेळा ओंकार म्हणायला सांगून भाषणाला सुरुवात केली क्रोनिक डिसीज का होतात आणि होलिस्टिक अॅप्रोचनी त्यावर मात कशी करता येते हे त्यांनी स्वानुभवावरून सांगण्यास सुरुवात केली.अनुवंशिकता नाही,व्यसन नाही तरी त्यांना कॅन्सर झाला.त्यांच्या पत्नीचा कॅन्सरने झालेला मृत्यू आणि त्यांना स्वत:ला झालेला  कॅन्सर,मलाच का? हा सतावणारा प्रश्न, यामुळे कॅन्सरबद्दल मुळाशी जावून विचार करायला त्यांना प्रवृत्त केले.यासाठी त्यांनी कॅन्सरवरची अनेक पुस्तके आणून वाचली.त्यांच्या परीने  उत्तर शोधले.कामाचा प्रचंड ताण आणि तो सोसण्यासाठी गरजेची असलेली  भावनिक बुद्धिमत्ता ( EQ ) कमी पडणे,स्वस्थ,पुरेशा  झोपेचा अभाव हे स्वत:बद्दल उत्तर त्यांना सापडले.बेंगलोर येथील व्यास विद्यापीठात घेतलेले प्राणायामाचे शिक्षण आणि इतर  अभ्यासातून केमोथेरपी न घेता  होलिस्टिक Treatment चा विचार त्यांनी केला.हे करत असताना वेळोवेळी तपासण्या करून कॅन्सर  वाढत नाही ना  हे पाहिले.
                     प्राणायाम हा होलिस्टिक अॅप्रोचचा एक भाग आहे.प्राणायाम का आणि योग्य पद्धतीने कसा करायचा हे समजले तरच त्याचा उपयोग होतो. त्यासाठी होलिस्टिक अॅप्रोच समजून घ्यावा लागेल.त्यात प्रथम येते Spirituality. देवावर विश्वास ठेवा. तो नसेल तर स्वत:वर विश्वास ठेवा. अहंम ब्रम्हास्मी म्हटले जाते.तुमच्यातल्या डॉक्टरला जागृत  करा.शेल्लीकरी यांनी त्यासाठी अॅनाॅटाॅमीवरील पुस्तके वाचली.पंचेंद्रियांची शक्ती समजून घेतली.रूट कॉज शोधले.भूतकाळातील समस्यांचा प्रभाव काढून टाकणे,स्वत:तील Strong Points शोधणे,सकारात्मक विचार करणे याही गोष्टी महत्वाच्या आहेत.आपले आहे ते आयुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी होलिस्टिक अॅप्रोच महत्वाचा ठरतो.
                   दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विचार.योग्य विचारासाठी  शरीर आणि मन यात ताळमेळ हवा.नकळत आपल्या मनाचा तोल जातो.नियंत्रण जाते.त्याचा विविध अवयवांवर परिणाम होतो.आणि स्वत:च निर्माण केलेल्या व्याधी मागे लागतात.शरीर आणि मन यात बॅलन्स राहण्यासाठी ओंकाराचा उपयोग होतो.रोज सकाळी ९ वेळा ओंकार करावा.रात्री झोपताना ९ वेळा ओंकार करावा,भ्रामरी करावी. त्यामुळे झोप चांगली लागते.स्मरणशक्ती चांगली राहते.प्राणायामालाही ओंकाराने सुरुवात करावी.ओंकार करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्यावा.त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. फुफ्फुसाची क्षमता वाढते.हे करताना डोळे बंद असावेत.ताठ बसावे.शरीर ताणरहित असावे.श्वासाकडे लक्ष द्यावे.श्वास घेतांना थंड हवा आत येते. श्वास सोडताना गरम हवा बाहेर जाते.हे करताना शरीराचा एखादा भाग अवघडला,तर हालचाल करून घ्यावी परंतु मिटलेले डोळे उघडू नयेत..भ्रामरीतील गुंजन २० सेकंदापेक्षा जास्त असावे.श्वास घेताना हवा आत घेणे,रोखणे ही क्षमता हळूहळू वाढवत जावी.
                आहार हाही होलिस्टिक अॅप्रोचमध्ये महत्वाचा आहे.जेवताना पाणी न पिता पातळ ताक घ्यावे.पाणी पिल्याने पचनास आवश्यक विविध रस निर्माण होत असतात, ते डायल्युट होतात.ओमेगा ३ असलेले पदार्थ खावेत ,विविध फळे खावीत,शक्यतो ब्रेकफास्ट पूर्वी खावीत.तळलेले,मसालेदार पदार्थ खावू नयेत.जे खाऊ ते आनंदाने खावे.
               या सर्वाबरोबर व्यायाम,प्राणायामही महत्वाचा आहे. कोणताही व्यायाम श्वासाबरोबर करावा.
               आपला आजार समजून घेऊन, त्याला मित्र बनवून स्वत:च त्याला नियंत्रणात ठेवता येते.'थिंक ऑफ बिगर' असा संदेशही त्यांनी दिला.त्यादिवशी ते २२ किलोमीटर वारीबरोबर चालून आले होते.मनाची ताकद, त्याला अभ्यासाची जोड यामुळे आजारावर नियंत्रण कसे शक्य आहे याचे ते जिते जागते उदाहरण आहेत.त्यांच्या व्याख्यानातुनही हा संदेश उपस्थितांपर्यंत पोचला.
              शेवटी त्यांनी ओंकाराचे प्रात्यक्षिक करून दाखवले.ज्यांना अधिक शिकण्याची इच्छा आहे त्यांनी व्यक्तिगत रित्या किंवा गट करून बोलावल्यास शिकवण्याची त्यांनी तयारी दाखवली.
              वाढदिवसानिमित्त रेखा आचार्य यांनी चहा,बिस्किटे दिली.पद्मजा ताम्हणकर यांनी पेढे वाटले.
                 
                                                                  निवेदन 
                 
                                सोमवार दिनांक १३ ऑगस्टला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
न्युरोफिजिओथेरपिस्ट पूनम गांधी या ताई ची ( Tai Chi ) वर प्रात्यक्षिकासह व्याख्यान देणार आहेत.पार्किन्सन्सच्या ' फ्रीजिंगच्या समस्येवर फिजिओथेरपी उपचार 'असा प्रयोग त्या करत आहेत. त्याबद्दलही माहिती देणार आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

वेळ - दु.४. ०
ठिकाण  : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५  ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
         
                                                      १३ ऑगस्ट २०१८ मासिक सभा वृत्त
                                सोमवार दिनांक १३ ऑगस्टला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.
न्युरोफिजिओथेरपिस्ट पूनम गांधी यांनी ताई ची ( Tai Chi ) वर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिले.सभेस ४०/४५ सदस्य उपस्थित होते.पार्किन्सन्सच्या ' फ्रीजिंगच्या समस्येवर फिजिओथेरपी उपचार 'असा प्रयोग त्या करत आहेत. त्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
                             सुरुवातीला हरिप्रसाद आणि उमा दामले यांनी त्यांच्या Travel - Mate या नव्याने सुरु केलेल्या सेवेविषयी माहिती दिली.ज्येष्ठ  नागरिकांना सर्व सुविधा असतात.पण एकटे कुठे बाहेर जाणे शक्य नसते, सोबतीची गरज असते. अशी  सोबत या सेवेद्वारे दिली जाणार आहे.या दोघांचे निवेदन चालू असतानाच चहा देण्यात आला.यावेळी अरुंधती जोशी यांनी चहा दिला.सध्या चहा देण्यासाठी वेटिंग लिस्ट असते ही आनंदाची बाब आहे.
                            यानंतर पूनम गांधी यांची शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.त्यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला Tai Chi या व्यायाम प्रकाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली.हजारो वर्षांपासून चीनी संस्कृतीमध्ये  जीवन पद्धती म्हणून याकडे पाहिले आहे.सुरुवातीला मार्शल आर्टसाठी याचा वापर केला जायचा.श्वासोच्छवास आणि मन यांच्याशी समतोल राखत केला जाणारा हा व्यायाम प्रकार आहे.शरीर आणि मन यांचे संतुलन साधण्यासाठी हा व्यायाम केला जातो.
                        तावो तत्वज्ञानानुसार मानवी शरीराच्या  अमर्यादित क्षमता आहेत.त्यांचा वापर करायचा तर उर्जेची गरज आहे.ती उर्जा म्हणजे ' Chi.' मनाची एकाग्रता आणि श्वासोच्छवास यांचा समन्वय साधून केलेल्या विशिष्ट हालचालीतून ती मिळवता येते.चायनीज उपचार पद्धतीनुसार योग्य  श्वासोच्छवासामुळे तारुण्याला टिकवता येते आणि आजारांना रोखता येते.त्याला व्यायामाची जोड दिल्यास शरीराला उपयुक्त आयर्न,कॉपर,झिंक,मॅग्नेशियम मिळते. शरीरात निर्माण होणारी दुषित द्रव्ये,टाकाऊ पदार्थ बाहेर फेकले जातात.
                        या विशिष्ठ हालचालीमुळे उर्जा शरीरात आठ मार्गांनी ( channel ) पसरवण्यास मार्गदर्शन होते.येथे हे फक्त विशिष्ठ पद्धतीने केलेल्या हालचालींनी साध्य होणार नाही तर श्वासोच्छवासाबरोबर एकाग्रता साधण्याची मनाची शक्ती ही महत्वाची आहे.म्हणून याला moving meditation असेही म्हटले जाते.
                       यानंतर पूनम गांधी यांनी शुभंकर शुभार्थी यांच्याकडून ताई चीचे विविध प्रकार करून घेतले.हे प्रकार महिनोनमहीने योग्य  प्रकारे केल्यास त्याचा परिणाम दिसतो असे त्यांनी सांगितले.पार्किन्सन्स शुभार्थीचा विचार करता तोल जाणे, पडण्यापासून बचाव,  मनाचा समतोल, रिलॅक्सेशन यासाठी याचा उपयोग होतो.या हालचाली  आनंददायी  असल्याने शुभार्थी मनापासून करू शकतात.एकत्रित केल्यास सामुहीकतेतून वेगळाच आनंद मिळू शकतो.
                       मेयो क्लिनिकने केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार ताई चीमुळे स्नायूंची ताकद वाढणे,लवचिकता,तोल सांभाळणे, वृद्धांमध्ये पडण्यावर नियंत्रण, झोप चांगली लागणे, अस्वस्थता, नैराश्य कमी होणे, वेदना कमी होणे,रक्तदाब कमी होणे,हृदयाची शक्ती वाढणे,स्त्रियांच्या मेनोपॉजनंतर हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते ती कमी होणे, ताकद, सहनशक्ती, चपळता वाढणे असे अनेक  फायदे होऊ शकतात.
                     यानंतर पूनम गांधी यांनी पीडी पेशंटच्या फ्रीजिंग या समस्येवर  माहिती दिली.त्यांनी यासाठी काही पीडी पेशंटवर पायलट स्टडी केला आहे आणि फिजिओथेरपीचा यासाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार केला आहे.या समस्येवर औषध नसल्याने इतर उपाय योजावे लागतात.फ्रीझिंग म्हणजे पेशंटचा एकदम पुतळा होतो. हालचाल करता येत नाही. हे ऑन पिरिएडमध्ये तसेच ऑफ पिरिएडमध्ये ही होऊ शकते.यातून सुटका करण्यासाठी हालचालीचे निरीक्षण करून Relaxation, Concentration, External cuing हे उपाय करता येतात.
External Cuing मध्ये दृश्य स्वरुपाचे,आवाजाच्या आधारे आणि Vibration च्या आधारे असे प्रकार येतात. यातील कोणता प्रकार  कुणाला आणि कोणत्या स्थळी उपयोगी पडेल हे निरीक्षणानेच ठरवता येते.तसेच  एकावेळी २/३ Cue च्या एकत्रीकरणातूनही उपयोग होऊ शकतो.
                      शुभार्थीना आशेचा किरण अशी एक गोष्ट गांधी यांनी सांगितली ती म्हणजे पीडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत ट्रेडमिलवर high density व्यायाम केल्यावर हालचालीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण येऊ शकते असे संशोधन सेकंड फेज मध्ये आहे.
                     यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना गांधी यांनी उत्तरे दिली.पूनम गांधी या पार्किन्सन्सच्या whats app ग्रुपवर असल्याने कोणाला काही शंका असल्यास तेथे विचारता येतील.फ्रीजिंगची समस्या असणारे आणि ज्यांना ताई ची शिकायचे आहे ते  त्यांच्याशी संपर्क करू शकतील.
                 
                                                         निवेदन

सोमवार दिनांक १0 सप्टेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि समुपदेशक अनुराधा करकरे या ' पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.
वेळ - दु.४. ०
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४
                                           १० सप्टेंबर सभा

सोमवार दिनांक १0 सप्टेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागल्याने  ती रद्द करावी लागली.
                                  निवेदन
               
                         सोमवार दिनांक ८ ऑक्टोबरला  पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
 Occupational Therapist   झैनब कापसी या  Occupational Therapy  या  विषयावर व्याख्यान देणार आहेत.तसेच शुभार्थीची तपासणी करून सल्लाही देणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.ही तपासणी चालू असताना काही शुभार्थींना  स्पीच थेरपीस्ट नमिता जोशी या स्पीच थेरपीबाबत तपासणी करून सल्ला देतील.
सभेच्यावेळी ऑक्टोबर महिन्याचे संचारचे अंक देण्यात येतील.

वेळ - दु.४. ०
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४

विशेष सूचना - बुधवार २१ नोव्हेंबर रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल जाणार आहे. त्यासाठी जे सहलीला येऊ इच्छितात त्यांनी प्रत्येकी ४०० रुपये भरून सभेच्या ठिकाणी नाव नोंदवावे.सहलीचा तपशील सभेत सांगण्यात येईल.
                                         ८ ऑक्टोबर २०१८ सभा वृत्त
                          
                                     सोमवार दिनांक ८ ऑक्टोबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली होती.
Occupational Therapist झैनब कापसी यांनी Occupational Therapy या विषयावर व्याख्यान दिले. सभेस ६०/६५ जण उपस्थित होते.सविता ढमढेरे यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या चहापानानंतर प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.सप्टेंबर महिन्यात सभा न झाल्याने यावेळी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील जन्म असणाऱ्या सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
                         झैनब कापसी यांची शोभना तीर्थळी यांनी ओळख करून दिली.प्रोजेक्टरचा वापर करून डॉक्टर कापसी यांनी व्याख्यानाला सुरुवात केली.यानंतर पीडी पेशंटच्या अवस्थेचे आणि रोजच्या जगण्यातील संघर्षाचे वर्णन स्वरचित कवितेतून केले.कंप,ताठरता,हालचालीतील मंदत्व,तोल जाणे,फटिग,पडण्याची भीती,कॉग्नीटीव्हीटी कमी होणे अशा अनेक बाबींमुळे दैनंदिन व्यवहार करणे कठीण जाते.या सर्वांवर मात करून दैनंदिन व्यवहार  हाताळायचे,जास्तीत जास्त स्वावलंबी व्हायचे  तर इंटर्नल आणि एक्सटर्नल अशा दोन पातळ्यांवर ते  हाताळावे लागतील.
                          इंटर्नलमध्ये relaxation महत्वाचे. हे पेशंटनुसार वेगवेगळे असेल.योग, ध्यान,संगीत ऐकणे या आधारे हे होऊ शकते.सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा.मला हे जमेल असे स्वत:ला सांगायचे.एकदम पूर्ण कृती स्वत: न करता त्यातला एक भाग करावा. हळूहळू पूर्ण कृती वाढवावी.दुसरे मनातल्या मनात कृतीची उजळणी करणे,तिसरे स्वत:ला कृतीबद्दल सांगणे,चौथे कृती डोळ्यासमोर आणणे.तुमचे थेरपीस्ट आणि केअर टेकरच्या मदतीने यातले तुम्हाला काय सोयीचे आहे ते ठरवा.
                        एक्सटर्नलमध्ये तुमच्याकडे क्षमता आहे पण आजूबाजूची रचना, आजूबाजूचे पर्यावरण पूरक नसते.ते कसे करावयाचे याचा समावेश होतो.घरातील थोडीफार रचना बदलून हे होऊ शकते.यासाठी त्यांनी पेशंटच्या दृष्टीने चुकीची रचना आणि पूरक रचना असे फोटो दाखवले.
                     भिंत आणि जमीन यांचे रंग सारखे असले तर मार्करने खुणा केल्यास कोठे जायचे समजणे सोपे होते.वाटेत पुरेसा उजेड असेल अशी लाईट व्यवस्था असावी.
                  कृतीचे तपशील देणारे चित्रफलक, दिवसभरातील कृतींचा तक्ता करून ती कृती झाली की तेथे खूण करणे,कृतीबद्दल सूचना देणे असे उपायही करता येतात.
                    पीडी पेशंटबाबत गतीक्षमता ( mobility )कमी होणे ही समस्या असते.घरातील विविध हालचाली आणि घराबाहेर पडल्यावरही हालचालींवर मर्यादा येतात.यात फ्रीजिंग,तोल जाणे,पडणे या समस्या असतात.या प्रत्येक पेशंटच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या असतील.केअरटेकरने हे लक्षात घेऊन त्या  हाताळताना वर सांगितलेल्या  इंटर्नल आणि एक्सटर्नल बाबींचा वापर करायचा.मार्करचा वापर करायचा,आपल्याला काय कृती करायची याचे नियोजन करायचे, विविध अडथळ्यातून जायचा सराव करायचा. हे थेरपीस्ट करून घेतील.
                   पडणे टाळण्यासाठी लक्ष पूर्णपणे त्या क्रियेवर ठेवायचे.वस्तू हातात न घेता हात मोकळे ठेवायचे,आजूबाजूला गोंगाट नसावा.बरेच खिसे असलेला गाऊन तयार करून घ्यावा. त्यात वस्तू ठेवल्याने हात मोकळे राहतील.
                    ओंन,ऑफ पिरिएड पाहून ओंन पिरिएड मध्ये जास्तीत जास्त अवघड गोष्टी कराव्या.
                     पिशवी वापरण्याऐवजी पोटाला पाऊच बांधा. पिशवीमुळे एका बाजूला वजन जास्त झाल्याने तोल जाऊ शकतो.Walker असेल तर त्यात वस्तू ठेवायला कप्पे करा.
                   झोपून उठताना केअर टेकरवर अवलंबून राहू नये यासाठी  थेरपिस्टच्या सल्ल्याने पलंगाच्या रचनेत थोडे फेरफार करा.हे शक्य नसेल तर पलंगाच्या टोकाला ओढणी बांधून तीचे दुसरे टोक  हातात धरून उठा.उठणे सुलभ होण्यासाठी ड्रेस किंवा बेडशीट यापैकी एक  सॅटीनचे ठेवा.
                 खाण्यापिण्यातही समस्या येतात.खातापिताना पोश्चर योग्य ठेवावे.गिळताना आपोआप गिळले जात नाही.त्यामुळे स्वत:च स्वत:ला सूचना द्यावी.किंवा केअरटेकरनी सूचना द्यावी.खाताना कंप असल्याने तोंडात घास घेणे कठिण होते यासाठी हाताला वेट बांधावे.वेट किती असावे हे व्यक्तीनुसार वेगळे असेल.थेरपिस्टच्या सल्ल्याने ते निवडावे.योग्य पकड असणारे चमचे थेरपिस्टच्या सल्ल्याने वापरा.
                  बाथरूम मध्ये बार असावेत.अंघोळ करताना लागणाऱ्या सर्व वस्तू आधीच ठेवाव्या.बसून अंघोळ करा.बाथरूममध्ये घसरणार नाही अशा फरशा असाव्यात.कपडे घालतानाही बसून घालावे. ड्रेसिंग स्टिकचा वापर करावा.सोयीचे कपडे कसे असावेत, घालताना कसे घालायचे याची विविध चित्रे डॉक्टरांनी दाखवली.                              अनेकांना  फटिग ही समस्या असते. कोणकोणत्या क्रियेने थकता हे पाहून नियोजन करा.त्याला पर्याय शोधा.उदा.हातात फोन घेऊन बोलण्याने दमायला होते तर स्पीकरचा वापर करा.
                    कॉग्नीशनमधल्या विविध बाबीत समस्या असतात त्या शोधा. यात आकलन, स्मरण, कृती, व्यवधान  अशा अनेक गोष्टी येतात.यातील काय कमी आहे ते पाहून थेरपिस्टचा सल्ला घ्या.
                  करमणूक आणि समाजात मिसळणे महत्वाचे. यात संवाद ही समस्या असते.यात लांबून दुसऱ्या खोलीतून न बोलता समोर राहून बोला.बोलताना महत्वाचे शब्द वापरा. उजेडात उभे राहून बोला.त्यांच्या  उत्तराची लगेच अपेक्षा न करता थोडा वेळ द्या.
                 त्यांना सातत्याने कुठे तरी गुंतवून ठेवा.
                  केअर टेकरला दिवसरात्र शुभार्थीकडे लक्ष ठेवावे  लागते. असे असले तरी  स्वत:ला थोडा वेळ द्या.केअरटेकरनी एकमेकात शेअर करा.
                    २०१६ ला डीसअॅबिलीटी अॅक्टनुसार डीसेबल व्यक्तींमध्ये  पार्किन्सन्सचा समावेश केला आहे.त्याचा उपयोग करून घ्या.
                    यानंतर डॉक्टर कापसी यांनी थेरपी वापरून, आजार समजून घेऊन उपाय केल्यावर पेशंटचे जगणे कसे सुसह्य होते हे सांगणारी स्वरचित कविता म्हणून व्याख्यान संपवले.
                    उरलेल्या वेळात प्रश्नोत्तरे किंवा तपासणी यापैकी एकच होऊ शकणार होते.उपस्थित श्रोत्यांनी तपासणीचा पर्याय निवडला.एकीकडे डॉक्टर कापसी यांनी तर दुसरीकडे स्पीच थेरपिस्ट ऋतिका सोनटक्के यांनी शुभार्थींची तपासणी केली.
                   सभेच्यावेळी ऑक्टोबर महिन्याचे संचारचे अंक देण्यात आले. जे उपस्थित नव्हते त्यांना पोस्टाने पाठविण्यात येतील.
                                               निवेदन
                 दिवाळीच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा.
                  दि.१२ सोमवार रोजी या महिन्यात सहल जाणार असल्याने मंडळाची सभा असणार नाही.याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
                 यावर्षीची पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल बुधवार २१ नोव्हेंबर रोजी घाडगे फार्म येथे जाणार आहे.हे निसर्गरम्य ठिकाण पुण्यापासून २३ किलोमीटरवर सिंहगड रोडवर आहे.सहल सकाळी जावून संध्यकाळी परत येईल.ऑक्टोबरच्या सभेत अनेकांनी सहलीचे पैसे भरले आहेत.त्याना सहलीबाबत सविस्तर माहिती वेळेत कळवली जाईल.
                 ज्यांना सहलीला यायचे आहे ते अजूनही १४ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवू शकतात.प्रत्येकी रु.४०० भरावयाचे आहेत.काही जागा शिल्लक आहेत.आपण  पार्किन्सन्स मित्रमंडळ या नावाने बँकऑफ महाराष्ट्र Ac no. 60293752005 IFSC MAHB0000330 या नंबरवर आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेत पैसे  भरू शकता.पैसे भरल्याचे विजयालक्ष्मी रेवणकर ९८५०८४९५२९ किंवा सविता ढमढेरे ९३७१०००४३८ याना फोन करून कळवावे.
सहलीबद्दल काही शंका असल्यास येथे संपर्क साधावा.
शोभना तीर्थळी ९६५७७८४१९८
वसुमती देसाई ९८६००६७८०८
   निवेदन

सोमवार दिनांक १० डिसेंबरला पार्किन्सन्स मित्रमंडळाने सभा आयोजित केली आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि समुपदेशक अनुराधा करकरे या ' पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी ' या विषयावर व्याख्यान देणार आहेत.सर्वांनी उपस्थित राहावे.
वेळ - दु.४. ०
ठिकाण : नर्मदा, विवेकानंद केंद्र, ८०६ B, प्रभात रोड गल्ली नंबर १५ ( भांडारकर रोड कडूनही गल्ली नंबर १५)
TVS शो रूमच्या जवळ,शिवाजीनगर,पुणे ४११००४

१० डिसेंबर २०१८ सभा वृत्त
            सोमवार दि.१० डिसेंबरला ज्येष्ठ समुपदेशक अनुराधा करकरे यांचे व्याख्यान झाले. ' पार्किन्सन्ससह आनंदी राहण्यासाठी ' असा विषय होता.सभेस ५०/६० जण उपस्थित होते. प्रार्थनेनंतर शुभंकर शुभार्थींचे वाढदिवस साजरे करण्यात आले. शोभना तीर्थळी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि अनुराधा करकरे यांच्या व्याख्यानास सुरुवात झाली. त्यांनी विविध कथांच्या आणि  Activity च्या आधारे पार्किन्सन्सला स्वीकारून आनंदी कसे राहता येईल हे सांगितले. सुरुवातीला Victor  Frankl या नाझी कॅम्पमध्ये छळ सोसलेल्या लोगोथेरपीच्या जनकाची कथा सांगितली. व्हिक्टर छळछावणीतील अनुभव लिहून ते कागद बुटात ठेवी. हे अनुभव त्याला जगापुढे आणता  येणार होते. तो पकडला गेला. हे कागद जाळून टाकण्यात आले. त्याच्या जगण्याला उद्दिष्ट राहिले नाही. व्हिक्टरपुढे आत्महत्या आणि फ्रीडम ऑफ चॉइस असे दोन पर्याय होते. पहिला त्यांनी बाजूला सारला आणि दुसरा स्वीकारला आणि जगभर गाजलेली सायको थेरपी निर्माण झाली. शुभार्थीसाठी सुद्धा पार्किन्सन्स झाला ते  हातात नाही  पण जी विविध शारीरिक, मानसिक लक्षणे आहेत त्यावर मात करणे त्यांच्या  हातात आहे.
                       यानंतर त्यांनी डोळे मिटून डाव्या हाताने लिहिण्यासाठी एक वाक्य सांगितले. उजव्या हाताइतके चांगले नसले तरी सर्वांना ते जमले. वेगळे काही करायचे तर पहिला नकार असतो. ही सवयीची चौकट मोडायला हवी. प्रतीकुलतेतून नव्याने उमेद घेऊन अनुकुलता शोधायला हवी. व्हिक्टरवरच्याच 'प्रिझनर्स ऑफ आवर थॉट' या पुस्तकातून सवयीचे गुलाम न होता प्रत्येक कृती अर्थपूर्ण कशी होईल हे पाहायला हवे. आलेल्या आपत्तीकडे  संधी म्हणून पाहून वेगळ्या पद्धतीने जगायला शिकायला हवे
                     वरील संदेश पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तींना  मिळाला आहे. परंतु माझ्याच बाबतीत असे का? हे असे कसे झाले? या प्रश्नात आपण अडकतो. यातून बाहेर पडण्यासाठी Ash Orther या विम्बल्डन खेळाडूची गोष्ट करकरे यांनी सांगितली. अपघातानंतर दिलेल्या रक्तामुळे तो एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला. यावेळी मलाच का असा विचार न करता ज्यावेळी मला अनेक विजय मिळाले तेंव्हा मी मलाच का असे नाही म्हटले असा विचार केला, वास्तव स्वीकारले.
                  स्वीकाराला अट नसते.विधान असते. मला अमुक अमुक झाले आहे हे विधान आणि लगेच पूर्णविराम. हा पूर्णविराम जितक्या लवकर देता येईल तितक्या लवकर आपल्यासाठीचे आयुष्य लवकर जगू शकतो. आपल्यात निरपेक्षता येईल भावनांचे रंग मिसळणार नाहीत. घटना आहे तशी दिसेल.आजाराचा स्वीकार आपोआप होईल.

                  याचबरोबर भावनांचे संतुलनही हवे. भावनाचा अतिरेक आपल्याला मारतो तर त्या प्रमाणात आल्या तर तारतात मग कोणत्याही प्रसंगात व्यक्ती डगमगत नाही, स्थितप्रज्ञ बनते. 
  • भावना ताब्यात ठेवता यायला हव्यात त्यांचा उद्रेकही नको आणि त्या दाबुनही ठेवू नयेत. भावनांचा समतोल हवा. प्रसंग योग्य तऱ्हेने  हाताळण्यास तो उपयोगी पडतो.
  • भावनांची तीव्रता, कालावधी आणि वारंवारिता यावरून भावनांचा समतोल साधता आला आहे का हे समजते.
  • भावनांचा उद्रेक काहीही न करायला प्रवृत्त करतो आणि दमन नैराश्याकडे नेते.
प्रत्येक प्रसंगात विविध पर्याय असतात. भावनांचा उद्रेग झाला की पर्याय दिसत नाहीत. स्वमदत गट हा पार्किन्सन्सला तोंड देण्यासाठी चांगला पर्याय आहे.
          भावना निर्माण होते ती धारणा मधून. विविध अनुभव, आईवडिलांची शिकवण, संस्कृती, धर्म, आपण स्वत: अशा विविध बाबीतून धारणा तयार होतात आणि आपल्या हार्ड डिस्क मध्ये पक्क्या बसतात. त्या न तपासता आपण त्याबाबतीत ताठर राहिलो तर उत्तरे सापडत नाहीत. आपल्याला आयुष्यात काय मिळाले याचा विचार न करता काय मिळाले नाही हे लक्षात घेतले जाते. कुरकुरा स्वभाव बनतो. यावेळी धारणा तपासून पाहायला हव्यात. कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा विवेकनिष्ठ दृष्टीकोन हवा. तरी बरे झाले असा विचार करावा, जास्तीतजास्त वाईट काय होईल असा विचार करून त्यासाठी तयार राहावे.
    वर्तनातील बदलही महत्वाचा यासाठी:
  •  'ऑउट ऑफ बॉक्स थिंकिंग' करायला हवे.मीच सर्व करेन असे न विचार करता कामे वाटून द्यायला हवीत.सोय पाहायला हवी
  • स्वत:साठी वेळ द्यायला हवा.स्वत:च्या आत डोकावायला हवे.आपले सुख बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून न ठेवता. स्वत:ची सोबत आवडायला हवी.
  • जीवनाचा वाढलेला वेग ही समस्या झाली आहे. स्वत:चा वेग ठरवायला हवा.
                   भावनिक गुंतवणूक करायला हवी. यासाठी वाच्यता न करता इतरांना छोट्यामोठ्या गोष्टीत मदत करणे, इतरांचे कौतुक करणे,माफी मागणे, माफ करणे, कृतज्ञता व्यक्त करणे इत्यादी गोष्टी येतील. शारीरिक मर्यादा आल्या की ही गुंतवणूक उपयोगी पडते. मदत मागताना आपण कचरणार नाही.
                    शारीरिक आजाराबरोबर त्यातून मानसिक आजारही येतात. वेळच्यावेळी मानसोपचार तज्ञाकडेही जायला हवे. स्वमदतगट हा  सुद्धा मानसोपाचारच आहे. यानंतर अपंगत्वावर मात करून एव्हरेस्ट चढणाऱ्या अरुणीमाची गोष्ट् त्यांनी संगितली. आपल्यात दुर्दम्य इच्छाशक्ती असते तिचा वापर करा 'डोन्ट गिव्ह अप' असा संदेश दिला. अनुराधा करकरे यांचे व्याख्यान हेही शुभंकर शुभार्थीसाठी सकारात्मकतेकडे नेणारा मानसोपचार ठरला.
                   यानंतर तळेगावच्या एमआयटी फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या शिलोत्री हिने आपल्या प्रकल्पाविषयी माहिती सांगितली. शुभार्थिनी सहभागी व्हावे अशी विनंती केली.
                   संस्थेच्या अध्यक्ष श्यामला शेंडे या अमेरिकेत असल्या तरी त्यांचा फोन ,WhatsApp, मेलद्वारे, सहभाग, संपर्क असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यामार्फत चहा देण्यात आला.
                  


                     
                      
                                              
                       
                               

                                                                           
         
                 
                           
                   







No comments:

Post a Comment