Friday 21 September 2018

पार्किन्सन्स विषयक गप्पा - २६

                   गप्पांच्या ओघात शुभंकर शुभार्थी नात्यातले विविध  पदर,कंगोरे  मला नव्यानेच उलगडत आहेत.यासठी कितीतरी गप्पांचे भाग होतील. आज मात्र मी माझा एक अनुभव येथे शेअर करणार आहे.
                 सततच्या पावसाने बागेत निसरड झाली होती.माझ्या नवऱ्याचा रोज सकाळी देवपूजेसाठी फुले काढण्याचा कार्यक्रम असतो.ते पडतील या भीतीने मी ते बाहेर जाण्यापूर्वीच फुले काढून ठेवली.पण त्याना ते काही फारसे पटले  नाही.ते फुलाची परडी आणि छोटी कात्री घेऊन फुले काढायला निघाले.माझ्या मनात ते पडतील या भीतीने घर केले होते.मीही त्यांच्या मागून बागेत फेरी मारतीय असे दाखवत बाहेर पडले.आज मी प्रथमच ते फुले किती रंगून जाऊन काढतात हे पाहत होते.त्यांनी प्रथम एक्झोरा च्या झाडावरचे एक फुल निवडले.फांदी वाकवून हळुवारपणे दोन,तीन पानासकट गुछ्य काढला.नंतर स्पायडर लिली कडे त्यांचा मोर्चा वळला.एकसारख्या आकाराची दोन फुले काढली.दोन्हीचे देठ एकाच आकाराचे होते.काही लिलीच्या  फुलांचा देठ अगदीच लहान ठेवला होता.हे करताना त्यांच्या ओठाचा चंबू होता होता,डोळे लकाकत होते.मग तगर,जास्वंदी अशा फुलांनी परडी गच्च भरली.मी त्यांच्या मागे आहे त्यांच्याशी काहीबाही बोलते आहे याची त्यांना जराही जाणीव नव्हती.ते त्यांच्याच नादात होते. ना हाताला कंप होता ना पाय डगमगत होते.त्यांचे फुले काढणे पाहून मला वाटले.मी फुले ओरबाडली होती. एक काम म्हणून केले होते. त्यांच्यासाठी मात्र ती कलाकृती होती.
                त्यांची पूजा ही अशाच तल्लीनतेत झाली.मला लक्षात आले फुले काढताना त्यांच्या समोर देव्हारा असतो.मूर्ती असतात. कोणती फुले कोठे घालायची कशी रचना करायची याचा आराखडा असतो.एकसारख्या लांब देठाची फुले त्यांनी महालासेच्या फोटोच्या दोन्ही बाजूला लावली होती.रुंद फ्रेम असलेल्या फोटोवर एक्झोरा ठेवला होता.मला जागतिक पार्किन्सन्स दिनाच्यावेळचे डॉक्टर उल्हास लुकतुके यांचे भाषण आठवले.
                .ईशस्तवन,नृत्य, कलाकृती या सर्वांनी डॉक्टर भारावून गेले होते.सर्वांचा आधार घेत  त्यामागचे विज्ञान त्यांनी समजावून सांगितले."नृत्य करणाऱ्या  शुभार्थींची नृत्य करताना पार्किन्सन्सची लक्षणे थांबलेली सर्वांनी पाहिली..तादात्म्य,सापडलेली लय यामुळे ती थांबली .जेंव्हा लय बिघडते तेंव्हा रोग होतो.कलाकृतीतही क्विलिंग हे अत्यंत नाजूक काम Movement  Disorder  असणारी व्यक्ती  करु शकते कारण ते काम करताना त्यांचे मन रमते,छान वाटते.या छान वाटण्यात लय असते.मी माझा स्वामी हा भाव असतो.अशी लय सापडणे महत्वाचे.ती मनाची असते तशी शारीरिक वर्तनाची असते."
                मला लक्षात आले ह्यानाही फुले काढताना,पूजा करताना ही लय सापडलेली असते.यापुढे हे त्यांचे काम मी करून त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा नाही असे ठरवले.    
            

No comments:

Post a Comment