Sunday 19 December 2021

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७४

                                                 पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७४

                                      माझा फोन कधी संपतो याची वाट पाहत मीरा म्हणजे आमची स्वयंपाकाची बाई  उभी होती.काय करायचे हे तिला विचारायचे होते.मी तावातावाने समोरच्या व्यक्तीशी बोलत असलेली पाहून ती गोंधळलेली होती तिला माझा हा अवतार नवीनच होता.ती मला हाताने शांत व्हा अशा खुणा करत होती.माझा राग काही कमी होत नव्हता.असमंजसपाणे वागून त्या बहिणी आपल्या आईचे नुकसान करत आहेत हे मला दिसत होते.खरे तर असे रागावण्याचा मला अधिकार नव्हता.पण समोरची व्यक्ती मी परोपरीने सांगूनही ऐकत नव्हती आणि माझा तोल गेला.

                                समोरची व्यक्ती म्हणजे त्या चौघीतील एक.ती वारंवार आमहा चौघी बहिणींच्या कडे गाडी आहे आम्ही सांगाल तो खर्च करू अशा  पैशाने आईचा आजार बरा करण्याच्या गोष्टी करत होती.शुभार्थीचे दुखणे मानसिक जास्त आहे हे मला लक्षात आले होते.मी व्यायामाबद्दल,आहाराबद्दल,तिच मन रमविण्यासाठी काय करता येईल हे सांगायचा प्रयत्न करत होते.पण हे सर्व ऐकण्यात तिला काही स्वारस्य नव्हते.मी यापूर्वी आमचे युट्युब चानल,वेबसाईट, तिच्या आईशी मिळत्याजुळत्या शुभार्थींचे सकारात्मक व्हिडीओ,तिच्या आईची मानसिक समस्या असल्याने माझा फ्लॉवररेमेडीच्या व्याख्यानाचा व्हिडिओ असे सर्व पाठवले होते. Whats app group वर यायला सुचविले होते पण यातले त्यांना काहीच करायचे नव्हते.एरवी कोणत्याही व्यक्तीला हे सर्व पाहून ऐकून Relax वाटते.येथे मात्र दगडावर डोके आपटल्यासारखे होते.त्या आईची तब्येत जास्तच बिघडत होती.तिला नैराश्याने घेरले होते.आणि आहे ते असेच चालू राहिले तर काही फरक झालाही नसता.आत्ता बोलणारी बहिण थोडी ऐकून घेईल म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला होता.पहिल्या बहिणीप्रमाणे येथेही तो वाया गेला होता.तिच्या आईचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि माझी चिडचिड झाली होती.आई आधीपासून अशीच आहे का असे विचारताच ती म्हणाली, 'नाही.नात्यातील काही कार्य असले की पुढे असायची.सर्वाना तिची गरज लागायची'. मी तिला म्हटले 'याचा अर्थ आजाराने तिची अशी अवस्था झाली आहे हे समजायला हवे ना तुम्हाला?'' मी तिला बरेच काही सुनावात होते. मीराच्या येण्याने मला फोन ठेवावा लागला.

                                      त्या चौघी बहिणी.वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या.एक शहरात राहणारी,बाकीच्या छोट्या गावात राहणाऱ्या.आई पार्किन्सन पेशंट. आईवडील तालुक्याच्या गावात राहत होते. वडील चांगली काळजी घेत होते दोघांचे छान चालले होते.दुर्दैवाने वडिलांचा करोनाने मृत्यू झाला.आता आईचे काय करायचे? चौघींनी प्रत्येकीकडे तीन, तीन महिने ठेऊन घ्यायचे ठरवले.

                                     एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना माझे नाव सुचविले. त्यांना माझा फोन नंबर दिला.. फोनवर प्रथम बोलणे झाले तेंव्हा आईबद्दल तक्रारीच जास्त होत्या.ती अजिबात हालचाल करत नाही.हट्टीपणा करते.आपल्या घरी जायचे म्हणते.जेवायला खायला लगेच उठते.पण कधी कधी हट्टाने पाउलही टाकत नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या.तिला ऑन ऑफ ची समस्या असणार हे माझ्या लक्षात येत होते .गोळीचा असर संपला की अजिबात हालचाल करता येत नाही आणि गोळी घेतली तीचा असर सुरु झाला की हालचाल अगदी सहज होते.मी हे सांगू पाहत होते पण त्याना ते ऐकण्यात रस नव्हता.

                                    तुम्ही आईलाच सांगा काहीतरी म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल लावला.त्यांच्याशी मी बोलायला पाहिले.त्यांचे बोलणे मला समजेना मग मीच् त्याना काहीबाही सांगत राहिले.त्या रडायलाच  लागल्या.जावयांनी फोन घेतला.त्यांच्यासमोरच त्यांच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली.त्यातही त्यांचे खाणे यावर जोर होता.नैराश्याने बऱ्याच वेळा सारखे खाखा होते.तसे त्यांच्याबद्दल झाले असावे.एकूण त्यांच्यासमोर जे बोलले जात होते त्यावरून त्याना आपल्या घरी जावे असे का वाटते हे लक्षात येत होते..न्यूरॉलॉजिस्टना दाखवून त्यांच्या सल्ल्याने मनोविकारतज्ज्ञ गाठणे आवश्यक होते..न्यूरॉलॉजिस्टना दाखवून बराच काळ लोटला होता.करोनामुळे त्यांच्या नेहमीच्या.न्यूरॉलॉजिस्टकडे नेणे अशक्य होते त्या आत्ता जेथे राहत होत्या तिथल्या .न्यूरॉलॉजिस्टची  नावे मी सुचविली.किंवा ऑनलाईन त्यांच्या .न्यूरॉलॉजिस्टना दाखवावे असे सुचविले.ते त्याच त्याच गोळ्या देतात अशी तक्रार ऐकून तर मी कपाळाला हात लावला.पण तरी याना आजाराबद्दल निट समजले नसेल असा विचार करून मी इमाने इतबारे आजाराबद्दल सांगायला सुरुवात केली.अगदी सोपे करून सर्व सांगितल्यावरही 'रामाची सीता कोण' अशी परिस्थिती पाहून मीच हतबल झाले.

                               आत्ता फोनवर माझी चिडचिड होण्यात हा पहिला अनुभव होताच.एकूण सर्व परिस्थिती पाहता कोणत्याही बहिणीकडे तिची निट देखभाल होत् नव्हती. होणारही नव्हती..सारखे सारखे ठिकाण बदलल्यानेही शुभार्थीला जुळवून घेणे कठीण होत असावे.मी त्याना खास पार्किन्सन्स आणि अल्झायमर च्या पेशंटसाठी  असलेले 'तपस' या संस्थेचे नाव सुचविले.तेथे तिला बरोबरीची माणसे भेटली असती योग्य उपचार झाले असते.तिथल्या उपक्रमात मन रमले असते.पण चौघींचे यावर एकमत होणे आवश्यक होते.ते होत नव्हते.. लोक काय म्हणतील नातेवायिक काय म्हणतील हा मोठ्ठा प्रश्न होता.

                             आत्तपर्यंत मी इतक्या शुभंकर, शुभार्थीशी बोलले आहे.तुमच्याशी बोलून खूप छान वाटले अशा तऱ्हेची प्रतिक्रिया असते.हतबलतेचा अनुभव मी प्रथमच घेत होते..शुभार्थीचा रडणारा चेहरा डोळ्यासमोर येत होता.तिच्यासाठी मी काहीच करू शकले नव्हते..सर्वांचे सर्व प्रश्न मी सोडवू शकत नाही हे  स्वीकारणे गरजेचे होते.

'मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.' हेच फक्त मी म्हणू शकत होते.




                                                                           

No comments:

Post a Comment