Monday 3 December 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा -३०


                       पार्किन्सन्सविषयी गप्पा -३०
                 दर शनिवारी आम्ही आमच्या घरामागेच असलेल्या छोट्या गल्लीत मारुती मंदिरात जातो.सोसायटीचे छोटे मंदिर आहे.बाकावर जेष्ठ नागरिक बसलेले असतात.छोटी मुले खेळत असतात. कधी अभ्यास करत असतात.त्यादिवशी ह्यांना पाहून छोटी मुले आपापसात कुजबुजून हसू लागली.एक मुलगा हाता हलवून नक्कल करत होता तर एक छोटी मुलगी त्यांना दटावत होती.ह्यानी याची आता सवय असल्याने त्यांना त्याचे काहीच वाटले नाही.पण सर्वच पार्किन्सन्स शुभार्थीबद्दल असे होईल असे नाही.माझ्यातला शिक्षक अशा वेळी जागा होतो.मी थांबून त्या मुलाना म्हणाले, असे का होते तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही हसला.आधी मुले मी बोलायला लागल्यावर कावरीबावरी झाली.मी त्यांना म्हटले,मी तुम्हाला रागावत नाही.घाबरू नका.मग त्यांना समजेल अशा भाषेत मेंदूतील डोपामिन कमी झाले की कसा हालचालीवर परिणाम होतो हे सांगितले.मुले ऐकत आहेत म्हटल्यावर इतरही हिताच्या गोष्टी सांगून झाल्या.दुसऱ्या दिवशी त्यातला एक मुलगा आई बरोबर चालला होता.आमच्याकडे पाहून गोड हसला आणि बाय केले.मुलांना निट समजावून सांगितले तर मुले ऐकतात असा माझा अनुभव आहे.शुभार्थीच्या घरी मुले नातवंडे असतात त्याना आजाराबद्द्ल समजावून सांगितले तर त्यांच्या शुभार्थीशी वागण्यात फरक पडतो.शुभार्थीच्या आनंदी राहण्यात आणि पीडीला स्वीकारण्यात कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याचा आणि त्यांच्याबरोबर सौहार्दाने वागण्याचा खूप वाटा असतो.
       माझ्या नातवाबाबत असेच घडले.पीडीमुळे हालचाली मंद होतात.एकदा लिफ्ट उघडून नातू तयार होता आणि ह्यांना चप्पल घालून लिफ्टपर्यंत यायला वेळ लागत होता. तो ओरडून चिडलेल्या आवाजात म्हणाला,' अब्बू लवकर लवकर या ना'.मी ते हळू का येतात हे त्याला समजावून सांगितले.नंतर मी फोनवर शुभार्थीशी बोलायची तेही तो ऐकायचा जेंव्हा तो आमच्याकडे होता तेंव्हा आम्हाला त्याला सभेलाही घेऊन जावे लागायचे.आता त्याला पीडीबद्दल बरीच माहिती आहे तो ह्यांचे निरिक्षण करून मलाच काहीकाही सांगत असतो.मुलांचे आणखी काही अनुभव पुढील गप्पात.
             

No comments:

Post a Comment