Monday 6 November 2023

पार्किन्सन विषयक गप्पा ८७

                                                      पार्किन्सन विषयक गप्पा ८७

                     पार्किन्सन झाल्यावर औषधोपचारासाठी डॉक्टर असतात.सेवा करायला कुटुंबीय असतात.पार्किन्सनमुळे होणाऱ्या नॉनमोटार लक्षणांसाठी मात्र शुभार्थी आणि कुटुंबीय यांना स्वमदत गटाचा आधार हवा असतो.यात नैराश्य,स्वारस्याचा अभाव(Apathy) अशी लक्षणे येतात त्या पाठोपाठ सामजिक भयगंड,आत्मविश्वास गमावणे,असुरक्षितता असा नकारात्मकतेचा गोतावळाही बरोबर येतो.स्वमदतगटाच्या एकत्रित शक्तीने आपण या सर्वाशी सामना करू शकतो.

            उदाहरण द्यायचे तर शुभार्थी उमेश सलगर आज इतरांसाठी रोल मॉडेल आहेत.ग्रुपमध्ये येण्यापुर्वी मात्र.पत्नीचे अकाली निधन,पार्किन्सनचे आगमन यामुळे ते नैराश्यात गेले होते.भांबावून गेले होते.त्यांनी काही दिवसापूर्वी हिंदी दिनानिमित्त वक्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.आयत्यावेळचा विषय अशी ती स्पर्धा होती.त्यामुळे तर याचे विशेष कौतुक होते.ग्रुपवरील कौतुकानंतर त्यांनी आपल्या स्वमदत गटाविषयी भावना व्यक्त केल्या.त्या त्यांच्याच शब्दात देत आहे.

 "खरंतर हा ग्रुपच माझं शक्तिस्थान आहे या ग्रुपने माझं कौतुक करून माझं बल वाढवले. पूर्वी मी फारसा सक्रीय नव्हतो, नैराश्यात गेलो होतो. मी या ग्रुप मध्ये आलो तसे, सर्व मेंबर्स सभासद आणि कमिटी मेंबर्स यांनी माझे बोट धरलं आणि  मला बळ दिलं. प्रेरणा दिली ,माझ्या,छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करून माझा उत्साह वाढवला आणि नकळत या स्पर्धेच्या प्रवाहात सोडून दिले जिंकण्यासाठी, त्यामुळे थँक्स टू आपला सपोर्ट ग्रुप आणि सर्व पदाधिकाऱी  व सभासद बंधू भगिनी
 खूपदा, फसतोही.पदार्थ फसतो, स्पर्धेमध्ये हरतो, पण पुन्हा वर यायचं प्रयत्न करायचा आणि ठरवलेलं साध्य हे साधायचं भिंतीवरचा कोळी नाही का दहा वेळा खाली येतो, पुन्हा वर जातो तसं परिस्थितीतून वर खाली होत राहतो. कधी मानसिक अवस्था बिघडते कधी शरीर साथ देत नाही कधी माणसं साथ देत नाही या सगळ्यातून वर यायचं. सतत आनंदी राहायचं. यासाठी शुभेच्छा देणारी आणी,फोनवर सांगणारी आणि आपली जीवाभावाची अशी ही सर्व म्हणजे पार्किन्सन सपोर्ट ग्रुप. अर्थात मला ती माझ्या 
  माहेरची माणसं अशीच वाटतात. त्यांची सोबत फार मोलाची आहे तीच आपल्याला पुढे घेऊन जाते, हसवते, धीर देते, खूप काही देते जे शब्दात व्यक्त करता येत नाही, फक्त ऋणात राहू शकतो आपण सर्वांच्या.
 खरंच ही सगळी आपली माणसं आहेत ही रक्ताची नात्याची नाहीयेत  पण एका सहवेदनेने आपण एकत्र गुंफलो आहोत. एकमेकांना धीर देतो आनंद देतो कौतुक करतो, जसं काही आपण एका घरातली ,एका आईची लेकरं आहोत ,किती छान आहे ना हे सगळं? देवा हे सगळं असच राहू दे. उलट यात भर पडू दे."
 उमेश सलगर यांची ही भावना प्रतिनिधिक आहे.अनेक शुभंकर,शुभार्थीची पार्किन्सनमित्रमंडळाबद्दल हीच भावना असते.

No comments:

Post a Comment