Monday 16 April 2018

पार्किन्सन्स विषयक गप्पा - १२

                                               पार्किन्सन्स विषयक गप्पा - १२
                                 गप्पांमध्ये बराच खंड पडला.सुरुवातीला माझ्या आणि नंतर गप्पांचे शब्दांकन करणाऱ्या सईच्या स्मार्टफोनने ओव्हर स्मार्टनेस दाखवायला सुरुवात केली.काही दिवस माझ्या इंटरनेटच्या अंगात आले.आता मात्र अत्यंत निकड वाटल्याने संवाद साधावा असे वाटले.
                                 माझ्या मुंबईच्या आत्येभावाचा अनिल कुणकेरकरचा फोन आला. त्याच्या साडूना पीडीचे निदान झाले होते.तो म्हणाला,"तु म्हणे पार्किन्सन्सचा आजार  बरा करतेस?" मला काय उत्तर द्यावे तेच सुचेना.पीडी बरा करतो सांगणार्यांविषयी सावध राहण्यासाठी,पार्किन्सन्स साक्षरतेसाठी मी माझी लेखणी आणि वाणी झिजवत आले.हेची फळ काय मम कामाला? असे झाले.तो तिथून विचारत होता.'ऐकू येतंय ना?'
'हो हो ' मी भानावर येत म्हटल.त्याला मी पार्किन्सन्स बरा न होणारा आजार आहे.लक्षणावर नियंत्रण करून जगण्याची गुणवत्ता वाढवता येते.वगैरे वगैरे अर्धा तास सांगत राहिले.शेखर बर्वे यांचे' पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत ' हे पुस्तक पाठवते त्यातून तुला या आजाराबद्दल यथार्थ माहिती समजेल असेही सांगितले.फोनवर त्याचे साडू दत्तात्रय मोर्डेकर,त्यांच्या पत्नी यांच्याशी बोलणे झाले.ते सर्व Whats app ग्रुपवर सामील  झाले. वेबसाईटची  लिंक त्यांना पाठवली.तासाभरात माझ्याबद्दलची वावडी किती चुकीची आहे हे पटवण्यात मी यशस्वी झाले होते.आणि मग मला हुश्श झाले.अनिलशी  बोलण्यातून या वावडीचे मुळ बेळगावात असल्याचे लक्षात आले.यापूर्वीही 'गोपू तीर्थळीचे पिणे वाढले आहे,धड बोलता येत नाही हात थरथरतात' अशी एक वावडी उठली होती.आम्हाला ओळखणाऱ्यांनी असे सांगणार्यांना झापले होते. त्यावेळी आम्ही ते चेष्टेवारी नेले. ही वावडी मात्र अशी नव्हती.हिला मुळापासून काढणे जरुरीचे होते.मूळ बेळगावचे असणाऱ्या काही जणांच्यात मित्रमंडळात सामील झाल्यावर खूपच फरक पडला होता. अर्थात मंडळात सामील झाल्यावर पार्किन्सन्सला स्वीकारून आनंदी राहण्याची प्रक्रिया जवळजवळ सर्वांच्यातच होते.आत्मविश्वास वाढतो.यातूनच वस्तुस्थितीचा विपर्यास झाला असावा.
                             यामुळे एक चांगले झाले.ही सर्व मंडळी पार्किन्सन्स मित्रमंडळाशी जोडली गेली.अनिलने तर पाच हजाराचा चेक लगेच आमच्या बँक अकाऊन्टवर जमा केला.एव्हढेच नाही तर  ९ एप्रिलच्या जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या कार्यक्रमाला खास मुंबईहून हे सर्व जण पुण्यात आले.आणि भरपूर सकारात्मक उर्जा घेऊन गेले.
                              हल्ली फेसबुक,whats app वरून पीडी बरा करतो असे दावे करणाऱ्या व्हिडिओजचा सुळसुळाट झाला आहे कृपया त्याला भुलू नका.या गप्पातून एवढा संदेश पोचला तरी पुरेसे आहे.
                        

No comments:

Post a Comment