Thursday 3 May 2018

पार्किन्सन्सविषयी गप्पा - १४

                                                पार्किन्सन्सविषयी गप्पा - १४   

  माझ्या मैत्रिणीकडे मला एक भूल तज्ज्ञ भेटल्या.मैत्रिणीने आम्ही पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम करतो असे सांगितल्यावर म्हणल्या,'मला आवडेल तुमच्याबरोबर काम करायला.माझे कामाचे स्वरूप पाहता मी दिवसभर बिझी असते पण तरीही जसा वेळ मिळेल तसे माझ्याजोगे काम आहे ते करीन.' बोलता बोलता त्यांच्या आईला  पार्किन्सन्स होता असे समजले.त्या म्हणाल्या'.'माझ्या आईला नैराश्यानी पार्किन्सन्सची सुरुवात झाली. बरेच दिवस तिला नैराश्य होते. मानसोपचार तज्ज्ञांना दाखवले.औषधोपचार सुरु होते.एक दिवस माझा डॉक्टर मित्र घरी आला होता.तो म्हणाला अग तिचे चालणे,चेहरा  पाहिलास, का? मला वाटते तिला पार्किन्सनन्स आहे.न्यूरॉलॉजिस्टकडे ने.त्यांनी म्हटल्यावर मलाही जाणवले, अरे खरेच की,माझ्या कसे लक्षात आले. नाही'. ज्यांच्या घरी डॉक्टर आहे तेथेही हे घडू शकते.ज्यांनी पार्किन्सन्स हा शब्दही ऐकला नाही अशा व्यक्तींना नैराश्य आल्यावर न्यूरॉलॉजिस्टना दाखवावे हे लक्षात येणे शक्यच नाही.यापूर्वी काही व्यक्तींची पार्किन्सन्सची सुरुवातच नैराश्याने होते असे ऐकले होते.येथे प्रत्यक्ष उदाहरण दिसत होते.मी सहज त्यांना आईचे नाव विचारले.त्यांनी नाव सांगताच माझ्या लक्षात आले. हे नाव आमच्या यादीत होते.रामचंद्र करमरकर त्यांच्याकडे घरभेटीसाठी जाऊन आले होते.त्यांची अवस्था सभेला येण्यासारखी नव्हती.त्यांचे वयही जास्त झाले होते.पण त्या म्हणाल्या होत्या मला फोन केलेला किंवा कोणी भेटायला आलेले आवडेल.त्यामुळे मीही त्यांच्याशी एकदोनदा फोनवर बोलले होते.मंडळाबद्दल उशिरा समजले याची त्यांना हळहळ वाटत होती.बऱ्याचजणांबद्दल असे होते.माझ्या गप्पा या अशा पीडी शुभार्थींपर्यंत आमच्या स्वमदत गटाबद्दल माहिती पोचवणारे साधन ठरावे म्हणुनतर आहेत.नैराश्यासारख्या लक्षणासाठी तर स्वमदतगट निश्चित उपयोगी पडू शकतो.मंडळात यायला लागल्यावर अनेकजण नैराश्यातून बाहेर येतात.पार्किन्सन्स आणि नैराश्य यावर स्वतंत्रपणे मी लिहिले असल्याने पुन्हा येथे लिहित नाही त्या लेखाची लिंक मात्र देत आहे
https://parkinson-diary.blogspot.in/2017/04/blog-post_7.html
                           येथे जाताजाता एक सांगावेसे वाटते,सभेला येऊ न शकणाऱ्या शय्य्ग्रस्तांसाठी मोबाईलवर वेब साईट पाहता येईल अशी यंत्रणा आणि शुभंकर सारखे App म्हणूनच मला महत्वाचे वाटते.शय्याग्रस्त हा एक स्वतंत्र गप्पांचा विषय आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune हा युट्युब channel पहा.

                         
                         

No comments:

Post a Comment