Monday 22 April 2019

पार्किन्सनन्स विषयक गप्पा - ३८

                                          पार्किन्सनन्स विषयक गप्पा - ३८
                           आमच्या पार्किन्सन्स मित्राला मिरवायची,आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायची हौस भारी.त्याच असं झालं आज आम्ही उन आणि गर्दी टाळण्यासाठी मतदान करायला सकाळी सात वाजताच बाहेर पडलो.बऱ्याच जणांनी आमच्या सारखाच विचार केला असावा.आमच्या पुढे रांगेत १०/१५ तरी लोक होते.पण त्या सर्वांनी ह्यांच्याकडे पाहून आम्हला एकमतानी आधी जाऊ दिले.तिथल्या अधिकारी,कर्मचारी सर्वांनीच याना अदबीने वागवले.आमच्या मित्राची कृपा दुसरे काय? पूर्वी याना असे कोणी फेवर केलेले आवडायचे नाही.पण आता पार्किन्सन्सला मित्र म्हणून स्वीकारल्यापासून  ते सहजपणे अशा बाबी स्वीकारतात.मतदान करून बाहेर आलो तर.कोणत्या तरी channel ची मंडळी आमच्याकडे आली.तुम्ही एवढे आजारी असून मतदानाला आलात याबद्दल काय सांगायचे आहे? मतदानाला बाहेर न पडणार्यांना,सहलीला जाणार्यांना तुम्ही काय सांगाल इत्यादी प्रश्न विचारले गेले.ह्यांचे बोलणे समजत नाही असे पाहिल्यावर माझ्याकडे मोर्चा वळला.त्यावेळी जे सुचेल ते मी बोलले पण नंतर वाटले मी सांगायला पाहिजे होते ते आजारी नाहीत.ती मुलाखत दिसली तर त्यांचे डोळे,मी आजारी नाही हे बोलत होते हे जाणकारांना समजेलच.असो.
                        आमच्या दृष्टीने मतदानाला जाऊन आम्ही फार काही जगावेगळे  केले नव्हते. हे सर्व करणे ह्यांच्यासाठी सहज शक्य होते.फारसा आटापिटा करावा लागला नाही.इतरांना मात्र ह्यांच्याकडे पाहून तसे वाटत होते.
                      आमचे  सर्व शुभंकर, ( केअर टेकर )  शुभार्थी ( पेशंट )मतदान करायला नक्की जाणार याची खात्री आहे.इतरही सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.

No comments:

Post a Comment