Tuesday 18 October 2022

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७९

                                              पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७९

                     पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या Whats app Group ला आनंदाची पाठशाला असे नाव द्यावेसे मला हल्ली वाटायला लागले आहे.आपल्या कला सादर करणे त्यातून होणार्या कौतुकाने आनंदून जाणे, लक्षणांवर अनुभवातून शोधलेले नियंत्रणाचे छोटे छोटे उपाय सुचविणे,झुमवरील सभा झाल्यावर लागलीच सकारात्मक प्रतिसाद देऊन इतराना व्हिडीओ पाहण्यास प्रवृत्त करणे,आपल्या प्रेरणादायी कृती सांगून इतराना प्रेरणा देणे,कोणी मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्यास त्याना उभारी देणे.स्वत:च्या आनंदात इतरांना सामील करून घेणे इत्यादी गोष्टी रोज घडत असतात.

                  आजचीच गोष्ट.डॉ.अविनाश धर्माधिकारी यांनी व्हाईस मेसेज टाकला.सुनील कर्वे आणि ते व्हिडीओ कॉल वर एकत्रित व्यायाम करतात.त्यांना दोघानाही त्यातून समाधान मिळते.दोघेही शुभार्थी असल्याने शुभार्थीच्या मर्यादा त्याना माहिती आहेत.त्यानुसार व्यायाम बसवले आहेत.इतर कोणाला हवे असल्यास त्यात्या शुभार्थीच्या वेळेनुसार हे दोघेही शिकवायला तयार आहेत.मला हे फारच भावले स्वत:च्या आजारात न अडकता इतरांसाठी करण्याची भावनाच किती चांगली आहे.

                धर्माधिकारी नेहमी व्होईस मेसेज करतात.आवाज थोडा लो असायचा.माझ्या कानाच्या मर्यादा असल्याने आणि मी हेड फोन वापरत नसल्याने मला कानाकडे लाऊन ऐकावा लागायचा.आता मात्र त्यांचा आवाज मला सहज आणि स्पष्ट  ऐकू आला.मी तसे लिहील्यावर ते म्हणाले, 'रोज दोन वेळा बाराखडी मोठ्याने म्हणण्याचा परिणाम'.मला हे खूप छान वाटले.किरण सरदेशपांडे यांनीही एका मुलाखतीत आपला आवाज पूर्ण गेला होता.रामरक्षा,हनुमान चालीसा,अशी स्तोत्रे रोज मोठ्याने म्हणून फरक पडल्यचे सांगितले होते. मी अविनाश सराना लगेच फोन केला.

              नुकताच व्यायाम केलेला होता ते एकदम फ्रेश होते.एकट्यानी व्यायाम करण्यापेक्षा व्हिडिओवरुन का असेना एकत्र व्यायाम केल्याचा हा परिणाम होता.या त्यांच्या उपक्रमाला 'काया,वाचा, मने' असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.लक्षणे लगेच कमी होत नाहीत. आधी मन प्रसन्न होते.नंतर शरीरावर आणि वाचेवर परिणाम होतो.काही दिवसापूर्वी फोन केलेल्यावेळी त्यांचा थोडा निराशेचा स्वर होता.पण ते यातून स्वत:च मार्ग काढतील हे मला नक्की माहिती होते.आणि तसा त्यांनी काढलाही.

               पार्किन्सनवर जगभर भरपूर संशोधन होत आहे.ते होत राहील पण रोजच्या जगण्यातील गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्षणांवर नियत्रण आणण्यासाठी असे छोटे छोटे प्रयत्नही मोलाचे आहेत.मदत घ्या मदत करा ही मंडळाची मागणी 'अशी एकमेका सहाय्य करू' मधून सुपंथ धरण्यासाठी उपयोगी होत आहे याचा आनंद वाटतो.

                    

               

 

No comments:

Post a Comment