Saturday 16 March 2019

हास्यक्लब एक वरदान

                                               हास्यक्लब एक वरदान  
                                                                           गोपाळ तीर्थळी

                             जून १९९९ मध्ये आमच्याकडे पार्किन्सन्स पाहुणा म्हणून आला आणि इतक्या वर्षात तो घरचाच बनला आहे. त्याच्याबरोबर हसत खेळत गुण्या - गोविंदाने आम्ही राहत आहोत.
                             जून १९९९ पासून २००४ पर्यंत वेगवेगळे उपचार केल्यावर औषधोपचाराबरोबर सर्वसाधारण आरोग्य आणि शारीरिक, मानसिक क्षमता चांगली ठेवणे गरजेचे आहे असे मला लक्षात आले.यासाठी योग, प्राणायाम,मेडीटेशन,व्यायाम गरजेचे आहे आणि हास्यक्लबमध्ये ऑल इन वन असे मला सापडले.पार्किन्सन्स मित्रमंडळात फिजिओथेरपिस्ट,व्यायाम,प्राणायाम,मेडीटेशन यावर प्रात्यक्षिकांसह  व्याख्याने  होतात.प्रत्येकवेळी मला वाटते,  'अरे हे तर आम्ही हास्यक्लबमध्ये करतो.'

 पार्कीन्संन्स  होतो म्हणजे नेमके काय होते?
             
मध्यमेंदूमध्ये Substantia nigra या भागात डोपामिन  नावाचे रसायन तयार होत असते शरीराची हालचाल व तोल सांभाळण्याचे कार्य ते करीत असते.पार्किन्सन्स रुग्णात डोपामिन तयार करणार्‍या पेशी हळूहळू कमी होऊ लागतात. त्यामुळे  शरीराच्या हालचाली मंदावतात.कंप,ताठरता,मंद हालचाली या प्राथमिक लक्षणाबरोबर इतर अनेक दुय्यम लक्षणे दिसू लागतात.या पेशींचे कमी होण्याचे प्रमाण वाढले की लक्षणेही  वाढतात.हा आजार बरा न होणारा आणि वाढणारा
असला तरी औषधोपचार आणि इतर विविध मार्गानी लक्षणावर मात करता येते.जीवनाची गुणवत्ता वाढवता येते.व्यायाम हा त्यासाठी अत्यावश्यक असतो.हास्यक्लबने माझी ती गरज भागवली.
                       श्री विठ्ठल काटे आणि सुमनताई काटे यांनी पुण्यात १९९९ साली या चळवळीस सुरुवात केली. आज पुण्यातल्या विविध भागात नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या २१८ शाखा आहेत.१५००० हून अधिक लोक याचा फायदा घेत आहेत.मध्यंतरी आमच्या भिमाले उद्यान शाखेत या उपक्रमाचे व्हिडीओ शुटींग झाले.त्यात  पार्किन्सन्ससाठी मला हास्यक्लबचा फायदा कसा झाला याबाबत अनुभव सांगण्याची संधी मिळाली.
                     भिमाले उद्यान येथे आमचा क्लब सकाळी ६.३० ला सुरु होतो.७.४५ पर्यंत  वार्म अपचे व्यायाम, शरीराच्या प्रत्येक अवयवाला हालचाली,प्राणायाम,मेडीटेशन असे चालते.नंतर हास्याचे प्रकार असतात.मध्ये थोडावेळ मध्यंतर असते आणि त्यावेळी एकमेकांचे अनुभव,विचार, माहिती शेअर केली जाते..
                      या सर्वांतून पार्किन्सन्समुळे ताठर झालेल्या स्नायुंना हालचाली हव्या असतात त्या होतात,सकाळी सकाळी भरपूर शुद्ध हवा,डी व्हिटामिन आणि सकारात्मक उर्जा  मिळते.१२ वर्षे रोज भेटत असल्याने आमचे आता एक कुटुंब  झाले आहे.सर्व एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात.एवढे मोठ्ठे कुटुंब पाठीशी असल्याने मी पार्किन्सन्स शुभार्थीना सतावणाऱ्या नैराश्यापासून  दूर आहे.
                      पुण्यात राहून कामात व्यग्र असल्याने पुण्याजवळील काही प्रेक्षणीय ठिकाणे पाहिली नव्हती.रोज कामासाठी सासवडला जायचो पण जेजुरी पाहिली नव्हती.पण हास्यक्लबच्या सहली निघतात तेंव्हा अनेक ठिकाणे पाहिली.मी जेजुरी, पुरंदर चढल्यावर पार्किन्सन्स पेशंट चढतो तर आपण का नाही अशी प्रेरणा इतरांना मिळाली.
                  करोना काळात हास्यक्लब बंद झाले.लगेच काटे दाम्पत्यानी ऑनलाईन हास्यक्लब सुरु केला.आम्ही तो जॉईन केला.भारतभरातले आणि परदेशातील लोकही सहभागी झाले.रोज वाढदिवस साजरे होऊ लागले,दर गुरुवारी मकरंद टिल्लू यांची टिल्लू गोष्ट,महिन्यातून एकदा तज्ज्ञांचे व्याख्यान असे सुरु झाले.बाहेर न जाताही जग घरात आले.                
                 पार्किन्सन्स बरोबर आनंदी राहण्यात हास्यक्लबचा मोठ्ठा सहभाग आहे.मी पार्किन्सन्स असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांनाही आपल्या जवळच्या बागेतील हास्यक्लबमध्ये किंवा ऑनलाईन हास्यक्लबमध्ये सहभागी व्हा आणि आनंदी रहा  अशी विनंती करतो.
                     

No comments:

Post a Comment