Tuesday 2 January 2024

आगळे नाते

                                                 

                द्वारकानाथ संझगिरींचा क्रीकेटवरील लेख आला आणि सलीलच्या बाबांची प्रकर्षाने आठवण झाली.लगेच तो त्यांना फारवर्ड करायचा परीपाठ होता.ते आपल्यात नाहीत हे अजून मन मानतच नाही.

               सलीलचे बाबा म्हणजे आमचे व्याही डॉ.रामनाथ मालवणकर.सोनालीचे लग्न ठरल्यापासून सलीलचे आईबाबा आणि आम्ही दोघे यात औपचारिक सबंध न राहता मैत्र कधी जुळले कळलेच नाही.लग्नाची काही खरेदी आम्ही एकत्र केली 'हम आपके है कौन' सिनेमा एकत्र पाहिला.

              लग्न ठरल्यावर मी सोनालीला म्हणायची आता थोडा स्वयंपाक शिक.तर ती म्हणायची आता तिथल्या पद्धतीचे तेथे जाऊनच शिकेन.तिला पोळ्या निट येत नव्हत्या सलीलचे बाबा म्हणायचे.चहाबरोबर सोनालीने केलेल्या पोळ्या खाईन डब्यात शोभाच्या नेईन.आता सोनाली स्वयंपाकात इतकी तरबेज झाले की हे त्यांना कोणाला आठवतही नसेल. सलीलच्या बाबांच्या तोंडी सोनालीचे सारखे कौतुक असायचे.त्यांचा शेवटचा फोन झाला त्यावेळीही ते सोनालीबद्दल भरभरून बोलत होते.

                जे आवडले त्याचे तोंडभरून कौतुक ते करत.मग आवडलेला पदार्थ असो किंवा लेखन असो, ह्यांचे ड्रायव्हिंग किंवा आमचे पार्किन्सनचे काम असो.माझा पीएचडीचा थिसीस माझे गाईड आणि रेफरी वगळता फक्त सलीलच्या बाबांनीच वाचला असेल.त्यांनी तो वाचयला मागितला तेंव्हा मला आश्चर्यच वाटले होते.त्यांनी तो बारकाईने वाचला.कौतुकही केले.त्यांचे संशोधन प्रयोग शाळेतले.सामाजिक शास्त्रांचे संशोधन कसे होते याबद्दल त्यांना कुतूहल होते. इतर वाचनातही काही शब्दांचे अर्थ,संकल्पना समजली नाही तर ते मला नि:संकोचपणे विचारायचे.

                ते संशोधक असले तरी मनाने हाडाचे शिक्षक होते.निवृत्तीनंतरही चाटे क्लासमध्ये शिकवायचे क्षितिजच्या घडणीतही त्यांच्यातल्या शिक्षकाचा मोठ्ठा वाटा आहे.आमच्या नात्यातील कोणी दहावी बारावीला असले तर ते आवर्जून उपयोगी कात्रणे द्यायचे.

              त्यावेळी मोबाइल नव्हते whatsapp नव्हते. प्रत्यक्ष भेटी व्हायच्या. सलीलचे आईबाबा आणि आम्ही दोघे मिळून नाशिक त्र्यंबकेश्वर,महाबळेश्वर अशा सहली केल्या.ड्रायव्हर असायचे सोनालीचे बाबा.ह्यांच्या अशा सहलीतून ही आम्ही अधिक जवळ आलो.पुण्यात आमची घरे दोन टोकाला त्यामुळे जंगली महाराज रोडवर कोणते तरी हॉटेल,नॅचरल आईस्क्रीम अशा ठिकाणी आम्ही एकत्र भेटायचो.फोन मोबाइल आले आणि भेटी कमी झाल्या.

                क्रिकेटची मॅच असली की दोन्ही व्याह्यांच्या त्याबाबत गप्पा व्हायच्या.आताशा ह्यांना पार्किन्सनमुळे बोलण्याचा प्रॉब्लेम होता.सलीलच्या बाबांना ऐकू येत नव्हते.दोघांच्यामध्ये बोलण्यासाठी मी मध्यस्त असायची.

              बर्याचदा वडील आणि मुलगा यांच्यात दोन पिढ्यांचे अंतर असल्याने कदाचित जमत नाही.सलील आणि त्याचे बाबा याला अपवाद होते.त्यांच्या नात्याचे मला नेहमीच कौतुक वाटले.एकुणातच त्यांचा सौम्य स्वभाव सर्वांशी जुळवून घेण्याचाच होता.

             आज ते नसले तरी त्यांच्या सुखद आठवणी मनात रेंगाळतच राहतील.

            

              


No comments:

Post a Comment