Thursday 29 July 2021

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७२

                                               पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७२


                               ' भेटू आनंदे' मध्ये शुभार्थी ( पार्किन्सन्स पेशंट ) वनिताताई सोमण आपले अनुभव सांगत होत्या.त्या स्कूटरवर १२/१३ किलोमीटर पर्यंत जातात असे म्हणाल्या .'पार्किन्सन्स आणि ड्रायव्हिंग' असा बरेच दिवस मनात घोळत असलेला विषय उसळी मारून वर आला.

                              सुरुवातीला कोणत्याही न्यूरॉलॉजिस्टचे व्याख्यान असले की मी पार्किन्सन्स झालेल्या पेशंटने  ड्रायव्हिंग करायचे का  हा प्रश्न विचारायची.अविनाश पानसे आणि तीर्थळी एकमेकांकडे पाहून हसायचे. मला उत्तर माहित असले तरी होर्सेस माउथ मधून नको असे उत्तर यावे ही इच्छा असायची.कारण हे दोघे फोर व्हीलर चालवणे बंद करत नव्हते.खरे तर हो आणि नाही असे एका शब्दात उत्तर असू शकत नाही हे मलाही समजत होते.पार्किन्सन्सच्या सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे वाढलेली नसतात तेंव्हा गाडी चालवणे शक्य असते. श्रद्धा भावे,रमेश घुमटकर,प्रभाकर लोहार हे शुभार्थी अनेक दिवस खूप लांबून सभेला स्कूटर,मोटार सायकलवर येत.उमेश सलगर ऑफिसला स्कूटरवर जात.औंधवरून मार्केट यार्डला आमच्या घरीही ते स्कूटरवर आले होते.ते घरी पोचे पर्यंत मलाच काळजी वाटत होती.अविनाश पानसे,मिलिंद तेलंग, तीर्थळी फोरव्हिलर घेऊन सभेला येत.पण वेळीच आपण ड्रायव्हिंग थांबवायला हवे हे समजायला हवे.आपल्या चालवण्यात फरक पडलाय हे चालवणाऱ्याला समजत नाही पण बरोबर असणार्यांना समजते.

तीर्थळीना पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.   पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम सुरु केल्यावर हडपसर,कात्रज,औंध,कोथरूड अशा पुण्याच्या कानाकोपर्यातील कित्येक घरभेटी आम्ही झेनने केल्या..पेशंट असून गाडी चालवत येतात याचे इतरांना कौतुक वाटे.पीडी आटोक्यात होता तोवर हे ठीक होते. डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.पीडी असणाऱ्यांना किती कठीण याची कल्पना करु शकतो. मोटर डिसऑर्डचा हा आजार असल्यामुळे हालचालीवर नियंत्रण कठीण जाते. त्यात हात,पाय अशा शरीराच्या विविध भागावर कंप असतो.स्नायू ताठर झालेले असतात.काहींचे Cognition कमी झालेले असते एकावेळी अनेक पातळ्यांवर निर्णय घेण्याची गाडी चालवताना गरज असते.ते योग्य प्रकारे होऊ शकत नाही.प्रतिक्षिप्त क्रिया असतात तेंव्हा इतका प्रॉब्लेम येत नाही. पण विचार प्रक्रिया सुरु झाली की कंप वाढतो. गाडी सरळ रस्त्यावर चालवताना प्रॉब्लेम यायचा नाही.पण रिव्हर्स घेणे,यु टर्न घेणे, ट्राफिक जाम झाला की त्यातून गाडी बाहेर काढणे कठीण व्हायचे,आजूबाजूच्या लोकांचे हॉर्न वाजणे सुरु झाले की कंप वाढायचा.आजूबाजूचे लोक अशावेळी वाट्टेल ते बोलतात ते ऐकताना मला त्रास व्हायचा,यांच्या रागाचाही पारा चढायचा.पेट्रोल पंपावरचा माणूस दरवेळी म्हणायचा आजोबा आता गाडी चालवणे बंद करा.रस्त्यावरच्या इतर लोकांचे आडाखे  आणि पीडीमुळे यांच्या मेंदूने निर्णयास घेतलेला वेळ यात फरक पडत होता.छोटे मोठे अपघात होत होते,नशीबाने आम्हाला आणि इतर कोणाला कधी दुखापत झाली नाही. पण गाडी दुरुस्ती साठी १० /१२ हजार तरी खर्च यायचा.गराजवालेही आता गाडी चालवणे बंद करा म्हणायचे. यांना एकट्याला मी कुठे जाऊ देत नव्हते याचाही त्यांना राग यायचा.मी यांच्या बरोबर जीव मुठीत घेऊन गाडीत बसायची,अश्विनी मधली पार्किन्सन्सची सभा संपवून आले की पोचलात ना व्यवस्थित असे सहकाऱ्यांचे फोन यायचे.कुठे जायचे तर एखादा ड्रायव्हर बोलऊ असे सुचवून पहिले पण त्यांना ते मान्य नव्हते.आणि हवा तेंव्हा असा ड्रायव्हर मिळणे कठीणही होते.गाडीवरून आमची सारखी भांडणे होऊ लागली.गाडी विकणे हा पर्याय होता.गाडीवर येणाऱ्या खर्चापेक्षा भाड्याचे वाहन वापरणे कसे स्वस्त पडेल हा गणिती हिशोबही करून झाला.शेवटी आमच्या ग्रुपमधील बुजुर्ग शुभार्थी, शेंडे साहेब यांना मी सांगितले ह्यांना जरा समजावा.शेंडे साहेबांनीही गाडी चालवणे योग्यवेळी थांबवले होते.कशाचाच उपयोग होत नव्हता.
शेवटी यांनाच उपरती झाली.ब्रेक पटकन दाबला जात नाही असे लक्षात आले.आपल्या गाडीखाली कोणी गेले तर काय असा विचार आला आणि आता गाडी विकूया असे त्यांनी जाहीर केले.जेथे गाडी दुरुस्तीला देत होतो त्यांनीच गिऱ्हाईक आणले.
                   मला हुश्य झाले.रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या वेळी गाडी विकली ते किती बरे झाले असे अजूनही वाटते.

एकुणात टू व्हीलर असो की फोर व्हीलर  गाडी चालवणे योग्यवेळी थांबवणे महत्वाचे.

ड्रायव्हिंग आणि पार्किन्सन्स डिसीज या तज्ज्ञांनी लिहिलेल्या लेखाची लिंक सोबत दिली आहे.ड्राईव्ह करणाऱ्या शुभार्थिनी ती अवश्य पहावी.त्यातील प्रश्नावली स्वत:शी पडताळून पहावी आणि स्वत:च ठरवावे. ड्रायव्हिंग थांबवायची आपली वेळ आली आहे का?

 

May be an image of 1 person, sitting, scooter and outdoors

No comments:

Post a Comment