Saturday 4 September 2021

क्षण भारावलेले १८

                                            क्षण भारावलेले १८

                            नुकतीच राखी पौर्णिमा होऊन गेली,whats app,फेसबुक, सर्वकडे भरभरून पोस्ट येत होत्या.त्यात एक पोस्ट मनाला भिडली.आमचे शुभार्थी मनोहर लिमये यांनी राखीचे दोन सुंदर कोलाज केलेले होते.इतके नाजूक काम पार्किन्सन्स शुभार्थी ( पेशंट )करू शकतो यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.या क्रिएटीव्हिटीला तोडच नाही.यापूर्वी ११ एप्रिलच्या पार्किन्सन्सदिन सोहळ्याच्या कार्यक्रमच्या वेळी शुभार्थींचे कलाप्रदर्शन भरवले होते.त्यातही त्यांनी सुंदर कोलाज पाठविले होते.मास्कबाबतचा संदेश त्यातून पोचवला होता.

                          या वेळच्या कोलाजपैकी  एका कोलाज वर प्रेरणा, सौ मंदाताई आणि एकावर प्रेरणा सौ.सुनंदाताई असे लिहिले होते.दोन्हीवर मजेत गेलेला वेळ सहा तास,खर्च रुपये शून्य,मूल्य अमुल्य असे लिहीले होते.खाली म.भा,लिमये अशी सही ही केली होती.मला हे सर्वच भारी वाटले.मी कुतूहल वाटून मनीषा ताई लिमयेना फोन केला.मंदाताई आणि सुनंदाताई या मनोहर लिमये यांच्या मोठ्या बहिणी असे समजले.

                       मनोहरराव स्वत: ८१ वर्षाचे आहेत आणि बहिणी त्यांच्यापेक्षा मोठ्या.एक बहिण घरी येऊन राखी बांधून गेली होती.तिला कोलाज प्रत्यक्ष देता आले होते.दुसऱ्या बहिणीचे खुब्याचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया झाली होती.ती येऊ शकत नव्हती.मनोहर रावांची परिस्थिती पर्किन्सन्समुले मनात आले आणि  आणि गेले अशी नव्हती.करोनामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळणे गरजेचे होते.पुण्यातल्या पुण्यात असून भेट न झाल्याने दोन्ही भावंडे तळमळत होती.शेवटी घरच्यांनी त्यांची भेट घडवून आणायचे ठरवले.मनोहर रावांसाठी केअरटेकर आहे परंतु पहिल्या मजल्यावरून खाली आणायचे जोखमीचे होते.मग दोन मुली,एक जावई असा लवाजमा दिमतीला आला सर्व जण बहिणीकडे आले.इतका आटापिटा करून भाऊ आलेला पाहून बहिण भारावून गेली.त्यांनी सहा तास खपून आणलेली भेट पाहून तर बहिणीबरोबर बहिणीचे  पतीही भारावून गेले.त्याची फ्रेम करून ते आता लावणार आहेत. बहिण, भावाच्या प्रेमाची खूण असेल ती.राखी पोर्णिमेदिवशी रेडिओवर 'द्रोपादिशी बंधू शोभे नारायण'' हे गाणे लागले होते Whats app वर ही आले होते. त्यातील 'प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण' ही ओळ मला फिरून फिरून आठवत होती.भावाची ही भेट बहिणीला शस्त्रक्रियेतून रिकव्हर व्हायला औषधाइतकिच कदाचित जास्तच उपयोगी पडणार हे नक्की. 

                                 आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत लिमये मध्यंतरी वारली पेंटिंग शिकले. दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून बहिणींना आता  वारली पेंटिंग भेट हवे आहे.मनीषाताईंच्या बहिणीला आणि जाऊबाईनाही वारली पेंटिंग हवे आहे.हे भावनिक आव्हान स्वीकारून लिमये त्या तयारीला लागलेही.सगळ्या नातेवायीकांनी मिळून त्याना पार्किन्सन्स विसरायच्या उद्योगाला लावले आहे.

                               घरचा शुभंकर मानिषाताई तर उत्साहाचा झरा आहेत,मला मनीषा ताईंशी वेगवेगळ्या संबंधात बोलताना त्यांच्या सासर माहेरची नातेसंबंधाची वीण घट्ट असलेली जाणवली.त्यांचे एक भाऊ विश्वनाथ भिडे यानाही पार्किन्सन्स असल्याने ते आमच्या ग्रुप मध्ये आहेत.त्या सांगत होत्या त्यांचा डीपी पाहिलात का? तो पाहीला तर ते ट्रेक करतानाचा होता तों आत्ता आत्ता पर्यंत ट्रेक करत होता असे त्या कौतुकाने सांगत होत्या.जेंव्हा आम्ही मनीषा ताईंचे व्याख्यान ठरवले तेंव्हाहा भाऊ अनेकांना कौतुकाने व्याख्यानाची लिंक पाठवत होता.नियमाने वागणाऱ्या मनीषा ताईंचा ग्रुपशिवाय इतरांना लिंक पाठवली तर चालेल ना असा फोन आला.अर्थात मी चालेल असे सांगितले.

                          त्यांच्यातील प्रयोगशील शिक्षिका शुभंकर म्हणूनही सतर्क असते. अनेक कल्पक पर्याय शोधत असते.'PDMDS' च्या एका ऑनलाइन सभेत मनीषाताईंनी सांगितलेला प्रकल्पही असाच मनाला भिडणारा होता.त्यांची नववीत असलेली नात मराठी, हिंदी, इंग्लिश अशा कोणत्याही भाषेत काहीतरी वाचून दाखवायची तेही फोनेवरून.आजोबा त्यातले शब्द आठवून सांगायचे.आज्जी ते लिहून काढायची महिनाभर हा प्रयोग चालला.गावाला गेली तरी नातीनी प्रयोगात खंड पडू दिला नाही.पहिल्या दिवशी चार शब्द आठवले. महिन्यानंतर १९ शब्दापर्यंत मजल गेली.मला या प्रयोगाचे खूप अप्रूप वाटले.विशेषत:टीनेजर नात आज्जी आजोबांच्या प्रयोगात सामील झाली याचे कौतुक वाटले.

                         मनोहर रावांसाठी पत्नी मनीषाताई खंबीरपणे उभ्या आहेतच शिवाय नातेवायीकांची अख्खी टीमही जोडलेली आहे.वर्षानुवर्षाच्या परस्पर सलोख्याच्या संबंधातून हे घडलेले असते.वरवर पाहता या छोट्या गोष्टी वाटतात पण पार्किन्सन्ससारख्या रोज नवनवीन समस्या निर्माण करणाऱ्या आजारात आपण इतरांना हवे आहोत हा विश्वास देतात,कृतीशील राहायला,पार्किन्सन्स विसरून आनंदाने जगण्यास बळ देतात.म्हणूनच  मला ही माणसातली इन्व्हेस्टमेंट फार फार मोलाची वाटते.

May be an illustration of 2 people and flower

               May be an illustration of 2 people and flower      

May be an image of 1 person

No comments:

Post a Comment